वरुण अ‍ॅग्रो - स्त्रीशक्तीची प्रेरक कहाणी

विवेक मराठी    28-Feb-2026
Total Views |
 Varun Agro Processing Foods / Manisha Dhatrak
 
@ दत्ता जोशी 
आपण शिक्षण घेतले आहे ते स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी. त्यामुळे लग्नानंतर घरातच बसावे लागणार असेल तर तेथे लग्नच नको, अशी ठाम भूमिका घेणार्‍या मुली किती असतील? पण मनीषा शशिकांत धात्रक यांनी तशी ठाम भूमिका घेतली. त्या मुद्द्यावर काही स्थळेही नाकारली. जिद्दीतून पुढे येत त्यांनी विवाहोत्तर आयुष्यात स्वतःच्या उद्योगाचे बीजारोपण केले. साधारण 1996 मध्ये शुभारंभ झालेल्या या उद्योगाचा आजचा विस्तार एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीला कच्चा माल पुरविणार्‍या मोठ्या कंपनीत झाला आहे. ‘वरुण अ‍ॅग्रो’ ही अ‍ॅग्रीकल्चर फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील कंपनी शेकडोंना थेट रोजगार आणि हजारोंना बाजारपेठ मिळवून देते. या कंपनीच्या संस्थापक मनीषा धात्रक यांची वाटचाल मोठी संघर्षपूर्ण अशी आहे.
नाशिकहून पेठ रस्त्यावर पुढे जाताना उमराळे नावाचे एक गाव लागते. या गावातील ‘कॅपिटल हिल’वर ‘वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फुड्स प्रा. लि.’ नावाचा उद्योग कार्यरत आहे. सन 1996 मध्ये या कंपनीची सुरवात झाली. कृषिप्रक्रिया क्षेत्रात एका उद्योजिकेने सुरू केलेली ही पहिलीच कंपनी. त्या काळी त्या स्वतः वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये आपण बनविलेला टोमॅटो केचप ठेवावा या साठी मार्केटमध्ये उतरत असत. हा पुरवठा पुढे वाढत गेला. काही वर्षांतच टोमॅटो केचपचे रूपांतर टोमॅटो पल्पच्या उद्योगात झाले. आता त्यांचा पल्प भारतातील बहुतेक सर्व प्रमुख बड्या कंपन्या खरेदी करतात आणि त्यांनी तयार केलेला टोमॅटो सॉस देशभरातील दुकानांतून विकला जातो. एकेकाळी पत्र्यांच्या साध्या शेडमध्ये सुरू झालेला त्यांचा उद्योग आता भव्य इमारतीत विस्तारला आहे. क्षमता हजारो पटींनी वाढली आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कंपनीने शेतकरी व विदेशी आयातदारांत विश्वास निर्माण केला. शेतकर्‍यांबरोबरच करार करून शाश्वत असे उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने क्रांतिकारी पर्वाला सुरुवात केली. आज कंपनीने सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍याच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे.
 


varun agro 
 
हाडाच्या शेतकरी असलेल्या मनीषा शशिकांत धात्रक यांची ही कथा. शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून असल्याने बळीराजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना सतत त्यांच्या मनात असे. शेतमाल कवडीमोलानेच विकला जात असल्याने त्याला काहीतरी पर्याय शोधावा, या हेतूने त्यांनी शेतकर्‍यांना सोबत घेऊन ’वरुण फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ सुरू केली. यात शेतकर्‍यांना चांगला भाव मिळवून देऊन शाश्वत आर्थिक विकासाकडे नेले.
 
मनीषा या पोलीस कर्मचार्‍याच्या कन्या. त्यांचे वडील गोविंदराव मानकर नोकरीच्या निमित्ताने सतत गावे बदलत. त्यामुळे मनीषा यांचा जन्म मात्र आजोळी मुंबईत झाला. मालेगावच्या छत्रे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मनीषा व त्यांच्या भावंडांचे शालेय शिक्षण पार पडले. ‘शिकावेच लागेल’ या आईवडिलांच्या आग्रहामुळे मनीषा आणि त्यांच्या भावंडांना शिक्षण घ्यावेच लागले! अन्यथा या परिवारात शिक्षणाची पार्श्वभूमी तशी फारशी नव्हती. शिक्षणामुळे एक भाऊ आज क्लास वन ऑफिसर तर दुसरा कॉन्ट्रॅक्टर झाला आणि बहिण विज्ञान पदवीधर झाली.
 
मनीषा यांना 10वी नंतर प्रवरानगर येथे ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ला प्रवेश मिळाला. ते वर्ष होते 1988. मनीषा यांना तेव्हा 63 टक्के गुण मिळाले होते. मनीषा सांगतात, “त्या काळात मुले प्रामुख्याने सिव्हिलला प्रवेश घेत असत आणि मुलींसाठी कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन असे विषय असत. मी कुठली ब्रँच निवडायची असा प्रश्न होता. तेव्हा प्रवरानगरच्या त्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर नुकतेच सुरू झाले होते. स्टाफ फारसा नव्हता. टेलिकम्युनिकेशनमध्ये मुलीच मुली भरलेल्या होत्या. त्या सगळ्यांना नोकर्‍या कशा मिळणार, अशी शंका मला आली. म्हणून मी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा वेगळाच विषय निवडला. इथे फक्त 15च मुली होत्या. इंजिनीअरिंग झाल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. तेव्हा मोठ्या घरचे, वेल सेटल्ड् लोक आले की माझ्या शिक्षणाबद्दल चांगले बोलत पण लग्नानंतर काम करता येणार नाही, घरच सांभाळावे लागेल, हे स्पष्ट करीत. त्यासाठी मी तयार नव्हते. मला तर स्वतःचा कारखाना उभा करायचा होता. त्यामुळे काम करण्याच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास मी तयार नव्हते. धात्रक परिवाराने माझा विचार समजून घेतला. माझे पती स्वतः बी.ए. होते. ग्रामीण भागातून बाहेर पडून त्यांनी नाशिकमध्ये राहून शिक्षण घेतले होेते. घरची शेती होती. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी अशी पिके ते घेत. नाशिकमध्ये त्यांनी छोटा फ्लॅटही घेतलेला होता. हे स्थळ सांगून आले, माझ्या कामाला त्यांनी मान्यता दिली आणि 1996 मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो आणि त्याच वर्षी वरुण अ‍ॅग्रोला सुरुवात केली.”
 
 
varun agro
 
औद्योगिक वाटचालीला प्रारंभ झाला. बर्‍याचदा नव्या उद्योजकांना मनोधैर्य खच्ची करणारे, नकारात्मक अनुभव येतात. पण मनीषा यांच्या वाट्याला सुदैवाने असे अनुभव आले नाहीत. लोक त्यांचे म्हणणे ऐकत गेले. बहुतेकांनी त्यांना व त्यांच्या उत्पादनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा हाती फक्त 5 हजार रुपयांचे भांडवल होते. त्यांना पाच लाखांची गरज होती. कुठलीच बँक त्यांना उभे करेना. नातेवाईकांकडून मदत मिळणार नव्हती. मग त्यांनी खासगी सावकाराकडून 27.5 टक्क्याने कर्ज घेतले. पहिल्या वर्षाअखेर त्यांनी 2 लाख रुपयांच्या मालाची विक्री केली. हे त्यांच्या दृष्टीने मोठे यश होते. त्या दोन लाखांना त्या काळी मोठी किंमत होती. पण पाच लाखाचे 27.5 टक्क्यांनी त्यांनी घेतलेले कर्ज त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत होते. कर्जातून त्यांनी कामचलाऊ बांधकाम करून घेतले, खेळते भांडवल म्हणूनही त्यातीलच रक्कम वापरली. पॅकिंग मशीन, बाटल्या यांची खरेदीही त्यातूनच केली. नफ्यातील मोठा वाटा व्याजातच जाऊ लागला. पहिल्या दोन वर्षांत त्यांनी कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित केले.
 
 
varun agro
 
त्यानंतर उद्योगाच्या विस्ताराची वेळ आली तेव्हा त्यांनी राष्ट्रियीकृत बँकेकडून प्रयत्नपूर्वक कर्ज मिळविले. कर्ज हाती आल्यानंतर त्यांनी अतिशय वेगात निर्णय घेतले. त्यांनी केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देखावे उभे करण्याचा मोह टाळला आणि आलेला सारा पैसा केवळ मूलभूत कामांवर खर्च केला. मशीनरी आधीपासूनच आलेली होती. 11 हजार चौरस फुटांचे बांधकाम करून मशिनरी इन्स्टॉल झाली. विजेची खास लाईन आणली गेली. पाण्याची स्वतंत्र लाईन आणली. पण या विस्तारासाठी लागणार्‍या विविध परवानग्यांनी मात्र त्यांना चांगलेच जेरीला आणले. यंत्रणेच्या आयातीचा विषय असल्याने नेहेमीप्रमाणे कस्टम्स विभागाने मोठा अडथळा आणला. त्यांनी अकारणच तब्बल 2 कोटींचे आयात शुल्क लावले. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून हे शुल्क काढण्यात सहा दिवस वाया गेले. वीज मंडळाच्या परवान्यासाठी त्यांना सहा दिवस त्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. वेळ जाऊ लागला तसे व्याजाचे ओझे वाढू लागले. मात्र शेवटी ते काम झाले.
 

varun agro 
 
प्रदूषण नियंत्रण विभागाच्या ना हरकत परवान्यासाठी त्यांना सर्वाधिक त्रास झाला. वास्तविक त्यांच्या उद्योगात कसल्याही रसायनांचा वापर नसल्याने हे प्रमाणपत्र मिळण्यात अडचण नव्हती. त्यांच्या वडिलांच्या वयाचे ते अधिकारी कारखान्यात येऊन गेले. प्रमाणपत्र देऊ असे त्यांनी सांगितले. पण ते मिळाले नाही. त्या थेट मंत्रालयात पोहोचल्या. त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाली. त्याने प्रमाणपत्र पाठविल्याचे सांगितले, पण तेही त्यांना मिळाले नाही. त्यातच गावातील काही हितशत्रूंनी त्यांच्या कंपनीच्या विरोधात काही खोट्या तक्रारी केल्या. अखेर त्यांनी मंत्र्यांना भेटण्याचे ठरविले. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी या विषयातील नियमच बदलला होता आणि जलाशयाच क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणाचा नियम बदलला. त्यानंतर त्या मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेल्या. त्या अधिकार्‍याने योगायोगाने मनीषा यांना टीव्हीवर मुलाखतीत पाहिले होते. तो चरकला. त्यांच्यासारख्या धडाडीच्या उद्योजिकेला झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला आणि दहा मिनिटांत थेट प्रमाणपत्र हाती आले. या सार्‍या प्रक्रियेत तब्बल दोन वर्षे गेली. तसेच भ्रष्टाचाराची विविध रूपे त्यांना अनुभवायला मिळाली.
 
 
या सार्‍या प्रक्रियांतून जात 13 एप्रिल 2012 रोजी नव्या युनिटचा शुभारंभ झाला. प्रारंभी 150 ते 200 टन प्रतिदिन असे उत्पादन सुरू झाले. पूर्ण लाईनची क्षमता पूर्णपणे वापरात येण्यात साधारण 2 वर्षे गेली. 2014 पासून हा उद्योग पूर्ण क्षमतेनिशी सुरू झाला. अगदी प्रारंभापासून ‘युनिलिव्हर’ने त्यांची उत्पादने खरेदी करण्यास प्रारंभ केला. प्रारंभी कंपनीसोबत 650 शेतकरी होते. ही संख्या 13-14 मध्ये 2200 वर गेली. या शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे, खते-कीटकनाशकांच्या वापराविषयी माहिती देणे, उत्तम पीक कसे घ्यावे या विषयीच्या टीप्स देणे ही कामे कंपनीचे अधिकारी करतात. युनिलिव्हरप्रमाणेच सिंजेंटा, बायर यासारख्या कंपनीचे तज्ज्ञ अधिकारीही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतात. त्यांनी शेतकर्‍यांचे गट केले. आधी शेतकरी दुकानात जात असे आणि दुकानदार देईल ते खत-कीटकनाशक घेऊन शेतात टाकत. आता ते प्रशिक्षित झाले आहेत. आता त्यांना यातील बारकावे कळले आहेत.
 
 
‘वरुण’शी जोडल्या गेलेल्या शेतकर्‍यांत आता नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकरी आहे, त्याचप्रमाणे नगर, पुणे, लातूर जिल्ह्यांतीलही काही शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. काही टोमॅटो गुजरातेतूनही येतात. त्यांची पूर्ण क्षमता आता वापरली जात आहे. एकेकाळी बँकांनी त्यांना असहकार्य केले किंवा आढेवेढे घेत, जास्त व्याजदराने कर्ज दिले. आज सुमारे पाच-सहा वर्षांच्या व्यवहारानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा बँकांचा दृष्टीकोन बदलला आहे.
 
 
कंपनीने 2015 मध्ये ’आयक्यूएफ’ (तत्काळ शीतल योजना) ही शीतकरणातील विदेशी पद्धतीची अत्याधुनिक पद्धत आणली. यातून वाटाणा, मका, गाजर, फ्लॉवर व कोबी ही भाजीपाला पिके कंपनीतील आयक्यूएफ पद्धतीने शीतल व स्वच्छ करून पुढे मॉलमध्ये पाठविण्यात येतात. यातील काही माल निर्यातीसाठी विविध देशांत पाठविला जातो. कंपनी थेट शेतकर्‍याच्या बांधावरून उत्पादनाची खरेदी करते. याशिवाय गरजेप्रमाणे मार्केटमध्ये आलेला मालही कंपनी खरेदी करते. तत्काळ शीतल योजनेसाठी लागणारा कच्चा माल कंपनी पूर्णपणे तपासून मगच खरेदी करत असल्याने विदेशात निर्यात होणारा हा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा राहणार असल्याने भविष्यातील निर्यातीच्या दृष्टीने पडणारे एक क्रांतिकारक पाऊल आहे. यासाठी लागणारी सर्व मशिनरी इटलीतून आयात केली आहे. यासाठी कंपनीने तब्बल 35 कोटींची यंत्रणा उभी केली आहे. हा तयार झालेला माल भारतासह जर्मनी, पोलंड, स्वीत्झर्लंड, सिंगापूर, दुबई, युनायटेड किंग्डम या देशांत पाठवला जाणार आहे.
 
 
कंपनीचे सभासद होण्यासाठी शेतकर्‍याचा सातबारा उतारा, पॅनकार्ड, छायाचित्र घेऊन कंपनीसोबत करार केल्यानंतर कंपनीतर्फे देण्यात येणार्‍या विविध सुविधांचा लाभ दिला जातो. कंपनीतर्फे सभासद शेतकर्‍यांना मार्गदर्शनाबरोबरच रोपे, बियाणे, आर्थिक सहाय्य, ठिबक सिंचन, प्लॅस्टिक क्रेट्स, कीटकनाशके याची उपलब्धता करून दिली जाते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीला युनियन बँकेचे सहकार्य मिळाल्याचे धात्रक सांगतात. सध्या तत्काळ शीतल योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खर्‍या अर्थाने कंपनी विदेशी बाजारपेठेत पाय रोवू शकेल. अशा प्रकारची ‘रेडी टू ईट फ्रोजन’ उत्पादने आजघडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मोठी गरज बनली आहेत.
 
 
कंपनीने विदेशी कंपनीसोबत करार केल्याने भाजीपाला पडून राहण्याची चिंता शेतकर्‍यांना राहणार नाही. कंपनी यापूर्वी टोमॅटो केचप, सॉस, पेरू, पपई, आंबा, केळी यांपासून तयार केलेली उत्पादने विदेशात निर्यात करीत आहे. आता गोठवलेली आणि निर्जलीकरण केलेली फळे अधिक पोषणमूल्ये राखून असतात, हे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीमध्ये चांगली वाढ होते आहे. त्यामुळे ग्राहक वाढतात आणि नवे करार होतात. हे करार होण्यासाठी कंपनीच्या प्रमुखाला सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमधून आपल्या कंपनीविषयी मार्केटिंग करणे गरजेचे असते. अशा प्रदर्शनांतून कंपनीच्या कर्तबगारीची माहिती जागतिक पातळीवर जाते आणि त्यातून नवे ग्राहक, नवी बाजारपेठ मिळते. कंपनीने ज्या शेतकर्‍यासोबत करार केलेला आहे, अशा शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन सर्व फळपिकांचे व भाजीपाल्याची खरेदी करणार असल्याने शेतकर्‍याची होणारी परवड थांबण्याबरोबरच त्याला एक शाश्वत असे आर्थिक उत्पन्न मिळेल, असे धात्रक यांनी सांगितले. आयक्यूएफ प्रणालीत तयार झालेला माल हा स्वच्छ व नीटनेटक्या पद्धतीने थंड केल्यामुळे त्यातील टिकाऊ व साठवणक्षमता, चवही तशीच राहणार असल्याने खाण्याच्या सवयीत कोणताही फरक पडणार नाही.
 
एक सामान्य महिला पूर्ण ताकदीने उभी राहिली आणि त्यांना घरातूनही साथ मिळाली तर कसे परिवर्तन घडून येऊ शकते हे मनिषा धात्रक यांनी दाखवून दिले आहे. आता त्यांची नवी पिढीही या उद्योगात उतरली असून पुढील दशकभरात ही कंपनी देशातील अग्रगण्य कंपन्यांच्या यादीत अग्रस्थानी दिसेल, असा विश्वास त्या व्यक्त करतात.