सुधारकी विचार मांडण्याला आणि त्याप्रमाणे कृती करण्याला प्रचंड धाडसाची आवश्यकता असते. हे धाडस अण्णासाहेबांनी-महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले. याकरिता ‘आधी केले मग सांगितले’ हे सूत्र अण्णांनी वापरले. हाती घेतलेले कार्य त्यांनी जराही क्षीण होऊ दिले नाही. 1896 सालात त्यांनी स्थापन केलेला ‘अनाथ बालिकाश्रम’ आज ‘महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था’ या नावाने आपल्या कार्याची 130 वर्षे पूर्ण करीत आहे. अण्णांनी घडवून आणलेल्या उत्क्रांतीचे जे लक्ष्य होते, तेे आता या ‘कर्वे’ पथावरून साध्य होताना दिसत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला आदिशक्ती म्हटले गेले आहे. केवळ विचारांतून नव्हे तर आचारांमधूनही स्त्रीला इथे युगानुयुगे सन्मान दिला गेला. उक्ती किंवा कृतीद्वारे स्त्रीचा निरादर हा इथे अपराध समजला गेला. स्त्रीचा जिथे सन्मान होतो, तिथे देवतांचा वास असतो अशी श्रद्धा इथे पिढ्यान्पिढ्या जपली गेली. सर्व प्रकारचे शिक्षण हा तिचा अधिकार होता. पाकगृह ते शल्यचिकित्सा अशा सर्व ज्ञानक्षेत्रांत तिचा संचार होता. पण मध्ययुगात अनेक सामाजिक स्थित्यंतरांमुळे, विशेषत: परकीय आक्रमणांमुळे स्त्री अबला बनली. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन अशा घातक परंपरा समाजात रुजल्या आणि कितीतरी मुलींच्या आयुष्याचे मातेरे झाले. असल्या परंपरांना धार्मिक आधार दाखवले की, त्याबद्दल बोलताना भल्याभल्यांची वाणी निष्प्रभ होई; कारण काही बोलले की तो ठरणार पाखंडी, मग निंदा-नालस्ती, सामाजिक बहिष्कार हे ‘दगड-धोंडे’ आहेतच. नुसते बोलण्याचीच मारामार, मग कृती कोण करणार?
पुनरुत्थानाचा आरंभ
अशा वातावरणात सुधारकी विचार मांडण्याला आणि त्याप्रमाणे कृती करण्याला प्रचंड धाडसाची आवश्यकता असते. हे धाडस अण्णासाहेबांनी-महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले. बालविधवांना अजिबात सन्मान नसण्याच्या या काळात अण्णांनी एका विधवेशी स्वत: विधिवत पुनर्विवाह केला. स्वत: गणिताचे प्राध्यापक असलेल्या अण्णांनी तत्कालीन विधवा बालिकांचे क्लिष्ट गणित ‘आधी केले मग सांगितले’ हे सूत्र वापरून सोडविले. केवळ पुनर्विवाह केला, इतक्याच कारणास्तव अण्णा व त्यांच्या पत्नी आनंदीबाई तथा बाया या दोघांनीही समाजाकडून कटू निंदानालस्ती सहन केली आणि बहिष्कारही अंगावर घेतले. मात्र हाती घेतलेले कार्य त्यांनी जराही क्षीण होऊ दिले नाही. उलटपक्षी, अनेक नवनवे सहकारी या कामी कौशल्याने जोडून घेत या कार्याचा मोठा विस्तार पुढे घडवून आणला. 1896 सालात त्यांनी स्थापन केलेला ‘अनाथ बालिकाश्रम’ आज ‘महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था’ या नावाने आपल्या कार्याची 130 वर्षे पूर्ण करीत आहे.
हा सर्व प्रपंच उभा करण्यामागे एक निश्चित आणि सुसंबद्ध असा विचार होता. हा विचार होता स्त्रीला सर्वच दृष्टीने आत्मनिर्भर बनविण्याचा. महर्षी कर्वे हे स्वत: अत्यंत संवेदनशील आणि कोमलहृदयी व्यक्ती होते. शिवाय निसर्गत:च अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. याआधारे तत्कालीन स्त्रियांची अगतिक अवस्था त्यांनी डोळसपणे पाहिली, समजून घेतली आणि अत्यंत विचारपूर्वक आपल्या कामाची दिशा निश्चित केली. इथे त्यांच्या अंगी असलेला तिसरा गुण त्यांच्या कामी आला आणि तो म्हणजे ‘कठोर परिश्रम’ करण्याची तयारी. महर्षी कर्वे यांच्या कार्याचे तीन टप्पे प्रामुख्याने पाहायला मिळतात. पहिल्या टप्प्यात विचार झाला तो अनाथ बालिका आणि विधवांना शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा. म्हणूनच स्थापन झालेल्या संस्थेचे नाव प्रथम ‘अनाथ बालिकाश्रम’ असेच ठेवले गेले होते. हे काम सुरू केल्यानंतर काही दिवसांतच सर्वसामान्य मुलींसाठी शिक्षणाची गरजही अण्णांच्या लक्षात आली आणि दुसर्या टप्प्यात महिला विद्यालयाची सुरुवात झाली. या विद्यालयातही सर्व स्तरांतील अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी येऊ लागल्या. पण इतके करूनही पुरेसे नाही असा विचार करून स्त्रीशिक्षणाच्या संदर्भातील तिसरा टप्पा ओलांडला गेला तो स्वतंत्र महिला विद्यापीठाच्या रूपाने. खरे तर 1857 सालीच भारतात विद्यापीठांची स्थापना झाली होती. मुंबई विद्यापीठ होतेच. या विद्यापीठांतून स्त्रियांना शिक्षण घ्यायला बंदी होती असेही नाही. पण तरीही अण्णा महिला विद्यापीठासाठी आग्रही होते. स्त्रीशिक्षणाबाबतचे आपले विचार त्यांनी आपल्या आत्मवृत्तामध्ये पुढील प्रकारे स्पष्ट केले आहेत -
अ) स्त्रिया म्हणजे मानवजातीचे घटक व स्वत्वविशिष्ट व्यक्ती आहेत हे ओळखून त्यांना शिक्षण द्यावे.
आ) सुपत्नी व सुमाता होण्याची पात्रता त्यांच्या अंगी येईल असे शिक्षण त्यांना देणे.
इ) आपल्या प्रापंचिक जीवनाचा राष्ट्राच्या उन्नती-अवनतीशी, अस्फुट असला तरी निकट संबंध आहे असे त्यांच्या नेहमी ध्यानात राहील अशा प्रकारचे शिक्षण त्यांस देणे .
स्वत: पाश्चात्य शिक्षणपद्धतीत शिकलेल्या अण्णांचा हा विचार पूर्णत: भारतीय असल्याचे यावरून स्पष्ट होते. भारतीय कुटुंबव्यवस्था हा राष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण आणि आधारभूत घटक असून या कुटुंबाचा कणा म्हणजे स्त्री आहे आणि म्हणून तिचे स्त्रीत्व विकसित होईल अशा पद्धतीचे शिक्षण तिला मिळायला हवे, असे त्यांचे चिंतन होते.
कार्यपद्धती आणि विस्तार
स्त्रीच्या वैचारिक परिवर्तनाचे केवळ स्वप्न पाहून अण्णा थांबले नाहीत, तर आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणणार्या अनेक समर्पित महिला कार्यकर्त्या घडत राहतील अशी आश्रमाची कार्यपद्धती त्यांनी विकसित केली. त्याद्वारे संस्थेच्या पहिल्या आजन्म सेविका पार्वतीबाई आठवले 1902 सालात अण्णांच्या मदतीला आल्या. प्रथम स्वत:चे शिक्षण पूर्ण करून आणि काही काळ संस्थेत काम करून पार्वतीबाई निधीसंकलनाच्या कार्यासाठी बाहेर पडल्या. भारतातील विविध प्रांत फिरण्याबरोबरच पुढे परदेशांतही या कामासाठी त्या गेल्या आणि तेथूनही त्यांनी संस्थेला मोठी मदत मिळवून दिली. त्याचप्रमाणे काशीबाई देवधर, वेणुबाई नामजोशी यांसारख्या महिला कार्यकर्त्याही याच काळात आजन्म सेविका म्हणून संस्थेत दाखल झाल्या आणि अंतर्गत व्यवस्थापनाचे काम करण्याबरोबरच संस्थेच्या उत्तम प्रवक्त्या बनून निधीसंकलन कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अण्णांच्या स्वप्नातील स्वत: विचार करणारी, आपला विषय समाजात निर्भयपणे मांडणारी, नवीन कौशल्ये शिकून आत्मसात करणारी नव्या काळातील स्त्री अशी घडली. संस्थेच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे वैचारिकता घडविण्याची ही प्रक्रिया आजही चालू आहे.
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचा पुढे होत गेलेला विस्तार पाहिल्यास वैचारिक बदलाची हीच दिशा विकसित झालेली पहावयास मिळते. 1979 साली ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत ‘संपदा बेकरी’ची सुरुवात संस्थेत झाली. स्वावलंबन आणि कौशल्य-विकास या दोन्ही गोष्टी याद्वारे साधल्या गेल्या. ग्रामीण भागातील असंख्य गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थिनींना या योजनेमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले. आजही बेकरीच्या कर्मचार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात त्या विद्यार्थिनी. यातील शेकडो विद्यार्थिनींनी इथे शिकून पुढे आपले स्वत:चे व्यवसायही सुरू केले आहेत.
सन 1896 ते 1990 पर्यंत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व अध्यापक विद्यालय हेच प्रामुख्याने संस्थेचे कार्यक्षेत्र होते. मात्र बदलत्या काळात उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेत 1990 नंतर नवे संक्रमण घडले. यात प्रथम 1990 मध्ये श्री सिध्दीविनायक महिला महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन, माहिती/तंत्रज्ञान, परिचारिका-प्रशिक्षण, अध्यापिका-प्रशिक्षण अशा सर्व शाखा विकसित झाल्या, स्थिरावल्या. स्त्रीला मोकळे अवकाश मिळत गेले. आज पुणे, सातारा, वाई, नागपूर, रत्नागिरी व कामशेत या ठिकाणी एकूण 77 शाखा सर्व स्तरांतील महिलांसाठी कार्यरत आहेत.
कामशेत येथील आश्रमशाळा तर आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम करते. याद्वारे दर्जेदार शिक्षण तसेच आदिवासी समुदायाच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आता 450च्या वर गेली आहे. प्रस्तावित प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन परिघीय आदिवासी क्षेत्रांचे सर्वेक्षण केले जाते. इथे दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. दहावी झाल्यानंतरही संस्थेच्याच पुण्यात असलेल्या महाविद्यालयांत यातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण आता मार्गी लागत आहे.
व्यावसायिक शिक्षणाचे वाढते महत्त्व आणि आवश्यकता लक्षात घेऊन 1990 साली संस्थेच्या कर्वेनगर परिसरात ‘मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MNVTI)’ या शाखेचा प्रारंभ झाला. यथावकाश ‘बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI) या नावाने पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी आणि नागपूर या स्थानीसुद्धा हे अभ्यासक्रम सुरू झाले. याद्वारे महिला सक्षमीकरणासाठी हस्तकला, फॅशन आणि पर्यावरणपूरक उपक्रम यासारख्या क्षेत्रात उद्योजकता आणि रोजगारासाठी प्रत्यक्ष शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाते. सोबतच संगणक, इंटिरियर डिझाइन, फॅशन डिझाइन, सौंदर्य संस्कृती, मेक-अप आर्ट, अन्ननिर्मिती असे विविध अभ्यासक्रम यात समाविष्ट आहेत. झोपडपट्टी भागातील ज्या महिलांना संस्थेत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी त्या स्थानी जाऊन प्रशिक्षण देण्यातही संस्थेने पुढाकार घेतला आहे. तसेच विविध उद्योगांमध्ये आणि समाजामध्ये मागणी अथवा आवश्यकता असलेल्या कौशल्यांनुसार अभ्यासक्रम तयार केले जातात, त्यामुळे या अभ्यासक्रमांची उपयुक्तता आपोआपच वाढते. या शाखांच्या माध्यमातून सामान्य स्तरातील हजारो महिला व मुली आत्मनिर्भर झाल्या आहेत.
अर्थात स्त्रियांच्या सर्व समस्या संपल्या आहेत, असे नाही. या समस्यांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी संस्थेने 2003 या वर्षात ‘बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्राची’ स्थापना केली. याद्वारे महिलांसाठी कायदेविषयक माहिती, प्रेम, मैत्री आकर्षण अशा संवेदनशील विषयांबद्दल जागरण, महिला उद्योजकता विकास या विषयांवर कार्यक्रमांची आखणी होते. दिलासा समुपदेशन केंद्र, मानसमित्र, स्वास्थ्यशिल्पी यासारख्या समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे आरोग्य जपणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यशाळा घेण्याचे काम येथे होते.
याखेरीज संस्थेमार्फत चालविल्या जाणार्या वसतिगृहांचा लाभ बाहेरील विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर होत आहे. पुण्यात डेक्कन परिसरात गार्गी, कर्वेनगर परिसरात मैत्रेयी आणि सदाशिव पेठेत ‘महिला निवास’ ही वसतिगृहे खास नोकरदार महिलांसाठी उभारण्यात आलेली असून अनेक व्यावसायिक महिला त्याद्वारे लाभान्वित होत आहेत. काळाची पाऊले ओळखून अशा वसतिगृहाची सुरुवातही अण्णांनी 1953 सालातच केली होती, हे विशेष.
उपसंहार
केवळ चार बालिकांपासून सुरू झालेला हा आश्रम आज 35000 हून अधिक बालिकांना एकावेळी सामावून घेण्याच्या क्षमतेचा बनलेला आहे. हा केवळ विस्तार नाही तर ही स्त्रियांच्या जीवनात घडलेली एक उत्क्रांती आहे. महर्षी कर्वे यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसते आहे, कारण आजवर लाखो मुली येथून आत्मनिर्भर होऊन बाहेर पडल्या असून समाजाच्या विभिन्न क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. स्त्री वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या पुढे जाऊन स्त्री आणि पुरुष या दोघांनाही लिंगसाक्षर बनविणे म्हणजेच कर्तृत्व मोजताना लिंग ही बाब अप्रस्तुत असल्याचे शिक्षण, ही आजच्या काळाची गरज आहे. कर्वे संस्थेत अशा प्रकारचे शिक्षण तर दिले जातेच, पण त्याबरोबरच मुला-मुलींचे सहशिक्षण जिथे दिले जाते, त्या ठिकाणी याबाबत जागरण करण्याचे कामही संस्थेच्या माध्यमातून होत असते. हा विचार समाजात रुजविणे हेच खरे तर अण्णांनी घडवून आणलेल्या या उत्क्रांतीचे लक्ष्य होते, जे आता साध्य होताना दिसत आहे.
अर्थात आव्हाने आजही शिल्लक आहेतच. कारण सुदूर ग्रामीण/आदिवासी भागातील स्त्रीशिक्षणाच्या मूळ प्रवाहात येणे बाकी आहे. शिवाय दहावी/बारावीनंतर मुलींचा शिक्षणविराम अर्थात ‘ड्रॉप आऊट’ हेदेखील दुर्लक्षणीय नक्कीच नाही. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या जगात कुटुंब व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. ही आव्हाने शिक्षणाच्या माध्यमातून पेलली गेल्यास महर्षी कर्वे यांनी पाहिलेल्या स्वप्नांची खर्या अर्थाने परिपूर्ती झाली असे म्हणता येईल. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था हेच लक्ष्य ठेवून निरंतर कार्यरत आहे.
सामग्री-लेखक, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था