नीर्वेद मसाले - ध्यास शुद्धतेचा

विवेक मराठी    28-Feb-2026
Total Views |
@अपर्णा देशपांडे
 

Nirved Masale 
फार अल्प काळात ‘उत्तम चवीसाठी नीर्वेद’ अशी प्रसिद्धी उत्कर्षा कुलकर्णी यांच्या व्यवसायाला मिळाली आहे. फार मोठं भांडवल न गुंतवता, घरच्यांची आर्थिक मदत न घेता शक्यतो स्वतःच्या बळावर उत्कर्षा यांनी व्यवसाय उभारला आहे. शुद्धतेची हमी आणि ग्राहकांचा विश्वास राखणे हे उत्कर्षा कुलकर्णी आपल्या व्यवसायाचे यश मानतात.
उत्कर्षाताई, एक व्यावसायिक म्हणून तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तुम्हाला आधीपासूनच व्यवसाय करण्याची आवड होती का? म्हणजे आधीपासूनच तसं ठरवलं होतं का?
 
- हो. अगदी आधीपासूनच मला व्यवसाय करण्याची इच्छा होती, आणि आवडही. मी काही अगदी छोटे-छोटे व्यवसाय करून बघितले होते. त्या दृष्टीने वेगवेगळे प्रशिक्षणही घेतले होते. खादी ग्रामोद्योगतर्फे चालवण्यात येणारे लघुउद्योग पूरक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यावरून मी काही काळ पाककला वर्गही चालवले. काही काळ मुलांसाठी खेळणी लायब्ररी चालवली. तेव्हा निगडी परिसरात माझ्या बर्‍याच ओळखी झाल्या. ज्याचा मला आताच्या व्यवसायासाठी बराच फायदा झाला.
 
शिवाय आम्ही उछउ मशीन तंत्रज्ञान शिकवण्याचे वर्ग चालवत होतो. म्हणजे माझे पती जितेंद्र कुलकर्णी यांनी साधारण 1998 च्या सुमारास प्रशिक्षण संस्था सुरू केली होती... जर्मन, फ्रेंच, चायनीज भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू होते. तो व्यवसाय अगदी चांगला सुरू असताना काही अडचणी आल्या आणि आमचे भोसरीमधील औद्योगिक विभागात स्थलांतर झाले. आजूबाजूच्या गावांमधून फार मोठ्या संख्येने मुलं प्रशिक्षण घ्यायला येत असत, कारण तेव्हा उछउ मशीन कामगार व तंत्रज्ञांची फार गरज होती.
 
 
हा व्यवसाय तेजीत असताना पुन्हा वेगळा मसाल्यांचा व्यवसाय का करावा वाटला?
 
 
- त्याचा एक रंजक किस्सा आहे. त्याचं झालं असं, की आमच्याकडे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जवळपासच्या खानावळीत जेवत असत. तिथं त्यांचं जेवण नीट होत नसे, म्हणून मी घरून जेवण पाठवण्याचं ठरवलं. साधारण पन्नास डबे रोज जात असत. मुलं तर जेवायचे, पण भाज्यांना माझ्या मनासारखी चव येत नव्हती. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या, आपण घरीच मसाले करून बघूया. मग सांगलीमध्ये एक किलो मसाला करून बघितला. त्यासाठी सांगलीच्या बाजारपेठेतून अनुभवी लोकांच्या मदतीने सगळी सामग्री आणली. तो मसाला मात्र अतिशय उत्तम चवीचा ठरला. जेवणाला चव यायला लागली. नेमकं त्याच काळात आमच्या व्यवसायात खूप फटका बसला आणि पुन्हा एकदा माझ्या मनात आणखी काय उद्योग करता येईल ह्यावर विचार झाला. फार मोठं भांडवल न गुंतवता, घरच्यांची आर्थिक मदत न घेता शक्यतो आपल्याच बळावर काहीतरी करू असं मनात होतं. तेव्हा मैत्रिणी म्हणाल्या की, मी जो मसाला घरी बनवते, त्याचेच उत्पादन करून व्यवसायात रूपांतरित केलं तर? ही कल्पना उत्तम वाटली आणि मग हाच उद्योग करण्याचा निर्णय घेतला.
 


Nirved Masale 
 
 
उद्योगासाठी नीर्वेद हे नाव कशामुळे सुचलं?
 
- एकदा निर्णय झाल्यावर ह्या व्यवसायातील बारकावे समजावून घेणं आवश्यक होतं. म्हणून मग मसाल्यांच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना भेटून त्यांचं काम बघायला सुरुवात केली. माझ्या असं लक्षात आलं की, मसाल्यांमध्ये भेसळ करण्यास प्रचंड वाव आहे आणि त्याचा गैरफायदा बरेच व्यावसायिक घेतात. ते सगळं फार अस्वस्थ करणारं होतं. तेव्हाच मी ठरवलं की, मी अत्यंत शुद्ध, विनाभेसळ मसालेच बनवणार. तिथे कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. म्हणून शुद्ध म्हणजे नीर्वेद हे नाव ठेवलं. त्यासाठी उत्तम प्रतीचा माल कसा ओळखायचा ह्याचाही अभ्यास केला.
 
उत्तम!
पण उच्च प्रतीचा माल म्हणजे किंमतही तशीच असणार. अशावेळी बाजारातील इतर व्यावसायिकांसमोर टिकण्याचं आव्हान कसं पेललं?
 
- अगदी पाहिल्यांदा मी जेव्हा एक एक किलो मसाले बनवले तेव्हा मला साधारण सहाशे रुपये प्रति किलो मोजावे लागले पण बाहेर चारशे-साडेचारशे रुपये प्रति किलो इतका कमी दर होता. त्या परिस्थितीत माझे आप्त आणि मित्रमंडळी मदतीला आली. त्यांनी माझ्याकडून मसाल्यांची पाकिटं विकत घेऊन ती भेट म्हणून इतरांना देणं सुरू केलं. ती चव सगळ्यांनाच आवडू लागली, मागणी होऊ लागली. मी देखील गृहिणींच्या एकत्रीकरणात जाऊन माझ्या मसाल्यांची माहिती देऊ लागले. फार अल्प काळात ’उत्तम चवीसाठी नीर्वेद’ अशी प्रसिद्धी होऊन खप वाढला.
 
 
मसाल्या व्यतिरिक्त नीर्वेदचे इतर ’प्रॉडक्ट्स’ही आहेत ना?
 
- हो, अनेक प्रकारचे मसाले, उपवासाचे आणि इतर इन्स्टंट मिक्सेस पण आम्ही बनवतो. ते मी हळूहळू मागणीनुसार बनवत गेले. आता आमच्याकडे उपवासाची खीर, खास मागणी असलेलं इन्स्टंट ढोकळा मिक्स, साबुदाणा वडा मिक्स, मूग भजी, उपवास इडली, मेदुवडा मिक्स, भरडा वडा मिक्स आणि अगदी बाटी मिक्स देखील आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार एक-एक मसाले आणि मिक्स वाढवत गेलो. आम्ही अनेक प्रकारची तयार पिठं देखील बनवतो. आता तर फक्त भारतात नाही, तर अनेक देशात आपले ग्राहक आहेत. आवर्जून फोन करतात, येऊन भेटतात, किंवा प्रॉडक्ट आवडले म्हणून आवर्जून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवतात. तेव्हा खूप छान वाटतं.
 
 
Nirved Masale
 
घरातून सुरू केलेल्या व्यवसायाचं खूप लवकर एका उद्योगात रूपांतर झालं ह्यातच नीर्वेदचं यश दिसतं.
 
तुम्ही मोठ्या जागेत उत्पादन केव्हा सुरू केलं? आणि तुम्हाला कोणते चांगलेवाईट अनुभव आले?
 
- 2020 मध्ये कोविड काळात नीर्वेद उत्पादनांची मागणी खूपच वाढली. तेव्हा नियम थोडे शिथिल झाल्यावर पुरवठा करताना यंत्रणा कमी पडू लागली. शिवाय समाजमाध्यमांमुळे नीर्वेदची ओळख सर्वत्र पसरली होती. म्हणून आम्ही वाल्हेकर वाडी इथे जागा घेऊन यंत्रसामग्री आणून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलं. एक अनुभव सांगते. ओळखीच्या एका व्यक्तीने त्यांच्या संस्थेसाठी तीन हजार पाकिटं मसाल्यांची मागणी केली. तेव्हा दीड दोन लाखांची ऑर्डर म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी आनंदाच्या भरात त्यांच्याकडून कुठलीही नोंदणी रक्कम न घेता तीन हजार पाकिटं तयार केली, त्यासाठी जास्तीचा वेळ आणि जास्तीचे कामगार वापरले. असं असताना ऐन वेळेवर त्यांनी त्यांची ऑर्डर रद्द केली. 2021 मध्ये इतका मोठा माल इतरत्र विकणं हे एक आव्हान आणि शिवाय माझ्यासाठी एक मोठा धडाही होता. व्यावसायिकतेचे काही नियम असतात आणि ते पाळले नाही तर कसं नुकसान होतं हे मी शिकले. मोठ्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात नीर्वेद मसाले जातात, ग्राहक आनंदानं जेवतात, पण तिथं नीर्वेदचं नाव पुढे येत नाही. आम्ही नीर्वेद वापरतो असं त्यांनी जाहीरपणे सांगावं इतकं नाव आमचं झालं पाहिजे. एका महिलेनं मसाले विकणं हे अनेकांच्या दृष्टीनं कमी प्रतीचं मानलं जात होतं. शंभर दोनशे रुपयांच्या पाकिटांचा काय व्यवसाय... असा काहीसा चुकीचा समज होता. तो समज दूर करणं हे एक आव्हान होतं.
 
 
आज नीर्वेद मसाले हे एक विश्वासाचं नाव आहे, पन्नास-साठ लाखाची उलाढाल आहे, ह्यात तुम्ही कुणाला तुमचे स्पर्धक मानता?
 
- निर्वेदची कुणाशीही स्पर्धा नाही आणि असणारही नाही. उलाढाल कितीही असो, शुद्धतेची हमी आणि ग्राहकांचा विश्वास राखणे जास्त महत्त्वाचे. आमचे उपकरणं आणि यंत्रसामग्रीदेखील आम्ही कायम स्वच्छ ठेवत असतो.
 
 
ग्राहकांना नीर्वेदचे हवे ते प्रॉडक्ट त्यांच्या घराजवळील दुकानात दिसणं आणि ते सहज उपलब्ध करून देणं ह्यावर आम्ही काम करतोय. त्यासाठी नीर्वेदचे पॅकेजिंग, ब्रँडिंग करून देशभर वितरक नेमणे ह्यावर सध्या काम सुरू आहे. आजवर नीर्वेदचे अधिकृत वितरक असे नेमले नव्हते, पण आता आम्ही ते करू. पुनर्विक्री करणार्‍या जवळपास तीसेक महिला आणि आमचे नियमित ग्राहक ह्यांच्यामार्फत आम्ही विक्री करत होतो आणि पुढेही करू. ह्यातून अनेक महिलांनी त्यांचे व्यवसाय उभे केले आहेत आणि घरासाठी मोठं आर्थिक पाठबळ उभं केलं आहे.
 
महिला सबलीकरणावर तुम्ही कायमच काम करत आलेला आहात. त्यासाठी तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळाले. त्याबद्दल सांगाल का?
 
- विविध स्तरांतील महिलांना नीर्वेदचे उत्पादन पुनर्विक्रीसाठी देताना त्यांना परवडेल अशा पद्धतीने देणे, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण देणे हे तर आम्ही करतोच. शिवाय काही संस्थांमार्फत येणार्‍या महिलांना मसाल्यांच्या व्यवसायाबद्दल निःशुल्क माहिती देण्याचंही काम करतो. पुण्यात पर्वतीजवळील सेवा सहयोग संस्था महिलांसाठी काम करते. तिथल्या महिलांना सगळी माहिती दिली. त्यांच्यात आपण काही करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. हे एक उदाहरण झालं. असं आमचं काम सुरूच असतं. आता पुरस्कारांचं म्हणालं तर पुरस्कार हे आपले मनोबल वाढतात. आपल्या कामाची कुठेतरी नोंद होतेय ही नक्कीच आनंदाची बाब आहे. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीतर्फे यशस्वी उद्योजिका पुरस्कार, रोटरी क्लबतर्फे संघर्षशील महिला पुरस्कार, सावरकर महिला मंडळामार्फत उद्योजिका पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, अन्नपूर्णा पुरस्कार... असे बरेच पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा नीर्वेद कायमच प्रयत्न करत राहील, हे नक्की.