पाडव्याचा संकल्प

विवेक मराठी    14-Mar-2026
Total Views |
@ वैद्य ज्योत्स्ना पेठकर

Gudi Padwa 2026
आयुर्वेदात एक खूप छान सूत्र सांगितले आहे - ‘शरीरम् आद्यम् खलु धर्म साधनम्.’ आपल्याला जे जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे आणि आपण ते औषधं न घेता उत्तम राखले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी एकच गोष्ट आहे - ऋतुचर्या! चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर आपण सगळेच ऋतुचर्या पालनाचा संकल्प करूया!
नवीन वर्ष सुरू झाले की, काहीतरी संकल्प करण्याचा प्रघात असतो. आपल्याला ही संधी दोन वेळा मिळते. ग्रेगोरियनप्रमाणे 1 जानेवारीस आणि चांद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला. आता एक जानेवारी रोजी केलेला संकल्प नित्यनेमाने सुरू असेल तर हरकत नाही, पण बारगळला असेल तर पुन्हा एकदा खूप उत्तम संधी आहे, एक खास संकल्प करण्याची!
 
 
आपली सगळ्यांची धडपड एकाच गोष्टीसाठी असते. आपली आर्थिक परिस्थिती उत्तम असावी, घरात वातावरण प्रसन्न असावे, नात्यात गोडवा असावा, मुलांनी मन लावून अभ्यास करावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे औषधांवर, डॉक्टरांवर पैसे कमी खर्च व्हावेत. इच्छा, आकांक्षा खूप आणि त्या साध्य करण्याचा मार्ग मात्र एकच- केवळ एका संकल्पाने या सगळ्या गोष्टी सहजसाध्य आहेत. तो संकल्प आहे-ऋतुनुसार वागण्याचा!
 
पृथ्वीच्या कललेल्या अक्षाने आपल्या आयुष्यात विविध सहा ऋतूंचे रंग भरले आणि त्या विविध ऋतूंमध्ये काळ बदलाचे ज्ञान गुंफण्यासाठी सणांची योजना केली गेली. आपण उत्तरायण साजरा करतो, महाशिवरात्री आणि आषाढी अमावस्या देखील साजरी करतो, हुताशनी पौर्णिमा असो वा नारळी पौर्णिमा, अथवा कोजागिरी पौर्णिमा आपण ऋतु बदल विशिष्ट पद्धतीने आनंदाने साजरे करतो.
 
 
या बदलांनी आपले स्वास्थ्य बिघडू नये म्हणून त्या बदलांनुसार आपणही आपल्या खाण्या-पिण्यात-वागण्यात बदल करणे गरजेचे असते. हे संतुलन साधण्यासाठी निसर्ग त्या त्या ऋतूप्रमाणे भाज्या, फळे, उपलब्ध करवून देत असतो.
 
महाशिवरात्र साजरी करताना जसे कवठाचे ज्ञान बिंबवले जाते तसेच आपल्या नववर्षाला म्हणजे चैत्र पाडव्याला साजरा करताना साखरेच्या गाठीतून मधुर रसाचे, कडुनिंबाच्या पानांतून कडू रसाचे आणि विशेष पक्वान्न म्हणून श्रीखंडाचे ज्ञान बिंबवले जाते.
 
 
शिशिराची रुक्षता नकोशी झालेली असताना आपण उत्तरायणाची उत्सुकतेने वाट पाहत असतो. सूर्याचे मकर संक्रमण आपल्यासोबत बहर घेऊन येतो. सृष्टी बहराचा उत्सव आपण रंगातून साजरा करतो आणि होळी साजरी करत अग्नीची पूजा करतो, आपली कृतज्ञता अर्पण करतो. पान गळती झालेली ओकीबोकी दिसणारी झाडे हिरव्या पालवीने बहरू लागतात आणि सृष्टी आपले एक आवर्तन पूर्ण करते आणि काळाचे नवीन चक्र सुरू होते.
 
 
नवीन वर्ष सोबत बहारदार वसंत घेऊन येतो आणि त्यासोबत ‘कफ’ देखील. नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की, या दिवसात कफाचे त्रास सुरू होतात. सर्दी, खोकला, घसा दुखणे, डोकं जड होणे, दम्याचा त्रास वाढणे, त्वचेचे आजार वाढणे अशी लक्षणे दिसू लागतात. हा काळच असतो कफ पाझरण्याचा, आपण फक्त कफ नीट सुटण्यासाठी आणि वाहून जाण्यासाठी मदत करायची असते. शिशिरात साचलेली रुक्षता जेवढी जास्त तेवढा कफ घट्ट चिकटून बसतो, सहज सुटत नाही. अशा वेळी ज्येेष्ठमध, सितोपलादि आणि कंटकारी मदत करतातच, पण त्याच्या जोडीला घरी बनवलेले ताजे श्रीखंड अशा वेळी अमृताप्रमाणे काम करते.
 
 
श्रीखंड स्निग्ध आहे, मधुर आहे, असे ताजे स्निग्ध व मधुर श्रीखंड प्रमाणात खाल्ले असता, शरीरातली उष्णता कमी होते, रुक्षता/कोरडेपणा कमी होऊन घट्ट चिकटलेला कफ अलगद सुटतो, पिकतो आणि सहजतेने बाहेर पडतो. नाक, घसा आणि इतर सायनसेसमध्ये अडकून बसलेल्या कफाने वाढलेली बेचैनी, जडपणा आणि वेदना सगळेच कमी होते, अन्न पचन उत्तम होते आणि आपला वसंत उत्साहात जातो.
 
 
थोडक्यात काय, कफ साचू द्यायचा नाही. कफ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नाकातून किंवा खोकल्यातून पडणारा कफ येतो, पण कफ ही संकल्पना त्याहून व्यापक आहे. कफ फक्त फुफ्फुसात साचत नाही, तो शरीरातल्या प्रत्येक घटकात असतो, त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले की, तो शरीरात सर्वत्र वाढू लागतो. गरजेपेक्षा जास्त वाढलेली गोष्ट त्रासदायकच ठरते. जड, घट्ट आणि मंद असलेला कफ पचनशक्ती मंदावतो, अन्न नीट पचत नाही, न पचलेले अन्न अनेक आजारांना आमंत्रण देते.
 
 
कफ आणि उष्णता दोन्ही वाढवणारा आपल्या खाण्यात असलेला आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे दही. दही या ऋतुत अवश्य टाळावे. वेळेच्या आधी येणारे कलिंगड, टरबूज, आंबे ही फळे देखील कफाला वाढवतात.
 
 
वसंतात आवर्जून टाळण्याच्या गोष्टींपैकी एक म्हणजे दुपारची झोप. उन्हं वाढीस लागली की दुपारी जेवण झाल्यावर डोळे आपोआप मिटायला लागतात. जरा वामकुक्षी घ्यावी म्हणून आपण आडवे पडतो आणि झोप आवरती घेणं आपल्याला अवघड जातं. उठल्यावर डोकं, शरीर जड होतं आणि आळस चढतो. तोंडावर पाणी मारून आळस झटकू शकतो पण शरीरात या दरम्यान वाढणारा कफ अन्नात मिश्र होऊन जे नुकसान करणार आहे ते मात्र सहजतेने घालवता येत नाही. त्यामुळे वसंतात दुपारच्या जेवणानंतर आडवं पडून मस्त ताणून द्यायची नाही. हां, तुम्ही बसल्या बसल्या एक डुलकी मात्र नक्कीच काढू शकता.
पुढे ग्रीष्मात अजूनच वाढणारा कोरडेपणा, उष्णता मधुर रसाने नियंत्रणात राहते. या काळात तहान शमवणारी द्राक्षं, टरबूज, कलिंगड आणि आंबा अशी फळं क्रमाक्रमाने येत जातात. उष्णता वाढेल तशीच ती क्रमाक्रमाने खावीत. या दिवसात मिळणारी आंबटचुक्याची भाजी देखील वसंत आणि ग्रीष्म दोन्ही ऋतूंत आपल्या आहारात असावी. आंबट चवीची आणि शश्रशलीीेंश्रूींशी चे भरपूर प्रमाण असलेली ही भाजी तहान शमवते, भूक उत्तम ठेवते आणि तोंडाला चव देखील आणते.
 
आपल्या शरीरात असंतुलित झालेल्या गोष्टींना संतुलित करण्यासाठी निसर्ग कायमच सज्ज असतो. गरज आहे ती आपण निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची आणि ज्या काळात जे खायला हवंय ते खाण्याची.
 
 
शरीराच्या स्तरावर गोष्टी संतुलित असल्या की मन देखील प्रसन्न राहते. स्वस्थ शरीर आणि प्रसन्न मन जास्त ऊर्जेने काम करते, आपल्या कामातील ऊर्जा आपल्याला योग्य ते फळ देतेच, सगळीकडून येणारी सकारात्मकता छोट्या-छोट्या ताणतणावांना सहजतेने हाताळू शकते. आपले स्वस्थ व शांत मन चटकन टोकाचे निर्णय घेत नाही, त्यामुळे संघर्ष कमी होत जातो. मुलांच्या वाढत्या वयात ऋतूनुसार आहारातून मिळणारे पोषण त्यांची शारीरिक वाढ तर उत्तम ठेवतेच पण त्यांचे वारंवार आजारी पडणे कमी होते, स्वस्थ मन अभ्यासात एकाग्र होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.
 
 
आयुर्वेदात एक खूप छान सूत्र सांगितले आहे - ‘शरीरम् आद्यम् खलु धर्म साधनम्.’ आपल्याला जे जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे आणि आपण ते औषधं न घेता उत्तम राखले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी एकच गोष्ट आहे - ऋतुचर्या!
 
 
चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर आपण सगळेच ऋतुचर्या पालनाचा संकल्प करूया!
 
शुभ चैत्र पाडवा!