समाजजाणीवांच्या प्रगल्भतेचा प्रवास

विवेक मराठी    16-Mar-2026   
Total Views |
समाजभान हेच समाजसंस्काराचे द्योतक आहे, ही शिकवण पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामुळे समीरला मिळत गेली. रूढार्थाने शिक्षणाबरोबर समाजशिक्षणही घेण्याची समीरची प्रेरणा वृद्धींगत होत राहिली. प्रभुणेकाकांच्या गुरुकुलात घडलेल्या इंजिनियर समीर काळे याचा हा समाजजाणीवांच्या प्रगल्भतेचा प्रवास आहे.
 
sameer kale
 
भीमा नदीच्या काठावं वसलेल्या कवठा गावाच्या आमच्या पालावर पारधी समाजाची वस्ती आहे, ही वार्ता समजताच एक दाढीवाला बाबा आमच्या पालावर नजर ठिवायला यितं हुता. इक ना दुन दिसं, महिनं-दुन महिनं तो बाबा न कटाळता यितं हुता. पोराबाळांना जवळ बोलवित हुता, पण कुणी त्याच्या हाताला घावत नव्हतं. दिसं सरत व्हतं, तसा तो दाढीवाला बाबा कधी आम्हासनी खेळातून तर कधी बॉब्या, बिस्किटं, गोळ्या घिऊन जवळ करू लागला. आमच्यासाटी पायाची भिंगरी करणारा ह्यो दाढीवाला बाबा म्हंजे आमचे लाडके गिरीशकाका...
 
 
असे गिरीशकाकांविषयी प्रत्येक शब्द न् शब्द कृतज्ञतापूर्वक सांगणारा आणि आज आपल्या कार्यकर्तृत्वाने जीवनात स्थैर्य प्राप्त करणारा, त्यांच्याच गुरुकुलात घडलेला इंजिनिअर म्हणजे समीर काळे.
 
 
जीवनात स्थैर्य प्राप्त करणारा म्हटलं तर त्यात काय विशेष असचं कुणालाही वाटू शकेल, परंतु समीर काळे याच्या समाजाची पार्श्वभूमी पाहिली तर ती गोष्ट लक्षात येईल. श्रीगोंदा तालुक्यातील कवठा गावी 25 ते 30 जणांच्या कुटुंबकबिल्याचं पारधी समाजाचं पाल. कोंबडं आरवलं की पालावरच्या माणसांची पोटापाण्यासाठी भटकंती सुरू होई. बाया गावात मागायला जात, तर बापे जंगलात शिकार करायला जातं. पालावर परत फिरत ती दिवस मावळतीला, मागून आणलेल्या भाकरतुकड्यासोबत कधी नुसतीच पाण्याची लोटी तर कधी शिकारीतून गवसलेल्या मांसाची मेजवानी.
 
पोटाची आग विझवताना कधी पोटच्या पोरांची आबाळ होतेयं, याचंही भान त्यांना नव्हतं. जनावरापेक्षा वरताण पोरांचं वागणं पाहताना गिरीशकाकांचं काळीज पिळवटून निघतं होतं. हळूहळू मुलांशी सलगी झालीच होती, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही हे पक्कं होतं. आता बोलाफुलाला गाठ पडावी तसे गिरीशकाका पोरांच्या मायबापांची समजूत काढायला निघाले. गिरीशकाकांचा विचार एका डावात पटला नसला तरी आता तो विचार सुरू झाला होता.
 
 
या संदर्भात समीर सांगू लागला की, हलाखीच्या परिस्थितीतून पोरांची सुटका होईल या एका विचारानं आईने आम्हा भावडांना अजनूजच्या शाळेत धाडायला दुजोरा दिला. पाहता पाहता पालावरची 16 पोरं तयार झाली. सुरुवातीला आम्ही यमगरवाडीत राहिलो. वर्षभराने अजनूजच्या शाळेत रवानगी झाली. अजनूजची शाळा म्हणजे एक पडकं गोडाऊन, त्यावर पाण्याची टाकी आणि आजूबाजूला ओसाड माळरान. ही पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली की, त्यानेच आमचा अभिषेक होत होता.
 
 
sameer kale
 
बेताच्या परिस्थितीत मुलांच्या संगोपनाबरोबर शिक्षण देणे या पूर्वअटीसाठी गिरीशकाका पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरत होते. मुलांकडे दुर्लक्ष नको म्हणून व्यवस्थेसाठी दीपक आणि ज्योती पाटील यांना नेमून दिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रथम ओळख झाली ती या अजनूजच्या शाळेतच. संघसंपर्क आणि सज्जनशक्तीच्या माध्यमातून मदत होत होती तरी ती तोकडी पडत होती. नाईलाजास्तव हा अजनूजचा प्रयोग बंद पडला.
 
 
शाळा बंद पडल्यावर सगळी पोरं पुन्हा पालावर परतली. माझे भाऊही पालावर गेले, मी मात्र तिथेच राहिलो. पाटील दांपत्याने काळजीपोटी मला त्यांच्याबरोबर स्वतःच्या घरी नेले. आपुलकीने माझे सर्वकाही केले. त्या दरम्यान संघसंपर्कही अखंड होताच. संघाच्याच एका कार्यक्रमात गिरीशकाकांची पुन्हा भेट झाली. त्यांनी विचारपूस केली आणि त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडला पुनरूत्थान समरसता गुरुकुलम् सुरू केलंय ही आनंदवार्ता दिली. शिवाय गुरुकुल तुझंच आहे केव्हाही ये अशी बापासारखी साद घातली.
 
 
गुरुकुलात आलो तोपर्यंत बारावी झाली होती. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण फीचा आकडा काळजात घर करत होता. अस्थिरतेच्या वळणावर सतत झोकांड्या खात असलेले आयुष्य निर्णय घेतानाही असेच बदलत राहिले. बारावी झाल्यानंतर इकचड घ्यावं असंही मनात आलं, पण बागुलबुवा वाटावा एवढी फी आणि लागणार्‍या कागदपत्रांमुळे त्या विचाराचे कृतिरूप काही झाले नाही. डिप्लोमा केल्यावर लवकर नोकरी लागते, म्हणून तोही काकांच्या सहकार्याने पूर्ण केला. चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झालो आणि नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
 
 
या निर्णयाला मात्र गिरीशकाकांनी थांबा दिला आणि तोच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. नोकरीत गुरफटलास की शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल असे सांगून मला त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचा मोलाचा सल्ला दिला. इंजिनिअरिंगच्या फीचा भार हलका करण्यासाठी काकांनी मला अनेक दात्यांशी भेट घालून दिली खरी पण खर्च मारूतीच्या शेपटासारखा होता. फी सवलतीसाठी वाजवी कागदपत्रांची सोय झाली तर मार्ग निघू शकतो. काही ठोस नोंदी-पुरावे गोळा करण्यासाठी पालावर धाडले. या शोधयात्रेत दोन दिवस आजोबा शाळेत गेले होते हे समजलं. प्रयत्नांती शाळेतून आजोबांचा दाखला मिळाला, त्यात सगळी वंशावळदेखील सापडली, मार्ग सुकर झाला. असं असलं तरी मदतीच्या हातांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत, असं समीर काळे भारावून सांगत होता.
 
 
कुतरओढीचे जगणे आपल्याच नशिबी आहे की आपल्या समाजाच्या इतर बांधवांचेही? हा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. इंजिनिअरिंग शिकत असतानाच्या दिवाळी/उन्हाळी सुट्ट्या कधी निवांत घालवल्या नाहीत. तर या सुट्ट्यांत अनेक पालांवर जाऊन तेथील समाजजीवनाचे दर्शन घेतले. कधीही न भरून येणार्‍या वेदनादायी जखमा समाजात आहे ही जाणीव झाली. हे समाजभान जागृत झाले ते काकांनी एकदा मला सुनील देशपांडे यांच्या संपूर्ण बांबू केंद्र येथील प्रकल्पावर घेऊन गेले तेव्हा. समाजभान हेच समाजसंस्काराचे द्योतक आहे, हे अनुभवाने समीर सांगत होता.
 
 
हा समाजसंस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिदोरीतूनही मला मिळाला आणि मी अधिक डोळसपणे या समाजजाणीवा अनभवू शकलो, असं सांगताना समीर पुढे म्हणाला की, माझ्या आयुष्यावर झालेला संघप्रभाव म्हणजे मी कधी प्रचारक जाईन हेच स्वप्नवत होते. द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग मी स्वयंप्रेरणेने केला. गुरुकुलात असल्यापासून मुख्य शिक्षक, कार्यवाह इ. जबाबदार्‍या, वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग याने आत्मविश्वास दुणावत होता. संघाची कोणतेही पार्श्वभूमी सोडाच पण साधी तोंडओळखही मला नव्हती, उलट आमच्या समाजातील लोकांनी बामणाच्या संघात जातो, म्हणूनही हिणवलं. जोपर्यंत संघाचा अनुभव येत नाही तोपर्यंत संघ समजत नाही आणि संघ कोणत्या जातीपातीचा नाही तर राष्ट्रहितासाठी आहे, याचा प्रत्यय मला होत गेला. हे शक्य झाले ते केवळ गिरीशकाकांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच.
 
 
‘पुनरूत्थान समरसता गुरुकुलम्’ या प्रकल्पाचेही तुझ्या आयुष्यात स्थान आहे. प्रकल्पाच्या नावातच समरसता आहे, याचा अनुभव तुला कसा आला, असे समीरला विचारल्यावर तो म्हणाला की, खरं सांगायचं तर समरसता हा शब्द खूप मोठा आहे, अजूनही नीट समजला नाही. एवढं सांगू शकतो की, गुरुकुलात केवळ पारधी समाजाची मुलं राहत नाहीत तर अन्य समाजाचीही मुले आहेत. या सर्व मुलांना एका सूत्रात बांधून ठेवताना बघत होतो, तेव्हा समरसता म्हणजे समानता इथपर्यंत समजलं. गुरुकुलामुळे संघाशी संपर्क वाढत होता आणि तिथे समरसतेचा अर्थ अधिक उकलत गेला. या सार्‍या अनुभवातून समाजप्रवाहापासून मागे राहिलेल्या समाजाला बरोबर घेऊन येण्याचे, त्यांचे उत्थान करण्याचे काम समरसता गुरुकुलम्मध्ये होत आहे याची समज होत गेली. शिवाय संघ आणि गुरुकुल यातून संघटन, व्यवस्थापन कौशल्य, संयम, जिद्द, निर्णयक्षमता, याचे पाठ शिकत गेलो, जे मला प्रचारक जीवनात व वैयक्तिक आयुष्यातही खूप मोलाचे ठरले.
 
 
समीर आता थर्मेक्स कंपनीत प्रोसेस इंजिनियर म्हणून काम पाहतो. पेट्रोकेमिकल, साखर कारखाने, रिफायनरी इंडस्ट्री यामध्ये मोठमोठे बॉयलर लागतात, त्या बॉयलर पार्टमध्येच समीर काम करत आहे. त्याचसोबत गुरुकुलामार्फत होणार्‍या कास्टी येथे ‘क्रांतिवीर समशेरसिंग सामाजिक संस्था’ सुरू झाली आहे, त्यात प्रकल्पप्रमुख म्हणूनही समीर काम पाहत आहे. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडमध्ये ज्यांना येणं शक्य नाही अशांसाठी आहे. इथे समाजातील दुर्बळ घटकांतील क्षमता विकसित करून कलाकौशल्याचे शिक्षण दिले जाणार आहे. इथे कोणतीही वयोमर्यादा नाही. या प्रकल्पासोबत अनेक संस्थांना जोडून घेत आहोत, जेणेकरून उद्दिष्टपूर्ती योग्य दिशेने होईल. गिरीशकाकांच्या सोबतीनेच हे शिवधनुष्य पेलण्याचे धाडस करत असल्याचे समीर सांगत होता.
 
 
स्वातंत्र्याला 78वर्षे होऊनही रा. स्व. संघ आणि सज्जनशक्तीच्या साथीने समाजातील दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य चालू आहे, तरी ते अपुरे आहे. समीरसारख्या त्याच समाजातील व्यक्तींना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले तर राष्ट्र प्रगतीपथावर मार्गस्थ होईल यात शंका नाही आणि असाच आशय समीर काळे याच्याशी बोलताना जाणवला.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.