@ अनुजा कुलकर्णी 8007971164
आज संपूर्ण घर संघाचे झाले आहे, हे सारे परिवर्तन माझ्या कुटुंबात झाले हे पाहताना मी कृतार्थ आहे... तृप्त आहे. ज्या घरात संघ माहीतही नाही, खेडेगावातील प्रतिष्ठित घर म्हणून घरातील महिलांनी बाहेर पडणे ही फारसे सहजसुलभ मान्य नाही, अशा घरात स्वतः सक्रिय कार्यकर्ता असताना स्वत:ला रुजवून घेणे आणि आतली कामाची उर्मी जागी ठेवून त्यांनाच आपणासारखं करणे ही तितकीशी सोपी गोष्ट नसते. पण अशक्यही नसतं... अवघडही नसतं...!! हेही तितकच खरं! आम्ही बी घडलो... तुम्ही बी घडा ना... हाच मंत्र मनात ठेवून काम करताना माझ्यामुळे किती कार्यकर्ते उभे राहिले माहीत नाही, पण मी माझं घर हे संघाचं घर अशी ओळख निर्माण करू शकले.
माननीय यशवंतराव केळकर यांच्या गौरव समारंभाचा सांगता सोहळा पुण्यामध्ये बालगंधर्व नाट्यगृहात आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. बाळासाहेब देवरस उपस्थित राहणार आहेत. तू कार्यक्रमाला नक्की ये. विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयातून हा निरोप मिळाला आणि गेले पाहिजेच ही उर्मी उफाळून आली, पण ....पण हा पणच आडवा येत होता! कारण दोन-तीन महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात बद्ध होऊन मी डॉ. आरती चिंतामणी चौथाईची डॉ. सौ. अनुजा दिलीप कुलकर्णी, मोडनिंबकर झाले होते. माझे माहेर मिरज, माझे वडील काका चौथाई हे संघसमर्पित जीवन जगणारे, सेवा प्रकल्प प्रमुख, जिल्हा संघचालक अशा पदांवर ते कार्यरत होते. माझे सख्खे भाऊ, चुलतभाऊ... सगळं घर संघाचं होतं. वडील आणीबाणीमध्ये 19 महिने मिसाखाली तुरुंगात होते. सासरी मी विद्यार्थी परिषद (प्रांत कार्यकारणी सदस्य) असे सक्रिय काम केलेले. सासरी एकत्र कुटुंब... संघपरिवार हा केवळ ऐकून माहिती असणारा विषय....
घरी मोठे चुलतसासरे... सगळं काही त्यांना विचारून, परवानगी काढून करण्याचा नियम होता. एक बरी संधी पाहून मी सासर्यांपुढे पुण्याला कार्यक्रमाला जाण्याचा प्रस्ताव मांडला. सर म्हणजे शाळेतले सर, महाविद्यालयातले सर की, तू ज्यांच्याकडे क्लासला वगैरे जायचीस ते सर? ते मुंबईचे आणि तू मिरजेची... मग तुमची ओळख कुठली? सासर्यांच्या या प्रश्नांना काय उत्तर देऊ? या कुठल्याच पठडीत न बसणारा... पण एका वेगळ्याच सूत्राने जुळलेला हा बंध. शब्दांच्या पलीकडचा... शब्दांत न मावणारा...
कार्यक्रमाला तर निघालो ...बालगंधर्व रंगमंदिराच्या दारातच माननीय यशवंतराव येणार्यांच्या स्वागताला उभे होते. आम्ही समोर येताच त्यांनी अत्यंत प्रेमाने या, या डॉक्टर असं म्हणत स्वागत केलं आणि माझ्या पतीचे हात हातात घेतले. आपुलकीने चौकशी केली आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला .
हाच तो क्षण होता.... जेव्हा सर आपले कोण आहेत?... याचे उत्तर मिळालं. आत्मीयतेचा, प्रेमाचा समानशीले व्यसनेशु सख्यम.... असण्याचा ...! प. पू. बाळासाहेब देवरस यांच्याशी माझी, माझ्या वडिलांमुळे चांगलीच ओळख होती, पत्रव्यवहार होता. त्यांचीही भेट झाली. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ!... अशी भावना असताना या दोन्ही महानुभावांनी व्यक्त केलेला आपलेपणा माझ्या पतीच्या मनाला स्पर्शून गेला आणि... आणि हाच तो क्षण होता... आमच्या सहजीवनाला सुखद कलाटणी देणारा...
अर्थातच यानंतर सोलापूर, पंढरपूर, बार्शी अशा आसपासच्या परिवार संघटनांचा आमच्या घराशी आणि मोडनिंब या आमच्या गावाशी संपर्क सुरू झाला. त्यात प्रामुख्याने कै. बापूराव सारोळकर, प्रचारक हर्षवर्धन खरे, मा. गिरीशजी कुबेर, मा. सदाशिवराव देवधर यांचा समावेश होता. यांच्या सहवासाने माझे पती, डॉ. दिलीप, हे संघाच्या कामात कार्यरत झाले. पुढे ते तालुका कार्यवाह ही झाले.
त्या वेळेला एक व्यापक बैठक आमच्या गावी झाली. गंमत म्हणजे त्यावेळी संघाची संपूर्ण प्रार्थना म्हणू शकणारा एकही स्वयंसेवक नव्हता, पण डॉक्टरांचा वक्तृत्व, संघटन शैली आणि प्रचंड संपर्क यातून पुढे केवळ गावातच नव्हे तर तालुक्यातही संघाचे काम उभे राहू लागले. त्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रवास आणि कार्यक्रमांना ते जाऊ लागले.
आमच्या गावात तर शंभर-शंभर महिला-पुरुष यांची प्रभातफेरी, एक वीट घेऊन चला हे गाणं गात निघू लागली. जवळजवळ दीडशे जण अयोध्येच्या कारसेवेत सहभागी झाले.
त्यानंतर विवेकानंद पाटील हे पूर्णवेळ म्हणून आमच्याकडे वास्तव्यास आले. अधूनमधून विद्यार्थी परिषदेचे विस्तारक, अनेक प्रचारकांचा प्रवास असं काही संघाच्या घरात असतं तसं सारं आमच्या घरात होऊ लागलं. डॉक्टरांकडे भारतीय किसान संघाचं काम सोपवलं गेलं. त्यातूनच आमच्या तालुक्यात म्हणजे माढा तालुक्यात उजनी धरण होतं, पण त्याचं पाणी मात्र आम्हाला मिळत नव्हतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी किसान संघाच्या माध्यमातून खूप मोठं आंदोलन उभे राहिलं. यामध्ये पाच हजाराहून अधिक शेतकरी, जवळजवळ 115 गावांतून या आंदोलनात सहभागी झाले. शासकीय आणि राजकीय पातळीवरून हे आंदोलन होऊ न देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा झाली, पण शेवटी शेतकरी बांधवांनी ते आंदोलन यशस्वी करून दाखवलं आणि माढा तालुक्याला उजनीच पाणी मंजूर झालं.
यानिमित्ताने मा. दत्तोपंत ठेंगडी, मुकुंदराव पणशीकर, डॉ. अरुणराव वाळिंबे अशा अनेकांशी स्नेह जुळला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे मोडनिंब गावचे... त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक व्याख्यानमाला आम्ही चालू केली. ज्यामध्ये त्यावेळचे विरोधी पक्षनेते नितीनजी गडकरींपासून विवेकजी घळसासी, प्राचार्य शाम भुर्के यांच्यासारख्या अनेक मातबरांनी व्याख्यानांसाठी हजेरी लावली होती. तिथल्याच तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एक पतसंस्था चालू केली. त्याचबरोबर रेशीम उद्योग, साबुदाणा लागवड, रबर लागवड असे शेतीमध्येही त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि यशस्वी करून दाखवले.
आता ते विवेक साप्ताहिकाचे पालक आहेत. आरोग्य भारती इत्यादी परिवारातील संघटनेतही आपले यशस्वी आणि भरीव योगदान त्यांनी नोंदविले आहे. गोविज्ञानच्या संपर्काने पंचगव्य आधारित ओझोन या प्रणालीचा अभ्यास करून रुग्णांना रोगमुक्त करणारी सेवा देत आहेत. दोन वेळा विश्व गो-परिषदेचे आयोजन केले, ज्याद्वारे देशी गाईचं महत्त्व आणि त्यापासून होणारी उत्पादन लोकांपर्यंत पोचली गेली.
हे सारं घडत असताना मी मात्र सामाजिक दायित्व केवळ मम म्हणण्याचे काम करीत होते. मुलं, परिवार आणि वैद्यकीय व्यवसाय सांभाळत होते. डॉक्टर खूप काम करतात, असं ऐकताना अभिमानाने मन फुलून येत होते.
आज माझी मुलगी संज्ञा आणि जावई देवदत्त हे दोघेही संघ परिवाराच्या कामात कार्यरत आहेत, तर अमेरिकेत असणारा मुलगा संकल्प हा ही हिंदू स्वयंसेवक संघाचे काम करतो. हे सारे परिवर्तन माझ्या कुटुंबात झाले हे पाहताना मी कृतार्थ आहे... तृप्त आहे. संघ असणार्या घरी, बिगरसंघाच्या वातावरणातली मुलगी सून म्हणून येते व ती संघाचीच होते हे एक वेळ सोपं असू शकतं... पण ज्या घरात संघ माहीतही नाही, खेडेगावातील प्रतिष्ठित घर म्हणून घरातील महिलांनी बाहेर पडणे ही फारसे सहजसुलभ मान्य नाही, अशा घरात स्वतः सक्रिय कार्यकर्ता असताना स्वतःला रुजवून घेणे आणि आतली कामाची उर्मी जागी ठेवून त्यांनाच आपणासारखं करणे ही तितकीशी सोपी गोष्ट नसते. (हे अनुभवाचे बोल) पण अशक्यही नसतं... अवघडही नसतं...!! हेही तितकच खरं! आम्ही बी घडलो... तुम्ही बी घडा ना... हाच मंत्र मनात ठेवून काम करताना माझ्यामुळे किती कार्यकर्ते उभे राहिले माहीत नाही, पण मी माझं घर हे संघाचं घर अशी ओळख निर्माण करू शकले. ही कृतार्थता नक्कीच आहे... वंदे मातरम्!