जगाला मानवतेची शिकवण देणार्या भारतीय सनातन विचारांची आणि जीवनमूल्यांची आवश्यकता आहे. इतिहास काळात ही राष्ट्रीय ऊर्जा घेऊन शेकडो भारतीय बांधव त्यावेळच्या ज्ञात जगात गेले. मनात अपार करूणा, कसल्याही भौतिक लाभाची शून्य अपेक्षा, स्थिरबुद्धी, हे त्यांचे भांडवल होते. ही ऊर्जा मध्यंतरीच्या काळात क्षीण झाली. तिचे पुनरूज्जीवन करण्याचा मार्ग म्हणजे संघमार्ग आणि या मार्गचे शालीवाहन म्हणजे डॉ. हेडगेवार. राष्ट्राची वैश्विक दृष्टी असलेले आणि अनुभूत राष्ट्रज्ञानाने परिपूर्ण असलेले डॉ. हेडगेवार होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच डॉ. हेडगेवार यांची जयंती! यादिनानिमित्त त्यांचे स्मरण करणारा लेख..
संघ शताब्दी ही एका दृष्टीची (मिशनची) शताब्दी आहे. संघरूपाने ही दृष्टी ठेवण्याचे काम संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांनी केले आहे. वर्षप्रतिपदा हा त्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म राष्ट्राचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी झाला. आधुनिक काळात राष्ट्रद्रष्टेपणाचे ते महान पुरूष आहेत. थॉमस कार्लाइल याचे जप कशीेशी, कशीे- On Heroes, Hero-Worship, & the Heroic in History हे अतिशय गाजलेले पुस्तक आहे. त्यांनी मानवी इतिहासाला कलाटणी देणार्या धर्मसंस्थापक, राजधुंरधर, कवी, लेखक, तत्त्वज्ञ यांच्यावर या पुस्तकात लिहिले आहे. देशाचा इतिहास म्हणजे थोरपुरूषांचे जीवन असा त्यांचा सिद्धांत आहे.
कार्लाइल यांच्या थोर पुरूषांच्या यादीत डॉ. हेडगेवार हे न बसणारे व्यक्तित्व आहे. कार्लाइल आज हयात असते तर त्यांनी पहिला प्रश्न केला असता, कोण हेडगेवार? आणि असे त्यांचे कोणते मोठे योगदान आहे की ज्याची मी इतिहासकार म्हणून दखल घ्यायला पाहिजे. कार्लाइलचे म्हणणे योग्य ठरायला हरकत नाही, कारण ज्या भारतात डॉ. हेडगेवारांचा जन्म झाला आणि त्यांच्या युगप्रवर्तक कार्याचा जन्म झाला, त्या भारतातच त्यांच्याबद्दल अतिशय जुजबी माहिती आहे आणि काही जणांकडे विकृत माहिती आहे.
संघ शताब्दीनिमित्त संघावर काही चित्रपट निघाले, एक टीव्ही सिरियलदेखील सुरू झाली. निर्मात्यांची क्षमा मागून असे म्हणायला पाहिजे की, हे सर्व प्रयत्न अतिशय बाळबोध आहेत. डॉ. ़हेडगेवारांच्या जीवनातील घटनाप्रसंग चित्रित केले तेवढ्याने डॉ. हेडगेवार यांची उंची समजत नाही. प्रत्येक व्यक्तीचे जीवन घटनाप्रसंगांनी भरलेलेच असते. सार्वजनिक कार्यासाठी जगणार्या व्यक्तीच्या जीवनातील घटनाप्रसंग सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील घटनाप्रसंगांपेक्षा वेगळे असतात, एवढेच त्याचे वैशिष्ट्य.
आपली सनातन विचार पंरपरा मनुष्यजीवनाचे ध्येय सांगते. मनुष्यजीवनाचे अंतिम ध्येय सर्वाधिक सुख प्राप्त करून घेण्याचे आहे. पंरतु हे सुख भौतिक गरजांच्या पूर्तता करून प्राप्त होणार नाही. माणसाच्या भौतिक गरजा, इच्छा, आकांक्षा, अमर्याद असतात, त्यांची पूर्तता होणे अशक्य आहे. आणि कोणत्याही भौतिक गोष्टीत निरंतर सुख देण्याचे सामर्थ्य नाही. तेवढ्यापुरते सुख मिळते आणि पुन्हा सुखाची लालसा तशीच राहते.
यासाठी आपल्या थोर ऋषी परंपरेने सांगितले की, विश्वाच्या अंतिम सत्याचा साक्षात्कार करून घ्या. तो करून घेण्याचा प्रयत्न करा. भौतिक जीवन जगत असताना त्यातून वेळ काढून त्या सत्याची साधना करा आणि ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. शाब्दिक रूपात हे सत्य सांगायचे तर सर्व चराचर सृष्टी ही एकाच परमसत्याचा आविष्कार आहे. कुणी त्याला ब्रह्म म्हणतं, कुणी परमात्मा म्हणतं, कुणी शून्य म्हणतं, शब्दाला महत्त्व नाही. महत्त्व अंतिम शाश्वत सत्याला आहे, त्याची अनुभूती करून घेणे हे जीवनाचे लक्ष्य असले पाहिजे. कमीअधिक प्रमाणात भारतातील प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे जाणत असतो आणि जीवनात अल्पसा प्रयत्न करीत राहतो.
जसे व्यक्तीच्या जीवनाचे अंतिम ध्येय असते, तसे राष्ट्राच्या जीवनाचे अंतिम ध्येय असते. राष्ट्र ही एक जीवमान संकल्पना आहे. लोकांचा समूह, भूमीवरील निवास, नद्या-पर्वत, निसर्ग, एवढ्याने राष्ट्र तयार होत नाही. व्यक्तीला जसे आत्मतत्त्व आहे, तसे राष्ट्राचे आत्मतत्त्व असते. पं. दीनदयालजींनी शब्द वापरला चिती. आम्ही एक सनातन राष्ट्र आहोत, जीवमान राष्ट्र आहोत. आमचे आत्मतत्त्व म्हणजे चिती आहे आणि तिचे आम्ही अंगागी भाग आहोत. डॉक्टरांच्या सुचनेवरून जी संघ प्रार्थना तयार झाली. त्यातील शब्द आहेत,‘वयम् हिंदुराष्ट्रांग भूता’ आम्ही हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहोत.
डॉ. हेडगेवार म्हणजे हिंदुराष्ट्राची अंगभूत जाणीव असणारे व्यक्तिमत्त्व. अंगागीभाव म्हणजे मी एका विराट राष्ट्रपुरूषाचे अंग आहे. जी चेतना आणि ऊर्जा त्या विराट पुरूषाच्या अंगी आहे, ती माझ्यातदेखील आहे. मी राष्ट्राशी एकरूप आहे, समरूप आहे.
ज्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे जीवनलक्ष्य आपल्या सनातन धर्माने निश्चित केले आहे, तसेच या राष्ट्राचे जीवनलक्ष्यदेखील, राष्ट्र जन्माला आल्यापासून निश्चित झाले आहे. हे जीवनलक्ष्य आहे, सर्व मानवजतीला मानवी धर्माची शिकवण देण्याचे. हे जीवनलक्ष्य कधी कृण्वन्तो विश्वमार्यम्, बहुजन हिताय बहुजन सुखाय आदी शब्दांतून व्यक्त झाले. सनातन काळापासून राष्ट्राचे हे अंगभूत चैतन्य घेऊन त्यावेळच्या ज्ञात जगात लाखो तरूण गेले. रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी जवळजवळ सगळा आग्नेय आशिया, मध्य आशिया, मानवी धर्माच्या प्रभावाखाली आणला. चीनच्या एका राजनेत्याने म्हटले की, भारताने रक्ताचा एक थेंबही न सांडता चीन जिंकून घेतला. (म्हणजे चीन बौद्धधर्मीय झाला)
हिंदुराष्ट्राचे हेच जीवनलक्ष्य आहे आणि डॉ. हेडगेवार हे या जीवनलक्ष्याला लाखो तरूणांच्या हृदयात संक्रमित करणारे आधुनिक काळाचे शालीवाहन आहेत. एका संघगीतात ‘संघयुगाचे शालीवाहन’ असे म्हटले आहे. राष्ट्राचे हे जीवनलक्ष्य साध्यासोप्या पद्धतीने मनात आणि बुद्धीत रूजविण्याची कार्यपद्धती दिली, तिला संघशाखांची कार्यपद्धती म्हणतात आणि या संघशाखांचे जाळे सर्व देशभर, तसेच जगात ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहेत, त्या त्या ठिकाणी विणले गेले आहे.
धर्म ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. या धर्म शब्दाबद्दल जितका काही गोंधळ घालता येईल तितका गोंधळ आपल्या देशातील राजकारणी लोकांनी आणि त्यांची साथ देणार्या बुद्धिजीवी लोकांनी घातला आहे. या मंडळींना आपण काही रोखू शकत नाही. परंतु आपल्या राष्ट्राचा सिद्धांत आहे की, असत्याचा आणि खोट्या मतांचा प्रचार हा काही काळ गेल्यानंतर उलटा चाबूक बनून आपल्यालाच झोडत राहतो. हे या सर्वांचे भवितव्य असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे यातच शहाणपण आहे.
आजच्या जगाची स्थिती पाहिली असता जगाला मानवतेची शिकवण देणार्या भारतीय सनातन विचारांची आणि जीवनमूल्यांची आवश्यकता आहे. इतिहास काळात ही राष्ट्रीय ऊर्जा घेऊन शेकडो भारतीय बांधव त्यावेळच्या ज्ञात जगात गेले. मनात अपार करूणा, कसल्याही भौतिक लाभाची शून्य अपेक्षा, स्थिरबुद्धी हे त्यांचे भांडवल होते.
ही ऊर्जा मध्यंतरीच्या काळात क्षीण झाली. तिचे पुनरूज्जीवन करण्याचा मार्ग म्हणजे संघमार्ग आणि या मार्गचे शालीवाहन म्हणजे डॉ. हेडगेवार. राष्ट्राची वैश्विक दृष्टी असलेले आणि अनुभूत राष्ट्रज्ञानाने परिपूर्ण असलेले डॉ. हेडगेवार होते. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे संघ शताब्दी ही एका मिशनची शताब्दी आहे. तिची वाटचाल टप्याटप्याने झालेली आहे. शताब्दी हा तिचा एक पडाव आहे, पुढचा वैश्विक मार्ग किती काळाचा असेल हे सांगणे अवघड आहे. प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार अर्नाल्ड टॉयन्बी सांगतात की, हे आधीच स्पष्ट होत आहे की ज्या अध्यायाची सुरुवात पाश्चात्य धर्मातून झाली आहे, जर त्याचा अंत मानवजातीच्या आत्म-नाशात होऊ द्यायचा नसेल तर त्याचा शेवट भारतीय धर्मातूनच झाला पाहिजे. मानवी इतिहासातील या अत्यंत धोकादायक क्षणी, तारणाचा एकमेव मार्ग म्हणजे प्राचीन हिंदू मार्ग. हिंदुंकडे अशी वृत्ती आणि आत्मा आहे ज्यामुळे मानवजातीला एकाच कुटुंबात एकत्र वाढणे शक्य होऊ शकते. मानवतेसाठी मोक्षाचा मार्ग भारताने देणे हे भारताचे जागतिक लक्ष्य आहे.
हे मत इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणार्या एका विद्वानाचे आहे, म्हणून त्याचे महत्त्व फार आहे. येणार्या काळात किती हजारो लाखो तरूण राष्ट्रमंत्राने भारावून सगळं जग पादाक्रांत करायला निघतील, यावर मानवतेचे सुख अवलंबून राहणार आहे. शतकाची वाटचाल झाली आहे, अजून खूप चालायचे आहे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेत (And miles to go before I sleep) सांगायचे तर -
जंगल सुंदर, गडद आणि खोल आहे,
पण मला वचने पाळायची आहेत,
आणि चिरविश्रांतीपूर्वी मैलो न् मैल जाायचे आहे,
आणि चिरविश्रांतीपूर्वी मैलो न् मैल जाायचे आहे,