आईच्या काळजीतून जन्माला आलेला ‘बरवा’ ब्रँड

विवेक मराठी    02-Mar-2026   
Total Views |
सौंदर्यप्रसाधने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण या सौंदर्यप्रसाधनांमधून अनेक केमिकल्सचा मारा आपल्या त्वचेवर होत असतो. या केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांमध्ये एक नैसर्गिक ब्रँड आपला वेगळेपणा राखून आहे. एका आईच्या काळजीतून जन्माला आला तुपातून फुललेला ‘बरवा’ ब्रँड. सातार्‍यातून फुललेल्या नैसर्गिक सौंदर्याची गोष्ट आज जागतिक बाजारपेठेत पोहोचली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बरवा स्किन थेरपीच्या संस्थापिका कामाक्षी बर्वे यांच्याशी विशेष गप्पा..
 

Barava
 
 
प्रत्येक व्यवसायामागे एक प्रेरणा असते, काहीतरी विचार असतो. बरवा ब्रँडमागची गोष्ट काय?
 
- प्रत्येक गोष्टीमागे एक कार्यकारणभाव असतो तसा बरवाच्या बाबतीतही आहे. एका आईच्या शोधातून बरवाची सुरुवात झाली. 2007 ची गोष्ट आहे, मला एका कार्यक्रमाला जायचं होतं, आवरण्यासाठी म्हणून मी माझ्या रूममध्ये आले. माझी दोन- अडीच वर्षांची मुलगी ड्रेसिंग टेबलला धरून उभी होती. माझ्याकडे बघून ती हसली तेव्हा तिचे सगळे दात जांभळे निळे झाले होते. तिने माझी लिपस्टिक घेऊन लावण्याच्या प्रयत्नात चक्क चावून खाल्ली होती. तिच्या जिभेवरून, दातांमधून ती अडकलेली लिपस्टिक काढताना एक विचार मनात यायला लागला की, आई म्हणून माझं चुकतंय की, मी केमिकलयुक्त लिपस्टिक वापरत आहे. आई म्हणून मी जे वापरत आहे तेच माझ्या मुलीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे त्याक्षणी ते सगळं सामान उचललं आणि बाहेर टाकून दिलं. ही घटना बरवा ब्रँडकडे पडलेलं पहिलं पाऊल होतं. मग पुढच्या वर्षी माझे पती जयदेव बर्वे हे जर्मनीला ’बायोफाक’ नावाच्या सेंद्रिय किंवा ऑरगॅनिक या विषयाला धरून घडणारं मोठं ट्रेड फेअर भरलेलं होतं तिथे गेले होते. जिथे ऑर्गेनिक कॉस्मेटिक्सचं जगभरात वाढणारं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं त्यांनी अनुभवलं. गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक या भारतातच बनत आहेत आणि त्या आपल्याला मिळू शकतात. ही माहिती माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट होता.
 
 
हा शोध माझा नाही हे मी मुद्दाम नमूद करू इच्छिते. मूळ वर्ध्याच्या असणार्‍या अनघाताई दंडवते यांनी त्यांच्या मुलीसाठी तुपापासून लिपस्टिक बनवली होती. मला स्वतःसाठी आणि माझ्या मुलीसाठी सुरक्षित काहीतरी हवं होतं. तेव्हा मी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि स्वतः प्रॉडक्ट वापरायला तर सुरुवात केलीच पण त्यांच्यासोबत कामही करायला सुरुवात केली.
 
 
पुढे 2010 मध्ये युथोपिया नावाने कंपनी रजिस्टर केली. 2012 पासून माझ्या बरवा ब्रँडने खर्‍या अर्थाने टेकऑफ घेतला. समोर आलेल्या संधीचा दरवाजा माझ्यासाठी उघडला गेला आणि ती संधी मी घेतली. आज देखील बरवासाठी मॅन्युफॅक्चरिंगचं काम दंडवते काकूंची मुलगी प्रीती खिरे आणि जावई सारंग खिरे हे पाहतात.
 
 
Barava
बरवा हे नाव खूप वेगळं आणि छान आहे, तर या नावामागे काही खास कारण आहे का?
 
- ‘बरवा’ म्हटलं की दोन गोष्टी आपल्याला आठवतात, एक तर ’तो हा विठ्ठल बरवा’ हा अभंग, बरवेपण म्हणजे काय तर उत्तम, चांगलं, शुद्ध, सात्विक. जी गोष्ट आपल्याला विठ्ठलापर्यंत घेऊन जाणारी आहे, सर्वोत्तम आहे ती गोष्ट म्हणजे बरवा. त्यामुळे ते चांगलेपण आम्हाला या नावातून मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे जे घटक पदार्थ आम्ही त्यात वापरतो ते सगळे निसर्गाकडून प्रेरणा घेतलेले आहेत. ’ऋतू हिरवा ऋतू बरवा’ या गाण्यातला संदर्भ इथे येतो. निसर्गाशी संबंधित हा शब्द आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या बर्वेंचा ब्रँड ....बरवा. आपल्या त्वचेसाठी जे जे चांगलं, सर्वोत्तम आहे ते ते म्हणजे बरवा.
 
 
आज बाजारपेठेत अनेक कॉस्मेटिक ब्रँड आहेत, त्यात अनेक हर्बल उत्पादनंही आहेत. त्यात बरवाचे वेगळेपण काय?
 
- बरवा हा ब्रँड आयुर्वेदिक नाही पण आम्ही आयुर्वेदाकडून प्रेरणा घेतो. जुन्या काळातील आयुर्वेदाचं ज्ञान आम्ही वापरतो. आमच्या प्रत्येक उत्पादनातील जो मुख्य घटक आहे (Ingradient) तो आयुर्वेदावर आधारलेला आहे. उदा. आमचं फेस ऑइल हे लोकांना आवडणारं उत्पादन आहे, त्यात ज्येष्ठमध आणि केशर या दोन्हीचे अर्क वापरतो. हे हर्ब्स आहेत( आयुर्वेदिक वनस्पतींचे अर्क) म्हणजे प्रॉडक्ट हर्बल आहे का? तर हो, पण नुसतं हर्बल नाही त्यात आयुर्वेदाचा आधार घेऊन वनस्पतींचे अर्क आम्ही विशिष्ट पद्धतीने वापरतो. आमच्या उत्पादनांमध्ये नैसर्गिक उत्पादनं प्राधान्यक्रमाने असतात. गाईच्या तुपापासून मेकअप प्रॉडक्ट्स हा आमचा यूएसपी आहे.
 
 
लहानपणापासून माझ्या घरी शेती कधी नव्हती. आई नोकरीने बँकर आणि वडील नारायण जोगळेकर हे व्यावसायिक. पण व्यापार केमिकलचा होता. सेंद्रिय, केमिकलविरहित किंवा रसायनमुक्त, ऑरगॅनिक शेती या शब्दाचा पहिला संपर्क लग्नानंतर आला. जयदेवचे बाबा संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करायचे. या सेंद्रिय शेतीतून एकीकडे मानवी अन्नधान्य मिळतं तर दुसरीकडे आयुर्वेदिक वनस्पती, त्यांचे अर्क आणि देशी गायींच्या पासून शुद्ध तूप मिळतं. या सर्वच गोष्टींचा वापर आम्ही बरवामध्ये उत्तमरीत्या करतो.
 

Barava  
 
भारतीय जीवनपद्धतीचा कणा म्हणजे शेती. शेतीवर आधारित आपल्याकडे शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन असे अनेक व्यवसाय आहेत. पण त्याच्यापलीकडे आपण फार वेगळा विचार करत नाही. पण मला मात्र असं वाटत
’बरवा’ हा शेतीवर आधारित उद्योग आहे. कारण अनेक वनस्पती, नैसर्गिक घटक जे निसर्गाकडून, शेतीमधून आपल्याला मिळतात ते आम्ही वापरतो. त्यामुळे बरवा हे शेती या वृक्षाचं फळ आहे. जमिनीशी जोडून ठेवणारा असा बरवा ब्रँड आहे.
 
 
हल्ली सेंद्रिय शेती, उत्पादनांकडे अनेक जण पुन्हा वळत आहेत. येणार्‍या काळातील त्याची गरज काय आहे?
 
- मनुष्याला जगण्यासाठी हवा आणि पाण्यासोबत अन्नाची गरज असते. अनेक वर्षं आपल्याकडे शेतांमध्ये प्रचंड रासायनिक खतांचा मारा केला जातोय. भरमसाठ केमिकल्सचा मारा करून सुद्धा उत्पादनात फारसा फरक पडत नाही. आज ना उद्या तर आपल्याला पुन्हा आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या, ते करत असलेल्या निसर्ग आधारित शेतीकडे अर्थात सेंद्रिय शेतीकडे वळावं लागणार आहेच, मग आज का नाही? असा विचार करून माझे सासरे बाबा हे सेंद्रिय शेतीकडे वळले होते.
 
 
एक गंमत सांगते की, बाबा उर्फ जयंत बर्वे पूर्वी बाजारातून फ्लॉवर आणला की उलटासुलटा करून बघायचे. त्यात एखादी अळी दिसली की खूश व्हायचे. मला प्रश्न पडायचा की, अळी दिसणारा फ्लॉवर चांगला कसा? ते म्हणायचे की, अगं अळी जिवंत राहिली म्हणजे यावर जे काही फवारलं आहे त्याचा आपल्या आरोग्याला काही त्रास होणार नाही.....
 
 
आहे की नाही कमाल. असा विचार आपण कधीच करत नाही. पण असा वेगळा विचारच आपल्याला एका निश्चित ध्येयाकडे घेऊन जातो, हे त्यांच्याकडे बघून कळायचं.
 
 
पूर्वी माझ्या सासर्‍यांच शेती औषधांचं दुकान होतं. एकदा कावळ्यांच्या त्रासाने त्रस्त असलेला एक द्राक्ष उत्पादक शेतकरी केमिकल घ्यायला आला. चार दिवसांनी त्याला द्राक्षांची काढणी करायची होती. माझ्या सासर्‍यांनी त्याला औषध दिलं. पण त्यांच्या मनात विचार आला की, औषधाची फवारणी केलेली द्राक्ष उद्या माझ्याच घरी येऊ शकतात आणि हा विचारच त्यांना केमिकलकडून सेंद्रियतेकडे घेऊन जाणारा ठरला.
 
 
सन्मानपूर्वक लोकं दुकानाचं उद्घाटन करतात पण बाबांनी सन्मानपूर्वक लोकांना बोलवून मी आजपासून विष विकणार नाही असं सांगून दुकान बंद केलं. त्यानंतर ते सेंद्रिय शेतीकडे वळले. 42 वर्षांपूर्वी ज्यावेळी पूर्ण समाज कोणतं केमिकल सरकारने आणलं आहे आणि मी शेतीत काय घालू शकतो याचा विचार करता होता, त्यावेळी बाबा सेंद्रिय शेतीकडे वळले आणि आमची मुळं त्यामुळे घट्ट झाली असं वाटतं. त्या झाडाचं फळ म्हणजे बरवा आहे. कारण जर उत्तम घटक शेतीतून मिळाले नाहीत तर बरवामध्ये येणार नाहीत .
 
 
आज एक मराठमोळा कॉस्मेटिक ब्रँड जागतिक बाजारपेठेत उभा आहे ही सोपी गोष्ट नाही. त्यामागे प्रचंड मेहनत, संयम, जोखीम आणि सर्वांत महत्त्वाचा असा ग्राहकांचा विश्वास आहे. नव्याने व्यवसाय करू पाहणार्‍या महिलांना काय सांगाल?
 
खरं सांगू का, मी अनघाताईंकडे अत्यंत स्वार्थी विचाराने गेले होते. मला समाजासाठी काही करायचं आहे असा विचार तेव्हा अजिबात नव्हता. पण या तुपाच्या लिपस्टिक वापरताना आणि या ऑरगॅनिक बॅकग्राऊंडमुळे माझ्या लक्षात आलं की, एका आईने आपल्या मुलीसाठी ही वस्तू बनवली, दुसर्‍या आईला काळजीपोटी ती वापरायला हवी होती. अशा 2 आया समाजात आहेत तर अशा 200 नसू शकतात का? जर तुमचा विचार ताकदवान आहे तर तो तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतो आणि त्याचा प्रचार प्रसार होतो.
 
 
बरवाला मोठं करण्यात मराठी माणसाचा मोठा हातभार आहे. जोखीम होती पण स्वतःवर आणि द्यायचं ते चांगलं या विचारावर विश्वास होता. माझे बाबा आणि सासरे कायम सांगायचे की, नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. मला वाटत बरवा ब्रँड उभा राहाण्यात या म्हणण्याने हातभार लावला. माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना वेळेचा उत्तम उपयोग करून काही काम करायचं होतं त्यांच्यासाठी आम्ही संधीचा दरवाजा खुला केला. एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला केलेली चांगली मदत म्हणजे महिला सक्षमीकरण. अशा स्त्री व्यावसायिकांच्या मदतीने बरवा आज सक्षमपणे उभा आहे.
 
बरवाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती कशी झाली आणि समाजातले विविध घटक कसे जोडले गेले?
 
- आमच्या टीममध्ये 97 टक्के महिला काम करतात. मॅन्युफॅक्चरिंगपासून फायनल पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक विभागात मोठ्या संख्येने महिला काम करतात. विक्री विभागात 172 महिला काम करतात. सध्याच्या घडीला स्कीन केअर, बॉडी केअर, हेअर केअर आणि मेकअप अशा चार श्रेणीत आमची उत्पादनं आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई (UAE), यांमध्ये बरवा ब्रँड पोहोचला आहे आणि फक्त भारतीय नव्हेत तर इतर राष्ट्रीयत्वाच्या लोकांना देखील हे प्रॉडक्ट आवडताहेत.
 
 
एखादा चांगला विचार समोर आला तर समविचारी माणसं जोडली जातात, असंच काहीसं बरवाबाबत घडताना दिसतंय.सातार्‍यासारख्या निमशहरी भागात आमचं काम आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात महिलांची टीम आम्ही उभी केली आहे. कस्टमर केअर विभागात अकलूज, विटा, सातारा सारख्या भागातून एक टीम काम करते. विविध वयातील अनेक स्त्रिया जोडल्या गेल्या आहेत. महिलांसोबत मुलं, पुरुषवर्ग हाही आमचा ऑडियन्स आहे. लहान बाळांना आपण तेलाने मसाज करतो, हाही स्किन केअरचा एक भाग आहे. सगळ्या वयोगटातील लोकांना वापरता येतील असे प्रॉडक्ट आम्ही तयार करतो. आमचा ब्रँड आता फॅमिली ब्रँड झालाय.
 
 
फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं आपण म्हणतो, तुम्ही पेशाने फॅशन डिझायनर आहात आणि कॉस्मेटिक क्षेत्रात काम करत आहात तर महिलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी राहणीमान हा घटक किती महत्त्वाचा आहे?
 
- समजा, मी आहे त्या घरातल्या कपड्यांमध्ये भाजी आणायला जात असेल आणि स्वच्छ टापटीप कपडे घालून बाहेर जात असेल तर व्यक्तिमत्त्वात पडणारा जो फरक आहे तोच एक साधा ड्रेस त्यावर हलकीशी लिपस्टिक लावली तर व्यक्तिमत्त्वातला जो बदल घडतो तो आपल्याला सहज अनुभवता येतो. कारण प्रत्येकीला पडद्यावर दिसणार्‍या अभिनेत्रीसारखा मेकअप रोज करता येणं शक्य नसतं. पण काही गोष्टी वापरून आपण आपल्याच व्यक्तिमत्त्वातला बदल नक्कीच अनुभवू शकतो. आज मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक जण बरवाकडे वळले आहेत. हे सगळे सेलिब्रिटी जेव्हा सांगतात की, मी बरवाचे प्रॉडक्ट वापरत आहे आणि I'm feeling good तर हा फील गुड फॅक्टर सगळ्यांना हवासा वाटतो. कारण तो व्यक्तिमत्त्वाला खुलवणारा असतो आणि हा बदल आत्मविश्वास आपोआप वाढवतो. सुंदरतेची फार काळजी करू नका, तुम्ही मनाने सुंदर असाल तर ते तुमच्या चेहर्‍यावर दिसतं. स्त्री असो किंवा पुरुष तुमच्यातल्या अंगभूत चांगलेपणाला एक हलकीशी रंगीत किनार दिली तर ते चांगलेपण आणखी उजळतं. तुमच्यातल्या चांगुलपणाला, मनाच्या सुंदरतेला उजळवण्याचं काम बरवा करतो. बस इतकंच.....
 
या संपूर्ण प्रवासात घरच्यांची साथ कशी होती?
 
- एखादा पुरुष जेव्हा कामासाठी घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्यामागे स्त्री खंबीरपणे उभी राहते. पण जेव्हा एखादी स्त्री कामासाठी बाहेर पडणार असते तेव्हा तिच्यामागे पूर्ण घराला उभं राहावं लागतं. फक्त नवरा, सासूसासरे, आईवडील यांनीच उभं राहून नाही चालत, तर तिच्या मुलांनी सुद्धा तितकच साथ देणं गरजेचं असत. आई बाहेर जात असेल तेव्हा मुलं रडायला लागली तर आईचा पाय निघत नाही. पाय अडखळतो. याबाबतीत मी मात्र भाग्यवान आहे. माझी मुलं वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षांपासून माझ्यासोबत स्टॉलवर उभी राहायची. घरातल्या मदतनीस महिलाही खूप समजून घ्यायच्या. जेव्हा त्यांना कळायचं की, मला 10 -10 दिवस बाहेर गावी जावं लागणार आहे तर मी दांडी नाही मारली पाहिजे. ही पण एक प्रकारची मदतच आहे. एक स्त्री दुसर्‍या स्त्रीची शत्रू आहे, असं आपण का म्हणतो, ती कुठल्याही रूपात आपल्या मागे उभीच राहते, मदत करते. हा अनुभव मला कायम आला आहे. माझी मोठी नणंद पॅकेजिंग विभागाची हेड म्हणून काम करते. तिचे मिस्टर अकाऊन्टस विभागाचे हेड आहेत. धाकटी नणंद बरवाची डिस्ट्रिब्यूटर म्हणून लातूर येथे काम करते. मी पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर माझ्याकडे काम करणार्‍या मावशींना आम्ही पॅकिंग विभागात काम दिलं. ही साथ खूप महत्त्वाची असते.
 
 
भविष्यातील योजना, स्वप्न काय आहेत?
 
 
पृथ्वीवर जिथे जिथे माणसं आहेत तिथे बरवा पोहोचावा ही इच्छा आहे. नॉर्वेसारख्या देशात जिथे प्रचंड थंडी असते तिथे आम्ही तुपाचा स्निग्धपणा घेऊन पोहोचलो तर आनंदच आहे. आज अमेरिकेत दोन वर्षे झाले बरवा पोहोचला आहे. बरवाच्या बाबतीत एक खास गोष्ट अशी आहे की, आधी सेलिब्रेटी एखादा ब्रँड वापरतात, त्याची जाहिरात करतात आणि मग आपण तो खरेदी करतो. बरवाच्या बाबतीत मात्र अगदी उलट झालं आहे. आधी सामान्य माणसांनी बरवा वापरायला सुरुवात केली आणि मग तो सेलिब्रेटींपर्यंत नेऊन पोहोचवला.
 
 
पूर्वी कुणी अमेरिकेला जायला निघालं की, भलीमोठी कॉस्मेटिक्सची लिस्ट दिली जायची आता अमेरिकेतून इथे आलेले बरवा आठवणीने घेऊन जातात, याचा आनंद आहे. यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. या गुढीपाडव्याला आम्ही न्यूझीलंडमध्ये जाणार आहोत. इतकंच नाही तर काश्मीरच्या छोट्या गावातून आम्हाला ऑर्डर येते, आसाममध्ये जिथे पार्सल पोहोचायला 9 दिवस लागतात तिथूनसुद्धा आम्हाला जेव्हा ऑर्डर येते तेव्हा संपूर्ण टीम आनंदात असते... तेव्हा बरवा हा फक्त मराठी ब्रँड न राहता एक भारतीय ब्रँड बनतो. भारतीयच नाही तर परदेशी नागरिकही बरवा वापरतात तेव्हा आनंद होतो.

बागेश्री पारनेरकर

सा. विवेकमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. रेडिओ, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात काम करण्याचा अनुभव. विविध माध्यमातून योग आणि आहार विषयक लेखन. नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्राची आवड. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव...