शहराकडून खेड्याकडे

विवेक मराठी    20-Mar-2026   
Total Views |
farmer
मुंबईत वाढल्या तरी कविता चांदोरकर यांना मातीची आणि निसर्गाची ओढ स्वस्थ बसू देईना. शहरातील यशस्वी जीवन मागे ठेवत त्यांनी कोकणातील केळशीच्या मातीत नवे स्वप्न रुजवले. शेती, गोधन आणि नैसर्गिक जीवनशैली स्वीकारत त्यांनी संघर्षातून उभा केलेला हा प्रेरणादायी प्रवास.
farmer
 
शहरातील वेगवान जीवन, उंच इमारती, गजबजलेले रस्ते आणि आधुनिक सोयीसुविधांनी भरलेले वातावरण या सगळ्यात अनेकांचे आयुष्य घडते. पण या सार्‍या चकचकीत जीवनातही काही मनं अशी असतात, ज्यांना निसर्गाची, मातीची आणि साधेपणाची ओढ सतत आतून खुणावत असते. शहरात वाढलेल्या अनेकांच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, जेव्हा त्यांना जाणवते की जीवनात काहीतरी महत्त्वाचे हरवले आहे. ते म्हणजे शांतता, मोकळेपणा आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते. निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याची ही ओढ माणसाला हळूहळू गावाकडे, शेतीकडे आणि साध्या जीवनशैलीकडे खेचू लागते. हिरवीगार झाडे, मोकळे आकाश, पक्ष्यांचा किलबिलाट, शेतातील पिकांची डोलणारी लय या सगळ्यांत एक वेगळीच समाधानाची अनुभूती असते. शहरातील धावपळीच्या आयुष्यापेक्षा निसर्गाच्या कुशीत जगणे अधिक अर्थपूर्ण वाटू लागते.
 
 
अशा ओढीतून काही जण शहरातील सुखसोयी बाजूला ठेवून मातीशी नाते जोडण्याचा धाडसी निर्णय घेतात. शेती, गोधन, नैसर्गिक अन्न आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारत ते निसर्गाशी पुन्हा मैत्री करतात. दापोली तालुक्यातील रोवले (केळशी) कविता आशुतोष चांदोरकर ह्या त्यातील एक आहेत.
 

farmer  
निसर्ग, मातीशी जुळलेल्या नात्याचा आणि शेतीविषयी निर्माण झालेल्या आत्मशोधाचा प्रवास उलगडताना कविताताई म्हणाल्या, “मुंबईत जन्म, बालपण, शिक्षण अगदी आयुष्याची चाळीसपेक्षा अधिक वर्षे या गजबजलेल्या शहरात गेली. सुखसोयी, सुरक्षितता, समाधान सर्व काही होते. जीवन व्यवस्थित मांडलेल्या ताटासारखे होते; सर्व काही परिपूर्ण पण तरीही कशाची तरी उणीव जाणवत होती. जणू त्या ताटात मीठच नव्हते. ही उणीव होती निसर्गाची, मातीची आणि मोकळेपणाने जगण्याची. शिक्षणाच्या काळात आर्थिक गरज नसतानाही काहीतरी नवीन शिकावे, अनुभवावे या उत्सुकतेतून मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. मुंबई विद्यापीठातून बी.कॉम. पदवी पूर्ण केली. त्यानंतर एच.एम.व्ही. कंपनीत नोकरी सुरू झाली आणि त्याच वेळी लग्न झाल्याने आयुष्याचा नवा टप्पा सुरू झाला.
 
 
लग्नानंतर काही काळ आम्ही पुण्यात वास्तव्यास होतो. घराच्या मागे वाहणारी नदी, तिच्या काठावरची हिरवाई, विविध पक्ष्यांची किलबिल आणि आजूबाजूला असलेली जैवविविधता या सगळ्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. थोडीफार बागकामाची हौसही तिथे पूर्ण होत होती. मात्र नंतर यजमानांना - आशुतोषना मुंबईत नोकरी लागल्यामुळे पुन्हा मुंबईतील कांदिवली येथे परतावे लागले. या काळात आशुतोष यांच्या पाठिंब्यामुळे विविध उपक्रम राबवण्याची संधी मिळाली. त्याच काळात ज्योतिर्भास्कर साळगांवकर यांच्यासोबतही काम करण्याचा अनुभव मिळाला. पुढे बिहारमध्ये योग भारती येथे चार महिन्यांचा रेसिडेन्शियल योग कोर्स पूर्ण केला.
 

farmer  
त्या काळात मुलगा ऋत्त्विक लहान होता. पण आई, भाऊ-बहीण आणि आशुतोष चांदोरकर यांनी त्याची जबाबदारी सांभाळली, त्यामुळे स्वतःच्या वाटचालीत पुढे जाणे शक्य झाले. यानंतर मुंबईत योग शिक्षिका म्हणून ’नम्रता’ या नावाने माझी ओळख निर्माण होऊ लागली. अनेक मोठ्या कंपन्या, बँकांचे सीईओ, चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्ती, तसेच टिना अंबानी यांसारखे अनेक मान्यवर माझ्या योग वर्गात सहभागी होत होते. नाव, प्रतिष्ठा, आर्थिक सुबत्ता सर्व काही मिळाले होते. तरीही मन कुठेतरी अस्वस्थ होते.
 
 
शहराच्या भिंतींमध्ये अडकलेले आयुष्य जणू मातीचा सुगंध शोधत होते. जंगल, गाव, मोकळे आकाश या सगळ्याची ओढ दिवसेंदिवस वाढत होती. या ओढीनेच मी 2008-09 साली माणगाव-गोरेगाव परिसरात पहिली जमीन घेतली. तिथे दोन वर्षे स्थानिक जनजातींच्या मदतीने भातशेतीही केली. मात्र या भागातील काही अडचणी शुद्ध शाकाहारी अन्नाची सोय नसणे, पाणथळ जमीन असल्यामुळे घर बांधण्यातील अडथळे यामुळे तिथे स्थिरावणे कठीण होत होते. दरम्यान काही कारणाने मी केळशी येथे आले आणि जणू शोध संपला. समुद्रकिनार्‍याची शांतता, हिरवागार परिसर, मातीचा सुगंध आणि निसर्गाशी जवळीक हे सर्व अनुभवताना असे वाटले की ही जमीनच मला इथे बोलावून घेत आहे. शहराच्या चकाकीतून सुरू झालेला हा प्रवास शेवटी निसर्गाच्या कुशीत येऊन विसावला आणि आयुष्याच्या ताटातले हरवलेले मीठ जणू पुन्हा सापडले.”
 
 
शेती, निसर्ग आणि माणसांची सांगड
 
शेती, निसर्ग आणि माणसाच्या नात्याची सांगड घालत कविताताई यांनी प्रत्येक मुद्दा इतक्या जिवंतपणे उलगडला की तो ऐकताना माहितीबरोबरच संवेदनाही अनुभवता येत होत्या. कविताताई सांगतात,‘मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून दापोली तालुक्यातील केळशी येथील रोवले गावात 2010 साली जमीन घेतली आणि आयुष्याचा वेगळाच प्रवास सुरू झाला. सुरुवातीला फक्त येणं-जाणं होत होतं; पण हळूहळू त्या जमिनीत नारळ-पोफळी, काजू-आंबा, मसाल्याची पिके, पेरू, जांभूळ, कोकम अशी झाडे रुजू लागली आणि त्या हिरव्या जगाशी मनाचं नातं जुळत गेलं. मुंबईत योगशास्त्र शिकवताना लोकांच्या आहारात वाढलेले कृत्रिम अन्न आणि त्यातून निर्माण होणारे आजार जवळून पाहत होते. त्याच काळात नकळत माझ्या मनात एक बीज रुजत होते नैसर्गिक शेतीचे. सुरुवातीला गावातून शेण आणत होते; पण वाढती किंमत आणि म्हशीच्या शेणाचा अनुभव पाहून अखेर स्वतः गाय घेण्याचा निर्णय घेतला. शेतघर उभे राहिले, आजूबाजूला हिरवळ आणि वनराई वाढू लागली आणि जमिनीशी नातं अधिक घट्ट होत गेले.
 
farmer
 
या प्रवासाच्या सुरुवातीला ना कोणाचे मार्गदर्शन होते, ना कृषी विभागाच्या योजना माहीत होत्या. शहरी माणसाला अशा गोष्टींची माहितीच नसते. पण नंतर शेणगे साहेबांची भेट झाली. माझी शेतीची कल्पना त्यांना आवडली आणि त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक योजना माझ्यापर्यंत पोहोचू लागल्या. त्याच वेळी त्यांनी विनायक महाजन यांची ओळख करून दिली. समविचारी भेटीचे ते नाते इतके जवळचे झाले की ते कधी ‘महाजन काका’ झाले कळलेच नाही.
 
 
यानंतर कृषी सहाय्यक म्हणून गेंद साहेबांची नेमणूक झाली आणि अनेक अडचणी सहज सुटू लागल्या. जणू सोन्यासारखे पीक यावे म्हणून देवाने सोन्यासारखी माणसेच पाठवली होती. राजेंद्र भट काका, कुटे सर यांसारख्या जाणकारांच्या भेटींमुळे शेतीकडे पाहण्याची दृष्टी अधिक समृद्ध झाली. लाल तांदूळ पिकवण्याच्या उद्देशाने आधीच पॉवर टिलर घेतला होता. तेव्हा अनुदान योजना असतात हे माहीतही नव्हते. पुढे मात्र गवत कापणी यंत्र (ग्रास कटर), काजू लागवड, ठिबक सिंचन अशा अनेक सुविधा अनुदानातून मिळू लागल्या.’
 
गोधनाचा प्रवास
 
गोधनाचे संगोपन करताना आलेल्या समृद्ध अनुभवांविषयी त्या सांगताना म्हणतात, ‘नैसर्गिक शेतीचा विचार प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर स्वयंपूर्ण खतनिर्मिती अत्यावश्यक आहे, हे हळूहळू स्पष्ट होत गेले आणि मग एक दिवस माझ्या आयुष्यात तीन नवीन सदस्य आले. कोकण कपिला जातीच्या पहिल्या तीन गायी. त्या क्षणापासून मी खर्‍या अर्थाने गोधनाची मालकीण झाले. त्या दिवसाची कृतार्थता आजही मनात ताजी आहे. पण गाई घरात आणणे ही केवळ सुरुवात होती. खरी कसरत होती त्यांना समजून घेण्याची. शहरात वाढलेली असल्यामुळे गायीला हात लावायलासुद्धा सुरुवातीला भीती वाटायची. पण निसर्ग आणि गरज दोन्ही उत्तम गुरू असतात. हळूहळू मी धार काढायला शिकले, गायींची काळजी घ्यायला शिकले. याच काळात एक मोठा अनुभव आयुष्यात आला. मिलिंद देवल यांच्या फोनवरून मिळालेल्या मार्गदर्शनाने मी पहिल्यांदाच एका गाईचे बाळंतपण केले. त्या क्षणी आत्मविश्वासाचा नवा अंकुर फुटला. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आजपर्यंत मी जवळजवळ 40 ते 50 गायींची बाळंतपणे यशस्वीपणे केली आहेत.
 

krushivivek 
 
मात्र शेतीचा प्रवास नेहमीच सरळ नसतो. काही काळाने कामगारांची मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे गोधन कमी करण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला. गायींचे संगोपन आणि शेतीची जबाबदारी सांभाळण्यासाठी मला केळशी-रोवले येथेच येऊन राहावे लागले. आणि तेव्हाच आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले. शहरातील योग शिक्षिकेचे जीवन मागे पडले आणि नकळत मी या मातीशी कायमची बांधली गेले. जे कधी स्वप्नातही नव्हते ते घडले. मी कायमची रोवल्याचीच झाले.
 
 
वादळानंतरही उभी राहिलेली जिद्द
 
2020 साली कोकणात आलेल्या वादळाने कविताताईंचे आयुष्य उलथून टाकले, पण त्याच संकटाने दिलेल्या नव्या उमेदीविषयी त्या सांगताना म्हणाल्या, “शेतीत रममाण झालेल्या त्या दिवसांत कामाची कुठे नोंद होत होती, त्यासाठी पुरस्कारही मिळत होते, शेतीची घोडदौड सुरू होती. गोकुळ हळूहळू भरत होते. आंबा, काजू आणि हळदीची पिके वार्‍यावर डोलत होती. शेतात समृद्धीची चाहूल लागली होती. इतकेच नव्हे तर काजू आणि आंब्याला परदेशातून मागणी येऊ लागली होती.
 
 
परंतु जीवनाच्या प्रवासात परीक्षा अचानक समोर उभ्या राहतात. 2020 मध्ये आलेल्या भीषण निसर्गवादळाने क्षणार्धात सगळे चित्र बदलले. डोळ्यासमोर उभे केलेले घर, मेहनतीने बांधलेले गोठे, वाढवलेली आंबा-काजूची बाग सगळे एका क्षणात उद्ध्वस्त झाले. जणू आयुष्याने मला पुन्हा सुरुवातीच्या टप्प्यावर फेकून दिले. हातात पैसा नाही, राहायला घर नाही आणि सांभाळायला अनेक जीवांची जबाबदारी अशी कठीण वेळ माझ्यासमोर उभी राहिली.
पण मनात एक गोष्ट ठाम होती, गाईंना सोडून मी परत जाणार नाही. माझा हा निर्धार लक्षात आल्यानंतर बाबांनी घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. घर उभे राहीपर्यंत मी गोठ्यातच राहिले. त्या काळात माझ्या योगक्षेत्रातील काही शिष्यांनीही मदतीचा हात दिला आणि गोठा पुन्हा उभा राहिला. या प्रवासात काही अशीही माणसे भेटली की ज्यांनी मला कधी पाहिले नव्हते, पण अंतर्मनातून आलेल्या प्रेरणेने ते मला शोधत आले आणि मदत केली. काही जणांनी तर वर्षभरासाठी गाईंना लागणार्‍या चार्‍याचा खर्चही उचलला.
 
 
त्या कठीण काळात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. संकटे येतात तेव्हा निसर्ग आपली परीक्षा घेतो; पण त्याच वेळी माणुसकीच्या रूपाने देवही मदतीला धावून येतो. त्या वादळाने बरीच स्वप्ने उद्ध्वस्त केली, पण त्याच वादळाने माझ्या जिद्दीला आणि माणसांवरील विश्वासाला नव्याने बळ दिले.“
 
 
नैसर्गिक उत्पादनांची अनोखी वाटचाल
 
नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारल्यानंतर त्यांच्या शेतात विविध पिके आणि उत्पादनांची समृद्ध शृंखला उभी राहिली आहे. निसर्गाशी सुसंवाद साधत, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक साधनांचा समतोल साधत त्यांनी आपल्या शेतातून अनेक दर्जेदार उत्पादने तयार केली आहेत. त्यांच्या शेतातील लाल तांदूळ हे आरोग्यदायी आणि पौष्टिक धान्य म्हणून ओळखले जाते. यासोबतच आंबा आणि काजू ही कोकणातील प्रमुख फळपिकेही त्यांच्या शेतात भरघोस प्रमाणात घेतली जातात. मागील वर्षी काजूला तब्बल 1500 रुपये किलो दर मिळाला होता, तर यंदा 1600 रुपये किलो दराने काजूचे उत्पादन आधीच बुक झाले आहे. त्यांच्या शेतातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पीक म्हणजे हळद. डघ-4 जातीची हळद. त्या स्वतः रोपांपासून तयार करतात. काढणीनंतर हळदीच्या चकत्या करून त्या सोलर ड्रायरमध्ये वाळवतात आणि त्यापासून दर्जेदार हळद पावडर तयार केली जाते. या हळदीला बाजारात साधारण 550 रुपये किलो दर मिळतो. ’मिलिंद माधव’ या ब्रँड अंतर्गत उत्पादनाची विक्री केली जाते.
 
 
गोधनाच्या संगोपनातून तयार होणारे शुद्ध वैदिक तूप हेही त्यांच्या शेताचे विशेष आकर्षण आहे. हे तूप सुमारे 3000 रुपये किलो दराने विकले जाते. दरमहा सुमारे 20 किलो तूपाची विक्री होते. अग्निहोत्र करणारे साधक, तसेच कॅन्सर आणि इतर गंभीर व्याधींनी ग्रस्त असलेले अनेक लोक शुद्धतेवर विश्वास ठेवून हे तूप प्राधान्याने घेतात.
 
 
याशिवाय शेतात नारळ आणि सुपारी यांचीही लागवड आहे. नैसर्गिक शेतीच्या पद्धतीतून तयार होणारे सेंद्रिय खत हे शेतातील आणखी एक महत्त्वाचे उत्पादन आहे. मुक्त संचार असलेल्या गोठ्यातील गायी, तसेच विशेषतः जोपासलेल्या बकर्‍या आणि कोंबड्यांच्या विष्ठेमुळे तयार होणारे हे खत जणू ‘काळे सोने’ ठरते.
 
 
शेतीसाठी जीवामृत आणि गो-कृपा अमृत यांसारखी नैसर्गिक द्रव्येही त्या तयार करतात. गरज असलेल्या शेतकर्‍यांना ही द्रव्ये दिली जातात. त्याचबरोबर गोमूत्र आणि तुरटी यांच्या आधारे ‘गो-शुद्धी’ नावाने तयार होणारे गो-नाईल, शेणापासून बनवलेले दंतमंजन अशा अनेक उपयुक्त वस्तूंची निर्मितीही येथे होते. तथापि, कोकणात अजूनही सेंद्रिय शेतीचे आणि शुद्ध अन्नाचे महत्त्व पूर्णपणे समजलेले नाही. त्यामुळे या उत्पादनांना अपेक्षित प्रमाणात मागणी मिळत नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. भविष्यात भाजीपाला, कलिंगड आणि इतर विविध पिकांची लागवड करण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र वानर आणि रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे या प्रयोगांना अनेकदा अडथळे येतात’, असेही त्यांनी सांगितले.

संपर्क
कविता आशुतोष चांदोरकर
रोवले (केळशी), ता. दापोली जि. रत्नागिरी
मो. 7447303844
 
 
पारंपरिक ऊर्जा आणि नैसर्गिक शेतीचा सुंदर संगम
 
नैसर्गिक शेतीसोबत पारंपरिक ऊर्जेचा वापर करत त्यांनी शाश्वत शेतीची प्रभावी पद्धत उभी केली आहे. शेतात दोन गोबर गॅस युनिट (प्लास्टिक टाकी व फेरो सिमेंट टाकी) कार्यरत असून त्यातून ऊर्जा निर्माण केली जाते. तसेच सोलर ड्रायरच्या साहाय्याने हळद, काजू, केळी व इतर घटक वाळवले जातात.
 
 
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्यांच्या शेतात गाय, बकरी, कोंबड्या आणि जमिनीतील उपयुक्त जीवाणू यांचा नैसर्गिक समन्वय साधला आहे. मुक्तसंचार गोठ्यातून मिळणारे गायींचे खत, गलेरिसिडियाचा पाला आणि पालापाचोळा यांच्या साहाय्याने जमिनीची गुणवत्ता वाढवली जाते. त्यावर जीवामृत आणि अमृत पाणी वापरल्याने माती अधिक सुपीक बनते. बियाण्यांच्या बाबतीत त्या प्रामुख्याने देशी वाणांची निवड करतात. उत्कृष्ट फळांपासून बी निवडून रोपे तयार करतात आणि लागवडीपूर्वी बियाणे ताक किंवा गोमूत्रात भिजवून वापरतात, त्यामुळे मुळांची वाढ जोमदार होते, असा त्यांचा अनुभव आहे.
 
 
सामाजिक बांधिलकीतून संस्कारांची जपणूक
 
शेतीसोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत कविता चांदोरकर केळशी येथे ‘आदिशक्ती’ आणि ‘काळभैरव’ या उपक्रमांतर्गत मुलांसाठी विविध संस्कारवर्ग चालवतात. या वर्गांमधून मुलांना हिंदू धर्माची ओळख, संस्कारमूल्ये, स्वसंरक्षण कौशल्ये (सेल्फ डिफेन्स), गड-किल्ल्यांचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य आणि भारताचा समृद्ध व गौरवशाली इतिहास यांची प्रेरणादायी माहिती दिली जाते.
 
 
यासोबतच कोकणातील नैसर्गिक संपदा, शेती आणि स्थानिक विकासाच्या विविध संधी मुलांसमोर उभ्या करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. भविष्यात कोकणातील समृद्ध प्रकल्पांची ओळख करून देत मुला-मुलींना त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
 
 
एकूणच शहरातून गावाकडे वळलेल्या कविता चांदोरकर यांनी जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा प्रवास अनेकांना मातीशी पुन्हा नाते जोडण्याची प्रेरणा देणारा ठरतो.

विकास पांढरे

सध्या 'कृषी विवेक' (विवेक समूह) चे कार्यकारी संपादक. एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारी याठिकाणी वार्ताहर व उपसंपादक म्हणून अनुभव. कृषी, समाज, साहित्य व वंचित समाजाविषयी लिखाण.