डॉ. हेमंत बेडेकर
9767200905

चीनने गेल्या 4-5 दशकांत बांबू (bamboo) लागवड आणि उद्योग क्षेत्रात केलेली झपाट्याने प्रगती जगासाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. सखोल संशोधन, योग्य प्रजातींची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकर्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणारी प्रभावी यंत्रणा यांच्या बळावर चीनने बांबूला जागतिक औद्योगिक संपत्तीचे रूप दिले. या प्रक्रियेमागील वैज्ञानिक दृष्टीकोन, उत्पादन वाढ आणि विविध उद्योगनिर्मितीचा अभ्यासपूर्ण आढावा या लेखात मांडला आहे.
या आधीच्या लेखामध्ये आपण चीनने केलेल्या विविध प्रांतांमधील बांबू लागवड आणि बांबू उद्योगाबद्दल माहिती घेतली. हे सगळं करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की, गेल्या 40-50 वर्षामध्ये बांबू उद्योगामध्ये चीनने केलेली घोडदौड लक्षणीय आहे, विलोभनीय आहे. त्याबद्दलची अधिक माहिती आपण या लेखात घेऊया.
एखादा खंडप्राय देश अर्धशतकात एका बांबूसारख्या बहुवार्षिक पिकात जगाचे नेतृत्व करण्याएवढी झेप कशी घेतो? हे खोलात जाऊन अभ्यासण्यासारखे आहे. याचे गमक काय आहे? एका वाक्यात सांगायचं झालं तर, प्रचंड प्रमाणात संशोधन आणि त्याची सामान्य शेतकर्यांना माहिती देणे, नवीन तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक वापर, नवनवीन वस्तूंची निर्मिती ही क्रांती आपल्या देशात व्हावी म्हणून त्या देशातील सरकारने आणि त्याला अनुषंगून असलेल्या संस्थांनी बजावलेली उत्तम कामगिरी व यासाठी भक्कम पुरवठा साखळी उभी करणे. या सर्व घटकांची आपण एकेक करून थोडी सखोल माहिती घेऊया.
तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर सर्वात प्रथम चीनमधील शास्त्रज्ञांनी दिलेलं भरीव योगदान लक्षणीय आहे. या वाटचालीच्या 40-50 वर्षांमध्ये सुमारे 300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी बांबूच्या विविध प्रजातींचा केलेला सखोल अभ्यास, हवामानानुसार कोणत्या प्रजाती निवडाव्यात याची मिळवलेली समग्र माहिती आणि त्या प्रजातींपासून परंपरागत वस्तूशिवाय आपण काय काय करू शकतो यासाठी केलेले अविरत संशोधन, हे नवीन झालेले संशोधन प्रत्यक्ष वापर करणार्या शेतकर्यापर्यंत आणि उद्योजकांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेले अविश्रांत परिश्रम हे फार महत्त्वाचे आहेत.
गोल्डन बांबू

विविध बांबू प्रजातींचा शोध व लागवड
बांबूसारख्या पिकाचा अभ्यास करताना निसर्गतः आपल्या प्रदेशात आढळणार्या सर्व प्रजातींचा व त्यांच्या औद्योगिक वापरासाठीचा, त्यांच्या वनस्पतीशास्त्रीय आणि कायिक गुणधर्मांचा व त्यांच्या विविध हवामानातील व मातीतील वाढीचा सखोल अभ्यास करावा लागतो. सुरुवात करताना 1988 सालच्या बांबूसंदर्भातल्या एका अभ्यासामध्ये असे आढळले की चीनमध्ये फक्त 6 बांबू प्रजाती उपलब्ध होत्या. त्यानंतर झालेल्या सखोल अभ्यासानुसार आज सुमारे 500 प्रजातींचा उल्लेख करता येतो. ही प्रजातींची वाढलेली संख्या ही सर्वदूर प्रत्यक्षात फिरून मिळवलेली माहिती आणि अभ्यास यावर आधारित आहे. यापैकी सर्वच प्रजाती त्यावेळच्या उद्योगांच्या गरजेनुसार उपयुक्त असतात असे नाही. यामधून हवामान, उपयुक्तता आणि उत्पन्न यानुसार विशिष्ट प्रजाती निवडता येतात. याबरोबरच या प्रजातींच्या उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष देऊन प्रती हेक्टरी जास्त उत्पन्न कसे वाढवावे याचा सखोल अभ्यास करून कोणत्या प्रांतात कोणत्या प्रजाती व त्यांचे उपयोग हे निश्चित केले जाते. हे सर्व करताना वेगवेगळ्या हवामान विभागात या सर्व प्रजाती शेजारी शेजारी लावल्या गेल्या. यालाच बांबू प्रजाती संग्रह किंवा लरालेेीर्शीीां म्हणतात. अशी लागवड झिजियांग प्रांतामधील अंजी काउंटी, झांगझाऊ आणि फुजियान या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरवातीला केली गेली व नंतर इतर सर्व प्रांतामध्ये ही झाली. या सर्व ठिकाणी या बरोबरच बांबूच्या पुनरुत्पादनावर व रोपवाटिका तंत्र विकसित केले गेले. भक्कम पुरवठा साखळी तयार होण्यासाठी लागणार्या बांबूचे पुरेसे उत्पादन होण्यासाठी किती हेक्टर लागवड करावी लागेल याचा विचार करून उत्कृष्ट दर्जाच्या रोपांची कमतरता पडू नये म्हणून पुरेशा रोपांची निर्मिती केली गेली आणि हे अजूनही पाळले जाते. या प्रयत्नामुळे साहजिकच त्या त्या प्रांतामध्ये कोणत्या प्रजाती उत्तमपैकी वाढतात व त्यांचा उपयोग करून कोणत्या नवीन वस्तू तयार करता येतात याच्यावरचा सखोल अभ्यास होऊ शकला. त्यांच्या निर्मितीचे तंत्र विकसित झाले. व्यापारी तत्त्वावर कोणत्याही नवीन वस्तूची निर्मिती करण्यासाठी कोणता बांबू लागतो आणि कोणती यंत्रे लागणार याची पूर्ण माहिती हातात असल्याने साहजिकच किती उत्पादन व ते कुठे विकायचे- देशात की विदेशात- हे ठरवून उत्पादन केले गेले. या सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे व्यापार करणे सुलभ झाले. हे सर्व ठरवताना उत्पादकांना सतत प्रोत्साहन मिळे. त्यामुळे व्यापारातील सुलभता आणि खात्री उत्पादकांना दिली गेली.
बांबू संग्रहाच्या लागवडीचा अभ्यास करताना त्या त्या हवामानात कोणत्या किडी आणि रोग येतात याचा सखोल अभ्यास करून हवामानानुसार कोणत्या प्रांतात व कोणत्या प्रजातीवर येणार्या किडी व रोगावर कोणते औषध फवारायचे याची सविस्तर माहिती दिली गेली आणि आजही दिली जाते. त्यामुळे हवामान बदलले तर अशा वेळी काय फवारायचे याची शेतकर्यांना आधीच कल्पना असल्याने उत्पादनात खंड पडत नाही किंवा घट होत नाही.
कोणत्या हवामानात आणि कोणत्या भौगोलिक परीस्थितीत प्रत्येक प्रजाती कशी वाढते यावर सखोल संशोधन आणि शेतकर्यांचे प्रशिक्षण झालेले असल्याने आणि याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध असल्याने कोठेही चुकीच्या जाती लावल्या जात नाहीत. हे सर्व 1980 सालापासून चालू आहे. यासाठी आजही तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. बांबूची प्रत्येक हंगामातील वाढ व त्यानुसार होणारे कायिक बदल, प्रत्येक हंगामानुसार विविध निविष्टांची आवश्यकता व भासणारी कमतरता, जैवभार कसा वाढतो व त्यातील कर्बाचे स्थान, मृत भागांचे जमिनीतील चलनवलन आणि त्याचा जमीन समृद्ध करण्यासाठी उपयोग, बांबूची वाढ होत असताना जमिनीतील विविध पोषक द्रव्ये कशी वापरली जातात आणि ती तूट कशी भरून काढायची हे सर्व शेतकर्यांच्या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग असतात. हे सर्व संशोधन करताना उपलब्ध आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. प्रत्येक उत्पादनातील सर्व बारकावे तपासून ते शेतकर्यांपर्यंत पोचवले जातात त्यामुळे शेतकरी अधिक जागृत होऊन अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी सतर्क रहातो. चीनमध्ये व्यापारी तत्त्वावर लावल्या जाणार्या सुमारे 71 प्रजातींचा असा सखोल अभ्यास आजपर्यंत केला गेला आहे.
हेक्टरी उत्पादन
दर हेक्टरी उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या जातींचे पुनरुत्पादन कसे करायचे, यासाठी बी, पेरांपासून रोपे करणे, कंद लागवड, याबरोबरच उती संवर्धन अशा पारंपरिक आणि आधुनिक अशा सर्व पद्धतींवर संशोधन करून रोपवाटिका तंत्र विकसित केले गेले. रोपांच्या सशक्त वाढीसाठी दर हेक्टरी किती रोपे लावायची, दोन ओळी आणि रोपे यात अंतर किती असावे? लावणीचा योग्य हंगाम कोणता, खते केव्हा, कोणती, किती आणि कशी घालावीत, पाणी कुठे केव्हा, किती व कसे द्यावे, अधिक उत्पादनांसाठी कोणत्या घटकावर भर द्यावा आणि अधिक कोंब मिळवून त्यांचे बांबूत रुपांतर कसे करावे हे सर्व अभ्यासले गेले. या सर्व संशोधनाच्या आधारावर ढोबळमानाने सर्व लागवडींचे तीन गट पडतात. नैसर्गिक बांबू वाढीचा सखोल अभ्यास करताना असे लक्षात आले की काही बांबू लागवडी कमी उत्पन्न देतात (70%), काही बांबू लागवडी मध्यम उत्पन्न देतात (30%) व काही लागवडी विशेष अधिक उत्पन्न (10%) देतात. ही वस्तुस्थिती पाहून कमी उत्पन्न देण्याच्या प्रवृत्तीतून मध्यम उत्पन्न देण्यासाठी काय करायचे हे ठरवले गेले. पुढील 30 वर्षात हे प्रमाण 70 टक्क्यावरून 20 टक्के एवढे करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले आणि त्यात यश आले. अजूनही निसर्गतः कमी उत्पन्न देणार्या पण उपयुक्त प्रजातींवर संशोधन चालू आहे. सर्वांचा प्रयत्न सर्वच प्रजातीचे मध्यम आणि अधिक उत्पन्न देणारे असे दोनच गट कसे होतील यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यावर केंद्रित आहेत. आज 15 टन हेक्टरी उत्पन्नापासून 30 टन हेक्टरी उत्पन्न मिळवणे या दिशेने वाटचाल चालू आहे. याचा परिणाम म्हणून हेक्टरी 20 टनाच्या पुढे उत्पन्न मिळवायला सुरुवात झाली आहे. हे सर्व प्रयत्न होत असताना दर हेक्टरी बांबूचे उत्पन्न व दर हेक्टरी कोंबांचे व्यापारी उत्पन्न हे ध्येय ठेवले गेले. यासाठी 1000 हेक्टर हे एकक गृहीत धरून प्रयत्न केले जातात. हेक्टरी 20000 बांबू आणि 1600उपयुक्त कोंब हे लक्ष्य ठेऊन प्रयत्न केले जातात. तसेच 100 हेक्टर एकक धरून बांबूसाठी 30 टन प्रती हेक्टर आणि कोंबासाठी 3 टन/हेक्टर हे शक्य आहे का हे आजमावले गेले. चीनमध्ये विशेषतः एकपाद बांबू लावण्याच्या प्रदेशात बांबू तोड दर दोन वर्षांनी होते. वरील उत्पन्नाचे आकडे हे दर दोन वर्षांनी तोडलेल्या बांबू व कोंबाचे आहेत. लागवड करताना एकाच वेळी दोन किंवा तीन जातींची मिश्र लागवड करून वर्षभर कोंब मिळवता येतात का याबद्दलही प्रयत्न सुरू झाले. चीन हा सर्वात मोठा बांबू कोंबावर आधारित उद्योगाचा निर्यात करणारा देश आहे. या सर्व प्रयोगामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात आली की छद्मपाद म्हणजेच बेटांनी वाढणार्या बांबूचे दर हेक्टरी उत्पन्न एकपाद बांबूपेक्षा जास्त येते. बेटांनी वाढणार्या काही प्रजातींचे हेक्टरी उत्पन्न 40 टन ते 70 टन पर्यंत जाऊ शकते.
या सर्व प्रयोगांचे निष्कर्ष शेतकर्यांच्यापर्यंत पोचवताना हायब्रीड बियाणांचा जमाना सुरू झाला होता. बांबू शास्त्रज्ञांनी यावरही प्रयोग करायचे ठरवले. गेली 25-30 वर्षे बांबू हायब्रीड्स करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात याला यशही मिळाले आहे. उच्च प्रतीचा धागा देणारी, कोंबाचे गुणधर्म वाढवणारी हायब्रीड बियाणे तयार केली गेली. सहा प्रजातींचे एकमेकांबरोबर प्रयोग करून आतापर्यंत चार हायब्रीड्स उपलब्ध केली गेली आहेत. पण अजून फार विस्तृत क्षेत्रावर त्यांचा वापर होत नाही. अजून प्रयोग चालू आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, जास्त उपयुक्त व आरोग्यदायी घटक वाढवणे, आयुष्यमान वाढवणे आणि जास्त चांगली चव असणारे कोंब असणे असे काही गुणधर्म मिळवण्यासाठी हे चालू आहे. असे हायब्रीड्स तयार केल्यावर त्यांचे उती संवर्धनाने पुनरुत्पादन करणे व मोठ्या प्रमाणावर रोपे उपलब्ध करून देणे यावर काम नित्य नेमाने चालू असते.
बांबू प्रक्रिया उद्योग
बांबूच्या प्रक्रियेवर संशोधन करून अनेक बांबू उद्योगातील अनेक समस्यांची उकल केली गेली. इतर झाडांच्या लाकडाशी तुलना करता बांबूचे काही गुणधर्म हे फायदेशीर ठरतात. त्यामुळे बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय ठरला. यामध्ये बांधकाम क्षेत्रातील व अंतर्गत सजावटीतील वापर, वेगवान वाढ आणि पुनःपुन्हा होणारे उत्पादन, लाकडाचे काही अधिक उपयुक्त गुणधर्म, शोभिवंत गाठी, आणि तुकतुकीतपणा असे गुणधर्म असल्याने लाकडाला पर्याय म्हणून वापर करण्यासाठी बांबू उपयुक्त ठरला. एकदा लाकडाला पर्याय म्हणून उपयुक्तता लक्षात आल्याबरोबर असंख्य उपयोगाचे दालन उघडले गेले. बांबूचा वापर करताना रोग व किडींपासून बचाव करण्यासाठी बांबूवर रासायनिक प्रक्रिया पद्धती शोधल्या गेल्या. प्लायवूड तयार करण्यासाठी अनेक प्रयोग झाले. त्याचबरोबर भुश्यापासून पार्टिकल बोर्ड निर्मिती सुरू झाली. विविध प्रकारच्या चटया एकमेकांना विशिष्ट रसायनांनी चिकटवून त्यांचा प्लाय करण्यात आला. या प्लायचा चीनमध्ये रेल्वे वाघिणी आणि ट्रकमध्ये खालील पत्र्यावर आच्छादन म्हणून प्रचंड प्रमाणात वापर केला जातो त्यासाठी मोठ्या प्रमाणात हा प्लाय लागतो. हा प्लाय झाडांच्या लाकडापेक्षा स्वस्त पडत असल्याने आणि प्रचंड प्रमाणात निर्माण होत असल्याने पुरवठ्यामध्ये खूपच फरक पडला. बांबूचा फर्निचर उद्योगातला वापर खूप वाढला. बांबूचा भुसा, पट्ट्या व रेझिन वापरून बांबूला अधिक बळकटी देणारे व लाकडासारखे दिसणारे कम्पोझीट तयार करण्यात आले. हे तंत्र विकसित झाल्याबरोबर बांबूचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. एक नवे दालन उघडले गेले.
चीनमधल्या सुमारे 40 प्रजातींचे कोंब हे सर्वेक्षणात उपयुक्त ठरले. अधिक प्रथिने असणारे, कमीतकमी स्निग्ध पदार्थ असणारे असे कोंब हे बांबू कोंब उद्योगाची वाढ होण्यास उपयुक्त ठरले. आज बांबू कोंब व त्यावर आधारित असंख्य पदार्थ निर्यात करणारा चीन सर्वात मोठा देश आहे. वर्षभर ताजे कोंब उपलब्ध करण्याच्या तंत्रामुळे कोंब उद्योगाला आणखीनच उभारी मिळाली
वाया जाणार्या भुसा व अन्य पदार्थांपासून उत्तम प्रतीचा कोळसा मिळू शकतो. कोळसा बनवताना हवेत उडून जाणारे पदार्थ मिळवले जातात. यामध्ये व्हिनेगार, टार असे अनेक पदार्थ मिळवून उत्पन्नात भर घातली जाते. कमी प्राणवायू स्थितीत तयार केलेला कोळसा हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. यालाच अॅक्टीवेटेड कार्बन म्हणतात. हा सर्व हवा शुद्धीकरण, पाणी शुद्धीकरण व असंख्य उद्योगात वापरला जातो. जागतिक बाजारात याला प्रचंड मागणी आहे. त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारण्यासाठीही हा उपयुक्त आहे.
बांबूपासून उत्तम प्रतीचा धागा मिळतो. त्याचा वापर जगभर केला जातो. हा धागा तयार करतानाच्या प्रक्रियेत खूप रसायने वापरली जातात म्हणून त्याच्या वापराबद्दल अजून शंका घेतली जाते त्यावरही काम चालू आहे. या धाग्यापासून अतिशय तलम व सर्व हवामानात वापरण्यायोग्य कापड मिळते. हा चीनचा एक फार मोठा उद्योग आहे.
या सर्व बांबू उद्योगावर संशोधन होत असतानाच चीनमधील विविध औद्योगिक संस्थांनी त्यासाठी लागणारी यंत्रेही विकसित केली. त्यांचे मोठ्या प्रमाणावर जगभर वितरण होते. ही यंत्रे आधी तैवानहून आणून त्याचे आपल्याला आवश्यक यंत्रात रुपांतर कसे करावे याचा वस्तुपाठ चीनने दिला आहे.
वरील विवेचनावरून लक्षात येईल की 100 टक्के बांबू वापर करणे व आवश्यक तेवढे उत्पादन करणे हे ध्येय ठरवून गेल्या 50-60 वर्षात चीनने अफाट प्रगती केली. एकदा ठरवले तर कृषी आधारित क्रांती कशी करता येते हे चीनने दाखवून दिले. बांबूचा औद्योगिक वापर करण्यासाठी मूलभूत संशोधन कसे करावे, त्यापासून उद्योग कसे उभे करावेत याचे एक उत्तम उदाहरण म्हणून चीनकडे बघता येईल.
कोणताही उद्योग उभा करताना पुरवठा साखळी भक्कम असावी लागते त्यासाठी चीनने काय केले हे पुढील भागात पाहू.
संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.