@ डॉ. व्यंकटराव घोरपडे
94220 42195
सांगली जिल्ह्याचे अस्सल वैभव आणि दुष्काळी तालुक्यात वरदान ठरलेली माडग्याळ मेंढी ( Madgyal Sheep) आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कुतूहलाचा आणि अभिमानाचा विषय ठरली आहे. दिसायला अत्यंत देखणी, उंचीला माफक, शारीरिक आकाराने वेगळी असणारी ही मेंढी सांगली जिल्ह्याची ओळख म्हणून पुढे येत आहे.
जत तालुक्यातील माडग्याळ हे साधारण आठ हजार लोकसंख्या असणारे सर्वसाधारण गाव आहे. याच गावातील मेंढपाळ व रामोशी समाजातील पशुपालकांनी अत्यंत नियोजनपूर्वक निवड पद्धतीने ही प्रजाती विकसित केली आहे. वेगाने होणारी वजन वाढ आणि मांसासाठी प्रसिद्ध असणारी ही मेंढी आज सर्व दूर अनेक राज्यात पोहोचली आहे आणि पोहोचत आहे. जत तालुक्यातील माडग्याळ, सनमडी गावासह आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. अलीकडे राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील मेंढपाळांची पसंती या मेंढीला असल्याने सगळीकडे आपल्याला या मेंढ्या, मेंढे असलेले कळप दिसून येतात. कर्नाटक, आंध्र प्रदेशातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात या मेंढीच्या खरेदीसाठी सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पशुबाजारात येत असतात.
या मेंढ्यांमध्ये प्रामुख्याने पांढर्या रंगावर तपकिरी ठिपके असतात. काही वेळा तपकिरी रंगाच्या देखील मेंढ्या असतात. शरीराचा माफक आकार, आकर्षक रोमन पद्धतीचे बाकदार नाक यामुळे पाहताक्षणी पशुपालक त्यांच्या प्रेमात पडतो. पोपटी नाक, शेपूट पातळ व मध्यम आकाराची असते. लोकर अत्यंत खडबडीत व केसाळ असते. कपाळ रुंद व फुगीर असते. पाय लांब, मजबूत व राखाडी खुरासह पातळ असतात. डोळ्याभोवती तपकिरी रंगाचे वलय असते. पाठीचा कणा सरळ असतो. नर व मादी यांच्यात शिंगे नसतात. कास गोल व सड टोकदार हे देखील एक वैशिष्ट्य आहे. कान हे लांब व लोंबकळणारे असतात.
उत्तम वजनवाढ त्यातून मिळणारे मांस उत्पादन हे याचे वैशिष्ट्य आहे. जुळी कोकरे देण्याचे प्रमाण देखील यांच्यामध्ये जास्त आहे. जन्माच्या वेळी कोकराचे वजन साधारण 3.5 ते 4 किलोपर्यंत असते. सर्व प्रकारची काळजी, उत्तम आहार दिल्यास वर्षभरामध्ये 20 ते 25 किलो पर्यंत यांची वाढ होते. संपूर्ण वाढ झालेल्या मेंढ्यांचे वजन 40 ते 45 किलो पर्यंत असू शकते. वयस्कर नर साधारण 55 ते 60 किलो तर मादी 40 ते 45 किलो वजनाची असते. अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी ही जात पशुपालकांच्यासाठी वरदान ठरलेली आहे. विशेष म्हणजे बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांची खूप चांगली आहे. या सर्व कारणामुळे या मेंढ्याचे संगोपन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना करणे सोयीस्कर व फायदेशीर ठरत आहे. विशेष म्हणजे यांचे व्यवस्थापन करताना खास कौशल्याची गरज नाही. या मेंढ्यांच्या संगोपनासाठी सुद्धा फार आर्थिक पाठबळाची गरज नसते. सोबत करडांना बाजारपेठेत वर्षभर मागणी देखील असते. मेंढ्यांपासून मांस हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असला तरी त्यातून काही प्रमाणात लोकर, लेंडी खत, दूध सुद्धा उत्पन्नाचे साधन आहे.
अशी ही रुबाबदार मेंढी सन 2003 मध्ये जत तालुक्यात त्यावेळी काम करणारे उमदी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे आणि सोन्याळ येथे काम करणारे पशुधन विकास अधिकारी डॉ. बबन कांबळे यांच्या नजरेस पडली. स्थानिक मेंढपाळ यांच्याशी चर्चा करून त्याविषयी सर्वसाधारण माहिती गोळा केली. सदर माहिती मुंबई येथे झालेल्या पैदास धोरण (ब्रीडींग पॉलिसी) संबंधित विशेष सभेत त्यावर प्रकाश टाकला आणि सदर मेंढी विभागाच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाने संवर्धनासाठी प्रयत्न केले. आज त्यांची संख्या राज्यात जवळजवळ एक लाखाच्या वर गेली असल्याचे कळते.
अशा या रुबाबदार मेंढीच्या जोरावर जिल्ह्यातील अनेक पशुपालक लक्षाधीश आणि कोट्याधीश झाले आहेत. आटपाडीत वीस वर्षापासून माडग्याळ मेंढी पालन करणार्या सोमनाथ जाधव यांनी मोठा बंगला बांधला असून, त्या बंगल्यावर त्यांनी मेंढ्याचा पुतळा देखील उभा केला आहे. हे प्रतिनिधिक उदाहरण आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील अनेक मेंढपाळ आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत आणि होत आहेत. चाणाक्ष मेंढपाळ हा 35 ते 40 मेंढ्याचा छोटा कळप सांभाळतो. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन देखील त्याला शास्त्रीय पद्धतीने करता येते. अशा छोट्या कळपातून वर्षाला लाखो रुपये मिळतात. माडग्याळ परिसरातील सनमडी, सोन्याळ, घोलेश्वर, आप्पाची वाडी, कोणीकोन्नूर या गावात शुद्ध जातीच्या माडग्याळ मेंढीचे संवर्धन व संगोपन केले जाते. थेट विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. दर शुक्रवारी माडग्याळ गावच्या बाजारात देखील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल ही माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून होत असते.
माडग्याळ मेंढीचे संवर्धन व संगोपन हे जिल्ह्यातील मेंढपाळ आणि रामोशी समाजातील पशुपालकांनी निवड पद्धतीने केले आहे. त्यासाठी जवळजवळ 100 वर्षाचा कालावधी लागला आहे. या रुबाबदार व सगळ्यांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर सर्वांनीच आपापल्या परीने मदत केली आहे. पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे यांच्यासह सर्व स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत विविध उपचार, लसीकरण, जंतुनाशके पाजणे, व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करून हातभार लावला. एक गोष्ट मात्र निश्चित कोणतीही प्रजाती जर रुजवायची असेल, वाढवायची असेल तर त्यामध्ये पशुपालकाचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी राज्यात सर्व देशी पशुधनाच्या स्थानिक पातळीवर जाती संवर्धन संस्था स्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. राज्यात तसा प्रयत्न महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत सुरू आहे. काही संस्थाही स्थापन झाल्या आहेत. त्यांना शासकीय पाठबळ असणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र येणार्या काळात याबाबत निश्चितच ठोस कारवाई पशुसंवर्धन विभागामार्फत अपेक्षित आहे. याला अनुसरूनच माडग्याळ मेंढीसाठी राजमाता माडग्याळ शीप ब्रीडर्स असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. सदर संस्थेची स्थापना 6 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली आहे. त्याद्वारे माडग्याळ मेंढ्याचे संवर्धन व जतन करणे, अनुवंशिक सुधारणा होण्याकरता पैदास धोरण राबवणे, मांस, दूध, लोकर यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणे, अद्ययावत तंत्रज्ञान मेंढपाळापर्यंत पोहोचवणे, चर्चासत्रे प्रशिक्षण पशु प्रदर्शने आयोजित करणे अशा प्रकारच्या ध्येय व धोरणाने प्रेरित होऊन सदर संस्था सध्या काम करत आहे.
माडग्याळ मेंढीबाबत आजही एक बाब प्रलंबित आहे. ती म्हणजे ‘राष्ट्रीय स्तरावर मानांकन’ जे आजअखेर मिळाले नाही. नॅशनल ब्युरो ऑफ निमल जेनेटिक रिसोर्सेस, कर्नाळ हरियाना (एनबीएजीआर) ही संस्था अशा प्रकारचे मानांकन देते. यासाठी सर्वच पातळीवर खूप प्रयत्न सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत सन 2003 मध्ये प्राथमिक सर्वे करून सन 2005 ते 2010 या कालावधीत ‘केंद्र पुरस्कृत नामशेष होणार्या प्रजातीचे संवर्धन’ या योजनेखाली माडग्याळ मेंढ्यांचे संवर्धन, विकास व प्रसार कार्यक्रम राबविण्यात आला. नंतर दिनांक 10डिसेंबर 2018 रोजी सदर नामांकन प्रस्ताव एनबीए जीआर या संस्थेकडे सादर करण्यात आला. त्यानंतर अनेक त्रुटी, अतिरिक्त माहिती, प्रस्तावात सुचवलेल्या सुधारणा करत करत सदरच्या अतिरिक्त माहितीसह संपूर्ण प्रस्ताव दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी एनबीएजीआर या संस्थेला सादर करण्यात आला आहे. मध्यंतरी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून पाठपुरावा देखील करण्यात आला. विशेष करून महाराष्ट्र शेळी मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे येथील सहाय्यक संचालक डॉ. सचिन टेकाडे यांनी मा. व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली खूप परिश्रम घेऊन प्रत्येक शंकांचे समाधान व तांत्रिक माहिती संकलित करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे येणार्या काळात एनबीएजीआर या संस्थेच्या ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी सभेत सदर मानांकन मिळू शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ते मिळाल्यानंतर या माध्यमातून सांगली जिल्ह्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर होऊन अजून मोठ्या प्रमाणामध्ये माडग्याळ मेंढीकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल आणि त्या माध्यमातून पशुपालकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकेल.
माडग्याळ मेंढी संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील प्रलंबित आहे. तत्कालीन सचिव पदुम यांनी सदर संस्था माडग्याळ येथे स्थापन करण्याबाबतची घोषणा देखील केली होती. माडग्याळ ग्रामपंचायतीने जागा देखील देऊ केली आहे. पण या माध्यमातून त्यांना विनंती आहे की सदर संस्था जर जत येथील पशुसंवर्धन विभागाच्या वळूमाता केंद्रामध्ये स्थापन झाली तर त्याचा फायदा सर्वांना होईल. विशेष करून त्या ठिकाणी काम करणार्या शास्त्रज्ञांना ते सोयीचे ठरेल. त्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्यास त्याला निश्चितपणे मूर्त स्वरूप येईल. त्याप्रमाणे पाठपुरावा देखील करावा लागेल. तर अशा या देखण्या रुबाबदार माडग्याळ मेंढीसाठी आत्तापर्यंत सर्वांनीच पुढाकार घेतला आहे. येणार्या काळात देखील उर्वरित बाबींसाठी आपल्या सर्वांना प्रशासकीय पातळीवर, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा लागेल. तेव्हा निश्चितपणे सांगली जिल्ह्याचे हे वैभव आपली नवीन ओळख देशभरात निर्माण करेल यात शंका नाही.
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली.