क्रीडा समालोचक हा आवाज आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. जर योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण सराव, खेळावरील प्रेम, शब्दांवर पकड आणि लोकांना गुंतवून ठेवण्याची कला असेल तर क्रीडा समालोचन हे तुमच्यासाठी रोमांचक आणि सन्मानाचे करिअर ठरू शकते आणि या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकते.
“आणि हा चेंडू थेट सीमारेषेबाहेर... षटकार!”
हा आवाज ऐकताच आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. मैदानावर खेळाडू असतात, पण तो क्षण आपल्या मनात जिवंत करणारा असतो समालोचक.
आपण मागील लेखात पाहिले की स्कोअरर असो किंवा स्टॅटिस्टिशियन ह्या दोन्ही भूमिका क्रीडा समालोचकाला परस्परपूरक आहेत.
मैदानावर खेळाडू खेळ जिंकतात, पण तो क्षण लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारा आवाज म्हणजे समालोचक. हा व्यवसाय केवळ बोलण्याचा नसून ज्ञान, तयारी आणि आत्मविश्वासाचा संगम आहे.
समालोचक केवळ काय घडले ते सांगत नाही, तर त्या क्षणामागची कथा उलगडतो.
उदा:IPLमधील अंतिम षटकात 12 धावा हव्या आहेत. फलंदाज पहिल्याच चेंडूवर षटकार मारतो. समालोचक लगेच सांगतो -
या खेळाडूने मागील तीन सामन्यांत डेथ ओव्हर्समध्ये 180 चा स्ट्राइक रेट ठेवला आहे. दबाव त्याच्यासाठी नवा नाही!
इथे तो केवळ षटकार सांगत नाही, तर खेळाडूची मानसिक ताकद आणि परिस्थितीचे महत्त्व स्पष्ट करतो.
फुटबॉलमध्ये IPL सामन्यात शेवटच्या मिनिटाला गोल झाला, तर समालोचक म्हणतो -
“हा गोल फक्त स्कोअर बदलत नाही, तर संपूर्ण हंगामाची दिशा बदलू शकतो!”
या एका वाक्यात तो प्रेक्षकांना त्या क्षणाचे वजन जाणवून देतो.
क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, हॉकी-प्रत्येक खेळात समालोचकाची गरज असते.
उदा: Ultimate Kho Kho मध्ये जलद हालचाली आणि टॅग्स प्रेक्षकांना समजावून सांगण्यासाठी प्रभावी समालोचन आवश्यक असते.
कबड्डीमध्ये Pro Kabaddi Leagueदरम्यान डू-ऑर-डायरेड असताना समालोचक त्या रेडरचा मागील यशदर सांगतो. त्यामुळे प्रेक्षकांचा ताण वाढतो आणि क्षण अधिक रोमांचक बनतो.
समालोचक हा खेळाचा ‘आवाज’ आणि ‘भावना’ असतो. त्याच्या शब्दांमुळे साधा सामना ऐतिहासिक क्षणात बदलतो.
प्रेक्षकांना खेळ अधिक समजण्यास सोपा होतो, तांत्रिक गोष्टी साध्या भाषेत स्पष्ट होतात, खेळातील थरार आणि भावना दुप्पट होतात.
समालोचक होण्यासाठी विशिष्ट पदवी अनिवार्य नसली तरी पत्रकारिता, मास कम्युनिकेशनचे किंवा क्रीडा व्यवस्थापन (Sports Management) हे शिक्षण उपयुक्त ठरते. मात्र, यापेक्षा महत्त्वाची कौशल्ये असतात जसं की; स्पष्ट आणि दमदार आवाज, उत्कृष्ट भाषाशैली, खेळाचे सखोलज्ञान, जलद विचार आणि निरीक्षणशक्ती, आकडेवारी समजून सांगण्याची क्षमता.
समालोचक म्हणून विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध असतात, जसं की -
* टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्स
* डिजिटल स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म
* राष्ट्रीय लीग्स जसे Pro Kabaddi League
* स्पोर्ट्स पॉडकास्ट आणि यूट्यूब चॅनेल्स
* क्रीडा इव्हेंट अँकरिंग
* विश्लेषक (Expert Panelist)
काही जण विशिष्ट खेळात तज्ज्ञ बनतात, तर काही बहुभाषिक समालोचक म्हणून ओळख निर्माण करतात.
एका व्यावसायिक सामन्यात (विशेषतः टीव्ही किंवा मोठ्या लीगमध्ये) साधारणपणे 2 ते 5 प्रकारचे समालोचक असू शकतात.
सामन्याचे स्वरूप, प्रसारणाचा स्तर आणि भाषा यानुसार ही संख्या बदलते.
1)प्ले-बाय-प्लेसमालोचक (Play-by-Play Commentator)
हा मुख्य समालोचक असतो. तो क्षणागणिक काय घडत आहे हे सांगतो. एका सामन्यात सहसा 1-2 प्ले-बाय-प्ले समालोचक असतात
उदा: क्रिकेटमध्ये चेंडू टाकला, फलंदाजाने फटका मारला-तर तो लगेच वर्णन करतो:
“चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि शानदार कव्हर ड्राइव्ह!”
2) तज्ज्ञ समालोचक (Expert Commentator)
हा सहसा माजी खेळाडू असतो. तो रणनीती, मानसिकता आणि तांत्रिक बाबी स्पष्ट करतो. साधारणपणे 1-3 तज्ज्ञ समालोचक असतात.
उदा: IPLदरम्यान एखादा माजी गोलंदाज सांगतो -
“हा यॉर्कर योग्य लांबीवर टाकल्यामुळे फलंदाजाला जागाच मिळाली नाही.”
3) साइडलाइन / पिचरिपोर्टर
हा मैदानाच्या कडेला असतो. तो पिचची स्थिती, हवामान, खेळाडूंच्या दुखापती किंवा ड्रेसिंग रूममधील माहिती देतो. सहसा एक रिपोर्टर असतो.
उदा: फुटबॉल सामन्यात तो सांगतो -
“डाव्या विंगरला हलकी दुखापत आहे, त्यामुळे बदल होण्याची शक्यता आहे.”
4) बहुभाषिक समालोचक
मोठ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतंत्र समालोचक असतात.
उदा: Pro Kabaddi League किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदी, इंग्रजी, प्रादेशिक भाषांमध्ये स्वतंत्र पॅनेल असते.
5) डिजिटल / रेडिओसमालोचक
टीव्ही व्यतिरिक्त रेडिओ किंवा डिजिटल स्ट्रीमिंगसाठी वेगळे समालोचक असू शकतात.
रेडिओमध्ये दृश्य नसल्यामुळे अधिक सविस्तर वर्णन करावे लागते.
खेळातील थरार प्रेक्षकांपर्यंत जिवंत आणि तसाच्यातसा पोहोचवणे ही एक अद्भुतकला आहे. विशेषतः रेडिओवर, जिथे प्रेक्षक फक्त ऐकत असतो, तिथे समालोचक आपल्या जिवंत वर्णनशैलीने, प्रभावी भाषेने आणि उत्कट संवादफेकीने प्रत्येक क्षण चित्रासारखा उभा करतो आणि प्रेक्षकांची उत्कंठा क्षणोक्षणी वाढवत नेतो.
अशा प्रकारे जर आपण पाहिले तर समालोचक म्हणून विविध पद्धतीने आज संधी उपलब्ध आहेत.
स्थानिक सामना असेल तर 1-2समालोचक, राष्ट्रीय टीव्ही सामना असेल तर 3-5 समालोचक, आंतरराष्ट्रीय/मोठी लीग असेल तर प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र पॅनेल असते.
जसं आपण समालोचक म्हणून विविध करिअर संधी बघितल्या तसेच त्यांचे पगार ही त्यांचा अनुभव, प्लॅटफॉर्म आणि लोकप्रियतेनुसार बदलतात.
* स्थानिक किंवा जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी प्रति सामना मानधन ठरते.
* प्रादेशिक टीव्ही/डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी रू.25,000 ते 60,000 प्रतिमहिना मानधन अपेक्षित असू शकते.
* राष्ट्रीय लीग्स (उदा:IPL) प्रति सिझन लाखो रूपये मानधन असू शकते.
* अनुभवी आणि लोकप्रिय समालोचक रू. 1 लाख+ प्रतिमहिना किंवा त्याहून अधिक मागणी करू शकतात.
रेडिओ समालोचन, यूट्यूब चॅनेल्स आणि स्पोर्ट्स पॉडकास्टमधूनही उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होऊ शकतात.
जर तुम्हाला खेळाची आवड, शब्दांवर पकड आणि लोकांना गुंतवून ठेवण्याची कला असेल तर क्रीडा समालोचन हे तुमच्यासाठी रोमांचक आणि सन्मानाचे करिअर ठरू शकते.
खेळाडू मैदानावर इतिहास घडवतात आणि समालोचक तो इतिहास जगापर्यंत पोहोचवतात.
क्रीडा समालोचन हा आवाज आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि खेळावरील प्रेम असेल तर या क्षेत्रात उत्तम नावलौकिक मिळू शकते.
क्रीडा क्षेत्रात दोन महत्त्वाच्या भूमिका नेहमीच चर्चेत असतात - क्रीडा समालोचक आणि क्रीडा पत्रकार (Sport Journalism)
दोघांचे माध्यम वेगळे असले तरी उद्दिष्ट एकच असते- खेळ प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे. या दोघांमधील नातं म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखं आहे. पुढील लेखामध्ये आपण क्रीडा पत्रकारितेबद्दल अधिक जाणून घेऊ.
क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर
मॅक्सज्ञान स्पोर्ट्स एड्व्हायझरी