स्वर्गाच्या पाताळात - एका पत्रकाराच्या मालदीव मधील आठवणी

विवेक मराठी    23-Mar-2026
Total Views |
@ मिलिंद परांजपे 
vivek 
डॅनिएल बॉसलीने यांचे ‘डिसेंट इंटू पॅराडाईज, अ जर्नलिस्ट्स मेमोअर्स ऑफ द अनटोल्ड मालदीव्स’ हे पुस्तक वाचल्यावर वाचकांच्या मालदीवच्या 1200 बेटांसंबंधीच्या स्वर्गीय कल्पना पार बदलून जातात. लेखकाने त्या पडद्याच्या आतली धर्मांधता जगापुढे आणली आहे. आपल्याला हेही कळून येत की मालदीवमध्ये जिहादी प्रवृत्तीच्या विरूद्ध मूक बहुसंख्य (silent majorit)- लोक आहेत. निवडणुकांमध्ये बहुतेक तेच विजयी होतात. ते दहशत निर्माण करून येथील बहुसंख्यकांना बोलूही देत नाहीत. ज्या देशाला हिंदी महासागरावर प्रभुत्व ठेवायचं आहे त्याने मालदीव देशाला मूलतत्ववाद्यांपासून वाचवण्याशिवाय पर्याय नाही. अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारे हे इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे.
 
 
हिंदी महासागरावर ज्याची सत्ता असेल तोच मालदीवचाही सत्ताधीश असतो असा साधारण दंडक आहे. त्यामुळे 1887 साली मालदीवच्या सुलतानाने सिलोनमधील इंग्रज गव्हर्नराबरोबर अंकित राष्ट्र -प्रोटेकटोरेट (protectorate) म्हणून जो करार केला ती केवळ एक औपचारिकता होती कारण त्याआधी पाऊणशे वर्ष तरी हिंदी महासागरावर इंग्लंडचे वर्चस्व होते. 1834मध्येच रॉबर्ट मोर्सबी (Moresby) या इंग्रज कॅप्टनने मालदीव बेटांचा सर्व्हे करून ईस्ट इंडिया कंपनीने नाविकांसाठी त्याचे नकाशेही छापले होते. त्याआधी नकाशांअभावी कित्येक जहाजे तिथे अडकून अपघात झाले होते. आर्थिक पिळवणूक करून लूट मिळवण्यास मालदीवच्या प्रवाळी बेटांवर (atoll) नारळाचा काथ्या आणि सुकी मासळी याच्याशिवाय काहीच नसलं तरी सामरिकदृष्ट्या नाविक सत्तांना मालदीव फार महत्त्वाचा आहे.
 
 
ब्रिटिश लेखक डॅनिएल बॉसलीने मालदीवमध्ये सात वर्ष पत्रकार म्हणून काम केलं, तिथेच लग्नही केलं. त्यासाठी त्यादेशातील कायद्याप्रमाणे त्याला इस्लाम धर्म स्वीकारण भाग पडलं. धर्मांतराच्या प्रक्रियेला त्याने इंटरव्यू-मुलाखत-म्हटले आहे. लेखकाने मालदीवसंबंधातील अनेक पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत त्यापैकी ‘मालदीव मिस्टरी’ हे थोर हेयरदाल या प्रसिद्ध विद्वान नाविकाने लिहिलेले फार चित्तवेधक वाटले. हेयरदालनी मालदीवच्या पुरातत्वतेचा आणि समुद्रमार्गे झालेल्या स्थलांतरांचा अभ्यास करण्यासाठी मालदीव बेटांवर 1980मध्ये मोहीमा केल्या. त्याच्या मते सिंधू संस्कृतीचा संबंध प्रशांत (पॅसिफिक) महासागरातील ईस्टर आयलंडपर्यंत जोडता येऊ शकेल. इस्लाम येण्यापूर्वीचं हिंदू आणि बौद्ध धर्माचं मालदीव बेटांवरील प्राबल्य वगैरेंवर त्यात अभ्यास आहे. आज मालदीवमधून हिंदू-बौद्ध धर्मांच्या सर्व खुणा ‘लाजीरवाणा इतिहास’ म्हणून पुसून टाकतात.
 
 
‘ऑल ऍट सी’ ह्या संपूर्ण प्रकरणात मालदीवमधील दिवसेंदिवस वाढत जाणारा इस्लामी मूलतत्ववाद आणि त्याचे परिणाम वर्णिले आहेत. 1970-80 मधील पेट्रोलने आलेल्या संपत्तीतून सौदीने राजधानी मालेमधील 3 कोटी डॉलरचा ‘इस्लामिक सेंटर’ 1984 मध्ये बांधून दिला. कट्टरपंथी विचारधारा त्यामुळे वाढत गेल्या. थोड्डू बेटावर 1959 साली सापडलेली बुद्धाची मूर्ती वस्तू संग्रहालयात ठेवली होती. अनेक प्रयत्नानंतर शेवटी धर्मांधांनी ती तोडलीच. 2007 मधील मालेतील बॉम्बस्फोटात 12 पर्यटक जखमी झाले. आरोपींचा संबंध अल कायदा आणि हिमानंदू बेटावरील अतिरेकी विचारसरणीच्या मशिदीशी सापडला. वझिरीस्तानात मारले गेलेले अतिरेकी आणि लाहोर, सीरियामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात मालदीवमधील जिहादी निघाले. 2004 ते 2008मध्ये मालदीवच्या घटना समितीचे सभासद आपणच कसे जास्त सच्चे मुसलमान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत होते. मालदीवच्या नावाआधी ‘इस्लामी प्रजासत्ताक’ शब्द घुसडण्याचा खूप प्रयत्न करून झाला. कुराणावरील अधिकारी व्यक्तींनी विरोध करूनही शरियाचा संबंध उघडपणे घटनेशी जोडलाच आणि मुस्लिमेत्तर धर्मांची मान्यताही रद्द केली.
 
 
वृत्तपत्रस्वातंत्र्य आणि गुंतागुंतीची निवडणूक प्रक्रिया यावर लेखकाने विस्ताराने लिहिले आहे. त्यावेळेस मालदीवमध्ये जे काय होत होतं ते विचारांच्या पलीकडचं आणि विरोधाभासिक होत. न्यायव्यवस्थेला काही किंमतच उरली नव्हती, ज्या थोड्या व्यक्तींच्या हातात सर्व सत्ता केंद्रित झाली होती ते कोणालाच जबाबदार नव्हते आणि निवडणुका बेशिस्त झाल्या होत्या. लेखकाचे दोन मुक्त विचार करणारे पत्रकार मित्र अहमद रिलवान आणि यामीन रशीद यांचे इस्लामी मूलतत्ववाद्यांनी खून केले. दोघेही भारतात शिकून आले होते आणि दोघांनाही रोज जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या. तरी दोघांनी आपले लेखन चालू ठेवले होते. पोलिसांनी तर पूर्ण दुर्लक्ष केलं होतंच पण उच्च पदस्थ व्यक्तींचाही हत्येत हात होता असा दाट संशय लेखकास आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा भारतभेटीस आले असताना दिल्ली पोलिसांना मालदीवमधील अतिरेकी घातपात करण्याच्या शक्यतेची खबर मिळाली होती. नेहमी वादग्रस्त विधानं करण्यात निष्णात झाकीर नाईकला मालदीव सरकारने आमंत्रण दिले. ‘पर्यटन व्यवसायातून मिळणारा पैसा हराम आहे’ असं विधान करून त्याने सर्वाना पेचात टाकलं. (कारण पर्यटन हेच मालदीवच मुख्य उत्पन्न आहे). मालदीवमधील प्रत्येक रिसॉर्टवर एक मशीद असते पण आतली भाषणं बाहेर पर्यटकांना ऐकू जाणार नाहीत याची काळजी घेतलेली असते. मशिदीतला मुल्ला रिसॉर्टवर काम करणाराच एक असतो. रिसॉर्टवर कामाला असलेल्यांमध्ये फक्त तीन टक्के स्त्रिया असतात.
 
 
लोकशाही पद्धतीने प्रथम महंमद नशीद प्रेसिडेंट म्हणून 2008 साली निवडून आले. ते भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याच्या मताचे होते. 2012 मध्ये पोलीस आणि इतर मूलतत्ववादींनी बंडाळी करून त्यांना पायउतार होणं भाग पाडलं. नशीदना 13 वर्षाची सजा ठोठावण्यात आली. त्यांना इंग्लंडमध्ये आश्रय मिळाला. बॉसलीनी 2018 सालच्या निवडणुकीवर विस्ताराने लिहिले आहे. न्यायव्यवस्था आणि पोलीस खात्यातील भ्रष्टाचार, बेशिस्त निवडणूक प्रक्रिया यांमुळे मालदीवमध्येे लोकशाही ही एक थट्टाच झाली होती. आधीच्या एकाधिकार प्रवृत्ती सरकार मुळे जिहादींच्या अत्याचारांना मोकळं रान मिळालं होत. त्याला कंटाळून जनतेने इब्राहिम सोलींना बहुमताने निवडून दिले. त्यांनी सर्व प्रथम ‘इंडिया आऊट’ बंद करून ‘इंडिया फर्स्ट’ चालू केलं. यामिन रशीदचा (ज्याचा खून झाला) हवाला देऊन लेखक म्हणतो या देशाला गरज आहे ती अहमद रिलवान, महंमद नशीद सारख्या आणि दूरदृष्टीने भविष्य पाहणार्‍या लोकांची. तेच मालदीवला हुकूमशहा आणि धर्मांधांपासून वाचवू शकतील.
 
 
1988 तला तामिळ वाघ आणि मालदीवी बंडखोर यांनी मिळून मालदीव देशच ताब्यात घेण्याचा केलेला प्रयत्न भारताच्या ‘ऑपरेशन कॅक्टस’ मुळे हाणून पडला आणि देश मोठ्या संकटातून वाचला याची दखल लेखकाने दोन वाक्यात घेतली आहे. प्रेसिडेंट अब्दुल्ला यामिनचा चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ मध्ये मालदीवला गोवायचा विचार होता असा लेखकाचा कयास आहे, पण 2015 मध्ये मालेच्या समुद्राच्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करण्याच्या प्लँटला आग लागून तो बंद पडला. एक लाख तीस हजार रहिवाशांना एकदम प्यायला पाणी नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भारताकडे याचना करणं भाग पडलं. भारताला कळवल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी दोन विमानं पाणी घेऊन उतरली. आणखी एका दिवसात आयएनएस ‘सुकन्या’ आणि ‘दीपक’ ही दोन जहाज 1000 टन पाणी घेऊन आली. शिवाय दोन्ही जहाजांनी स्वत:चे गोडे पाणी तयार करण्याचे जनरेटर चालू ठेऊन मालेचा प्लॅन्ट दुरूस्त होईपर्यंत पाणी पुरवठा चालू ठेवला. चीन किंवा दुसरा कुठलाच देश अशी मदत देऊ शकला नाही.
 
 
4.8कोटी डॉलर खर्चून बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे 2004 च्या त्सुनामीपासून माले बचावले. हवामान बदलाचा धोका मालदीवला आहेच. 2021 पर्यंत 20% शहरांना समुद्राच्या पाण्याचं गोडं पाणी करण्याचे प्लँट बसवले आहेत. तरी आज 75% जनता गच्चीवरील पाण्याच्या टाक्यात पावसाचे पाणी साठवून ते पिण्यास वापरते.
 
 
अड्डू प्रवाळी बेट विषुववृत्ताच्या दक्षिणेस येत. तिथे 1976 पर्यंत ब्रिटिश नौसेनेचा तळ होता. 2011 मध्ये तिथे ‘सार्क’ परिषद भरली होती. हा उल्लेख आला आहे. परंतु भारताने BIMSTEK स्थापन करून बंगाल उपसागराच्या काठाभोवतालच्या देशांची सहकार्यासाठी वेगळी संघटना सुरू केली. त्यात म्यानमार (ब्रह्मदेश) आणि थायलंड हे दोन बौद्ध धर्मीय देश घेतले आहेत आणि पाकिस्तान, मालदीव यांना वगळण्यात आले आहे. ही गोष्ट लेखकाने लिहिलेली नाही. सार्क अस्तित्वात असली तरी तिचं महत्त्व खूपच कमी झालं आहे.
 
 
पुस्तक वाचल्यावर वाचकांच्या मालदीवच्या 1200 बेटांसंबंधीच्या स्वर्गीय कल्पना पार बदलून जातात. लेखकाने त्या पडद्याच्या आतली धर्मांधता जगापुढे आणली आहे. आपल्याला हेही कळून येत की मालदीवमध्ये जिहादी प्रवृत्तीच्या विरूद्ध मूक बहुसंख्य ( silent majorit)- लोक आहेत. निवडणुकांमध्ये बहुतेक तेच विजयी होतात. पण मूलतत्त्ववादी आरडाओरड, दंगे धोपे करणं यात पटाईत आहेत, त्याने दहशत निर्माण करून ते बहुसंख्यकांना बोलूही देत नाहीत. अशा स्थितीत भारताची बहुसंख्यकांना मदत मालदीव आणि भारत दोघांनाही योग्यच ठरेल. ज्या देशाला हिंदी महासागरावर प्रभुत्व ठेवायचं आहे त्याने मालदीव देशाला मूलतत्ववाद्यांपासून वाचवण्याशिवाय पर्याय नाही.
 
पुस्तकाविषयी
पुस्तकाचे नाव : डिसेंट इंटू पॅराडाईज,
अ जर्नलिस्ट्स मेमोअर्स ऑफ द अनटोल्ड मालदीव्स
लेखक : डॅनिएल बॉसलीने
पाने : 409, किंमत : 699 रुपये