रामसेतू ही नैसर्गिक किनारी आणि सागरी प्रक्रियांमुळे प्रवाळ आणि वाळूच्या उथळ संचयनामुळे पाण्याखाली तयार झालेली रांग सदृश भूरचना आहे. तथापि, मोठ्या प्रमाणावर पाण्याखालील पुरातत्त्वीय उत्खनन झालेले नसल्यामुळे ती एक मानवनिर्मित रचना असावी, हे संशोधनाने स्पष्ट झाले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तामिळनाडूच्या आग्नेय टोकाकडील पंबन किंवा रामेश्वरम बेटापासून श्रीलंकेच्या वायव्य टोकाकडील मानार बेटापर्यंत चुनखडकांनी बनलेली प्रवाळ बेटांची एक लांबचलांब पण तुटक रचना आहे. या रचनेला रामसेतू किंवा ऍडम्स ब्रिज असे म्हटले जाते. एका ब्रिटिश नकाशा शास्त्रज्ञाने वर्ष 1804मध्ये, मध्य श्रीलंकेत असलेल्या 2243 मीटर उंचीच्या ऍडम शिखराच्या नावावरून हे नाव दिले असा उल्लेख आढळतो. या सेतूला नळसेतू आणि सेतूबांध असेही म्हटले जाते. ’नळ’ हा रामायणाच्या काळांत स्थापत्य विशारद होता म्हणून त्याच्या सन्मानार्थ हे नाव दिले जाते.
भूशास्त्रीय पुराव्यांवरून असे लक्षात येते की हा सेतू म्हणजे भारत श्रीलंका यांना जोडणारा एक प्राचीन भूसेतू (लॅण्डब्रिज) असावा. तीस किमी लांबीचा हा सेतू पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात यांच्या दरम्यान पसरला आहे. 15 व्या शतकापर्यंत तो चालत जाण्यायोग्य होता असेही उल्लेख आढळतात.
या भागातला समुद्र खूप उथळ असून त्याची जास्तीत जास्त खोली दहा मीटर आहे. या सेतूवरील उघडे पडलेले वाळूचे काही भाग पूर्णपणे कोरडे आहेत. अशा परिस्थितीमुळे या प्रदेशांत नौकानयन (Navigation) होऊ शकत नाही. वर्ष 1480 मध्येे इथे आलेल्या वादळामुळे मोठी पडझड झाली होती. त्यापूर्वीपर्यंत हा सेतू पाण्याच्या वर दिसत होता असे काही उल्लेख आढळतात.
या सेतूचा सर्वप्रथम उल्लेख रामायणांत असून, रावणाने अपहरण करून लंकेत नेलेल्या सीतेला सोडवून आणण्यासाठी, प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेने हा सेतू बांधल्याची कथा आपल्या सर्वांना परिचित आहेच. त्यामुळेच या समुद्राला सेतुसमुद्रम असेही म्हटले जाते. उथळ पाण्यातील दगडांची ही शृंखला पंबन बेटावरील धनुष्यकोडीपासून सुरू होते.
रामसेतूच्या निर्मितीबद्दल आणि त्याच्या नेमक्या रचनेबद्दल अनेक मतमतांतरे आणि वाद आहेत. हा सेतू गाळ साचून व जमीन उंचावल्यामुळे तयार झाला असल्याचे आणि भारतापासून तुटून श्रीलंका दक्षिणेकडे सरकल्यामुळे निर्माण झाला अशी दोन मते 19व्या शतकांत मांडण्यात आली. सेतू प्रदेशातील चुनखडकसदृश रांगेतील खडक मोठमोठ्या चौकोनी तुकड्यात तुटलेले आणि विखुरलेले दिसल्यावर हा सेतू ही मानवनिर्मित रचनाच असावी असेही मत मांडण्यात आले.
हा सेतू म्हणजे, पृष्ठभागावर कठीण आणि खाली भरड व मृदू असलेल्या वालुकाश्म(सँडस्टोन) आणि गुंडाश्म(कोन्ग्लोमरेट) खडकांच्या एकमेकाला समांतर असलेल्या उंचवट्यासारख्या रांगा आहेत. काहींनी या सेतूला प्रवाळ खडकांची रांग म्हटले आहे तर काहींनी त्याचे वर्णन, दोन भूमिप्रदेश जोडणारी, पृथ्वीचे कवच पातळ होऊन बनलेली भूबद्ध रचना असे केले आहे. काहींनी तिला लांबलचक वाळूचा दांडा तर काहींनी रोधक बेटांची मालिका म्हटले आहे. भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने रामसेतू ही 103 लहानमोठ्या प्रवाळ खडकांची भिंत(रिफ) असल्याचे म्हटले आहे. सेतूच्या तुटलेल्या भिंतीमधील प्रवाळ खडकांचे सपाट माथे पाण्यातून वर डोकावणारे असून संपूर्ण प्रवाळ रांगेत प्रवाळ वाळू आणि पुळण खडक दिसून येतात.
काही शास्त्रज्ञांच्या मते हा सेतू म्हणजे भारत व श्रीलंका यातील सलग किनार्याचाच भाग असून काहींच्या मते रामेश्वरम आणि तलैमनार यांच्या दरम्यानच्या तटवर्ती प्रवाहांमुळे झालेल्या अवसाद संचयनाचा तो परिणाम आहे. येथील प्रवाळांच्या वाढीमुळेच वाळू अडकून ही रचना तयार झाली असावी असाही दावा करण्यात आलाय. एका अभ्यासानुसार जागतिक समुद्रपातळीचा या सेतूच्या निर्मितीशी काही संबंध नसून जमिनीच्या स्थानिक उंचावण्यामुळे तो तयार झाला असावा.
रामसेतूची ही रचना मनुष्यनिर्मित असल्याचा कोणताही पुरावा आढळत नाही असे भारतीय पुरातत्व विभागाचे मत आहे. अशा तर्हेचे प्रवाळ खडक खोल समुद्रांत कधीही तयार होत नाहीत त्यामुळे ही रचना नैसर्गिक असूच शकत नाही, ती मानवनिर्मितीच असावी असेही एक निरीक्षण आहेच! सेतूची ही रचना साधारणपणे 3500 वर्षांपूर्वी समुद्रातून वर आली असावी असे मत मांडण्यात आले आहे. या सेतूच्या उत्तरेकडील भारताच्या बाजूकडील वाळूच्या पुळणी एक ते सहा हजार वर्ष जुन्या असाव्यात. सेतूच्या प्रदेशात आढळणार्या पुळणी मात्र 4000 वर्ष जुन्या आहेत. सेतूवर सापडलेला प्रवाळ खडक 7000 वर्ष जुना आहे हेही आता नक्की झाले आहे!
हा सेतू तरंगणार्या खडकांनी बनलेला होता असे म्हटले जाते. हे तरंगणारे खडक प्युमिस खडक असावेत. लाव्हा रसाच्या उद्रेकातून रसाचा जो फेस (फोम) तयार होतो तो हळूहळू कठीण होऊन त्यापासून हा खडक बनतो. तो तयार होतो तेव्हा सुरुवातीच्या काळात त्यात हवेचे अनेक बुडबुडे तयार होतात. त्यामुळे हलका असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो मात्र कालांतराने या बुडबुड्यांच्या मोकळ्या जागेत पाणी भरते आणि दगड जड होतात व ते पाण्यात बुडतात.
रामायणाचा कालखंड इ. स. पूर्व 5000 वर्षे असा होता म्हणजे 7000 वर्षांपूर्वीचा तो काळ होता. सेतू रचनेवर सापडलेला प्रवाळही कार्बन14 या कालगणना पद्धतीप्रमाणे 7000 वर्ष जुना आहे. त्याकाळी सेतू उथळ समुद्रातील पाण्यावर बांधण्यात आला असावा. त्यानंतर या भागात झालेल्या समुद्र पातळीतील वाढीमुळे किंवा भूपृष्ठाच्या उंचावण्यामुळे तो आज पाण्याखाली गेला असावा असे या पुलाचे जन्मरहस्य सांगितले जाते. भारताच्या दृष्टीने रामसेतू हा एक विलक्षण भूवारसा आहे. गेल्या दशकात पुन्हा एकदा या सेतूच्या निर्मितीचे रहस्य उलगडावे म्हणून भारतीय पुरातत्व खात्याकडून नव्या संशोधन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
वर्ष 2016 ते 2026 या दशकात या प्रदेशात भूवैज्ञानिक, दूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) आणि समुद्रतळाचे मापन असे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार वापरून मोठे वैज्ञानिक संशोधन करण्यात आले. राम सेतू परिसराचा ज्ञात इतिहास लक्षात घेऊन पुन्हा नव्याने त्याची उत्पत्ती, रचना, वय आणि भूआकारशास्त्र समजून घेणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आणि NASA (ICESat-2 उपग्रह डेटा) या संस्थांचा यात मुख्य सहभाग होता.
वर्ष 2024 मध्ये शास्त्रज्ञांनी उपग्रह लेसर अल्टीमेट्री आणि बॅथिमेट्रिक मॉडेलिंगचा वापर करून राम सेतूचा पहिला संपूर्ण पाण्याखालील नकाशा तयार केला आणि पुढे दिलेले काही अतिशय महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. राम सेतुची रचना भारतातील धनुष्कोडीपासून श्रीलंकेतील तलैमन्नारपर्यंत पसरलेल्या सतत पाण्याखाली असलेल्या रांगेची आहे. काही भागांमध्ये ही रांग समुद्रतळापेक्षा सुमारे 8 मीटर उंच आहे. आज या रचनेपैकी जवळपास 99% भाग उथळ पाण्याखाली आहे. उच्च वियोजन (रिझोल्यूशन) मानचित्रिकरणात(मॅपिंग) सेतूच्या तळ भागावर चुनखडीचे अनेक उंचसखल उथळ पट्टे, प्रवाळाचे तुकडे आणि वाळूचे पट्टे दिसून आले. हे निष्कर्ष असे सूचित करतात की राम सेतू हा समुद्रात गाळ साचण्याच्या आणि प्रवाळ वाढण्याच्या प्रक्रियांमुळे तयार झालेल्या पाण्याखालील रांगेचा भाग आहे.
गाळाचे नमुने आणि प्रवाळांची कालनिश्चिती (डेटिंग) यावर आधारित अभ्यासांमधून असे दिसून आले की, एके काळी हा प्रदेश भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा भूभाग होता. कमी समुद्रपातळीच्या काळात 7000 ते 18000 वर्षांपूर्वी हा भूभाग समुद्रपातळीच्या वर उघडा पडला होता. नंतरच्या काळात प्रवाळ वाढ आणि वाळू साचण्यामुळे आजची उथळ बेटांची साखळी तयार झाली.
इथे पडलेल्या गाळामध्ये चुनखडीचे तुकडे, चुनायुक्त वालुकाश्माचे तुकडे आणि वाळूच्या दांड्यांवर प्रवाळाचे अवशेष सापडले. यावरून इथल्या किनारी प्रदेशात गाळ वाहतूक आणि प्रवाळ मंच(रीफ) निर्मिती प्रक्रिया कशी झाली असावी ते स्पष्ट होते.
2021मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण(ASI) विभागाने राम सेतूचे वय आणि निर्मिती समजण्यासाठी पाण्याखालील संशोधनाला मंजुरी दिली. सेतू परिसरात मानवी हस्तक्षेप आहे का हे तपासणे, पाण्याखालील रचना आणि दगडांची मांडणी अभ्यासणे आणि दगड आणि प्रवाळ नमुने गोळा करून त्याची कालनिश्चिती करणे ही या संशोधनाची मुख्य उद्दिष्टे होती. पूर्वी हा भाग पाण्याबाहेर असू शकतो किंवा चालत जाण्यास योग्य असू शकतो. मानवी हस्तक्षेपाचा प्रश्न अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेला नाही असेही अनुमान काढण्यात आले आहे.
सोनार स्कॅनिंग, सुदूर नियंत्रक आणि सागरी गाळ नमुना विश्लेषण असे तंत्रज्ञान प्रकार वापरून पुढील संशोधन प्रस्तावित आहे. पर्यावरणीय संवेदनशीलता आणि राजकीय वादविवाद यामुळे राम सेतू परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन अजून झालेले नाही.
अलीकडील संशोधनामध्ये प्रामुख्याने पाल्क सामुद्रधुनीतील भरती-ओहोटी प्रवाह, गाळ वाहतुकीचे नमुने आणि रोधक द्वीप (बॅरियर आयलंड) निर्मिती या बाबींचा अभ्यास केला गेला. सागर विज्ञान संदर्भात या भागाचे जे नवीन संशोधन झाले त्यात पुढील निष्कर्ष काढता आले. बंगालचा उपसागर आणि मन्नारच्या आखातातून येणार्या अनुतट(लाँगशोअर) प्रवाहांनी वाळू आणि प्रवाळाचे तुकडे सेतू परिसरात जमा केले. त्यामुळे भुबद्ध द्वीप (टोम्बोलो) प्रकारची बेटांची साखळी तयार झाली. काही संशोधक राम सेतूला भुबद्ध द्वीप साखळी किंवा पाण्याखालील रांग प्रणाली असे संबोधतात.
काही संशोधनांमध्ये राम सेतूला भूविज्ञान, पुराणकथा आणि सांस्कृतिक स्मृती यांचा संगम असलेला जलद्वीप भूमिप्रदेश (ऍक्वापिलॅगो लँडस्केप ) म्हटले आहे.
2024 मध्ये ISRO आणि NASA च्या ICESat-2 या उपग्रह सांख्यिकीचा(डेटा) वापर करून राम सेतूचा सर्वात तपशीलवार समुद्रतळ नकाशा तयार करण्यात आला. या संशोधनामुळे राम सेतूची पाण्याखालची अचूक रचना समजली आणि ती एक 48 किमी लांबीची संपूर्ण रांग असल्याचे सिद्ध झाले. राम सेतूची पाण्याखालील अचूक रचना काय आहे, ही रांग सलग आहे की स्वतंत्र बेटांपासून बनलेली आहे. सेतूचा समुद्रतळावरील उंचसखलपणा, उंची आणि भूआकृतिक वैशिष्ट्ये काय आहेत आणि या सेतूचा भूवैज्ञानिक विकास कसा झाला अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हा या नवीन संशोधनाचा उद्देश होता. या सेतू प्रदेशाचे पूर्वीचे अभ्यास मुख्यतः हवाई छायाचित्रे आणि कमी नियोजनाच्या समुद्रतळ रचनांच्या नकाशांवर आधारित होते. परंतु 2024/25 च्या संशोधनात लेसर अल्टीमेट्री तंत्रज्ञान वापरल्यामुळे अधिक अचूक परिणाम मिळाले. हे तंत्रज्ञान पाण्याच्या पृष्ठभागाची उंची आणि उथळ पाण्यातील समुद्रतळाची खोली मोजते तसेच किनारपट्टीवरील भूआकारही ओळखते. लेसर किरण स्वच्छ उथळ पाण्यात सहज प्रवेश करतात, त्यामुळे राम सेतूसारख्या पाण्याखालील रचनांचा उंचसखलपणा मोजणे शक्य होते.
हे करताना संशोधकांनी, उपग्रह प्रतिमा, विद्यमान नौकानयन नकाशे, अंकीय उंचीदर्शक मॉडेल (DEM)आणि किनारी भूवैशिष्ट्यांचे नकाशे या सर्व गोष्टींचा वापर करून सांख्यिकी मिळवली.
या अभ्यासातून हे सिद्ध झाले की, राम सेतू ही सुमारे 48 किमी लांबीची, 1-3 किमी रुंदीची सलग रांग (रिज) असून ती समुद्रसपाटी खाली 1 ते 10 मीटर खोलीवर पसरली आहे. त्यावर चुनखडीचे अनेक उथळ उंचवटे आणि प्रवाळ मंच व भित्ती आहेत. ही रांग आसपासच्या समुद्रतळापेक्षा सुमारे 8 मीटर उंच आहे. काही भागांमध्ये ही रांग पाण्याच्या पृष्ठभागाजवळ येते आणि हेच भाग उपग्रह प्रतिमांमध्ये दिसणार्या उथळ भागांशी जुळतात. शास्त्रज्ञांनी या रांगेत, रामेश्वरम वाळू पट्टा क्षेत्र, मध्य प्रवाळ-चुनखडीव्याप्त उंचवटे(शोल) आणि मन्नार उथळ उंचवटे प्रणाली असे तीन प्रमुख विभाग ओळखले आहेत. प्रत्येक विभागात वेगवेगळ्या प्रकारचा गाळ आणि प्रवाळ असल्यामुळे त्यातून बहुस्तरीय निर्मिती प्रक्रिया सूचित होते. आजपर्यंतचे हे राम सेतूचे सर्वात तपशीलवार वैज्ञानिक मानचित्रीकरण मानले जाते.
2024 च्या या संशोधनानुसार राम सेतूच्या निर्मितीचे खालील टप्पे ओळखता येतात. सुमारे 18,000 वर्षांपूर्वी समुद्रपातळी कमी असल्यामुळे भारत आणि श्रीलंका भूभागाने जोडलेले होते. हिमयुगानंतर समुद्र पातळी वाढल्यामुळे हा भूभाग पाण्याखाली गेला. उंच भूभाग पाण्याखाली गेला आणि समुद्रतळावर उंचवट्यांची उथळ रांग तयार झाली. या उथळ रांगेवर प्रवाळ कीटक आणि खडक वाढू लागले. अनुतट प्रवाहांनी वाळू आणि शंखांचे तुकडे जमा करून आजची प्रवाळांची साखळी तयार केली.
संशोधनानुसार, राम सेतू ही नैसर्गिक किनारी आणि सागरी प्रक्रियांमुळे प्रवाळ आणि वाळूच्या उथळ संचयनामुळे पाण्याखाली तयार झालेली रांग सदृश भूरचना आहे. तथापि, मोठ्या प्रमाणावर पाण्याखालील पुरातत्त्वीय उत्खनन झालेले नसल्यामुळे ती एक मानवनिर्मित रचना असावी हा समज अजूनही पूर्णपणे नाकारता येत नाही.