भूमिपूजन

विवेक मराठी    24-Mar-2026   
Total Views |
- रमेश पतंगे

tramp 
 उत्कर्षाला पोहचलेले राष्ट्रदेखील अधःपतनाच्या वाटेने जाणार हे ठरलेले आहेत. याला इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत ही अवनती टोकाला जाईल असे नाही, परंतु डोनाल्ड ट्र्म्प यांनी त्याचे भूमिपूजन करून ठेवले आहे, असे इतिहास नक्कीच म्हणेल.
अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इतिहास कशी दखल घेईल? या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे थोडे अवघड आहे. परंतु गेल्या दोन हजार वर्षाच्या इतिहासाचे प्रवाह पाहता असे लिहिण्याचा मोह आवरत नाही की, भविष्यात अस्तंगत होणार्‍या अमेरिकन साम्राज्याची पायाभरणी करणारे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची इतिहासात नोंद केली जाईल.
 
 
जगात अनेक साम्राज्ये निर्माण झाली. त्यातील काही साम्राज्यांचा उल्लेख केला पाहिजे. रोमन साम्राज्य याचा कालखंड इ. स. पूर्व 27 ते इ. स. 476 असा आहे. हे युरोपातील विशाल साम्राज्य समजले जाते. या साम्राज्याने जगाला चार देणग्या दिल्या. 1) रोमन कायदा 2) शिस्तबद्ध आधुनिक सैन्याची रचना 3) ख्रिश्चानिटी आणि 4) भव्य वास्तूंची उभारणी. या साम्राज्याचे पुढे दोन भाग झाले. रोमन साम्राज्य आणि बायझेंटाइन साम्राज्य. बायझेंटाइन साम्राज्य एक हजार वर्षे टिकले. इ. स. 1452साली त्याचा अंत झाला.
 
 
दुसर्‍या साम्राज्याचे नाव आहे मंगोल साम्राज्य. हे साम्राज्य तेराव्या शतकात मध्य आशियात उभे राहिले. आतापर्यंत जी साम्राज्ये उभी राहिली, त्यापैकी हे सर्वात विशाल साम्राज्य समजले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध सैन्य, घोड्यावर बसून धनुष्यबाण चालविण्याचे कौशल्य, लढाई जिंकल्यानंतर आत्यंतिक क्रौर्य, या मंगोल साम्राज्याने आशिया आणि युरोप यांच्यात सांस्कृतिक आणि धार्मिक आदानप्रदान घडवून आणले. एखादा भूप्रदेश जिंकल्यानंतर पुढे सुमारे तीनशे वर्षे शांतता राहिली. त्यामुळे व्यापारात खूप वृद्धी झाली. या साम्राज्याचा अंत साम्राज्यांच्या वारसदारांत कलह होऊन साम्राज्याची विभागणी झाली आणि नंतर तिथल्या तिथल्या जनसंस्कृतीत ते सामावले गेले.
 
 
जगातील तिसरे असे साम्राज्य इंग्रजांनी उभे केले. इंग्रज माणूस गर्वाने म्हणत असे की, इंग्रजी साम्राज्यावर कधीही सूर्यास्त होत नाही. हे साम्राज्य व्यापारी साम्राज्य होते. त्याला औद्योेगिक क्रांतीची जोड लाभली. कारखान्यातून उत्पादन सुरू झाले. वाफेची ऊर्जा आणि नंतर विजेची ऊर्जा त्यांच्या साहाय्याने प्रचंड अशा स्वरूपाची औद्योगिक क्रांती झाली. इंग्रजी साम्राज्य सोनं आणि प्रतिष्ठा या दोन पायांवर उभे राहिले. साम्राज्याचा विस्तार हा नंतर साम्राज्याच्या अस्ताला कारण झाला. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाने सगळी आर्थिक समीकरणे बदलली. साम्राज्यातील जनतेने स्वातंत्र्याचे उठाव सुरू केले आणि हळूहळू सूर्य मावळणारे ब्रिटनचे छोटेसे साम्राज्य राहिले.
 
 
 
युरोपातील चौथ्या साम्राज्याचे नाव आहे, रशियन साम्राज्य. या साम्राज्याचा 1721 साली प्रारंभ झाला. पीटर दी ग्रेट आणि कॅथेरिन दी ग्रेट यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. 1917ला झार निकोलस दुसरा ‘याच्या कर्तृत्वाने’ साम्राज्याचा अंत झाला. नंतर उभे राहिले रशियन साम्यवादी साम्राज्य. ते लेनिन आणि स्टॅलिनने उभे केले. त्याचा अंत 1990साली झाला. हे साम्राज्य वैचारिक साम्राज्य जसे होते तसे राज्य दहशतवादाचा वापर करून लोकांच्या स्वातंत्र्याच्या सर्व आकांक्षा रणगाड्याखाली चिरडून टाकणारे होते. चगेंजखानप्रमाणे या कम्युनिस्ट साम्राज्याने माणसे ठार मारण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे.
 
 
दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेचे साम्राज्य उभे राहिले. यापूर्वीच्या साम्राज्यात आणि अमेरिकन साम्राज्यात एक मूलभूत फरक आहे. अमेरिकन साम्राज्य भूविस्ताराचे साम्राज्य नाही. अन्य साम्राज्यांनी देश जिंकून त्यांच्यावर आपले राज्य सुरू केले. अमेरिका तसे करीत नाही. अमेरिका हे वेगळ्या प्रकारचे विस्तारवादी साम्राज्य आहे. त्याची शस्त्रे अशी आहेत -
 
 
* वेगवेगळ्या देशातील सैनिक तळ, क्षेपणास्रे तळ
 
* आपल्या हिताचे दुसर्‍या देशाकडून बळजबरीने करून घेणे.
 
* अमेरिकेला अनुकूल अशा राजसत्ता प्रमुख देशांत निर्माण होतील, हे डोळ्यात तेल घालून पाहणे.
 
* आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि जगातील लोकांना लिबर्टी म्हणजे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणे हे आमचे राष्ट्रीय लक्ष्य आहे.
 
एकाधिकारशाहीचा आम्ही धिक्कार करतो, आम्ही लोकशाहीवादी आहोत, ही अमेरिकन साम्राज्याची तात्त्विक भूमिका आहे.
याला आपण एक शब्द देऊ शकतो, लोकशाही साम्राज्यवाद. चगेंजखान, रोमचे सम्राट, खिलाफतीचे खलिफा, रशियाचे झार, नेपोलियन, हिटलर, मुसोलिनी या सर्वांचे साम्राज्यवाद व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, भू विस्तार या मुद्यांवर झाले. अमेरिका हा चेहरा धारण करीत नाही. अमेरिकेचा मुखवटा लोकशाहीचा आहे. इतर साम्राज्यांप्रमाणे अमेरिकेचे देखील साम्राज्यच आहे. बदलत्या काळानुरूप भूप्रदेश जिंकून त्यावर राज्य करण्याची जबाबदारी अमेरिकेला नको असते, परंतु आपल्या देशासाठी लागणारे खनिज पदार्थ, शेतमाल, गृहपोयोगी वस्तू अशा सर्व आपण सांगू त्या पद्धतीने उपलब्ध करून घेण्याची क्षमता ही साम्राज्यवादी क्षमता आहे.
 
 

tramp 
जगातील साम्राज्ये कशी उभी राहतात, त्यांचा परमोच्च बिंदू कधी येतो आणि त्यांना उतरती कळा कधी लागते, यावर अनेक पुस्तके आहेत. यातील एका पुस्तकाचे नाव आहे, "Why Great Nations Fail: The Hidden Lessons Behind the Rise and Fall of Empires' लेखिका मारिया यांनी या पुस्तकात अतिबलाढ्य रोमन साम्राज्याचे पतन का झाले याची अतिशय सोप्या भाषेत मांडणी केली आहे. त्या लिहितात,‘रोमन साम्राज्याच्या अभ्यासाने मला एक धडा शिकविला. तो धडा असा की, कोणतेही साम्राज्य आपला र्‍हास रोखू शकत नाही. ते कितीही अजेय वाटले तरी त्याचा अंत ठरलेला आहे. साम्राज्याच्या अधःपतनाची कारणे सूक्ष्म असतात. साम्राज्य उभे करताना जी ऊर्जा आणि शक्ती असते तिची पुढे जागा ऐशआराम आणि मौजमजा घेते. साम्राज्य उभे करताना कर्तव्याची भावना आणि ध्येयवाद असतो. नंतर स्वार्थ त्याची जागा घेतो. साम्राज्य उभे करताना लोकांची एकजूट असते, राजकीय लक्ष्य समान असते. साम्राज्य झाले की, राजकीय विभाजन सुरू होते, आपापसात कलह सुरू होतात आणि ते साम्राज्याचे पतन घडवून आणते.
 
 
मारिया यांनी रोमन साम्राज्याच्या पतनाची आणि अमेरिकन साम्राज्याच्या येऊ घातलेल्या पतनाची तुलना केली आहे. त्या लिहितात की, आज अमेरिका प्रचंड धनसंपन्न आहे. तसेच तंत्रज्ञान आणि लष्करी शक्तीबाबत अमेरिका महासत्ताच आहे. असे असले तरी अमेरिकेच्या अंतर्गत ताणतणाव, विभाजन, टोकाचे राजकीय मतभेद, उपभोगतावादाकडे म्हणजे ऐषआराम(खा, प्या, मजा करा) याकडे वाढत जाणारा कल, त्यामुळे जागतिक लक्ष्य आपल्याला गाठायचे आहे, अशी जी राष्ट्रीय ऊर्जा असते, ती क्षीण होत जाणे, हे सर्व अमेरिकेत घडताना दिसत आहे.
 
 आजची अमेरिका राजकीयदृष्ट्या प्रचंड जागरूक असते. युद्ध सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी जनमताचे सर्वेक्षण केले आणि प्रत्येकाचा निष्कर्ष असा आला की, 53% अमेरिकन जनतेला हे युद्ध पसंत नाही. केवळ 4% ते 10% लोक या युद्धाचे समर्थन करतात तर उरलेले लोक तटस्थ आहेत.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरूद्ध युद्ध सुरू केले. भविष्यात इराणपासून अमेरिकेला प्रचंड धोका संभवतो, म्हणून आजच इराणला रोखलं पाहिजे अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. म्हणून इराणची लष्करी शक्ती नष्ट करण्यासाठी इराणवर बाँब वर्षाव केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे युद्ध अमेरिकन जनतेचे युद्ध आहे का? आजची अमेरिका राजकीयदृष्ट्या प्रचंड जागरूक असते. युद्ध सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी जनमताचे सर्वेक्षण केले आणि प्रत्येकाचा निष्कर्ष असा आला की, 53% अमेरिकन जनतेला हे युद्ध पसंत नाही. केवळ 4% ते 10% लोक या युद्धाचे समर्थन करतात तर उरलेले लोक तटस्थ आहेत.
 
 
याचा अर्थ काय झाला?, याचा अर्थ असा झाला की, अमेरिकेत राजकीय मताचे विभाजन झाले आहे आणि ते अतिशय धारदार आहे. पर्ल हार्बरवर जपानने विमानहल्ला केला होता. तेव्हा अमेरिकन जनता खळबळून उठली, दुसर्‍या महायुद्धात उतरली आणि शेवटी दोन अणुबाँब जपानवर टाकून या आकस्मिक हल्ल्याचा सूड घेतला गेला. ती परिस्थिती आता नाही. आता 53% लोकांना युद्ध नको आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक लोकमताचा विचार करता सर्वसाधारणपणे खलनायक झालेले आहेत. ज्या देशांचा या युद्धाशी कसलाही संबंध नाही, त्यांना युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत.  
 
डोनाल्ड ट्रम्प हे रिपबल्किन पक्षाचे आहेत. अमेरिकेचे जनमत रिपबल्किन आणि डेमोक्रेटिक विचारात विभक्त असते. हे विभाजन या वेळेला अतिशय टोकदार झालेले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक लोकमताचा विचार करता सर्वसाधारणपणे खलनायक झालेले आहेत. ज्या देशांचा या युद्धाशी कसलाही संबंध नाही, त्यांना युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. आजचे जग इंधनावर चालते. स्वयंपाकघरापासून ते विमान उड्डाणापर्यंत सर्व ठिकाणी इंधन लागते. त्याचा पुरवठा इराण आणि आखाती देशातून होतो. हा पुरवठा संकटात सापडलेला आहे. भारतात त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.
 
 इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत ही अवनती टोकाला जाईल असे नाही, परंतु डोनाल्ड ट्र्म्प यांनी त्याचे भूमिपूजन करून ठेवले आहे,
 
साम्राज्यांचा अंत पराकोटीची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, कमालीची असहिष्णुता, दुसर्‍यावर वर्चस्व गाजविण्याची टोकाची भूमिका आणि ज्या शक्तीच्या आधारे साम्राज्य प्राप्त होते त्याचा प्रचंड गर्व ही सर्व लक्षणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने आपण पाहू शकतो. आपल्या अनेक पुराणकथांत अलौकिक शक्ती प्राप्त करणार्‍या असुरांच्या कथा येतात. त्या असुराला असे वाटते की, मी अजेय आहे, मला कुणी मारू शकत नाही. शस्र मारू शकत नाही, मनुष्य मारू शकत नाही, रात्री-दिवसा मी मरू शकणार नाही. या सर्व अटींची पूर्तता करणारा नरसिंह अवतार होतो. जो मनुष्यही नाही, प्राणीही नाही, तो हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडतो. डोनाल्ड ट्र्म्प यांना ही कथा माहीत नसेल. त्याचा मथितार्थ एवढाच की, जगात जसा माणूस मर्त्य आहे, तसेच उत्कर्षाला पोहचलेले राष्ट्रदेखील अधःपतनाच्या वाटेने जाणार हे ठरलेले आहे. याला इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत ही अवनती टोकाला जाईल असे नाही, परंतु डोनाल्ड ट्र्म्प यांनी त्याचे भूमिपूजन करून ठेवले आहे, असे इतिहास नक्कीच म्हणेल.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.