एकविसाव्या शतकातल्या, थोडंफार शिकलेल्या आणि तरीही सश्रद्ध असणार्या माझ्यासारखीच्या मनात राम घर करतो. सीतेला आपल्या बरोबरीने राजसिंहासनावर स्थान देणारा राम आमच्या मनावर अधिराज्य करतो.
मी आस्तिक आहे. देऊळ, चर्च, मशिद काही दिसलं की हात आपसून जोडले जातात. पण एक चांगली शक्ती म्हणजे परमेश्वर किंवा निर्गुण निराकार सत्याचे रूप म्हणजे परमेश्वर हे माझ्या छोट्या मेंदूला पुरत नाही, म्हणून भगवंतांची साजिरी गोजिरी रूपं आणि त्यांच्या सन्मार्गाने आयुष्य घालवण्याच्या कथा मला भुरळ घालतात. या सगळ्या वाटचालीत राम अगदी लहानपणापासून सतत भेटत राहिला आणि कणाकणाने मनात उतरत राहिला.
आजीच्या गोष्टीतून चंद्र हवा म्हणून हट्ट करणारा राम, हा तर आपल्यासारखाच म्हणून जवळचा वाटला. गदिमांच्या गीत रामायणातून मनात गुंजत राहिला. अनुप जलोटांच्या भजनांतून, रामकथा मेळ्यातून, दशावतारी आख्यानातून, दुर्गाबाईंचे निबंध वाचताना वनवासींच्या गीतांमधून, ओव्यांमधून, कुमार विश्वासांच्या व्याख्यानांमधून तर तो भेटत होताच, पण मी खपींशीपीहळि करताना उत्तरप्रदेशीय लोकं जास्त राहतात अशा भागात होते तेव्हा प्रत्येक नावात राम मिळत राहिला. सुखराम तर होताच, पण आईच्या गर्भात असताना वडील वारले म्हणून दुखरामही होता. सतत खोकणार्या दमेकरी आईचा मुलगा खांसीराम होता, पैलवान वडिलांचा भव्यराम होता. कर्जबाजारी आज्याचा मंगतराम होता पण राम होता... प्रत्येकात राम होता. पर्यटनासाठी भारतात जिथे जिथे गेले, तिथे तिथे राम कुंड, सीता कुंज, लक्ष्मण चबुतरा दिसून आले आणि रामाचं आपल्या देशातलं सर्वव्यापित्व जाणवलं.
वनवासात पहाटेपर्यंत सीतेशी गप्पा मारणारा राम कॉलेजच्या दिवसात रोमँटीकही वाटला आणि गर्भावस्थेतल्या सीतेला वनात सोडणारा राम आदर्श कसा हाही प्रश्न पडला. त्यावर आजीने उत्तर दिलं...‘तुमच्या मोजपट्टीने रामाला मोजू नका. तो काळ वेगळा होता, तेव्हाचे समाजाचे संदर्भ वेगळे होते...’ मग स्वत:च जमेल तसं वाचायला सुरुवात केली. आयुर्वेदाच्या अभ्यासामुळे चौखम्भा प्रकाशन माहीत झालं होतं. त्यामुळे त्यापासून सुरुवात केली. रामायणाचे पाठभेद बघून थक्क व्हायला झालं. वेगवेगळ्या भूभागत, अनेक काळात आपापल्या भाषेत राम चितारला आहे आणि सीता त्यागाचा प्रसंग मूळ रामायणात नाही हे बघून मन खूप सुखावलं.
राम ही कल्पना आहे. अशी व्यक्ती झालीच नव्हती असं मांडणारे लेखही वाचनात आले, पण पिढ्यान्पिढ्या, शतकानुशतके लोकांच्या मनावर राज्य करणारे काल्पनिक पात्र निर्माण करणे खरंच शक्य नाही. शिवाय रामायण हे काव्य असतं तर वाल्मिकी सर्वज्ञात झाले असते, जसा शेक्सपिअर झाला, कालिदास झाला, इथे राम प्रत्येकाच्या मनात रुजला म्हणजे तो नक्की होऊन गेला असणार. ‘नजर रोखुनी नजरेमध्ये, आव्हानांना द्यावे उत्तर’ ही कविता गुरू ठाकूरची की कुसुमाग्रजांची यावर 10 वर्षातच वादविवाद होतात. पण राम कथेचे संदर्भ भाषा आणि काळ बदलला तरी शतकानुशतके बदलत नाहीत. ओव्या, गथिका यांसारख्या मौखिक साहित्यातूनही तोच राम एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे सोपवला जातो आणि माझ्या मनातला राम मला अधिकाधिक स्पष्ट दिसायला लागतो. राम कुठेच कुणाला आज्ञा देताना किंवा उपदेश देताना आपल्याला दिसत नाही. आजच्या भाषेत बोलायचं तर रामाची स्वत:ची ींरस श्रळपश नाही. ‘माम एकं शरणं व्रज’ किंवा ‘आकाशीच्या बापा यांना माफ कर, हे काय करत आहेत ते यांना कळत नाही’, यासारखं रामाच्या तोंडचं कुठलंही वाक्य आपल्याला आठवत नाही. गदिमांच्या गीत रामायणातही छप्पन गीतांपैकी ‘या इथे लक्ष्मणा बांध कुटी’ हे एकच गीत रामाच्या तोंडी आहे. एरवी कृतीशील आचरणाचा वस्तुपाठ म्हणजे राम.
तो गुरूंची आज्ञा म्हणून यज्ञामध्ये विघ्न आणणार्या असुरांना मारतो. वडिलांची आज्ञा म्हणून आनंदाने वनवास स्वीकारतो. वनवासातही जिथे जिथे अन्याय दिसतो, त्यावर भाष्य न करता तो निवारण्याचं काम करतो. आचरणातून संदेश देणारा राम आपल्याला ठायी ठायी दिसतो.
अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरेत नित्यं ...
हा श्लोक आपल्याला माहीत आहेच. द्रौपदी सोडली तर अन्य चारही रामाच्या आयुष्यातल्या किंवा राम त्यांच्या आयुष्यात आलेला. यातल्या प्रत्येकाशी रामाचं असलेलं वर्तन हे रामाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. पुरोगामी राम या सगळ्यातून आपल्याला जाणवत रहातो.
इंद्राच्या फसवणुकीनंतर शीला झालेल्या अहिल्येचा उद्धार म्हणजेच योनिशुचितेच्या चुकीच्या कल्पनांमुळे समाजबाह्य झालेल्या अत्याचारग्रस्त महिलेला पुन्हा समाजात आदराचं स्थान मिळवून देणारा, कपटाने भावाचं साम्राज्य गिळंकृत केलेल्या वालीच्या वधानंतर राज्य प्रमुख म्हणून त्याच्या पत्नीच्या-ताराच्या हवाली राज्य करून साम्राज्याचा वारस पुरूषच हवा ही मानसिकता पुसून टाकणारा, रावणाच्या मृत्यूनंतर तिथल्या परंपरेप्रमाणे बिभीषणाशी लग्न करण्यासाठी मंदोदरीशी चर्चा करणारा आणि लंकेची राणी म्हणून तिचे हक्क अबाधित ठेव असे बिभीषणाला सांगणारा राम पुनर्विवाह आणि विधवा हक्कांबाबत संवेदनशील जाणवतो.
आजही लग्न जमवताना जाती, पोटजातीचा विचार करणार्या आपल्याला राजकुलात जन्मलेला राम जनक राजाला मंजुषेमध्ये मिळालेल्या कन्येशी कुल, गोत्र, जात, धर्म, ठेूरश्र इश्रेेव याचा विचार न करता विवाहबद्ध होताना दिसतो आणि जातीच्या उतरंडीवर केवळ एका वरमालेने फुली मारतो.
मातंग ऋषिंच्या मानसकन्येला भिल्ल कुळातील शबरी मातेला आलिंगन देऊन आणि तिच्या उष्ट्या बोरांचा स्वीकार करून राजा राम ‘भेदाभेद अमंगळ’ आपल्या आयुष्यातून पुसून टाकायला हवं हेच अधोरेखित करतो.
वानरसेना, जांबुवंत, खारुताई, जटायु या सार्यांना आपलासा वाटणारा, त्यांच्याप्रति कृतज्ञ राहणारा रघुकुल दीपक राम सृष्टीतील चराचरात एकच परमात्मा आहे हेच आपल्याला सांगतो.
शत्रूवर जय मिळवल्यानंतर त्याच्याकडील शास्त्र शिकून घे म्हणणारा राम, युद्धविरामानंतर मनातले शत्रुत्व काढून टाकायला शिकवतो. आणि शत्रूवरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची शिकवण देतो.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वनवासासाठी निघालेला राम या भारतद्विपातील लहान मोठे प्रश्न सोडवून पुन्हा अयोध्येला आपल्या मातृभूमीकडे येतो. सोन्याच्या लंकेचा अधिपती होण्याचंही प्रलोभन आपल्या मातृभूमीच्या ओढीने नाकारतो.
माझ्या मनातला राम हा या क्षणी असा आहे. ठुमक चलत रामचंद्रापासून आतापर्यंत समजलेला लोकनायक राम... अधिकाधिक वाचेन तसं अधिकाधिक समजत जाणारा, अधिकाधिक थक्क करणारा.
म्हणूनच...एकविसाव्या शतकातल्या, थोडंफार शिकलेल्या आणि तरीही सश्रद्ध असणार्या माझ्यासारखीच्या मनात राम घर करतो. सीतेला आपल्या बरोबरीने राजसिंहासनावर स्थान देणारा राम आमच्या मनावर अधिराज्य करतो.
डॉ. हर्षदा प्रसाद देवधर