धुरंधर रिव्हेंज - जिहादी वृत्तीचा पर्दाफाश

विवेक मराठी    27-Mar-2026
Total Views |
@अश्विनी रोहित कुलकर्णी
 

Dhurandhar 2 
‘धुरंधर‘ हा चित्रपट आपल्या अस्तित्वासोबत जोडलेल्या भावनांनाच थेट स्पर्श करतो. एक भारतीय म्हणून, हिंदू म्हणून आपलं अस्तित्वच गैर ठरवून ते संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येक जिहादी वृत्तीला पराभूत झालेले पाहण्याचा आनंद ‘धुरंधर’ आपल्याला देतो आणि म्हणूनच, पंधरा सेकंदाच्या रील्सच्या जमान्यातही आपण चार तासाचा चित्रपट एकही क्षण विचलित न होता जगतो, अनुभवतो आणि साजरा करतो.
धुरंधर रिव्हेंज’ या चित्रपटाचा डिसक्लेमर मी आजवर पाहिलेल्या सर्व चित्रपटांपेक्षा सर्वात मोठा आणि सविस्तर होता. कदाचित, या चित्रपटातील प्रत्येक पात्र, त्यांची व्यक्तिरेखा, व्यक्तिचित्रण, ठिकाणांची नावे सारे काही प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि प्रत्येक घटनेचे वास्तविक जगातील घडामोडींशी सहज संदर्भ जोडता येतात. म्हणूनच हा सगळा एक खूप मोठा योगायोग आहे हे दिग्दर्शकाला आवर्जून सांगावे लागले. पण तरीही चित्रपट पाहिल्यावर कोणत्या पात्राच्या व्यक्तिरेखेचे वास्तविक आयुष्यातील त्या व्यक्तिशी किती साधर्म्य आहे याबाबत पडताळणी करताना येणारी मजा वेगळी आहे. एसपी चौधरी अस्लमसारख्या काही पात्रांचे कुटुंबियसुद्धा हे साम्य पाहून थक्क झालेले आहेत. चित्रपटातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ‘ल्यारी‘ची प्रतिकृती कला दिग्दर्शकाने इतकी हुबेहूब बनवली आहे की ल्यारीचे मूळ रहिवासी हा चित्रपट पाहिल्यावर थक्क झाले.
 
 
’धुरंधर‘ चा पहिला भाग ही केवळ एका मोठ्या शृंखलेची एक कडी होती, ज्याला आदित्य धरने व्यावसायिक चित्रपटाचा पूर्ण मसाला घालून प्रेक्षकांपुढे ठेवले. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. एक हेर पट कोणत्याही प्रमोशनशिवाय प्रेक्षक चार-चार वेळा सिनेमागृहात जाऊन बघत होते. भारतातच नाही तर पाकिस्तानातसुद्धा लोक हा चित्रपट आवडीने बघत होते. प्रथमच एखाद्या चित्रपटाने पाकिस्ताना ग्लॅमरस जीवनशैली, शॉपिंग मॉल्स, पब्स, मोठे रस्ते दाखवले. सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ असो किंवा सैफ अली खानचा ‘फँटम’ चित्रपट असो, पाकिस्तानची सामान्य जनता नेहमी कळकट झब्बे घातलेले पुरुष आणि बुरख्यातल्या स्त्रिया अशीच आजवर चित्रित करण्यात आली होती. आदित्य धरने हा पायंडा मोडीत काढला. सामान्य मुसलमानांचे जिहादी इस्लाम्यांपासून असलेले वेगळेपण त्याने आपल्या कथानकातून सादर केले. पाकिस्तानातील आणि भारतातील मुसलमानांनादेखील ते भावले. यानंतर प्रेक्षकांना काहीशी प्रतीक्षा करायला लावून, योग्य तेवढी उत्कंठा ताणून आता ‘रिव्हेंज‘च्या रूपाने त्या कडीची संपूर्ण शृंखला एका सशक्त कथानकाद्वारे आदित्य धरने उघड केली आहे.
 
 
रिव्हेंज चित्रपटाची सुरुवात जसकिरतच्या हमजा बनण्याच्या प्रवासापासून होते. दोन पिढ्यांपासून सैन्यात भरती होण्याचा आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण घेत असलेल्या जसकिरतच्या कुटुंबाची दुर्दैवी वाताहत होते. त्यासाठी जबाबदार असलेल्यांना जसकिरत यमसदनी धाडतो आणि जन्मठेपेची शिक्षा भोगायला सज्ज होतो. मात्र त्याचा लढाऊ बाणा बघून त्याला उरलेले आयुष्य देशासाठी खर्ची करण्याची संधी दिली जाते. जसकिरतला या कामासाठी तयार करण्यासाठीचे संवाद खूप अर्थपूर्ण आहेत. आर. माधवन ही संवादफेक अजित डोवालांच्या पात्रात पूर्ण शिरून करतो.
 
 
गेल्या बारा वर्षात आपल्या देशात नोटबंदीसारख्या अचंबित करणार्‍या आणि अयोध्या राममंदिर पुनर्निर्माणासारख्या कृतकृत्य करणार्‍या अनेक घटना घडल्या. कोरोनामध्ये थाळी वाजवणे असो, स्वच्छता मोहिमा असो किंवा योग दिवस असो; प्रत्येक वेळी शीर्षस्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून देशातील नागरिकांनी मोदीजींना पूर्ण पाठिंबा दिला. उरी, पुलवामा हल्ल्यांनंतर झालेले सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक सुद्धा प्रतिशोध पूर्ण झाल्याचा संमिश्र आनंद देऊन गेले. पण आपण या घटनांची फक्त एक बाजू अनुभवली. जसे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यावर मावळ्यांचा जल्लोष वाचण्यापेक्षाही आदिलशाही दरबारातील बड्या बेगमचा जळफळाट, तडफड वाचायला मजा येते तशीच मजा ‘धुरंधर रिव्हेंज’ सिनेमा आपल्याला ती दुसरी बाजू दाखवून देतो. या देशविघातक शक्तींची झालेली घुसमट बघताना कोण आनंद मिळतो!
 
 दाऊदला अन्नातून विषबाधा झाली. या सर्व घटना जशास तशा कथानकाच्या सुसूत्रतेत बाधा न आणता आपण सिनेमात बघतो तेव्हा भारताच्या नवीन आक्रमकतेचं आणि ते मोठ्या पडद्यावर ताकदीने उभे करणार्‍या आदित्य धरचं कौतुक आणि केवळ कौतुक वाटत राहतं.
 
गेल्या काही वर्षात अज्ञात व्यक्तींनी केलेल्या बेधडक कारवाया आपण वाचत आलोय. 26/11 चा एक सूत्रधार जावेद खनानी कराचीमध्ये इमारतीवरून पडून मरण पावला. अतिरेकी म्होरक्या सय्यद रजाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अतिरेकी हरविंदर सिंग इस्पितळात मृत्यूमुखी पडला. IC-814 हायजॅक करणार्‍या जहूर मिस्त्रीला कराचीमध्ये गोळ्या घालून मारण्यात आले. बनावट नोटांची तस्करी करणारा ड्रग डिलर अतिक अहमद भारतीय तुरुंगातून बेलवर सुटताच अचानक त्याच्यावर गोळीबार झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. दाऊदला अन्नातून विषबाधा झाली. या सर्व घटना जशास तशा कथानकाच्या सुसूत्रतेत बाधा न आणता आपण सिनेमात बघतो तेव्हा भारताच्या नवीन आक्रमकतेचं आणि ते मोठ्या पडद्यावर ताकदीने उभे करणार्‍या आदित्य धरचं कौतुक आणि केवळ कौतुक वाटत राहतं.
 
 
आदित्य धर या दिग्दर्शकाला सत्यघटनेवर आधारित सिनेमाचे तंत्र उत्तम अवगत आहे. त्याचे नायक आणि खलनायक इतर बॉलीवूड अ‍ॅक्शनपटांप्रमाणे भावनाशून्य किंवा दांभिकपणे कधीही माघार न घेणारे नसतात. ते दोघे अपयशी होतात, मारही खातात, वेळप्रसंगी हतबल होऊन रडतातही. पण त्यांचा कमबॅक तो इतका प्रभावी दाखवतो की प्रेक्षकांचे पैसे वसूल होतात.
 
अजित डोवाल, NSA, Raw यांच्यावरील शेकडो पुस्तकांचा अभ्यास आपल्याला या सिनेमात दिसतो. National security agency हेर कसे तयार करते, त्यांना अतूट बनण्यासाठी कोणत्या पातळीवरचे प्रशिक्षण दिले जाते याचे बारकावे चित्रपटात अचूक दाखवले आहेत. हे सारे भारावून टाकणारे असले तरी गुप्तहेरांना आपल्या व्यक्तिगत भावभावना किती निर्दयीपणे दाबून टाकाव्या लागतात याचे चित्रणही उत्कृष्ट साकारले आहे. हमजा बनल्यावर जसकिरत आपल्या कुटुंबाची एकमेव आठवण असलेला फोटो जाळून टाकतो तेव्हा आपलीही भावनिक घालमेल होते. हमजा भारताचा हेर आहे हे समजल्यावर आपल्या पत्नी आणि मुलाशी त्याला कायमची फारकत घ्यावी लागते. त्याचा पत्नीसोबतचा शेवटचा संवाद दाखवलेला सीन इतका भावनिक आहे की आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याशिवाय रहात नाहीत. जसकिरत भारतात परतल्यावर कोणालाही न सांगता आपल्या आईला भेटायला घरी जातो. पण एकदा देशासाठी समर्पित केलेले आयुष्य त्याला पुन्हा स्वतःसाठी जगता येत नाही. आईचे दुरून दर्शन घेऊन तो त्याच पावली परत फिरतो. त्याच्या मनातली तगमग रणवीर सिंगने अभिनयातून उत्तम साकारली आहे. चित्रपटाचे संगीतही तोडीस तोड आहे. हा प्रसंग आपल्याला भारतीय गुप्तहेरांच्या समर्पित आयुष्याविषयी कृतज्ञ बनवतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो.
 
 
‘हमजा’ या मुख्य पात्रासाठी रणवीर सिंगची निवड केल्यामुळे एका दगडात अनेक पक्षी मेले आहेत. रणवीरने या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय. तो बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील अष्टपैलू अभिनेता असल्यामुळे त्याच्या अभिनयाचे सर्व स्तरातील प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आर. माधवनसहित सर्वच अभिनेत्यांनी कमाल केली आहे आणि चित्रपटाच्या पार्श्वसंगीताने त्यात प्राण फुंकले आहेत.
 
 
27 फेब्रुवारी 2019ची गोष्ट. त्यावेळी रोज संध्याकाळी ऑफिसमधून येताना एक तास मी वाहतुक कोंडीत अडकायचे. त्या एक तासात बातम्या ऐकणे हा व्यस्त दिनचर्येचा भाग झाला होता. त्या दिवशी बातमी आली, ‘ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या MiG-21 Bison या लढाऊ विमानातून पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडले.’
 
 
आपल्या हवाई दलाची तयारी बघून कमालीचा अभिमान वाटला. पण कॅप्टन वर्धमान यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. काही वेळाने समजले की ‘कॅप्टन वर्धमान यांच्या विमानाचा रेडिओ खराब झाल्यामुळे ते LOC पार करून शत्रूच्या मुलखात गेले आणि तिथेच त्यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले.’ ही बातमी ऐकून पायाखालची जमीनच सरकली. पाकिस्तान सैन्याने अटक केली म्हणजे आता अतोनात छळ होणार. विचार करून रात्री झोप पण येईना. काही वेळाने बातमी आली की, ‘कॅप्टन वर्धमान उद्या भारतात परत येतील. तशा यशस्वी वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत.’ दुसर्‍या दिवशी वर्धमान यांची सुटका झाली. ताठ मानेने आणि हसर्‍या चेहर्‍याने ते भारतात परतले. त्यावेळी पाकिस्तानची अशी कोणती हतबलता वा लाचारी होती की त्यांनी अशी नामी संधी सोडली किंवा भारताने कोणत्या कूटनितीचा वापर केला असेल याचा थांग लागला नव्हता. एका मुलाखतीत याबाबत विचारल्यावर मोदींनी केवळ हसून ‘वो राज राजही रहने दिजीये’असे उत्तर दिले होते. अशी कूटनीती यशस्वीपणे अजमावायची असेल तर हेर खाते कसे चौफेर नजर ठेवणारे आणि कार्यक्षम हवे, याची कल्पना चित्रपटाच्या शेवटी जसकिरतची सुटका होताना येते. त्याला विमानाने तातडीने भारतात आणण्यात आले हे बघताना ‘भारताचे स्पाईस जेटचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे 5 जुलै 2022 च्या मध्यरात्री पाकिस्तानमध्ये लँड झाले होते’ तो संदर्भ आठवून जातो आणि मन रोमांचित होते.
 
 
जिहादी वृत्तीवर सर्व बाजूंनी हल्ला चढवताना जिहादी लोक पाकिस्तानसाठीसुद्धा किती घातक आहेत आणि भारताची लढाई सामान्य मुसलमानांशी नाही हा संदेश चित्रपटातून द्यायला दिग्दर्शक विसरत नाही. ‘भारताचे आणि पर्यायाने हिंदूंचे क्षात्रतेज अजूनही तळपत आहे’ या आश्वासक संदेशातून वास्तविकता संपूर्ण जगासमोर ठेवणारा हा सिनेमा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे यात शंका नाही.