@प्रमोद वसंत बापट
9821979871
शताब्दीचा मोठा कालखंड पूर्ण करून आलेल्या संघाची माहिती देणं एवढाच सीमित उद्देश गृहसंपर्क अभियानामागे नाही. तर ती माहिती देत संघाला अभिप्रेत असलेल्या समाजजीवनाची प्रत्यक्ष व्यवहारात समाजाने अनुभूती घ्यावी, आणि त्यासाठी काही नेमक्या गोष्टी आपल्या जीवनातून अभिव्यक्त कराव्यात अशी अपेक्षा करणारं आवाहन, हे ह्या अभियानामागचं सूत्र आहे. म्हणजेच हे अभियान म्हणजे केवळ माहिती प्रबोधन, विषय जागरण नव्हे तर प्रत्यक्ष कृतीसाठी संघाने समाजाला घातलेली साद आहे.
आपल्या भारत देशाच्या प्राचीन इतिहासात डोकावले असता इथे एक एकसंध समाजजीवन दीर्घकाळ नांदत होते ह्याच्या कितीतरी गोष्टी आजही साक्ष देतात. अतिप्राचीन वैदिक मंत्रापासून आजवर चालत आलेल्या चालीरिती, परंपराही त्याची प्रचिती देतात.
संगच्छद्वं संवदध्वं।, समानं मन सहचित्तमेषाम्। किंवा सहनाववतु सहनौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै ॥ हे वेदमंत्र आमच्या समाजजीवनाची क्षणचित्रेच रंगवतात. असं आमचं संघटित समाजजीवन होतं. आणि त्यामुळेच ते दीर्घकाळ अखंडपणे सुरू आहे.
कालौघात त्यात काही दोष निर्माण झाले, वाढीला लागले. इथल्या समृद्धी, संपत्तीच्या लुटीसाठी आक्रमणे होत राहिली, काही आक्रमकांनी इथली सत्ता हस्तगत केली. त्याच्यामुळेही समाजजीवन विस्कळीत झाले. समाज दुर्बळ झाला. त्याचा परकीय सत्ताधीशांनी पुरेपूर लाभ उठवला. आणि परिणामी आमच्या समाजजीवनाचे ताणेबाणे उसवत गेले, वीण सैल झाली आणि अशा विघटित समाजाला स्वाभाविकच परवशता सोसावी लागली.
नेमकं हे व्याधीलक्षण ओळखून भारतभूमीत पुनरपी एकरस, एकात्म समाजजीवन प्रवाहित करण्याचा संकल्प सोडून त्याच्या पूर्तीचं संघरूपी साधनबीज डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या महापुरुषाने शंभर वर्षांपूर्वी ह्या भूमीत रुजवलं. ते अंकुरून आज आपल्या शाखासंभाराने विस्तारलं, विशाल झालं.
संघ शतायु झाला म्हणत असताना त्यामागे उत्सवी भावना नसून लोकसंघटनाची एक धारा अखंड आणि अधिकाधिक व्यापक होत वाहत राहिली, त्या सातत्याने आपला मार्ग योग्य असल्याची साक्ष मिळते आहे ह्याची नम्र कृतार्थता आहे. आणि अजूनही अधिक निकट संपर्कासाठी वाव असल्याची यथार्थ जाणीव आहे.
त्यातूनच संघशताब्दीकाळात संघाने आपल्या कामात काही विशेष उपक्रमांच्या साखळीची योजना केली. व्यक्तिव्यक्तीमध्ये आत्मीय संपर्कातून समाजभक्ती, राष्ट्रीय वृत्ती आणि संघटित कार्यशक्ती निर्माण करणं हेच संघकामाचं प्राणतत्त्व म्हणता येईल. आजवर संघ स्वयंसेवक आपल्या नित्य व्यवहारातही हेच करत असतो. संघाने एखाद्या विषयाचं, प्रसंगाचं महत्त्व समाजमनात ठसविण्यासाठी आजवर अशी काही विशेष जनसंपर्क अभियानंही योजली, कार्यवाहीत आणली. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगाच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने घरोघरी शिवसंदेश वितरण, स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जनजागरण, राष्ट्र जागरण अभियान, श्रीरामजन्मभूमी मंदिरनिर्माणानिमित्त केलेलं श्रद्धा जागरण अशी अनेक विशेष अभियानं इथे आठवतील.
संघशताब्दी निमित्तानेही अशाच एका व्यापक गृहसंपर्क अभियानाची योजना आखली गेली. ह्यापूर्वीच्या वर निर्देश करण्यात आलेल्या अभियानांचं स्वरूप काहीसं वेगळं होतं. एखाद्या विषयाची माहिती, प्रसंगाचं स्मरण असं प्रबोधन वा समाजजीवनावर परिणाम करणार्या एखाद्या घटनेविरोधात जनमत जागं करण्यासाठी जागरण असंच त्यामागे प्रयोजन होतं. संघशताब्दी निमित्त योजिलेल्या गृहसंपर्क अभियानाचं प्रयोजन मात्र वेगळं आहे. शताब्दीचा मोठा कालखंड पूर्ण करून आलेल्या संघाची माहिती देणं एवढाच सीमित उद्देश त्यामागे नाही. तर ती माहिती देत संघाला अभिप्रेत असलेल्या समाजजीवनाची प्रत्यक्ष व्यवहारात समाजाने अनुभूती घ्यावी, आणि त्यासाठी काही नेमक्या गोष्टी आपल्या जीवनातून अभिव्यक्त कराव्यात अशी अपेक्षा करणारं आवाहन हे ह्या अभियानामागचं सूत्र आहे. म्हणजेच हे अभियान म्हणजे केवळ माहिती प्रबोधन, विषय जागरण नव्हे तर प्रत्यक्ष कृतीसाठी संघाने समाजाला घातलेली साद आहे. ती साद घरोघरी गुंजावी ह्यासाठी प्रत्यक्ष वस्तीतील घराघरात जाणं, संवाद करणं, समाजस्थितीची चर्चा करणं, त्यात घरातील सर्वांना सहभागी करून घेणं, त्या त्या कुटुंबात होत असलेले काही उपक्रम जाणून घेणं, काही प्रयोग सुचवणं अशी ही बहुआयामी संवाद योजना आहे. ह्या भेटीत प्रत्येक घरी देण्यासाठी एका घडीपत्रकाची योजना आहे. तसंच संघ, संघकार्य आणि संघाला अपेक्षित असलेल्या समाजपरिवर्तनाचा आधार म्हणून निश्चित केलेल्या पंचपरिवर्तनाच्या विषयांची सविस्तर माहिती देणारी एक पुस्तिकाही स्वयंसेवक घेऊन गेले. त्याचं अगदी जुजबी मूल्य असल्याने अधिक जिज्ञासा असलेल्या कुटुंबात त्याची विक्रीही करण्यात आली.
असं हे अभियान गेले काही महिने देशभर सुरू आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात संघकामाची रचना चार प्रांतांच्या माध्यमातून होत असते. देशभरात हे अभियान विजयादशमीनंतरच्या कालावधीत सुरू झाले. प्रत्येक प्रांत, विभाग, जिल्ह्याने आपापल्या नियोजनानुसार तीन आठवड्यांच्या कालावधीत त्या अभियानाची कार्यवाही केली. महाराष्ट्रात नेमक्या त्याच कालावधीत नगर-महानगर पालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यामुळे या अभियानाचे नियोजन विजयादशमीनंतर लगेचच न करता फेब्रुवारी - मार्च महिन्यात करण्याचं ठरविण्यात आलं.
महाराष्ट्रात आता हे अभियान बहुतांशी पूर्ण होत आलं आहे. एका ऊर्जेचा, उत्साहाचा अनुभव सध्या स्वयंसेवकांनी घेतला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर सारखी भरगच्च वस्तीची महानगरं आणि नवी मुंबई, हिंजवडीसारख्या नव्याने विस्तारत जाणार्या शहरातील स्वयंसेवकांनी आपल्या सर्व वस्त्या-उपवस्त्यांमध्ये घरोघरी संपर्काची, संवादाची विकेंद्रित रचना उभी केली. प्रांतातून मराठी आणि हिंदी भाषेतील घडीपत्रकं, विक्रीसाठी पुस्तिका अशा सामग्रीचं वितरण झालं. शाखाशाखांतून संपर्क अभियानाची मांडणी झाली. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष संवादासाठी प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्यात आले. ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक मंडलातील गावं, त्यातील उपवस्त्या, वाड्या किंवा नगरीय क्षेत्रातील गृहसंकुलश:, वस्तीश: प्रत्यक्ष घरोघरी जाणारे समूह निश्चित करून त्यांची प्रत्येकी दोनतीन स्वयंसेवकांच्या गटात विभागणी केली. असे गट साधारण प्रतिदिनी संध्याकाळी-रात्री दोनतीन तास आणि सुट्टीच्या दिवशी सकाळ-संध्याकाळ मिळून अधिक कालावधी घेत घरोघरी संपर्कासाठी फिरत होते.
घरोघरी प्रत्यक्ष घरात जाऊन बसणं, गप्पा करणं असं अपेक्षित असल्यामुळे त्या दोन अडीच तासात दहाबाराच घरं होत असत. पण घरातील सर्व मंडळींबरोबर ह्या निमित्ताने झालेल्या संवादाच्या अनेक उपलब्धी आहेत.
संघाची सर्वांना सर्वसाधारण माहिती असेलच असं वाटणार्या स्वयंसेवकांना काही घरात आश्चर्याचा धक्का बसत होता. कारण काही घरं संघसंबंधात अगदीच अनभिज्ञ असल्याचे आढळून आलं. पूजनीय डॉक्टरांनी त्या काळातील गोविंदरावांचं केलेलं वर्णन आजही अतिशयोक्त नव्हतं. आपण बरं आणि आपला नोकरीधंदा बरा असं काही जणांचं आजही अलिप्त जग, जगणं होतं. पण त्याचबरोबर घरातील निवृत्त आजीआजोबांपासून शाळकरी मुलामुलींना, मायभगिनींना, युवकयुवतींना थोडाफार संघ माहिती होता आणि देशकाल स्थितीविषयीही काही म्हणायचं होतं, ऐकायचं होतं. माध्यममुखातून कधी कधी विपरीत रंगात रंगविलेल्या संघप्रतिमेचा अगदी नगण्य परिणाम दिसून आला. उलटपक्षी संघात येत नाहीत पण संघ समाजासाठी निःस्वार्थपणे काही भलं काम करतो असा विश्वास अनेक घरातून व्यक्त केला गेला. नगरीय क्षेत्रातील अनेक वस्त्यांमध्ये गावांमधून, तालुक्यांमधून शिक्षण वा नोकरीसाठी आलेल्या स्वयंसेवकांची संख्याही मोठी लक्षणीय आहे. तिथल्या तिथल्या शाखांची पटसंख्या वाढली. शाखांवरही उपस्थिती हळूहळू वाढत आहे.
ह्या निमित्ताने स्वयंसेवकांनी देशभर घरोघरी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, ’स्व’ बोध आणि नागरी शिष्टाचार ह्या पाच विषयांवर संवाद साधला, गप्पा मारल्या. काही सांगितलं तर खरंच पण, अधिक काही ऐकायला मिळालं. जाणून घेता आलं.
अनेक घरी या सर्वच विषयांवर काही उपक्रम होतात, काही रितीभाती स्थिरावल्या आहेत. घराला सुविधा पुरविणार्या सेवकसेविकांशी अनेक घरांतून आत्मीयतापूर्ण व्यवहार तर होतोच पण त्यांचा परस्पर परिचय सघन आहे, आस्थापूर्ण आहे. सेवादात्यांच्या घरातील मुलांच्या शिक्षणाची चिंता केली जाते. वर्षातून कधीतरी एकत्रित नाटक-चित्रपटही पाहिला जातो. चाळीत, संकुलात समूहजीवनाचं उबदार दर्शन होत होतं. घरात सांजवात लावली जात होती. वडीलमाणसांना नमस्काराची रितही पाळली जात होती.
मुळशीहून विस्थापितांच्या बैठ्या वस्तीतील एका घरातील आजीबाईंना संघ माहिती नव्हता पण ते तीन पोरं हवीत सांगणारे भागवतबाबा माहिती होते. आपल्या परम पूजनीय सरसंघचालकांचा हा असा काहीसा रांगडा पण निरागस परिचय स्वयंसेवकांना चकित करून गेला. आजीबाई भाकरी थापता थापता बोलत होत्या. त्यांनी संपर्काला गेलेल्या तिघांना तिथेच जमिनीवर बसायची खूण केली. पुढे बोलताना समोरच्या नौश्याच्या घरात कशी बाराचौदा जणांची पंगत आहे हे सांगत त्यांनी आलेल्या तरुणाला बाबा सांगतो ते माझ्या म्हातारीला नसतंय तर ते तुझ्यासारख्या जवानासाठी असतंय असंही निक्षून सांगितलं.
कुणी वकीलसाहेब होते, त्यांनी म्हटलं मी अनेकांशी बोलत असतो. वेगवेगळ्या वयोगटातील, स्तरातील लोकांशी बोलणं हा माझा धंदाच आहे. मी सल्ला देतो, समुपदेशन करतो. मी ह्या पंचपरिवर्तनाच्या गोष्टी रचेन. केवळ माहितीहून गोष्ट प्रभावी ठरते असा माझा अनुभव आहे. महिन्याभरात त्या गोष्टी ते पाठवणार आहेत.
काही ठिकाणी घरोघरी करता करता वस्तीच जमू लागे, एकत्र बसत असे आणि काही गोष्टी ठरवून घेत असे. उदाहरणार्थ वस्तीतील मंदिराची व्यवस्था, निर्माल्यव्यवस्था, पाणी-प्रसाधन व्यवस्था आदी विषयात काही नवे प्रयोग करण्याची चर्चा करीत असत.
संवाद हा संघकामातील एक मोठा घटक आहेच...होताच. अशी आत्मीय संवादाची विकसित केलेली शैली हे आधुनिक समाजव्यवहाराला संघानं दिलेलं एक लेणंच म्हणता येईल. पण एकूण संघयात्रेतील संवादाचा हा पुढचा कृतिप्रवणतेकडे, समाजपरिवर्तनाकडे नेणारा टप्पा होता. देशभरात एकूण बारा कोटी घरांमध्ये स्वयंसेवक जातील अशी ही योजना आहे. नेमकं संख्यात्मक वृत्त अजून एकत्रित व्हायचं आहे. पण आपल्या राज्यात साधारण पस्तीस लाख घरातून संघसंवाद गुंजला असावा असा अंदाज आहे.
वर्षानुवर्षे समाजाशी आपलं आत्मीयतेचं नातं जपणार्या संघाच्या ह्या उपक्रमातून स्वयंसेवकांनी समाजाची स्वागतशीलता तर अनुभवलीच पण त्याही पुढे जात संघस्वीकाराचा भाव अनुभवला. संघविचार पुढे नेत असलेल्या स्वयंसेवकांना आपल्या सवे.. एखादं पाऊल पुढेही टाकण्यास सिद्ध असलेल्या समाजाचं दर्शन झालं.
’संकेताची वाट पाहतील असंख्य ज्योती घरोघरी’ असा स्वयंसेवकांविषयी विश्वास दाखविणारी पद्याची ओळ म्हटली जात असे. आता ते विश्वासाचं वर्तुळ विस्तारलं आहे, विशाल झालं आहे. केवळ स्वयंसेवक नाहीत तर वाट पाहणारा समाज समजून घेता आला. जणू संघज्योती घेऊन गेलेल्या स्वयंसेवकांनी समाजातील घराघरात अशा तेवणार्या ज्योतींचंच दर्शन घेतलं.
हे शताब्दीचं मोठं पाथेयंच म्हणायला हवं.