महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या तसेच 100व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कोणत्याही विशिष्ट विचारधारेचे वर्चस्व नसून वाचकवर्गाला केंद्रस्थानी ठेवून प्रभावीपणे मांडणी करणार्या प्रत्येकासाठी हे व्यासपीठ खुले असेल, अशी स्पष्ट भूमिका मसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी मांडली. या विशेष संवादात त्यांनी साहित्य, राजकारण आणि विचारधारा याबाबतचे आपले मत स्पष्ट केले.
डिजिटल युगामुळे साहित्यविश्व झपाट्याने बदलत असताना ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ (ए.आय.)सारख्या तंत्रज्ञानामुळे सृजनशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची जाणीव व्यक्त करत, नव्या पिढीतील लेखकांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी मांडले. ‘तरुण भारत’शी झालेल्या विशेष संवादात त्यांनी निवडणुकीतील अनुभव, साहित्य क्षेत्रातील बदलती आव्हाने, तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि आगामी योजनांवर सविस्तर भाष्य केले.
दहा वर्षांनंतर निवडणूक लढवण्याचा अनुभव कसा होता?
दहा वर्षांनंतर पुन्हा निवडणूक लढवण्याचा अनुभव माझ्यासाठी अनपेक्षित पण महत्त्वाचा ठरला. खरे सांगायचे झाले, तर निवडणूक लढवण्याचा माझा सुरुवातीला अजिबात विचार नव्हता. मात्र, गेल्या दोन वर्षांत ‘साहित्य संघर्ष समिती’च्या माध्यमातून शशांक महाजन आणि धनंजय कुलकर्णी यांनी तत्कालीन कार्यकारिणीच्या कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवला. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासाठी त्यांनी लढा दिला. या पार्श्वभूमीवर ‘साहित्य संवर्धन आघाडी’ उभी करण्याचा विचार पुढे आला. 99 व्या साहित्य संमेलनात घडलेल्या काही घटनांनी अनेक समविचारी लोकांना एकत्र आणले. त्यातून एक स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. मी याआधी कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, त्यामुळे काही अनुभव होता. अध्यक्षपदासाठी माझे नाव सुचवले गेले, तेव्हा संघटनेच्या निर्णयाचा मान राखत मी होकार दिला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, हे स्पष्ट होते. कारण मागील दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या कार्यकारिणीची मतदारांवर मजबूत पकड होती. त्यांचे वैयक्तिक संबंध आणि अनुभव मोठा होता. दुसरीकडे आम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागली. मतदार याद्या अद्ययावत करणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, दूरध्वनी क्रमांक मिळवणे, निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे या सर्व गोष्टींसाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. अनेक मतदारांना निवडणुकीबद्दल फारशी माहिती नव्हती, तरीही ‘बदलाची गरज’ या भावनेने त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आम्हाला यश मिळाले.
रा. स्व. संघाचा स्वयंसेवक साहित्यिक होऊ शकत नाही का?
योगेश सोमण म्हणाले की, माझ्यावर संघाचे संस्कार झाले आहेत, पण त्यामुळे मी केवळ त्या विषयावरच लिहिले असे नाही. मी लिहिलेल्या 75 एकांकिकांमध्ये केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार नाहीत तर विविध विषय हाताळले आहेत. ना.ह. पालकरांनी डॉ. हेडगेवारांवर चरित्र लिहिले मग ना.ह. पालकर चरित्रकार नाहीत का? त्या चरित्राचा जर तिसर्या चौथ्या आवृतीपर्यंत जाण्याइतका खप होत असेल आणि मग तुम्ही म्हणत असाल की, संघाच्या शाखांवरच जातेय तर खप होणारच. पण खप होतोय म्हणजे वाचले जात आहे आणि त्या चरित्रामुळे माणसं संस्कारित होत आहेत हे महत्त्वाचे नाही का? आता संघाविषयी कोण लिहित आहे किंवा संघाचा माणूस लिहित आहे तर तो साहित्यिक होऊ शकत नाही का? असा प्रश्न योगश सोमण यांनी उपस्थित केला.
पूर्वीही संमेलनात राजकारण्यांचा सहभाग असे, मग आताच स्वायत्तेचा प्रश्न का?
मसापच्या नवीन कार्यकारणीवर राजकारणाच्या हस्तक्षेपाविषयी आणि मसापच्या स्वायत्ततेविषयी अनेक साहित्यिकांनी प्रश्न उपस्थित केला, यावर उत्तर देताना योगेश सोमण म्हणाले की, पूर्वीही साहित्य संमेलनांमध्ये राजकीय व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे, मात्र तेव्हा या बाबतीत आक्षेप घेतला गेला नाही. 98व्या संमेलनाला तुम्हाला शरद पवार चालतात. ते राजकारणी नाहीत का? ते मात्र साहित्यावर प्रेम करणारे असू शकतात तर देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, आशिष शेलार का साहित्यप्रेमी असू शकत नाहीत? का... ते तर फक्त एका झेंड्याचे आहेत आणि आम्ही फक्त त्यांचीच नाव घेतोय म्हणून तुम्ही मसापच्या स्वायत्तेवर प्रश्न करु शकत नाही. साहित्य परिषद ही स्वतंत्र संस्था आहे, पण शासनाशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. कारण विविध उपक्रमांसाठी शासकीय मदत आवश्यक असते. कोणतेही सरकार सत्तेत आले, तरी त्यांच्याशी संवाद साधणे आणि सहकार्य घेणे अपरिहार्य आहे, म्हणूनच राजकारण्यांच्या सहभागाकडे स्वायत्ततेला धोका म्हणून पाहणे योग्य नाही.
साहित्य परिषद आणि साहित्यविश्वासमोरील प्रमुख आव्हाने कोणती?
आजच्या काळात साहित्यविश्वासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे वाचकवर्गाचा बदलता स्वभाव. वाचन संपले आहे असे म्हणणे चुकीचे आहे; उलट वाचनाची माध्यमे बदलली आहेत. विशेषतः 15 ते 40 वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात वाचतात, पण ते डिजिटल माध्यमांकडे अधिक झुकले आहेत. त्यामुळे साहित्यिक, प्रकाशक आणि संस्थांनी या बदलाचा स्वीकार करून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. साहित्याचे डिजिटायझेशन करणे ही आजची गरज आहे. ई-बुक्स, ऑडिओबुक्स, सोशल मीडिया या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर झाला पाहिजे. सोशल मीडियावर अनेक तरुण उत्तम लेखन करत आहेत. त्यांचे विचार मांडण्याची शैली प्रभावी आहे. मात्र त्यांना पारंपरिक साहित्यवर्तुळात स्थान मिळत नाही. ही दरी कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. याच संदर्भात ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’सारख्या तंत्रज्ञानाचा विचार करणेही आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान सृजनशीलतेला पूर्णपणे मारक नाही, पण ते लेखकाला आळशी बनवू शकते. कारण ते उपलब्ध डेटावर आधारित मजकूर तयार करते. माणसाच्या लेखनात अनुभव, भावना, संवेदनशीलता आणि नव्या शब्दांची निर्मिती असते. मशीनकडे हे सगळे नैसर्गिकरित्या नसते. जर लेखकांनी स्वतः विचार करणे, प्रयोग करणे आणि नव्या शब्दरचना निर्माण करणे थांबवले, तर भविष्यात साहित्याची मौलिकता धोक्यात येऊ शकते. म्हणूनच तरुणांना स्वतः लिहिण्यास, विचार करण्यास आणि सर्जनशीलतेला वाव देण्यास प्रोत्साहित करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे.
भाषाविषयक शासकीय निर्णयांमध्ये परिषदेची भूमिका काय असेल?
भाषा हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय निर्णयावर प्रतिक्रिया देताना परिस्थितीचा सखोल विचार केला जाईल. जर एखादा निर्णय परिषदेच्या ध्येय-उद्दिष्टांशी सुसंगत असेल, तर त्याला पाठिंबा दिला जाईल. मात्र जर तो निर्णय मराठी भाषा आणि साहित्याच्या हिताला बाधा आणणारा असेल, तर त्या विरोधात ठाम भूमिका घेतली जाईल. साहित्य परिषद ही केवळ सांस्कृतिक संस्था नसून, ती भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करणारी संस्था आहे. त्यामुळे या विषयावर जबाबदारीने भूमिका घेणे आवश्यक आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाबाबत काय निर्णय होणार?
आम्ही अद्याप अधिकृतपणे पदभार स्वीकारलेला नाही. 1 एप्रिलनंतर कामकाज सुरू झाल्यावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाबाबत चर्चा केली जाईल. याआधी काही व्यक्तींना पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या प्रतिसादाचा विचार केला जाईल. त्याचबरोबर नवीन नावांचाही विचार केला जाईल. संमेलनाचे ठिकाण, निमंत्रणे आणि इतर घटक लक्षात घेऊन सर्वांगीण विचार केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्राथमिक उद्दिष्टे काय असतील?
पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे 100 वे आणि 101 वे साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित करणे. सध्या महामंडळाची जबाबदारी परिषदेकडे असल्याने ही मोठी जबाबदारी आहे. याशिवाय, राज्यभरातील 16,607 आजीव सभासदांपर्यंत परिषदेची प्रत्येक माहिती पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रत्येक उपक्रमात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. साहित्य परिषद ही केवळ काही शहरांपुरती मर्यादित न राहता, ती संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय व्हावी, हा आमचा प्रयत्न असेल.
कार्यकारिणीद्वारे कोणते सकारात्मक बदल अपेक्षित आहेत?
आमच्या कार्यकारिणीचा भर पारदर्शकता आणि आधुनिकीकरणावर असेल. सर्वप्रथम, आजीव सभासदांची यादी पूर्णपणे अद्ययावत करून तिचे डिजिटायझेशन केले जाईल. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जाईल. सध्या कॅश व्यवहारांवर अवलंबून असलेली प्रणाली बदलून ऑनलाईन व्यवहार, क्यूआर कोड यांचा वापर वाढवला जाईल. तसेच ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ पुन्हा छापील स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांचा समतोल साधत साहित्याचा प्रसार वाढवण्यावर भर दिला जाईल.
-प्रगती करंबेळकर
(पूर्वप्रसिद्धी : पुणे तरुण भारत)