मातीत रुजलेलं स्वप्न - अवधूत भिडेंचा प्रेरणादायी प्रवास

विवेक मराठी    27-Mar-2026
Total Views |
शाश्वत शेती हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून सामाजिक गरज आहे, असा अवधूत भिडे यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचा प्रवास म्हणजे निसर्गाशी जोडलेली जीवनशैली, संकटांवर मात करणारी जिद्द आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारी प्रेरणादायी कहाणी आहे. या सार्‍यामुळेच मातीत रुजलेलं हे स्वप्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 
Avadhoot Bhide
 
आजच्या वेगवान जीवनशैलीत सुरक्षित नोकरी, ठरलेला पगार आणि शहरी सुविधा यांनाच यशाचे मापदंड मानले जाते. मात्र काही व्यक्ती ठरावीक टप्प्यानंतर आयुष्याला नवी दिशा देतात. शहरातील सोयीसुविधा मागे सोडून निसर्गाशी नातं जोडण्याचा निर्णय घेतात. अशीच प्रेरणादायी वाट निवडली ती अवधूत भिडे यांनी.
 
 
शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर असलेले अवधूत भिडे यांनी सुरुवातीला दोन वर्षे मुंबईत रेल्वेमध्ये, त्यानंतर रिलायन्स पाताळगंगा, रायगडमध्ये 12 वर्ष आणि मग पुढची 10 वर्ष पुण्यात मल्टी नॅशनल कंपनीमध्ये नोकरी केली. परंतु 2013 मध्ये नोकरी सोडून शाश्वत जीवनशैलीसाठी स्वयंपूर्ण शेतीकडे ते वळले.
 
 
त्याचं झालं असं की, दरवर्षी फिरायला गणपतीपुळे आणि कुलदैवत व्याडेश्वर येथे जाण्याची त्यांची परंपरा होती. कोकणातील नयनरम्य परिसर, समुद्रकिनारा आणि शांत ग्रामीण जीवन त्यांना खूप भावायचं. मुळात ट्रेकिंगची आवड असल्यामुळे तरुणपणी त्यांनी अनेक किल्ले पालथे घातले होते. या सर्व अनुभवांनी ते ग्रामीण जीवनाकडे आकृष्ट झाले. या परिसरात फिरताना पती-पत्नी दोघांनाही वाटायचं की, गावात एक छोटंसं घर असावं, शेजारी देऊळ असावं आणि छोटी शेती असावी. या स्वप्नाच्या पार्श्वभूमीवर 2009 साली त्यांनी गुहागर येथे शेतजमीन घेतली. त्या वेळी ते पुण्यात नोकरी करत होते. पण जमीन घेऊन तिथे थोडाफार काम त्यांनी सुरू केलं.
 
 
Avadhoot Bhide
 अवधूत भिडे
 
त्यांनी आपल्या जागेत श्रीकृष्ण-रुक्मिणी मंदिर बांधले. 2010 मध्ये बोअरवेल खणली आणि झाडं लावायला सुरुवात केली. सुरुवातीला आंबा, काजू तसंच जैवविविधता जपणारी विविध झाडं त्यांनी लावली. झाडांच्या निवडीसाठी आयुर्वेदाच्या दृष्टीने वैद्य सुचित्रा कुलकर्णी आणि पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांचं मार्गदर्शन मिळालं. याच काळात त्यांनी भातशेती सुरू केली आणि देशी गायींच्या संवर्धनासाठी गायींची एक जोडी घेतली. या टप्प्यावरूनच त्यांच्या सेंद्रिय आणि आत्मनिर्भर शेतीची पायाभरणी झाली.
 
 
त्या परिसरात रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जात होती, त्यामुळे जमिनीची सुपीकता घटली होती. ही परिस्थिती पाहून अवधूत भिडे यांनी सुरुवातीपासूनच सेंद्रिय आणि शाश्वत शेती करण्याचा निर्धार केला. त्यांच्या मते नैसर्गिक शेती ही वातावरण, माती आणि पाणी या तीन मूलभूत घटकांवर आधारलेली असते. जमिनीची पूर्वस्थिती लक्षात घेऊन त्यांनी सर्वप्रथम मातीच्या पुनरुज्जीवनावर भर दिला.
 
 
जमिनीचं नियोजन करताना त्यांनी बहुपीक पद्धत स्वीकारली. आंबा, काजू, आवळा, जांभूळ, फणस यांसारखी उंच झाडं लावली आणि मधल्या जागेत कडधान्ये, कंदपिके व हंगामी पिके घेतली. या पद्धतीमुळे जमिनीचा पूर्ण उपयोग झाला, जैवविविधता वाढली आणि मातीची धूप कमी झाली. मोठ्या झाडांच्या सावलीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहिला.
 
 
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर सुरू केला. गाईचं शेण, पालापाचोळा आणि नैसर्गिक द्रावणांचा वापर करून त्यांनी मातीतील सूक्ष्मजीव वाढवले. जमिनीत गांडुळांची संख्या वाढणे ही सुपीकतेची महत्त्वाची खूण असल्याचं त्यांनी अनुभवातून जाणलं. अमृतपाणी या नैसर्गिक द्रावणाचा वापर करून त्यांनी माती अधिक सुपीक केली.
 

Avadhoot Bhide 
 
शेतीत मल्चिंग पद्धतीचा वापर करून त्यांनी झाडांची सुकलेली पानं आणि पालापाचोळा जमिनीवर टाकला. त्यामुळे ओलावा टिकून राहिला, पाण्याची गरज कमी झाली आणि जमिनीतील सूक्ष्मजीव वाढले. बहुपिक पद्धतीमुळे वर्षभर विविध पिकं घेणं शक्य झालं. फळझाडं, कडधान्य, भाजीपाला आणि हंगामी पिकं यामुळे शेती आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू लागली. गोपालनामुळे दूध, शेण आणि गोमूत्र यांचा शेतीत प्रभावी उपयोग झाला.
 
 
2017 साली दोघेही पती-पत्नी कायमस्वरूपी गावात राहायला आले. पत्नी सुप्रियालादेखील गावचं जीवन तितकंच आवडलं. शेणाने सारवण, रांगोळी, गोसेवा आणि विषमुक्त शेती या ग्रामीण जीवनशैलीचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला.
 
 
या प्रवासात मोठं आव्हान उभं राहिलं ते 2014मध्ये. अवधूत भिडे यांना अचानक पॅरालिसिसचा झटका आला. त्या वेळी ते गावातील घरात एकटेच होते. काही वर्ष उपचारात गेली आणि आजही त्यांच्या डाव्या हाताची बोटे पूर्णपणे कार्यरत नाहीत. तरीही या अडचणींवर मात करून त्यांनी शेतीचा ध्यास कायम ठेवला. कोकणातील साप, विंचू यांसारख्या नैसर्गिक आव्हानांचीही त्यांनी सवय करून घेतली आणि तिथले सहजीवन अधिक सोपं केलं.त्यांच्या कुटुंबाचा आधारही महत्त्वाचा ठरला. त्यांचा मुलगा प्रद्युम्न योगथेरपीमध्ये एम.एससी. करून वयाच्या 24व्या वर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
 
 
अवधूत भिडे यांचे मत आहे की, योग्य वयात काही आर्थिक साठा करून गावाकडे वळल्यास उत्तम आरोग्य लाभतं. एखादं पीक आलं नाही तरी दुसरं पीक आधार देतं. पन्नाशीनंतर त्यांनी भक्तिमार्गाकडे वळणंही पसंत केलं आहे. मंदिर, गोसेवा आणि शेती यामुळे त्यांची सेकंड इनिंग आनंदात सुरू आहे.
 
 
एक महत्त्वाचा विचार ते सर्वांना सांगू इच्छितात. ते म्हणतात की, भविष्यातील मोठं युद्ध अन्न आणि पाण्यासाठी होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. शाश्वत शेती हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून सामाजिक गरज आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. अवधूत भिडे यांचा प्रवास म्हणजे निसर्गाशी जोडलेली जीवनशैली, संकटांवर मात करणारी जिद्द आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारी प्रेरणादायी कहाणी आहे. मातीत रुजलेलं हे स्वप्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.