जीवनपथावरील मार्गदर्शक संघ नावाची समई

विवेक मराठी    28-Mar-2026
Total Views |
@मीनाक्षी आंबेकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला सौम्य प्रकाश देणार्‍या पण सतत तेवणार्‍या समईसारखा वाटतो. एरवी झगमगत्या कॉर्पोरेट विश्वात वावरताना आपले पाय जमिनीवर कसे राहतील याचं मार्गदर्शन संघाची समईच आम्हाला करत असते. संघाने शतक पूर्ण केलं असलं तरी माझी आणि संघाची ओळख 12 वर्षांचीच आहे. पण त्या 12 वर्षांत माझं कुटुंब सर्वार्थाने खूप समृद्ध झालं आहे. म्हणूनच माझं घर संघाचं झालं याचा मला पूर्ण अभिमान आहे.
rss
 
संघस्थापनेला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली असली तरी माझा आणि संघाचा जवळून परिचय होऊन जेमतेम एक तप झालं आहे. माझ्या माहेरी सनातनी वातावरण असलं तरी घर संघाचं नव्हतं. माझ्या लहानपणी मी संघाचं फक्त नाव ऐकलं होतं. माझे वडील, मामा वगैरे मंडळी त्यांच्या लहानपणी कधीतरी संघात गेलेले होते. अगदी 2012 सालापर्यंत मी संघाबाबतीत पूर्ण अनभिज्ञ होते.
संघाची आणि माझी ओळख झाली ती साधारण 2013-2014 साली. ऑफिसमधून येताना घराजवळच्या मैदानात लागणारी शाखा मला रोज दिसायची. मैदानावर खेळणारी मुलं बघून एक दिवस मी आमच्या मोठ्या मुलाला, मल्हारला शाखेत घेऊन गेले. पहिल्या दिवशी तिथेच तासभर उभी होते. कारण त्या काळात मल्हार खूप बुजरा होता. आज तोच मल्हार विजयादशमीच्या संचलनात आनक वाजवतो. त्यावेळेचा तो बुजरा, लाजाळू मल्हार ते आजचा बडबड्या, बिनधास्त मल्हार हा त्याचा कायापालट फक्त त्या संघशाखेची देणगी आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मल्हारच्या निमित्ताने संघाचं दार आमच्या कुटुंबासाठी उघडलं गेलं आणि आमचं घर संघाचं झालं...
 
 
त्यावेळी आम्ही दोघे पती-पत्नी फक्त घर आणि नोकरी या चक्राला बांधले गेलो होतो. त्याबाहेरचं जग आम्हांला ठाऊकच नव्हतं. आज मात्र माझे पती-हर्षल, संघकार्यात पूर्णपणे कार्यरत आहेत. मल्हारच्या शाखेच्या निमित्ताने हर्षलची काही स्वयंसेवकांशी ओळख झाली, वाढली आणि पुढे त्या स्वयंसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हर्षल संघकार्यात पूर्णपणे ओढले गेले. हे सगळं इतकं अचानक आणि वेगात घडलंय की आता मागे वळून पाहताना हे नक्की कधी सुरू झालं हे पण मला आठवत नाही. त्यामुळे संघ स्वीकारण्यात काही अडचणी आल्याचंही मला आठवत नाही आणि त्या सोडवण्याचा प्रश्नही कधी उद्भवला नाही. संघाने आमचा आणि आम्ही संघाचा अगदी सहज स्वीकार केला आहे.
 
 
मला स्वतःला संघाने काय दिलं?...तर मी आणि माझं कुटुंब या संकुचित भावनेतून मी बाहेर पडले. समाजाचे तुम्ही काहीतरी देणं लागता हा व्यापक दृष्टीकोन संघाने दिला. कारण प्रत्येक आपत्तीमध्ये मदत करणार्‍या पहिल्या काही हातांमध्ये संघ अग्रस्थानी असतो हा अनुभव मी सुरुवातीच्या काही दिवसातच घेतला. मग हळूहळू उलगडलं की संघ जिथे काम करत नाही असं एकही सामाजिक क्षेत्र नसावं. संघाशी संलग्न असणार्‍या असंख्य संस्थांची फक्त यादी बघूनच मी आजही अवाक् होते. 12 वर्षर्ं झाली तरी मी संघकार्याच्या हिमनगाचं पाण्यावरचं टोकही अजून पूर्ण पाहिलं नाहीये, इतकं संघकार्य अवाढव्य आहे. माझं कुटुंब त्या हिमनगाचाच एक अतिशय छोटासा तुकडा आहे हे मात्र खूप आनंददायी आहे.
 
संघ महिलांसाठी काहीच करत नाही, असा आरोप संघावर केला जातो. पण मला वाटतं, एकदा तुमचं घर संघाचं झालं की कुटुंबातल्या प्रत्येकासाठीच संघ काहीतरी करतोच. संघामुळेच आम्ही इतर अनेक समविचारी कुटुंबांच्या संपर्कात आलो. संघाचा दुवा नसता तर कदाचित आज आमचे जितक्या कुटुंबांशी मैत्र जोडलं गेलंय ते निश्चितच झालं नसतं. माझ्यासारख्या टोकाच्या इन्ट्रोव्हर्ट स्त्रीला अनेक जवळच्या मैत्रिणी केवळ संघसंपर्कातून भेटल्या आहेत. मुलांना स्वयंशिस्त, नियोजन, सांघिक कार्य, नेतृत्व, समरसता इत्यादी धडे शाखेतून सहज मिळतात आणि ते त्यांना त्यांच्या इतर कार्यांमध्ये उपयोगी पडतात. अशा रितीने संघ तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक विकासासाठी मदतच करतो हा माझा अनुभव आहे.
 
 
काही ना काही निमित्ताने संघांतील अत्यंत अनुभवी, बुद्धिमान आणि तरीही साध्या मंडळींचा आम्हाला अल्प का होईना पण सहवास लाभतो. त्यामध्ये लौकिकार्थाने मोठा असणारा कोणीही माणूस असू शकतो. संघात मात्र कोणीही मोठे-छोटे नसतं, कोणी गुरू-शिष्य नसतात किंवा कोणतेही पद नसतं, असतं ते केवळ दायित्व. आणि म्हणूनच कोणतंही दायित्व असलेला स्वयंसेवक तुमच्याशी अगदी घरगुती गप्पा मारू शकतो. अशी माणसं संघामुळे भेटतात आणि मग तुमचं घर संघाचं झाल्याचा आनंद वाढत जातो.
 
 
स्वयंसेवकाच्या हातात बांधलेली छोटीशी गोंड्याची राखी, भारतभर त्याची ओळख सांगायला पुरेशी असते हे तर मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. (केवळ गंमत म्हणून सांगायचं तर हर्षलच्या हातावर बांधलेल्या त्या गोंड्याच्या राखीमुळे मला तामिळनाडूतल्या एका स्वयंसेवकाच्या साडी विक्रीच्या दुकानात खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळालं आहे.)
 
 
संघ मला सौम्य प्रकाश देणार्‍या पण सतत तेवणार्‍या समईसारखा वाटतो. एरवी झगमगत्या कॉर्पोरेट विश्वात वावरताना आपले पाय जमिनीवर कसे राहतील याचं मार्गदर्शन संघाची समईच आम्हाला करत असते. संघाने शतक पूर्ण केलं असलं तरी माझी आणि संघाची ओळख 12 वर्षांचीच आहे. पण त्या 12 वर्षांत माझं कुटुंब सर्वार्थाने खूप समृद्ध झालं आहे. म्हणूनच माझं घर संघाचं झालं याचा मला पूर्ण अभिमान आहे.