‘जयोऽस्तुते’ संघविचारांचा मागोवा

विवेक मराठी    28-Mar-2026   
Total Views |
संघ शताब्दीनिमित्त ‘जयोऽस्तुते’ हे अवधूत वाघ लिखित पुस्तक शारदा प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक संघकार्याचा आढावा घेणार्‍या अनेक पुस्तकांपैकी एक असले तरी या पुस्तकाचेे संदर्भमूल्य तात्कालिक नाही. ज्यांना संघ समजून घेण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल एवढी क्षमता या पुस्तकाची आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू असताना संघाविषयी विविध प्रकारचे लेखन प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. टीकात्मक, तटस्थ आणि स्वानुभव अशा तीन दृष्टीकोनातून हे लिखाण होत आहे. अशा लिखाणाच्या मांदियाळीमध्ये दाखल झालेले नवे पुस्तक म्हणजे अवधूत वाघ यांनी लिहिलेले ‘जयोऽस्तुते’ हे पुस्तक होय.
पुस्तकाचे नाव - जयोऽस्तुते
लेखक - अवधूत वाघ
प्रकाशक - शारदा प्रकाशन
पृष्ठे - 223 र्ीं देणगी मूल्य - 300
या पुस्तकात अवधूत वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या कारकिर्दीचा धांडोळा घेतला आहे. अवधूत वाघ हे भाजपाचे प्रवक्ते म्हणून तसेच वृत्तपत्र लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी या पुस्तकाचे लेखन करताना ’स्वानुभव’ ही आधारशीला मानली आहे. या पुस्तकास ज्येेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. आपल्या प्रस्तावनेत भाऊ तोरसेकर म्हणतात, ‘हे पुस्तक नव्या पिढीसाठी मार्गदर्शक नव्हे तर दिशादर्शक ठरेल असेच वाटते. कारण यातील मजकूर संघाची थोरवी गाणारा किंवा संघात जाण्यासाठी प्रोत्साहित करणारा नाही तर संघाचे मूलभूत स्वरूप, त्याची आजची व्याप्ती, समाजजीवनातील संघाच्या विविध स्वरूपातील, संस्था व त्यांची उपयुक्तता कार्य यांची तोंडओळख यातून होऊ शकते. किमान संघाविषयी जे अपप्रचार चालतात, त्याला बळी पडण्यापासून वाचकाला हे पुस्तक वाचवू शकते.’ भाऊ तोरसेकर यांनी पुस्तकाचे सार थोडक्या शब्दात मांडले असून लेखक अवधूत वाघ आपल्या मनोगतात म्हणतात, ‘लहानपणी संघाच्या शाखेत झालेले संघ संस्कार हीच आयुष्यातील मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. या देणगीची अल्पबुद्धीने परतफेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे.’ अवधूत वाघ हे संघ स्वयंसेवक असल्याने जीवनाच्या जडणघडणीच्या काळात नियमित संघ शाखेत जाताना मनावर जो संघाचा ठसा उमटवला तोच अनुभूतीचा शब्दठसा या पुस्तकात उमटला आहे.
 
 
अवधूत वाघ यांनी लिहिलेल्या जयोस्तुते या पुस्तकाची आशय मांडणी सुरेख असून छोट्या छोट्या लेखांची शृंखला मांडत अवधूत वाघ यांनी आपल्या मनातील संघानुभावाची रांगोळी शब्दातून रेखाटली आहे. एकूण एक्कावन्न लेख या पुस्तकात समाविष्ट असून विविध विषयांची हाताळणी त्यांनी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी माहिती नसलेल्या व्यक्तीस जे प्रश्न पडतात, त्यांना साधार उत्तर देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. पुस्तकाच्या लेखांची विभागणी 1) कार्यपद्धती 2) नेतृत्व 3) विचार 4) आव्हाने 5) विस्तार 6) परिणाम, अशा सहा विभागांत करता येते. संघाची शाखा, संघाचा घोष, संघ गीते, बौद्धिक, कार्यकर्ता विकास इत्यादी गोष्टींचे आकलन शाखेबाहेरच्या वाचकांना होईल अशा शब्दांत केले आहे. तर डॉ. हेडगेवार ते डॉ. भागवत या सरसंघचालकांच्या वैचारिक नेतृत्वाचा मागोवा घेताना काळानुरूप दिशादर्शक अधोरेखित केले आहे. सहा सरसंघचालकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचे सार या पुस्तकात वाचता येते. त्याचबरोबर गांधीहत्या व आणीबाणीच्या अग्निदिव्यातून तावूनसुलाखून निघालेल्या संघाविषयी अवधूत वाघ यांनी भरभरून लिहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात संघ विचारांचा वाढता प्रभाव आणि संघटन समजून घेणे आवश्यक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, राष्ट्र सेविका समिती इत्यादी संघटना समजून घेणे आवश्यक आहे. या पुस्तकात या संस्थांची आवश्यकता, स्थापना व विस्तार इत्यादी गोष्टींचा उल्लेख करून अवधूत वाघ यांनी संघाचे समाजव्यापी स्वरूप मांडले आहे. त्याचप्रमाणे संघकामाचा संघटित परिणाम म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीराम मंदिर आंदोलनाविषयी विविध घटनाक्रमांसह अवधूत वाघ यांनी लेखन करून संघाची शक्ती अधोरेखित केली आहे. राममंदिर आंदोलनासंबंधी सात लेख लिहिले आहेत. त्याचप्रमाणे संघाचे विश्व दर्शनही घडवले आहे.
 
 
अवधूत वाघ यांनी या पुस्तकाचे लेखन संघ शताब्दी निमित्ताने केले असले तरी त्याचे संदर्भ मूल्य तात्कालिक नाही. ज्यांना संघ समजून घेण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना कायम उपयुक्त ठरेल अशी क्षमता या पुस्तकात आहे. असे हे सार्वकालीक उपयुक्तता असलेले पुस्तक संघ शताब्दी वर्षांत उपलब्ध करून दिले यासाठी लेखक अवधूत वाघ व शारदा प्रकाशन यांचे विशेष आभार मानले पाहिजेत.
 
 
पुस्तक नोंदणीसाठी संपर्क
अवधूत वाघ - 9892270052

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001