अफगाणिस्तान - पाकिस्तान - अनेक पदरी संघर्ष

विवेक मराठी    05-Mar-2026   
Total Views |
अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष हा केवळ सीमावाद नाही; तो आर्थिक, जातीय, धार्मिक आणि राजकीय घटकांनी विणलेला गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पाकिस्तानने आर्थिक संकट झाकण्यासाठी किंवा रणनीतिक लाभासाठी तणाव वाढवला, तर तो दीर्घकालीन दृष्टीने आत्मघातकी ठरू शकतो. आयएसकेपीसारख्या संघटनांचा वापर करून तालिबान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण प्रदेशात अराजकता पसरू शकते. दक्षिण आशियाला आज युद्ध नव्हे, तर स्थैर्य, सहकार्य आणि विकासाची गरज आहे.

pakistan
 
दक्षिण आशियातील राजकारणात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचे संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत. भौगोलिक जवळीक, ऐतिहासिक वारसा, धार्मिक-सांस्कृतिक नाती आणि सीमावाद या सर्व घटकांमुळे या दोन देशांमध्ये विश्वासापेक्षा संशयाचे वातावरण अधिक दिसते. अलीकडच्या काळात या तणावाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले असून सीमारेषेवरील चकमकी, आरोप-प्रत्यारोप आणि परस्परांवरील दहशतवादाच्या आरोपांमुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षामागील कारणे, पाकिस्तानची अंतर्गत स्थिती, अफगाणिस्तानातील सत्ता समीकरणे आणि भविष्यातील परिणाम यांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे.
 
 
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ड्युरंड रेषेचा वाद
 
अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंधाचे आणि संघर्षाचे मूळ ड्युरंड रेषेत आहे. ब्रिटिश काळात आखलेली ही सीमारेषा अफगाणिस्तानने कधीच अधिकृतपणे मान्य केलेली नाही. पाकिस्तानने मात्र ती आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून स्वीकारली आहे. या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना पश्तून समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. त्यामुळे पश्तूनिस्तान या संकल्पनेभोवती अनेकदा राजकीय भावना पेट घेतात. अफगाणिस्तानातील सत्ताधार्‍यांनी वेळोवेळी पाकिस्तानवर पश्तून प्रदेशांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे, तर पाकिस्तान हा अफगाणिस्तान आपल्या सीमावर्ती भागात अस्थिरता पसरवत असल्याचा आरोप करत असतो.
 
 
पाकिस्तानची आर्थिक घसरण आणि बाह्य तणाव
 
सध्याच्या घडीला पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर संकटात आहे. चलनमूल्य घसरलेले, महागाई प्रचंड वाढलेली, परकीय चलनसाठा कमी झालेला आणि कर्जाचे ओझे वाढलेले अशा स्थितीत सरकारवर प्रचंड दबाव आहे. बेरोजगारी आणि महागाईमुळे जनतेत असंतोष वाढत आहे. अशा वेळी जबाबदार नेतृत्वाने आर्थिक सुधारणांवर भर द्यायला हवा; परंतु पाकिस्तानच्या सत्ताधार्‍यांनी वारंवार बाह्य शत्रूचे चित्र रंगवून अंतर्गत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची पद्धत अवलंबली आहे.
 
 
भारताविरुद्ध तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न पहलगाम हल्ल्यानंतर फसल्याने आता पाकिस्तानने अफगाणिस्तानकडे लक्ष वळवले आहे. अफगाणिस्तानात राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकट असल्याने तिथे तणाव वाढवून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधता येईल, आणि आम्हीही संकटात आहोत असे सांगून आर्थिक मदतीसाठी दार ठोठावता येईल, अशी पाकिस्तानची रणनीती असू शकते. परंतु हा डाव धोकादायक आहे. कारण युद्ध किंवा तणाव हा आर्थिक पुनरुत्थानाचा मार्ग नसून, उलट संकट अधिक गडद करणारा ठरू शकतो.
 
तालिबान सत्तेची पुनर्स्थापना आणि बदललेली समीकरणे
 
अफगाणिस्तानात 2021मध्ये तालिबानने पुन्हा सत्ता हस्तगत केल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. पाकिस्तानने पूर्वी तालिबानला पाठिंबा दिल्याचा आरोप होत असला, तरी सत्तेत आल्यानंतर तालिबानने पाकिस्तानच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या कारवायांबाबत पाकिस्तान अस्वस्थ आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानातील भूमीचा वापर करून दहशतवादी गट पाकिस्तानात हल्ले करतात.
 
 
दुसरीकडे, अफगाण तालिबानचे मत असे आहे की, पाकिस्तानने अनेक वर्षे अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केला आणि अस्थिरता वाढवली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये परस्पर संशय अधिक गडद झाला आहे.
 
 
pakistan
 
आयएसकेपीची भूमिका आणि पाकिस्तानची रणनीती
 
या संपूर्ण समीकरणात Islamic State Khorasan Province (आयएसकेपी) ही संघटना महत्त्वाची ठरते. ही संघटना इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीवर आधारित असून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सक्रिय आहे. तालिबान आणि आयएसकेपी यांच्यात वैचारिक व सत्तास्पर्धा आहे. तालिबान पश्तूनबहुल नेतृत्वाखाली चालते, तर आयएसकेपी अफगाणिस्तानातील विविध जातीय गटांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
 
 
पाकिस्तानमध्ये अशी भीती व्यक्त केली जाते की, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये पश्तून वर्चस्व असल्याने हजारा, ताजिक, उझबेक असे इतर जातीय गट असंतुष्ट आहेत. पाकिस्तानला असे वाटते की, या असंतोषाचा फायदा घेऊन तालिबान सरकारला कमकुवत करता येईल. आयएसकेपीला अप्रत्यक्षरित्या बळ देऊन किंवा अल्पसंख्याक गटांना प्रोत्साहन देऊन तालिबानविरुद्ध आंतरिक बंड उभे राहील. मात्र ही रणनीती अत्यंत धोकादायक ठरू शकते. कारण दहशतवादी संघटनांचा वापर रणनीतिक साधन म्हणून करण्याचा इतिहास शेवटी स्वतःच्या सुरक्षिततेवर उलटतो. पाकिस्तानने ही याआधीही अनुभवले असून त्यातून धडा मात्र घेतलेला नाही. त्यामुळे अशा संघटनांना बळ देणे म्हणजे स्वतःच्या घरात आग लावण्यासारखे आहे.
 

pakistan 
 
जातीय राजकारण आणि अस्थिरतेची शक्यता
 
अफगाणिस्तान बहुजातीय देश आहे. पश्तून, ताजिक, हजारा, उझबेक आणि इतर गटांमध्ये ऐतिहासिक मतभेद आहेत. परंतु बाह्य हस्तक्षेप झाला की, हे गट अनेकदा एकत्र येतात. जर पाकिस्तानने तालिबानविरुद्ध अल्पसंख्याक गटांना उभे करण्याचा प्रयत्न केला, तर उलट अफगाण समाजात सामाईक शत्रूची भावना निर्माण होऊ शकते.
 
 
त्याचबरोबर, पाकिस्तानातील पश्तून लोकसंख्या देखील मोठी आहे. अफगाणिस्तानातील संघर्षाचा परिणाम पाकिस्तानातील पश्तून भागांवर होऊ शकतो. पाकिस्तानातील इमरान खान प्रकरणानंतर पठाण समाजात असंतोष वाढल्याचे दिसते.
 
 
पाकिस्तानातील पठाण आणि अफगाणिस्तानातील पश्तून यांचे वांशिक नाते घट्ट असल्याने ही नाराजी केवळ राजकीय न राहता सामाजिक स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सत्तासंतुलनावर आणि प्रादेशिक स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 

pakistan 
 
आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका
 
आजचा आंतरराष्ट्रीय समुदाय पूर्वीसारखा निष्क्रीय नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशांवर आर्थिक निर्बंध, राजनैतिक दबाव आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर टीका यांचा वापर केला जातो. पाकिस्तानने जर तणाव वाढवून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, तर उलट त्याच्यावर अधिक कठोर अटी लादल्या जाऊ शकतात.
 
 
अफगाणिस्तानातही मानवाधिकार, महिला शिक्षण, आणि समावेशक शासन याबाबत आंतरराष्ट्रीय दबाव आहे. अशा वेळी बाह्य युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास अफगाणिस्तानातील सामान्य जनतेचे हाल अधिक वाढतील.
 
अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष हा केवळ सीमावाद नाही; तो आर्थिक, जातीय, धार्मिक आणि राजकीय घटकांनी विणलेला गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पाकिस्तानने आर्थिक संकट झाकण्यासाठी किंवा रणनीतिक लाभासाठी तणाव वाढवला, तर तो दीर्घकालीन दृष्टीने आत्मघातकी ठरू शकतो. आयएसकेपीसारख्या संघटनांचा वापर करून तालिबान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण प्रदेशात अराजकता पसरू शकते. दक्षिण आशियाला आज युद्ध नव्हे, तर स्थैर्य, सहकार्य आणि विकासाची गरज आहे. संवाद, परस्पर आदर आणि दहशतवादाविरोधी ठाम भूमिका या तत्त्वांवरच या प्रदेशाचे भविष्य सुरक्षित राहू शकते. अन्यथा, इतिहासाची पुनरावृत्ती होऊन सामान्य नागरिकांनाच त्याची सर्वाधिक किंमत मोजावी लागेल.

शांभवी थिटे

सध्या जेएनयू येथे आंतराष्ट्रीय संबंध या विषयात पीएचडी करत आहेत. मागील पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणावर अध्ययन करत असून मध्य आशिया हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषक म्हणून कॉर्पोरेटमध्ये अनुभव. आशियाई राजकारणा सोबतच इतिहास अभ्यासाची विशेष आवड.