@किरण मुठाळ
भारताकडे जर पुण्यभूमी म्हणून पाहिलं, तर त्याची भूमिका अधिक स्पष्ट दिसते. जगभर विखुरलेल्या हिंदूंसाठी हिंदू परंपरांचे हे एक स्थिर केंद्र आहे. धर्माची प्रमुख तीर्थस्थळं, ग्रंथपरंपरा आणि यात्रांची परंपरा येथे आहे. जो कधी भारतात राहिलेला नाही, त्यालाही या केंद्राचं अस्तित्व महत्त्वाचं वाटतं. कारण त्यातून जोडलेपणाची जाणीव निर्माण होते. ही सांस्कृतिक रचना खोलवर रूजलेली असल्याने आजही टिकून आहे.
अलीकडे नेदरलँड्समध्ये माझी सुरिनाममधील एका हिंदुस्थानी महिलेशी भेट झाली. तिचे पूर्वज सुमारे दीडशे वर्षांपूर्वी भारतातून तिथे गेले होते. पाच-सहा पिढ्या उलटल्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीही भारतात परतलेले नाही. भारतातील आजच्या घडामोडींशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही. मी तिला विचारलं,‘आज भारत म्हणजे तुमच्यासाठी काय आहे?’ ती म्हणाली,‘वहाँ पे गंगाजी है...’ गंगा तिच्यासाठी केवळ नदी नव्हती; ती हृदयात जपलेली एक चिरंतन स्मृती होती.
*****
काही महिन्यांनी स्वित्झर्लंडमध्ये राहणार्या मूळच्या श्रीलंकेतील एका हिंदू व्यक्तीशी ओळख झाली. तो यादवी युद्धाच्या काळात श्रीलंकेतून बाहेर पडला आणि युरोपमध्ये स्थायिक झाला. त्याने भारतात कधी वास्तव्य केलेलं नाही. पण आईच्या निधनानंतर तो दरवर्षी काशीला जाऊन श्राद्ध करू लागला. मी विचारलं,‘तुमचा भारताशी संबंध काय?’ त्याचं उत्तर साधं होतं,‘आम्हीही हिंदू आहोत. भारतभूमी आमच्यासाठीही पवित्र आहे.’
*****
ही दोन उत्तरं साधी होती. पण त्यांनी एक विचार समोर आणला. भारताशी असलेला हा सांस्कृतिक संबंध काळ आणि अंतर ओलांडून कसा टिकून राहतो?
अंतर आणि सांस्कृतिक स्मृती
या दोन्ही अनुभवांकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. भौगोलिक अंतर वाढलं तरी सांस्कृतिक स्मृती सहज पुसली जात नाही. पिढ्या बदलल्या, परिस्थिती बदलली; तरी ती परंपरा थांबली नाही. सुरिनामचे हिंदू अनेक पिढ्यांपासून भारतापासून दूर आहेत. प्रत्यक्ष संबंध संपले आहेत. तरी काही धार्मिक विधी, काही प्रतीकं आणि काही स्मृती त्यांनी जपून ठेवल्या आहेत. कारण धर्माची खोलवर रूजलेली मुळे केवळ भौगोलिक स्थानावर अवलंबून नसतात. ती आचरणात आणि स्मरणात टिकतात. ही केवळ श्रद्धा नाही; ही पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवलेली सांस्कृतिक परंपरा आहे. श्रीलंकेतील हिंदूंची घडण वेगळी आहे. त्यांची स्वत:ची मंदिरे आणि परंपरा आहेत. तरी त्यांच्या धार्मिक नकाशात काशी आणि गंगा यांना अढळ स्थान आहे. स्थानिक श्रद्धा आणि त्याहून व्यापक असलेले पवित्र केंद्र एकत्र राहू शकतात. म्हणूनच देश बदलला तरी तो सांस्कृतिक संदर्भ टिकून राहतो.
जन्मभूमी, कर्मभूमी आणि पुण्यभूमी
जन्मभूमी म्हणजे जिथे आपण जन्मतो. कर्मभूमी म्हणजे जिथे आपण आयुष्य उभं करतो, काम करतो आणि कुटुंब वाढवतो. परदेशात राहणार्या अनेक हिंदुंसाठी ते राहतात ती स्थानिक भूमीच त्यांची मुख्य सामाजिक जागा असते. पण पुण्यभूमीचा अर्थ वेगळा आहे. ती केवळ तीर्थस्थळांची भूमी नसून धर्माचा मुख्य आधार असलेली भूमी आहे. जिथे धर्माची पाळेमुळे आहेत आणि जिथून त्याच्या विचाराला, जडणघडणीला मूलभूत दिशा मिळते. त्या अर्थाने भारत देश हिंदू परंपरेच्या मध्यवर्ती पवित्र स्थानी राहतो.
परदेशात राहणारा हिंदू एकाच वेळी वेगवेगळ्या भूमींशी जोडलेला असू शकतो. त्याची जन्मभूमी वेगळी असू शकते आणि कर्मभूमी त्याहून वेगळी असू शकते. पण पुण्यभूमी म्हणून त्याच्या मनात असलेले भारताचे स्थान अढळ असते. यात संघर्ष निर्माण होत नाही. हिंदू विचार सर्वसमावेशक असल्याने तो आचारात जपण्यासाठी कर्मभूमी सोडण्याची अट नसते. सर्वे भवन्तु सुखिनः आणि वसुधैव कुटुंबकम् ही विचारतत्त्वं अनेक स्तरांवरील जोड स्वीकारतात. त्यामुळेच दुसर्या समाजांविषयी वैरभाव तयार होत नाही.
भारत - एक सांस्कृतिक केंद्र
भारताकडे जर पुण्यभूमी म्हणून पाहिलं, तर त्याची भूमिका अधिक स्पष्ट दिसते. जगभर विखुरलेल्या हिंदुंसाठी हिंदू परंपरांचे हे एक स्थिर केंद्र आहे. धर्माची प्रमुख तीर्थस्थळं, ग्रंथपरंपरा आणि यात्रांची परंपरा येथे आहे. जो कधी भारतात राहिलेला नाही, त्यालाही या केंद्राचं अस्तित्व महत्त्वाचं वाटतं. कारण त्यातून जोडलेपणाची जाणीव निर्माण होते. ही सांस्कृतिक रचना खोलवर रूजलेली असल्याने आजही टिकून आहे.
भारत ही अतिशय प्राचीन संस्कृती आहे. तिच्यावर अनेक आक्रमणं झाली. त्यातून भौगोलिक बदल झाले. बाह्य दबाव आले. तरी तिची मूळ ओळख संपली नाही. परदेशात राहणार्या हिंदुंसाठी ही जाणीव महत्त्वाची आहे. ही सांस्कृतिक विचारांची परंपरा बलशाली आहे. तिने आधीही संकटं झेलली आहेत. मात्र केंद्र स्थिर असल्यामुळे जगभर विखुरलेला समाजही आतून जोडलेला राहतो. याच कारणामुळे भारत ही फक्त राष्ट्र-राज्याची संकल्पना नाही तर तो अविरत वाहणारा एक सांस्कृतिक प्रवाहही आहे, जो समाजाबरोबर स्थलांतरित होतो आणि थांबत नाही.
पासपोर्ट आणि अंतराच्या पलीकडे
या दोनही भेटी साध्या होत्या, पण त्यातून विचारांचा एक स्पष्ट नमुना दिसतो. सुरिनाममध्ये पिढ्यानपिढ्या गंगेची स्मृती जपली जाते आणि श्रीलंकेतील हिंदू काशीला जाऊन विधी करतो. ही केवळ वैयक्तिक भावना नाही. यात एक व्यापक सांस्कृतिक रचना दिसते. भारताशी असलेला संबंध नागरिकत्वावर किंवा वंशपरंपरेवर आधारलेला नसतो. तो सामायिक पवित्र स्मृतीवर आधारलेला असतो.
2015 साली दुबई येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की,‘भारत पासपोर्टचा रंग पाहत नाही. रक्ताचा रंग महत्त्वाचा आहे.’ त्या विधानाचा राजकीय संदर्भ वेगळा असू शकतो. पण त्यात एक व्यापक अर्थ आहे. जगभरातील हिंदुंसाठी भारताशी असलेला संबंध कागदपत्रांवर ठरत नाही. तो अर्थपूर्ण धार्मिक विधी, स्मृती आणि पवित्र स्थळांमधून व्यक्त होतो.
जोपर्यंत गंगा पवित्र मानली जाते आणि काशीचे अनन्यसाधारण महत्त्व जगभरातल्या हिंदुंसाठी टिकून आहे, तोपर्यंत हा संदर्भ टिकून राहील. ही केवळ नकाशावरची ठिकाणं नाहीत. ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेचा भाग आहेत. भारत केवळ आधुनिक भारताच्या राजकीय सीमांमध्ये मर्यादित नाही; तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेचा भरभक्कम आधार आहे.