@ प्रमोद नरहर मुळे
कै. भीमराव त्र्यंबक गारे काका यांनी गेल्या 20 वर्षांपासून पाडून दिलेल्या प्रथेप्रमाणे या वर्षीची प्रकल्प दर्शन सहल ग्रामविकास नाशिक शहराचे प्रमुख कार्यकर्ते योगिनीताई चंद्रात्रे, स्मिताताई जोशी, भावना सोनवणे व अशोक गवळी यांनी रविवार, 25 व सोमवार, 26 जानेवारी रोजी आयोजित केली होती. एकूण आम्ही 43 कार्यकर्ते सहलीत सहभागी होतो. यात 20 बंधू व 23 भगिनी होत्या.
आम्ही सकाळी 7 वाजता नाशिक रोड, बिटको पॉईंट येथून निघालो. वाटेत कार्यकर्त्यांना सोबत घेत आम्ही सकाळी नऊ वाजता नाशिकच्या बाहेर पडलो. देवळा, सटाणा या मार्गे प्रवास करत सटाण्याजवळील मुल्हेर येथे उद्धव महाराज यांच्या समाधीचे दर्शन दुपारी 12.30 वाजता घेतले. येथे श्रीनारायण व श्रीलक्ष्मी यांच्या विलोभनीय मूर्ती व मधोमध उद्धवराज महाराजांची मूर्ती आहे. नारायणाच्या मूर्तीच्या आजुबाजूला सुंदर प्रभावळ आहे.
येथील आख्यायिका अशी आहे की, सिंहस्थ काळात उद्धव महाराज यांच्या समाधीवरून पाणी येते आणि गंगा उद्धव महाराजांना स्नान घालते. येथे श्री नाना महाराज तराणेकर (इंदौर) यांना कृष्णसखा उद्धवाचे प्रत्यक्ष दर्शन झाले असे म्हटले जाते.
पहले तो हरि उद्धव थे, अब तो उद्धवदास
संतन की सेवा करें, जो पाये मुल्हेरवास
उद्धव महाराजांच्या समाधी मंदिराजवळ एक पुरातन बकुळीचे झाड आहे, या झाडाबाबतदेखील एक आख्यायिका आहे, ती अशी, कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता या बकुळीच्या झाडाच्या फुलातून साखर पडते तसेच येथील पुरातन रासक्रिडा पाहण्यासाठी परराज्यातूनही लोक कोजागिरी पौर्णिमेला येथे येतात. कोयना व कृष्णा नदीच्या काठी शिवकालीन 12 मारुती मंदिरे बांधली गेली आहेत, कारण तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याला युद्धाचे पुढील आराखडे तयार करण्यासाठी एकत्र येणे व विचारविनिमय करणे शक्य होत असे. कारण इतरत्र सर्वत्र मोगलांचे राज्य होते. मुल्हेर येथून अहवा, डांग मार्गे शबरीधामसाठी प्रस्थान केले. येथून गुजरात सीमा लागते. घाटाचा, नागमोडी व पूर्ण उताराचा रस्ता आहे. रस्ते खूप छान व डांबरी आहेत. दुपारी 3 वाजता शबरीधाम येथे आम्ही पोहोचलो. सागर रेस्टॉरंट येथे गुजराथी पद्धतीचे जेवण घेतले.
उद्धव महाराज समाधी
शबरी माता मंदिरात डाव्या बाजूला शबरी व उजव्या बाजूला लक्ष्मण व मध्ये श्रीराम यांच्या संगमरवरी विलोभनीय मूर्ती आहेत. शिळेवर बसलेल्या मूर्तीच्या मागे वनाचा देखावा आहे. खडकावर शबरीमाता बसलेली आहे व लक्ष्मणांची उभी मूर्ती आहे. शबरीधाम येथे सर्वत्र सागाचे जंगल आहे. शबरीमाता मंदिर चढताना पूर्ण चढ आहे व येताना उताराचा सिमेंट रस्ता आहे. शबरीधाम येथे सन 2006 साली वनवासी बांधवांचा कुंभमेळा झाला होता. परिसर मोठा व विस्तीर्ण आहे. शबरीधाम मंदिर बघून सायंकाळी 5.30 वाजता पंपा सरोवर पाहण्यास गेलो. सर्वत्र जंगल नागमोडी व छोटा रस्ता आहे. श्री नवनाथ मढी, पंपा सरोवर, अहवा, डांग येथे सरोवरांवर घाट बांधलेले आहेत. हनुमानाची मूर्ती खडकावर खूप उंचावर बसवलेली आहे. येथून बारीपाडा 40 किमी अंतरावर आहे. सायंकाळी 6 वाजता पंपा सरोवरावरुन निघून रात्री 8 वाजता बारीपाडा येथे मुक्कामी पोहोचलो. निवास व्यवस्था पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा ता.साक्री, जि.धुळे येथे दोन मोठ्या सभागृहांमध्ये केली. भोजन केल्यानंतर रात्री 10 वाजता जनसेवा फाऊंडेशनचे शिक्षक यांनी ग्रामविकासाची संकल्पना यावर एक तास उद्बोधन केले.
26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता बारीपाडा येथील जिल्हा परिषदेतील शाळेत आम्ही सर्वजण झेंडावंदनासाठी उपस्थित होतो. नंतर शाळेतील पहिली ते चौथी इयत्तांच्या मुलांनी संविधानावर भाषणे, नृत्ये, नाटिका, गीते असा एक तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
त्यानंतर दीपक पवार या कार्यकर्त्याबरोबर आम्ही बारीपाडा गावातील जंगल पाहावयास गेलो. गावापासून 3 किमी अंतरावर हे जंगल 1100 एकरात वसलेले आहे. बारीपाड्याची लोकसंख्या 1200 ते 1300 आहे. जंगलात 4435 मोहाची झाडे आहेत. मार्चला मोहाची पाने गळतात व मोहाच्या झाडांचा दरवर्षी लिलाव होतो. एका झाडाच्या वर्षांतून 15 मोळ्या काढतात, बाकी सर्व झाड सरळ वाढवू देतात. मोडून पडलेली झाडे जळणासाठी वापरली जातात. मोहाच्या झाडापासून व्हॅसलीन, ऑइल, मनुके, चॉकलेट, साबण इत्यादी वस्तू तयार केल्या जातात व त्या चांगल्या किमतीत विकल्या जातात. या वस्तू तयार करुन वनधन केंद्र नाशिकला विक्रीसाठी पाठविल्या जातात.
डॉ.आनंद फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1991 ला येथील कामास सुरुवात झाली. डॉ. आनंद फाटक यांचे यात मोठे योगदान आहे. 1993 ला पूर्ण गाव संघटित झाले. या अगोदर आजूबाजूचे लोक तेथे जंगलतोड करायचे. तेथे गावाची समिती तयार केली. श्रमदानातून गावात 700 बंधारे बांधले. राजेश शुक्लाजी यांनी बारीपाड्यांच्या जंगल उत्पादनांवर व शाश्वत विकासावर पीएच.डी. केलेली आहे.
बारीपाडा येथील शाश्वत विकासात 6 संस्थांचा सहभाग आहे. 1) देवगिरी कल्याण आश्रम, 2) ग्रामविकास समिती बारीपाडा, 3) जनसेवा फाऊंडेशन, 4) लुपिन फाउंडेशन, 5) योजक, व 6) वनधन केंद्र बारीपाडा.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती, बारीपाडा - पो. शेंदवड, ता.साक्री, जि.धुळे यांनी जंगलसुरक्षा गट स्थापन केले आहेत, असे 10 गट सदस्य आहेत. त्यानंतर दुपारी 12.30 ते 1.30 पर्यंत पद्मश्री चैत्रामजी पवार यांचे बारीपाडा गावाचा शाश्वत विकास यावर प्रेरणादायी मार्गदर्शन झाले. चैत्राम पवार यांनी आपल्या भाषणात आपल्याला कार्यप्रेरणा कशी मिळाली याबद्दल असे सांगितले की, ‘संघाचा प्रचारक कुठून तरी लांबून येथे येऊन आपल्या गावासाठी काम करत आहे, तर मग आपण का करू नये? हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पाँईट आहे. सुरूवातीला वनसंवर्धन आणि पशु या पाच बिंदूंना पुढे विकासित करण्यासाठी संघाचा ग्रामविकासाचा विषय त्याला जोडला, वनवासी कल्याण आश्रमाचे सहकार्य लाभले. बारीपाडा हा वनवासी भाग. या भागात अंधश्रद्धा, शिक्षणाविषयी उदासीनता, आरोग्यविषयक समस्या, धर्मांतर अशा अनेक प्रश्नांची साखळी होती. पण तेथे जे यश लाभले त्यामागे सामूहिक निर्णय हे बारीपाडा गावाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या भाषणातून त्यांनी महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास, मिलेट्स आणि मेडिसीन आदी विषयांचाही उत्तम धांडोळा घेतला. सर्वार्थाने त्यांचे भाषण आम्हाला प्रेरक आणि विचार प्रवर्तक वाटले. त्यांच्या उद्बोधनाच्या अगोदर सर्वांचा परिचय झाला. गारे काकांची कन्या प्राची शिंदे हिने प्रास्ताविक करुन तिच्या मनातील खंत व्यक्त केली व पद्मश्री चैत्राम भाऊंना विनंती केली की, कै.भीमराव गारे काका यांनी भिंतघर ता.सुरगाणा या गावी शाश्वत विकासासाठी मुहुर्तमेढ गोशाळेच्या रूपाने रोवली आहे. तेव्हा चैत्रामजींनी भिंतघर येथे यावे व आम्ही या गावाच्या विकासासाठी गावाला बरोबर घेऊन कसे काम करावे, याविषयी मार्गदर्शन करावे. पद्मश्री चैत्रामजींनी अत्यंत प्रेरणादायी भाषण केले.
त्यानंतर आम्ही सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन दुपारी 3.00 वाजता बारीपाड्याहून अंमळी धनेर येथील देवीच्या दर्शनासाठी गेलो. या मंदिरात देवीच्या पायांशी विष्णू झोपलेले आहेत व त्यांच्या बेंबीतून अखंड पाणी येते. तेथून सायंकाळी 6.30 वा. निघून रात्री 12.30 ला नाशिक येथे पोहोचलो ते बारीपाड्याच्या शाश्वत विकासाच्या व पद्मश्री चैत्रामजींच्या अफाट कार्यकर्तृत्वाच्या आठवणी मनात रेंगाळत ठेवूनच.
लेखक मालेगाव जिल्हा सेवाप्रमुख आणि सा. विवेकचे प्रतिनिधी आहेत.