स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियन खेळामागचे खरे शिल्पकार

Total Views |

sports
आपण सामना पाहताना समालोचकाचे बोलणे ऐकून खेळ अधिक रोमांचक वाटतो. पण त्या बोलण्यामागे अचूक माहिती कोण पुरवतो? इथेच स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियन यांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्कोअरर सामन्यातील प्रत्येक चेंडू, प्रत्येक गोल किंवा प्रत्येक गुण याची अचूक नोंद ठेवतो तर स्टॅटिस्टिशियन मात्र या आकड्यांना अधिक अर्थ देतो, त्यामुळेच समालोचकाचे बोलणे अधिक जिवंत, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह बनते.
एखाद्या खेळाडूचा अमुक एक स्कोअर झाला हे आपल्याला कळते कारण हा त्याचा स्कोअर कुणीतरी सातत्याने लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने प्रत्येक खेळाच्या सामन्यांमध्ये टिपत असते, लिहून काढत असते आणि ही महत्त्वाची कामगिरी जे बजावतात ते म्हणजे क्रिकेट Scorer (गुणसंख्यालेखक) किंवा Statistician (सांख्यिकीतज्ज्ञ) होय.
 
 
खेळाच्या मैदानावर आपण फलंदाज, गोलंदाज, स्ट्रायकर किंवा स्टार खेळाडू पाहतो पण या खेळामागे शांतपणे काम करणारे दोन महत्त्वाचे घटक असतात - स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियन. हे दोघेही खेळाची दिशा ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात.
 
स्कोअरर म्हणजे सामना अधिकृतपणे नोंदवणारी व्यक्ती. खेळाच्या अधिकृत प्राधिकरणाकडून त्यांची नियुक्ती केली जाते. ते मैदानाजवळ किंवा अधिकृत जागेवर बसून सामन्यातील प्रत्येक क्षणाची अचूक नोंद ठेवतात. उदा: Board of Control for Cricket in India (BCCI) किंवा Mumbai Cricket Association (MCA) यांच्याकडून क्रिकेट स्कोअरर परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच अधिकृत स्कोअरर म्हणून काम करता येते.
 

sports 
 
स्कोअररसाठी उत्कृष्ट एकाग्रता, खेळाचे नियम व कायदे यांचे सखोल ज्ञान, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय, स्पष्ट संवादकौशल्य, तत्परता व जबाबदारीची जाणीव हे आवश्यक गुण असावे लागतात.
 
 
वेगवेगळ्या खेळांतील गुणपद्धती
 
क्रिकेट - 280 धावा, 6 बाद
 
फुटबॉल - 2 गोल
 
बास्केटबॉल - 98 गुण
 
 
स्कोअरर ही केवळ नोंद ठेवणारी व्यक्ती नसते, तर ती सामन्याची अधिकृत साक्षीदार असते. स्टॅटिस्टिशियनचे काम म्हणजे सामन्यातील कच्चा डेटा म्हणजे फक्त आकडे आणि त्या आकड्यांचा अर्थ लावणे, त्यातून पॅटर्न शोधणे आणि निष्कर्ष काढणे.
 
उदा: क्रिकेट
धावा : 75
चेंडू : 50
चौकार: 8
षटकार: 2
स्ट्राइक रेट = (75/50) 100 = 150%
 
पण स्टॅटिस्टिशियनचे काम इथेच थांबत नाही. खेळाडूची बाउंड्री टक्केवारी किती? खेळाडूचे सातत्य कसे आहे? सामन्यावर त्याचा प्रभाव किती होता? हेदेखील ते पुढे पाहतात.
 
उदा: फुटबॉलमधील स्टॅटिस्टिक्स
 
शॉट ऑन टार्गेट
 
गोल रूपांतरण दर (Goal Conversion Rate)
 
हीट मॅप (खेळाडूची हालचाल)
 
उदा: बास्केटबॉलमधील स्टॅटिस्टिक्स
 
2 पॉइंट टक्केवारी
 
3 पॉइंट टक्केवारी
 
फ्री थ्रो टक्केवारी
 
इफिशियन्सी रेटिंग
 
म्हणूनच स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशियनची भूमिका ही प्रामुख्याने सर्व डेटा गोळा करणे, पॅटर्न शोधणे, खेळाडू व संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करणे, प्रशिक्षकांना धोरणात्मक सूचना देणे, विजयाची शक्यता (Winning Probability) भाकीत करणे ही असते.
 
आजच्या आधुनिक खेळांमध्ये डेटा म्हणजे शक्ती. प्रशिक्षक आणि व्यवस्थापन संघ निर्णय घेताना स्टॅटिस्टिक्सवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात.
 
 
स्टॅटिस्टिशियन बनण्यासाठी काही आवश्यक कौशल्ये आहेत.
 
जसे की मूलभूत गणित - टक्केवारी, सरासरी, गुणोत्तर, ग्राफ्स ह्याचा अभ्यास असणे, Excel, Python, R यांचे प्राथमिक ज्ञान असणे, स्पोर्ट्स अ‍ॅनालिटिक्स सॉफ्टवेअरची माहिती, विश्लेषणात्मक विचारशक्ती.
 
भारतातील स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियन क्षेत्रातील सुवर्णसंधी
 
आजचा खेळ केवळ ताकद, वेग आणि कौशल्यावर जिंकला जात नाही. तर डेटा आणि विश्लेषणावर जिंकला जातो. भारतात क्रिकेटपासून कबड्डी ते खो-खोपर्यंत अनेक खेळांमध्ये स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियनसाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहेत.
 
IPL, BCCI आणि विविध राज्य संघटनांमुळे क्रिकेटमध्ये डेटा क्षेत्राची मागणी मोठी आहे. तसेच मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म जसे ESPNcricinfo आणि फॅन्टसी स्पोर्ट्स कंपन्या जसे  Mobile Premier League (MPL)  येथेही विश्लेषकांची गरज भासते.
 
 
Indian Super League (ISL) आणि I-League मुळे फुटबॉलमध्ये विश्लेषणाची गरज झपाट्याने वाढत आहे.
बास्केटबॉलमध्ये हळूहळू संधी वाढत आहेत, भारतामध्ये आता बास्केटबॉलमध्ये व्यावसायिकता वाढू लागली आहे. विविध पदांवर संधी उपलब्ध होत आहेत.उदा: अधिकृत स्कोअरर (Table Official), परफॉर्मन्स अ‍ॅनालिस्ट, डेटा मॅनेजर.
 
 
Pro Kabaddi League मुळे कबड्डीमध्ये डेटा विश्लेषणाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. ह्यात स्कोअररची भूमिका ही गुण, टाइमआउट, बदल यांची अचूक नोंद करणे ही असते.
 
 
स्टॅटिस्टिशियनचे काम रेड पॉइंट्स, टॅकल पॉइंट्स शोधणे, डू-ऑर-डाय रेड यश दर, मशीन लर्निंग वापरून विजयाची शक्यता मांडणे ही असते.
 
 
Ultimate Kho Kho मुळे पारंपरिक खेळाला सुद्धा आधुनिक स्वरूप मिळाले आहे.
 
शिक्षण, प्रवेश मार्ग आणि उज्ज्वल भविष्य
 
आजच्या आधुनिक क्रीडा जगात स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियन होण्यासाठी योग्य शिक्षण आणि तांत्रिक कौशल्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात. या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास B.Sc. किंवा M.Sc. (Statistics / Data Science) सारखे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात. आकडेमोड, विश्लेषण आणि तर्कशक्ती यांचा मजबूत पाया येथे तयार होतो.
 
 
क्रिकेटमध्ये अधिकृत स्कोअरर व्हायचे असल्यास BCCIचे प्रमाणपत्र महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय Excel, Python, R, SQL यांसारख्या सॉफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक आहे. Hudl, Catapult, Sportscode यांसारखी आधुनिक अ‍ॅनालिटिक्स साधने शिकल्यास करिअरच्या संधी अधिक वाढतात.
 
 
खेळ जिंकण्यासाठी फक्त मैदानावरील पराक्रम पुरेसा नसतो. अचूक नोंदी ठेवणारा स्कोअरर आणि त्या आकड्यांना अर्थ देणारा स्टॅटिस्टिशियन - हे दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. जर तुम्हाला खेळ आवडत असेल, पण मैदानावर खेळाडू म्हणून नव्हे तर विश्लेषक म्हणून करिअर करायचे असेल, तर स्कोअरिंग आणि स्टॅटिस्टिक्स ही क्षेत्रे तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकतात. खेळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते पण आकड्यांची भाषा नेहमीच सत्य सांगते!
 
आजचा काळ आहे - खेळ + डेटा = यश!
 
आपण सामना पाहताना समालोचकाचे बोलणे ऐकून खेळ अधिक रोमांचक वाटतो. पण त्या बोलण्यामागे अचूक माहिती कोण पुरवतो? इथेच स्कोअरर आणि स्टॅटिस्टिशियन यांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्कोअरर सामन्यातील प्रत्येक चेंडू, प्रत्येक गोल किंवा प्रत्येक गुण याची अचूक नोंद ठेवतो तर स्टॅटिस्टिशियन मात्र या आकड्यांना अधिक अर्थ देतो, त्यामुळेच समालोचकाचे बोलणे अधिक जिवंत, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह बनते. पुढील लेखात आपण समालोचकाची भूमिका आणि संधींविषयी समजून घेऊ या.
 
 
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अ‍ॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.

वैशाली भिडे बर्वे / अ‍ॅड. रुपाली ठाकूर

- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अ‍ॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.