जीवन पुलकित करणारा संघस्पर्श

विवेक मराठी    10-Apr-2026
Total Views |
@ सुषमा पाचपोर
पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आणि समाजसेवेच्या वातावरणातून लग्न होऊन सासरी संघाच्या वातावरणात संभ्र्रमित अवस्थेतच आले. ‘संघ परिवार’ असा शब्दप्रयोग केला जातो, तो अनुभवातून समजत गेला आणि हीच परिवाराची ऊब आयुष्य प्रगल्भ करीत गेली. या काळात संघातील अनेक मान्यवरांच्या भेटी आणि संघ आयामांशी जोडले गेले. खर्‍या अर्थाने माझे जीवन संघस्पर्शाने पुलकित झाले.
 
sushma Pachpor
 
ग .. ट्रिंग .. त्या दिवशी एक सारखी फोनची घंटी सकाळपासून वाजत होती. सर्वांना एकच उत्तर देऊन मी सुद्धा वैतागले होते. आम्ही त्यावेळी नागपूरच्या पत्रकार सहनिवासात राहत होतो. सहनिवासच्या मोठ्या गेटपासून ते आमच्या बिल्डिंगपर्यंत आणि फ्लॅटपर्यंत त्या दिवशी पोलिसांचा ताफा, त्यांचे श्वान पथक आणि इतर सुरक्षारक्षक गस्त घालत होते. त्यामुळे सगळ्यांनाच कुतूहल होते की पाचपोरांच्या घरी काय झाले म्हणून इतके पोलिस आले आहेत? त्यांना काहीही माहिती नव्हते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक आदरणीय सुदर्शनजी आमच्या घरी भोजनाला येणार आहेत.
 
 
तसे सुदर्शनजी सरसंघचालक होण्यापूर्वी घरी आले होतेे. गुवाहाटीला असतांना एकदा काही पत्रकार मंडळींसोबत आमच्या घरी भोजनाचा योगही आला होता. मात्र सरसंघचालक झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती. आणि त्यांना असलेल्या सुरक्षेमुळे ही सर्व पोलिस मंडळी आमच्या सहनिवासात आली होती. इकडे त्यांच्या स्वागतात काही उणीव राहू नये म्हणून माझी सगळी धडपड सुरू होती आणि तशात ही फोनची घंटी सारखी वाजत होती. संघाचे सरसंघचालक घरी येणार म्हणून माझे मन कसे आनंदाने ओसंडून गेले होते. जणू जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव मी प्रत्यक्षच घेत होते.
 
 
नकळत माझे मन भूतकाळात गेले. आमचे घर मेहकरचे आणि माझे वडील डॉ. मनोहर पळसोकर. ते जणू समाजसेवेचे व्रत घेऊनच जन्माला आले असावेत. डॉक्टरची परीक्षा पास झाल्यावर त्यांना सहज मिळालेली सरकारी नोकरी सोडून लोकांच्या सेवेसाठी त्यांनी विदर्भातील मेहकर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. मेहकर हे बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण. येथील श्री शारंगधर बालाजीचे प्राचीन मंदिर आणि सुबक पूर्णाकृती मूर्ती यामुळे या शहराची ख्याती. पण त्याच बरोबर कविवर्य ना. घ. देशपांडे, हिंदू महासभेचे मोठे नेते वि. घ. देशपांडे, यांच्यामुळे अधिकच ख्याती प्राप्त शहर. अशा या शहराच्या आसपासच्या गावात मात्र वैद्यकीय सोयीसुविधा नगण्यच होत्या. माझे वडील त्यांच्या मोपेडवरून आसपासच्या गावात जाऊन गरजू रुग्णांना औषधे देत असत. लवकरच त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला.
 
गावाचा विकास करायचा असेल तर राजकारणात शिरल्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येताच त्याही क्षेत्रात त्यांनी शिरकाव केला आणि कॉँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते तीन वेळा मेहकरचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. मेहकर शहरासाठी पाण्याची योजना राबवितांना मुलांसाठी भारतीय ज्ञानपीठ नावाने एक विद्यालयसुद्धा त्यांनी सुरू केले. वडील कॉँग्रेसचे नेते त्यामुळे घरी कॉँग्रेसी नेत्यांचे येणे-जाणे असेच. घरचे वातावरणसुद्धा कॉँग्रेसी धाटणीचे होते. त्याचा प्रभाव आम्हा मुलांवर न पडता तरच नवल! पण त्या बरोबरच वडिलांनी केलेल्या समाजसेवेचे संस्कारही आमच्या मनावर होत होते. माझे मामा स्व. राजाभाऊ सावरगांवकर संघाचे प्रचारक म्हणून रांची येथे बरीच वर्षे होते. माझे आजोबा स्व. नानासाहेब सावरगांवकर हे क्रांतिकारी शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या टीममध्ये होते आणि आई समितीमध्ये सक्रिय होती. माझे काका दादासाहेब पळसोकर हे पक्के संघ स्वयंसेवक होते. अशा या कॉँग्रेसी आणि हिंदुत्वाच्या वातावरणात मी वाढले. अशी पार्श्वभूमी असली तरी ज्यावेळी माझे लग्न संघ स्वयंसेवक विराग पाचपोर यांच्याशी ठरले तेव्हा मनात खूप शंका होत्या. संघाचे लोक खूप कडक शिस्तीचे असतात; शाखेचे काम त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकतेचे असते. कौतुकाने असे सांगितले जात असे की त्यांची शाखेत जाण्याची वेळ सांगता येईल पण घरी येण्याची वेळ मात्र विचारू नये. नाटक, सिनेमा अशा चैनीच्या गोष्टी बघण्यात त्यांना वेळ नसतो .. इत्यादी इत्यादी.
 

एक अनमोल आठवण

तो माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण होता. आम्ही गुवाहाटीहून नुकतेच नागपुरला आलो होतो, त्या दरम्यान भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांची तिरंगा यात्रा काश्मीरकडे जात असताना नागपूरला थांबली होती. या यात्रेचे आयोजक नरेंद्रभाई मोदी होते. या यात्रेच्या स्वागतादरम्यान डॉ. जोशी आणि नरेंद्रभाईंना औक्षण करण्याची संधी मला मिळाली होती. हा माझा बहुमान मी समजते.
 
या माहितीमुळे संभ्रमी मानसिकतेत मी संसारात पाऊल टाकले आणि लग्न झाल्या झाल्या आम्ही गुवाहाटीकडे प्रस्थान केले. कारण हे त्यावेळी गुवाहाटी येथून प्रकाशित इंग्रजी दैनिक ‘दि सेंटीनल’ या वृत्तपत्रात काम करीत होते. पण इथे एक गोष्ट नमूद करावी असे वाटते. आमचे लग्न ठरले पण साखरपुडा, साक्षगंध काहीच झाले नाही आणि त्यानंतर जवळ-जवळ 8-9 महिन्यांनी लग्नाची तिथी होती. तेव्हा आजच्यासारखी मोबाईल किंवा फोनची सोय नव्हती. तरी पत्रभेटीचा पर्याय तर उपलब्ध होता. पण पत्र मिळायला देखील 8-15 दिवस लागत. आम्ही तो पर्याय निवडला आणि मला या पत्र भेटीतून माझ्या होणार्‍या स्वयंसेवक नवर्‍याचे मन कळले, त्याची ओळख पटली. त्याच्या पत्रांनी आमच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आणि माझ्या मनाने ग्वाही दिली की, हाच आधी खरा मित्र, खरा गुरू, खरा प्रियकर आणि नंतर नवरा आहे.
 
 
गुवाहाटीच्या मुक्कामात संघ आणि समितीच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीचा योग आला. समितीच्या वंदनीय प्रमिलाताई मेढे, कल्याण आश्रमाचे के. भास्कर राव, ज्येष्ठ प्रचारक कृष्णराव सप्रे, शशिकांतजी चौथाईवाले, विनायकराव कानेटकर, भास्करराव कुलकर्णी अशा अनेक महनीय व्यक्तींच्या संपर्कातून संघकार्याचे खरे व्यापक स्वरूप उलगडत गेले. श्रद्धेय डॉ. आबाजी थत्ते यांच्याशी संपर्क हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा अनुभव होता. नागपूरला परत आल्यानंतर हा संबंध अधिकच घट्ट झाला. असाच कौटुंबिक संबंध श्रद्धेय सुदर्शनजींसोबत निर्माण झाला. यामुळे आसामच्या वातावरणात जुळवून घेणे मला सहज शक्य झाले.
 
 
त्याच सुमारास आसाममध्ये विद्या भारतीशी संबंधित शिशु शिक्षा समितीच्या वतीने शंकरदेव शिशु निकेतन सुरू झाले होते. या समितीचे अध्यक्ष आसाम साहित्य सभेचे उप सभापती प्रो. रजनीकांत देव शर्मा, सचिव दीपक बरठाकूर तर संघटन मंत्री विराग पाचपोर होते. या शाळेत हिंदी शिकविण्यासाठी शंतनू शेंडे यांनी मला विचारले. एक दिवस घरी येऊन ते मला म्हणाले की, असमिया विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे आणि तुला हे काम करायचे आहे. माझ्या मनावर दडपण आले होते. असमिया भाषा माझ्यासाठी नवीन, शिकविण्याचा पूर्व अनुभव नाही अशा स्थितीत हे काम जमेल का असे दडपण होते. पण शेवटी हे स्वीकारले. याच काळात आसाममध्ये काम करणार्‍या कल्याण आश्रम, विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विवेकानंद केंद्र या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी जवळून संपर्क आला. आमचे ‘हे’ 1975 पासून ईशान्य भारतात सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करीत होतेच. ह्यांनी केलेल्या समाजकार्याचा ठसा मनावर उमटला होता. त्यामुळे मला या वातावरणात जुळवून घेणे फारसे कठीण गेले नाही.
 
 
 
गुवाहाटीला आमचे घरमालक असमिया होते. त्यांच्या दोन मुली माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आणि ते देखील भाषेची अडचण न येता. त्यांना असमियाशिवाय दुसरी भाषा येत नव्हती आणि मला असमिया येत नव्हती. पण ही अडचण आमच्या मैत्रीच्या आड आली नाही. त्यांच्या मैत्रीमुळे गुवाहाटीला मला एक हक्काचे असे घर मात्र अवश्य मिळाले.
 
 
पुढे नागपूरला परत आल्यानंतर काही काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केले. त्याच सुमारास छत्रपती संभाजी नगर येथे नुकतेच देवगिरी तरुण भारत सुरू झाले होते. तेथे उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण एक वर्षानंतर आम्ही परत नागपूरला आलो. त्यावेळी एक संघ कार्यकर्ते अविनाश संगवई यांच्या पुढाकाराने डॉ. हेडगेवार रक्तपेढी सुरू केली होती. सामाजिक रक्तपेढी अशी एक नवीन संकल्पना त्यांनी राबविण्याचे ठरविले होते आणि या रक्तपेढीची सोशल रिलेशन सेक्रेटरी म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैय्या यांनी आमच्या रक्तपेढीला भेट दिली त्यावेळी त्यांना औक्षण करून स्वागत करण्याची संधी मला मिळाली होती. माझ्यासाठी ही एक खूप मोठी गोष्ट होती. माझे प्रयत्न आणि अविनाश संगवई यांचे मार्गदर्शन यामुळे लवकरच डॉ. हेडगेवार रक्तपेढीने आपले एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.
 
 
त्याच सुमारास नागपूरला विश्व संवाद केंद्राच्या वतीने ‘विदर्भ हुंकार’ हे जागरण पत्रक काढण्याचे ठरविले तेव्हा केंद्राचे संचालक सुधीर वराडपांडे यांनी माझ्याकडे या जागरण पत्रकाचे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सोपविली. आमची कन्या राधिका तेव्हा अगदीच लहान होती पण तिला सांभाळून काम करण्याची अनुमती मिळाली होती म्हणून हे काम करता आले. विश्व संवाद केंद्रात काम करीत असतांना ‘राष्ट्र धर्म’ मासिकाच्या वतीने श्रीगुरुजी जन्म शताब्दीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मी सहभागी झाले होते. त्याचा पुरस्कार गाझियाबाद येथे एका कार्यक्रमात स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांच्या हस्ते मिळाला होता. तसेच ‘पाथेय कण’ या जयपूर येथून प्रकाशित मासिक पत्रिकेच्या वतीने आयोजित लेख स्पर्धेत संघाचे तत्कालीन सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तर, विद्या भारतीच्या वतीने याच काळात आयोजित निबंध स्पर्धेतदेखील मा. गो. वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार देऊन माझा गौरव करण्यात आला. विश्व संवाद केंद्रातील माझ्या कामाबद्दल वरिष्ठ संघ कार्यकर्ते अरुण कुमारजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हे सर्व क्षण माझ्यासाठी संघ स्पर्शाची देणगीच आहे असे मी समजते.
 
 
याच काळात वरिष्ठ संघ कार्यकर्ते, इंद्रेश कुमार यांच्याशी परिचय झाला. त्यांनी मुस्लीम लोकांशी संवाद प्रक्रिया सुरू केली होती त्या उपक्रमात आम्ही दोघांनी सहभागी व्हावे असे त्यांनी सुचविले. आदरणीय सुदर्शनजी यांचे या सुचनेला अनुमोदन होते. मुस्लीम समाजाबद्दल मनात असलेले पूर्वग्रह, त्यामुळे त्या समाजात काम करणे कसे जमेल याचे दडपण होते. पण हळूहळू काम करता करता जमू लागले. या कामाची पोचपावती म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री साध्वी निरंजना देवी यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने दिल्ली येथे गौरविण्यात आले. आता मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या महिला प्रकोष्ठची राष्ट्रीय सहसंयोजिका म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. असा हा माझ्या काँग्रेस ते संघ यात्रेचा हा आलेख आहे. अशा या संघस्पर्शाने माझे जीवन मात्र पुलकित झाले.