artemis 2
@रुचिरा सावंत
आर्टिमिस 2 ही मोहीम अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. अपोलो मोहिमेचा उद्देश माणसाला चंद्रावर पोहोचवणं, तिथे जाऊन पृथ्वीवर सुखरूप परत येता येण्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करणं हा होता. पण तब्बल पाच दशकांनी पुन्हा चंद्राच्या दिशेने कूच म्हणजे केवळ स्वप्नाच्या दिशेने पाऊल नाही, तंत्रज्ञानाचा करिष्मा नाही तर माणसाच्या माणूसपणाची, शोधाची आणि औतुस्क्याची एक जिवंत कहाणी आहे.
मानवी इतिहासाच्या अगदी सुरुवातीपासूनच चंद्र आणि माणसाचं नातं हे केवळ आकाशात दिसणारा, आपल्या कला बदलणारा एक खगोल या पलीकडे आहे. तो कायमच मानवजातीसाठी एक मूक सोबती ठरला आहे. फार पूर्वीपासून दुर्बिणीच्या आणि अवकाश यानाच्या शोधाआधी माणूस वर अवकाशात चंद्राला फार कुतूहलाने पाहत आलाय. प्रवाशांना अंधार्या वाटेवर दिशा दाखवणारा, दिनदर्शिकेची संकल्पना आणि कृषीचक्राला आकार देणारा, कवी आणि लेखकांना भुलवणारा हा चांदोबा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सौंदर्य, गूढता, आकांक्षा, आतुरता आणि कल्पनाशक्ती यांचं प्रतीक आहे. याच चंद्राने अनेक मानवी संस्कृतींचा उगम पाहिला आणि विश्व समजून घेण्यासाठी मानवाने पहिलं पाऊलसुद्धा याच्याच प्रेरणेने घेतलं. त्यामुळे अनेक अर्थांनी माणूस आणि चंद्र यांचं नातं म्हणजे माणसाच्या कुतूहलाचा एक प्रवासच आहे. दुरूवरून वाटणारं कुतूहल कधी वैज्ञानिक करणमीमांसेमध्ये रूपांतरित झालं समजलंच नाही. लोककथांची जागा आता प्रश्नांनी घेतली. निरीक्षण करण्यासाठी आता दुर्बिणी आल्या आणि लवकरच माणसाच्या कुतूहलाला पंख देऊन पृथ्वीच्या परिघाबाहेर पोहोचवणारी अवकाशयानंसुद्धा आली.
16 जुलै 1969 रोजी जेव्हा मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा ती केवळ तंत्रज्ञानातील एक उल्लेखनीय कामगिरी नव्हती तर रात्रीच्या आकाशात चमकणार्या त्या तेजस्वी गोळ्याच्या दिशेने केलेला कुतूहल आणि ओढीचा तो शतकानुशतकांचा रम्य प्रवास होता. आणि कदाचित म्हणूनच तिथे पोहोचल्यानंतरही चंद्राची मानवावर असणारी जादू मुळीच सरली नाही. त्याच्याविषयी असणारं कुतूहल अजिबात ओसरलं नाही. याउलट आणखी मूलभूत प्रश्न पडले, नव्या कल्पना सुचल्या आणि वेगळ्या वाटा गवसल्या. तो आपल्याला चकित करतच राहिला. यामुळेच कदाचित चंद्र आणि माणसाचं नातं हे केवळ वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक नाही. ते अतिशय मानवी आहे. कुतूहल, कल्पनाशक्ती आणि दूर व अशक्य भासणार्या क्षितिजांपलीकडे पोहोचण्याच्या कालातीत इच्छेवर उभं असलेलं हे एक अनोखं नातं आहे.
चंद्राविषयी पूर्वीपासूनच माणूस सातत्याने बोलत आला असला तरी मागचे काही दिवस अचानक याचं प्रमाण खूप वाढलं आहे. जगभरातील सारीच माणसं सद्यस्थितीला एका अदृश्य आणि मजबूत धाग्याने जोडली आहेत. तो धागा म्हणजे आर्टिमिस 2. या चांद्रमोहिमेचा पाठपुरावा करणारी सारीच माणसं अवकाशयात्रींच्या जोडीने भावनांचा रोलर कोस्टर अनुभवताहेत. आज जाणून घेऊया सध्या अखंड मानवजातीला भारावून टाकणार्या, आपलं इवलंसं जग व्यापून टाकणार्या मानवी अवकाश मोहिमांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा याच मोहिमेची गोष्ट.
1 एप्रिल 2026 हा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता. 50हून अधिक वर्षांनंतर आज माणूस पुन्हा एकदा पृथ्वीच्या कक्षेबाहेर चंद्राच्या दिशेने कूच करणार होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार एप्रिल 02, 2026च्या पहाटे 3:54 मिनिटांनी ओरियन हे अवकाशयान आर्टिमिस 2 मोहिमेतील चार अवकाशयात्रींना घेऊन अवकाशात झेपावलं. 1972मध्ये अपोलो 17च्या चंद्रावरील यशस्वी अवतरणानंतर अपोलो मोहीम आणि पर्यायाने मानवी चांद्रमोहीम स्थगित केली गेली, ती आजपावेतो. त्यामुळे अनेक अर्थांनी 1 एप्रिल हा दिवस एक नांदीचा दिवस असणार होता.
आर्टिमिस ही ग्रीक पुराणकथेमधील अपोलोची बहीण. अपोलो या पहिल्या मानवी चांद्रमोहिमेनंतर जेव्हा अनेक दशकांनी नव्या मानवी चांद्रमोहिमेची तयारी सुरु झाली तेव्हा तिचं ‘आर्टिमिस’ हे नाव निवडण्यामागे या जोडीचे आणखी एक कारण आहे. कारण आर्टिमिस मोहिमेमध्ये पहिल्यांदाच चंद्राच्या दिशेने करावयाच्या या प्रवासामध्ये एका महिला अवकाशयात्रीचा समावेश असणार हे या मोहिमेचं वैशिष्ट्य होतं. या अर्थानेसुद्धा स्त्रीशक्तीचा गौरव करणारं ‘आर्टिमिस’ हे नाव अगदी साजेसं ठरलं. 2019मध्ये आर्टिमिस मोहिमेची घोषणा झाल्यानंतर 2022 साली आर्टिमिस 1 या मानवरहित उड्डाणाद्वारे आर्टिमिस 2 या मानवी मोहिमेचा पाया रचला गेला.
आर्टिमिस 1च्या यशस्वी उड्डाणानंतर सार्यांचं लक्ष एकवटलं ते आर्टिमिस 2 या मानवी अवकाश मोहिमेकडे. ही मोहीम माणसाला चंद्रावर उतरवणार नसली तरी पृथ्वीच्या कक्षेबाहेर चंद्राच्या दिशेने जरूर घेऊन जाणार होती आणि त्यामुळेच तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या मोहिमेमध्ये एकूण चार अवकाशयात्री त्यांच्या अवकाश प्रवासाला निघाले. हे चार अवकाशयात्री म्हणजे - अवकाश मोहिमांचा दांडगा अनुभव असणारे कमांडर रीड वाईजमन, चांद्रमोहिमेमध्ये निवड झालेले पहिले कृष्णवर्णीय अवकाशयात्री पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, चांद्रमोहिमेमध्ये सहभागी झालेले पहिले कॅनडियन अवकाशयात्री मिशन स्पेशालिस्ट जेरेमी हॅन्सेन आणि चांद्रमोहिमेमध्ये सहभागी पहिल्या महिला अवकाशयात्री मिशन स्पेशालिस्ट क्रिस्टिना कोच. गंमत अशी की, यापैकी जेरेमी हॅन्सेनव्यतिरिक्त इतर सारेजण अवकाशात दीर्घकाळ मुक्काम करण्याचा अनुभव असणारे असून हॅन्सेन यांचा मात्र हा पहिलाच अवकाशप्रवास आहे.
आर्टिमिस 2 ही मोहीम अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. अपोलो मोहिमेचा उद्देश माणसाला चंद्रावर पोहोचवणं, तिथे जाऊन पृथ्वीवर सुखरूप परत येता येण्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करणं हा होता. पण तब्बल पाच दशकांनी पुन्हा चंद्राच्या दिशेने कूच करायची म्हणजे उद्दीष्टही तसंच असायला हवं नाही का! पहिली स्त्री, पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती व पहिली अमेरिकेतर रहिवासी व्यक्ती याना चंद्राच्या दिशेने घेऊन जाणारी ही मोहीम म्हणजे केवळ सर्वसमावेशकतेची ग्वाही नाही. आता माणसाला चंद्रावर केवळ पोहचायचं नाही तर तिथे दीर्घकाळ मुक्काम करायचा आहे. ही मोहीम माणसाला मंगळासारख्या इतर ग्रहांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. अपोलो 13 या मोहिमेअंतर्गत अवकाशयात्रींनी अवकाशात सर्वाधिक अंतर प्रवासाचा विक्रम आर्टिमिस 2च्या अवकाशयात्रींनी 406771 किमी अंतर प्रवास करून एप्रिल 06, 2026 रोजी मोडला. आणि या जोडीने आजघडीला अवकाशात सर्वाधिक दूरवर प्रवास केलेले अवकाशयात्री हा सन्मान त्यांनी मिळवला. यानिमित्ताने पृथ्वीची कक्षा ओलांडणारी पहिली स्त्री होण्याचा मानसुद्धा क्रिस्टिना कोच यांना मिळाला आहे.
या मोहिमेच्या निमित्ताने अवकाशयात्रींच्या जोडीने सामान्य माणसांनीही भावनांच्या चढउताराचा उच्चांक गाठला. मुन फ्लायबायच्या वेळी म्हणजेच चंद्राच्या अंधार्या बाजूला प्रवास करण्यासाठी अवकाशयात्री तयारी करत असताना नासाने त्यांच्यासाठी एक भेट पाठवली. ही अत्यंत खास भेट म्हणजे यापूर्वी चंद्राच्या त्या भागातून पहिल्यांदा प्रवास केलेल्या अपोलो 8 मोहिमेतील अवकाशयात्री लॉव्हेल यांचा खास आर्टिमिसच्या कृसाठीचा संदेश. 2025मध्ये लॉव्हेल यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी तो रेकॉर्ड करून ठेवला होता. त्या संदेशामध्ये लॉव्हेल म्हणतात,“माझ्या ओळखीच्या जुन्या भवतालात तुमचं स्वागत आहे. या भवतालातून आपल्या लाडक्या पृथ्वीचं सुरेख रूप पाहायला मिळतं. आमची ही परंपरा तुम्ही पुढे चालवताय याचा मला अभिमान आणि आनंद आहे. मला माहितीयं तुम्ही खूप व्यस्त असणार आहात पण या क्षणाचा आणि दृश्याचा आनंद घ्यायला मुळीच विसरू नका.” त्यांचा हा संदेश पाहून अवकाशयात्रींच्या जोडीने इथे त्या मोहिमेचा पाठपुरावा करणारे पृथ्वीवरील लोकही भावूक झाले. ल्यूनार फ्लायबायच्या वेळेत संपर्क तुटला असताना इथे लोक त्या अवकाशयात्रींसाठी अज्ञात शक्तीकडे प्रार्थना करत राहिले. त्या वेळात चंद्रावर अवकाशयात्रींना सापडलेल्या दोन नव्या विवरांपैकी एका विवराला रीड यांच्या पत्नी कॅरोलिन यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सर्व अवकाशयात्रींनी एकत्रितपणे मांडल्यावर इथे पृथ्वीवरील माणसांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले.
त्यांच्यापासून 2,50,000 मैल दूर असणार्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील आपल्या मित्रांना त्यांनी जेव्हा फोन जोडला आणि त्याला फॅमिली कॉल म्हटलं तेव्हा देशादेशांतील सीमा अदृश्य झाल्या. आपण माणसं एक कुटुंब आहोत यावर विश्वास वृद्धिंगत झाला. अपोलो 8ने मिळवलेल्या देखण्या पृथ्वीच्या उदयाच्या प्रतिमेप्रमाणे आर्टिमिस2 ला ही स्वतःची अशी एक खास प्रतिमा सापडली. ती प्रतिमा म्हणजे पृथ्वीचा अस्त होतानाची प्रतिमा. चंद्राच्या आडून दिसणारी ती पृथ्वी किती मनोहारी दिसत होती. अगदी देखणी.
आर्टिमिस 2च्या निमित्ताने मानव एका नव्या शास्त्रीय पर्वामध्ये प्रवेश करतो आहे. आपल्या या वारशाविषयी बोलताना हे अवकाशयात्री एक फार वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात की, इथून पुढे काही वर्षांत आमच्या मोहिमेला, आम्हाला लोकांनी विसरून जावं असं आम्हाला वाटतं. आमची ही मोहीम महत्त्वाची असली तरी ती केवळ पुढे करायच्या महत्त्वाच्या आणि कठीण अशा स्वप्नांच्या दिशेने केवळ पहिलं पाऊल आहे. आमची जबाबदारी त्या स्वप्नाच्या दिशेने प्रवासाची केवळ सुरुवात करून देणं ही आहे. ती तशीच रहावी. हा विचार म्हणजे अवकाशयात्री मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं जीवन अर्पण करतात याचा वस्तुपाठच नाही का?
आर्टिमिस 2 हे केवळ त्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल नाही, तंत्रज्ञानाचा करिष्मा नाही तर माणसाच्या माणूसपणाची, शोधाची आणि औत्सुक्याची एक जिवंत कहाणी आहे.