अस्वाभाविक पावसाचा अवेळी तडाखा

विवेक मराठी    10-Apr-2026
Total Views |
Avkali paus
 
@डॉ. श्रीकांत कार्लेकर
9764769791
महाराष्ट्रात झालेल्या या अस्वाभाविक आणि अवेळी मुसळधार पावसामुळे प्रदेशाची हवा आणि तिथले हवामान यासंबंधी हवामान बदलाच्या संदर्भात पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. पाऊस नेहमीच्या मान्सून कालावधीबाहेर पडणे, ऋतूंची स्पष्टता कमी होणे आणि पावसाच्या आकृतिबंधात मोठे बदल होणे यासारख्या घटना हवामानातील अनिश्चितता (climate variability)वाढली असल्याच्या निर्देशक आहेत. अचानक पाऊस येऊ लागल्यामुळे जलव्यवस्थापनातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा साठा न होता पाणी वाहून जाणे, भूजल पुनर्भरण कमी किंवा बाधित होणे यामुळे पाणी उपलब्धतेचे संतुलन बिघडणार आहे. हवामान बदलाशी संबंधित अशा या अनपेक्षित घटना भविष्यातील दीर्घकालीन समस्या ठरू शकतात..
मार्च 2026च्या अखेरीस आणि एप्रिल 2026 च्या सुरुवातीस अवेळी आलेल्या आणि राज्यभर पसरलेल्या पावसाने महाराष्ट्राला यथेच्छ झोडपून काढले. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत आणि बाधित झाले. पिके आणि घरदारे अक्षरशः उद्ध्वस्त झाली. 1 लाखांहून अधिक शेतकरी आणि शेतीचे 64,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झाले. अशा पावसाचा अल्प वेळात मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. शहरांमध्ये पाणी साचणे, वीज खंडित होणे, वाहतूक व विमान उड्डाणांवर परिणाम याचबरोबर शेतीचे मोठे नुकसान झाले.
 

rain 
 
हा पाऊस एकदाच नव्हे तर दोन महिन्यात, मार्चच्या मध्यात (15 ते 20 मार्च), मार्चच्या शेवटी(19 ते 20 व 29 ते 31 मार्च) आणि एप्रिलच्या सुरुवातीला (1 ते 4 एप्रिल : हा लेख लिहीपर्यंत ) अशा वेगवेगळ्या टप्प्यांत पडला. राज्यभर पसरलेला पण विखुरलेला, असमान प्रमाण असलेला असा हा पाऊस होता. उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव, धुळे), पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर, सातारा), विदर्भ (नागपूर, वर्धा, अमरावती) आणि मराठवाडा (बीड, लातूर, परभणी) हा भाग यामुळे प्रामुख्याने प्रभावित झालेला होता. वादळे, विजा, ताशी 40-60 कि.मी. वेगाने वाहणारे जोरदार वारे आणि गारपीट (विशेषतः मराठवाडा व विदर्भात झालेली) अशा जास्त तीव्रतेच्या हवामान घटना या पावसात दिसून आल्या. मार्चच्या सुरुवातीला 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेल्या उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर, अचानक पाऊस आणि तापमानात घट असे टोकाची विविधता असलेले बदलते हवामान तयार झाले. काही ठिकाणी काही तासांतच पडलेल्या पावसाचे प्रमाण जोरदार पावसाच्या प्रमाणाच्या जवळपास होते. नागपूर इथे सुमारे 20 मिमी, वर्धा इथे 26.4 मिमी, गडचिरोली या ठिकाणी 9.4 मिमी. तर अमरावती इथे 5.8 मिमी. असा मध्यम पाऊस आणि पुण्यात 2 तासांत 84 मिमी आणि नाशिकमध्ये 30 मिनिटांत 39 मिमी अशी ढगफुटीसदृश (Cloudburst) अतिवृष्टी झाली.
 
 
असा पाऊस, वादळे आणि गारपीट ही भूमध्य समुद्रात उगम पावणार्‍या पश्चिमी वार्‍यांच्या प्रभावामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या काळात होत असते. हिवाळ्याशिवाय इतर ऋतूत तुलनेने दुमीर्र्ळ असतात, पण पूर्णपणे नसतातच असे नाही. आत्ताचे वादळ हे दुमीर्र्ळ वादळ होते. थंड युरोप व उबदार भूमध्य समुद्र यामुळे निर्माण होणार्‍या तापमानातील तीव्र फरकामुळे आणि पश्चिमेकडील सक्रिय जेट प्रवाह यामुळे भूमध्य समुद्रावर तयार होणारी ही वादळे थंडीच्या दिवसांत वारंवार तयार होतात. इतर वेळी थंड व उष्ण हवेच्या तापमानातील फरक कमी होतो आणि कमी दाब प्रणाली कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे ही वादळेही दुमीर्र्ळ बनतात. या आधी वर्ष 2023 आणि 2025च्या एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये उत्तराखंड आणि राजस्थानात अशी वादळे आली होती. भारतामध्ये 2014 -15 आणि 2023 मधील अवकाळी पावसाच्या घटनांप्रमाणे हिवाळ्याबाहेरील काळातही पश्चिमी विक्षोभांच्या प्रभावामुळे अशी मोठी वादळे येऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे उपलब्ध नोंदींवरून दिसून येते.
 
 
ही वादळे भूमध्यसागर प्रदेशात उगम पावणारी बाह्य-उष्णकटिबंधीय म्हणजे मध्य अक्षांश प्रदेशातील कमी वायुभाराची (Low pressure) वादळे आहेत. ती पूर्वेकडे सरकताना भारतात थंड हवा आणि आर्द्रता आणतात. यामुळे उत्तर आणि वायव्य भारतात पाऊस आणि गारपिटीला सुरुवात होते, ज्याचा प्रभाव नंतर महाराष्ट्रापर्यंतही पसरतो. यावेळी सक्रिय पश्चिमी वार्‍यांमुळे महाराष्ट्रात, विशेषतः पुणे, नाशिक आणि मराठवाड्यासारख्या भागांमध्ये पावसाच्या सलग सरी कोसळल्या.
 

rain 
 
या वादळांचा सामान्य मार्ग, भूमध्य समुद्र-इराण-अफगाणिस्तान -पाकिस्तान-भारत असा असतो. सामान्यतः याचा परिणाम फक्त उत्तर भारतात जम्मू-कश्मीर, पंजाब, हरियाणा या भागातच दिसतो. यावेळी त्यांत विशेष बदल होऊन हे वादळ नेहमीपेक्षा दक्षिणेकडे अधिक सरकले आणि त्याचा प्रभाव मध्यभारत आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचला.
 
 
अशी परिस्थिती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प तसेच दिवसाचे उच्च तापमान यांसारख्या स्थानिक घटकांमुळे तयार होते आणि मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे निर्माण होतात. समुद्रावरून येणारे हे बाष्प ढग तयार होण्यासाठी आवश्यक असते. यामुळे गरम आणि थंड हवेमध्ये संयोग होऊन क्युम्युलोनिंबस प्रकाराचे उंच ढग तयार होतात आणि मुसळधार पाऊस पडतो.
 
 
हा पाऊस वेळ आणि तीव्रतेच्या दृष्टीने अस्वाभाविक किंवा असामान्य असला तरी तो पूर्णपणे अभूतपूर्व नाही. हा बदलत्या हवामानाच्या मोठ्या आकृतिबंधाचा भाग आहे. सामान्यतः महाराष्ट्रात मान्सूनपूर्व(Pre monsoon)पाऊस एप्रिल-मे मध्ये सुरू होतो, मार्चमध्ये नाही. तज्ज्ञांच्या मते मार्चमध्ये पाऊस पडणे तसे पाहता दुर्मीळ आहे, विशेषतः किनारपट्टी आणि मध्य भागात. त्यामुळे पाऊस पडणे शक्य असले तरी इतक्या लवकर तो सुरू होणे अस्वाभाविक आहे.
 
 
पुण्यात 4 एप्रिल 1896 नंतरचा एप्रिलमधील सर्वाधिक पाऊस (2 तासांत 84 मिमी) नोंदवला गेला. 4 एप्रिल 1896 या दिवशी पुण्यात 51 मिमी पावसाची नोंद झाली होती. नाशिकमध्ये 30 मिनिटांत 39 मिमी पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली. इतक्या कमी वेळेत एवढा मोठा पाऊस पडणे नक्कीच असामान्य आहे. या पावसाचा प्रभाव आणि विस्तार खूप मोठा होता, जो सामान्य ’मान्सून पूर्व’ पावसापेक्षा जास्त होता.
 
 
हवामान तज्ज्ञांच्या मते पश्चिमी विक्षोभ किंवा अडथळे (Western Disturbances) दक्षिणेकडे अधिक पसरल्यामुळे आणि वायुभाराची द्रोणीय स्थिती (Trough) आणि वार्‍यांची विसंगती (wind discontinuity) यांच्या परस्परक्रियांमुळे पावसाचा प्रभाव वाढला. या प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे वातावरण अस्थिर झाले. साधारणपणे हे घटक या काळासाठी सामान्य नसतात, त्यामुळे पावसाचे प्रमाणही वाढले.
 

rain 
 
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अभ्यासानुसार महाराष्ट्रात गेल्या काही दशकांत गारपीट आणि अवकाळी पाऊस (म्हणजे जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा ठराविक काळ सोडून आलेला पाऊस) वाढला आहे. हवामान बदलामुळे पावसाची वेळ बदलते आहे आणि अचानक मुसळधार पाऊस वाढतो आहे. उष्णतेच्या लाटा आणि पावसाचे चक्रही बदलते आहे त्यामुळे 2026मधील ही घटना अस्वाभाविक वाटत असली तरी ती वाढत्या हवामान बदलाचाच भाग आहे असे म्हणता येते.
 
 
हा पाऊस पूर्णपणे ’मान्सून पूर्व’ पाऊस नव्हता. काही अंशी ’मान्सून पूर्व ’आणि काही अंशी खरा अवकाळी पाऊस असा पावसाचा हा मिश्र प्रकार होता. एप्रिलचा काही भाग ’मान्सूनपूर्व’स्वरूपाचा तर मार्च मधला पाऊस अवकाळी पाऊस होता. सामान्य ’मान्सूनपूर्व’ पाऊस विखुरलेला आणि कमी वेळाचा असतो. पण 2026 मधला हा पाऊस संपूर्ण राज्यभर पडला आणि अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली. ’मान्सूनपूर्व’पाऊस स्थानिक उष्णता अभिसरणामुळे (convection) मुख्यतः एप्रिल-मे महिन्यात पडतो. यात मेघगर्जनेसह वादळे होतांना दिसून येतात. पश्चिमी अडथळे आणि वार्‍यांची विसंगती ही मोठ्या प्रमाणात तयार होणारी हवामान प्रणाली आहे आणि सामान्य ’मान्सूनपूर्व’ पावसात ती फारशी तयार होत नाही.
 
 
महाराष्ट्रात झालेल्या या अस्वाभाविक आणि अवेळी मुसळधार पावसामुळे प्रदेशाची हवा (weather) आणि तिथले हवामान (climate) यासंबंधी हवामान बदलाच्या संदर्भात पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. पाऊस नेहमीच्या मान्सून कालावधीबाहेर पडणे, ऋतूंची स्पष्टता कमी होणे आणि पावसाच्या आकृतिबंधात मोठे बदल होणे यासारख्या घटना हवामानातील अनिश्चितता(climate variability) वाढली असल्याच्या निर्देशक आहेत. जागतिक तापमानवाढीच्या प्रभावामुळे उष्ण झालेले वातावरण अधिक आर्द्रता सामावून घेऊ लागले आहे. त्यामुळे अचानक पडणार्‍या मुसळधार पावसाचे प्रमाणही वाढत आहे. पश्चिमी विक्षोभ किंवा अडथळ्यांचा(Western Disturbances) प्रभाव वाढतो आहे. त्यांची वारंवारता वाढत असून ते अधिक तीव्र होत आहेत. त्यांचा प्रभाव मध्य आणि दक्षिण भारतात वाढतो आहे. कृषी क्षेत्रातील अनिश्चितता वाढत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे पेरणी व कापणी नियोजन कठीण होत आहे. यामुळे अन्नसुरक्षेवर भविष्यात मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. अचानक पाऊस येऊ लागल्यामुळे जलव्यवस्थापनातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा साठा न होता पाणी वाहून जाणे, भूजल पुनर्भरण कमी किंवा बाधित होणे यामुळे पाणी उपलब्धतेचे संतुलन बिघणार आहे.
 
 
हवामान बदलाशी संबंधित अशा या अनपेक्षित घटना भविष्यातील दीर्घकालीन समस्या ठरू शकतात यात शंका नाही!