अलिबागस्थित श्रीक्षेत्र कनकेश्वराच्या शिखरावर जून 1876 साली श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामीजींनी श्री रामसिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. आध्यात्मिक साधनेसोबत समाजसेवेचे व्रत त्यांनी गणेशभक्तांना दिले. यंदाचे वर्ष हे श्री रामसिद्धिविनायक मंदिराचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
अथांग समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, घनदाट वनराई, निरभ्र आकाश असे विलोभनीय निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थळ म्हणजे आध्यात्मिक साधनेसाठी पर्वणी ठरणारे असेच. आता जे निसर्ग वर्णन केले आहे ते एकविसाव्या शतकातील मुंबईनजीक असलेल्या अलिबाग येथील कनकेश्वर मंदिर परिसराचे. हे वर्णन पाहता काही शतकांपूर्वी येथील निसर्गसंपदा किती समृद्ध असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. श्रीगणेशानंद उपाख्य श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामी यांनी हीच दूरदृष्टी ठेवून गणेशोपासनेसाठी श्रीकनकेश्वरी श्रीगजाननाचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला.
श्रीक्षेत्र कनकेश्वर हे अतिशय प्राचीन महादेवांचे मंदिर. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील असून डोंगराच्या शिखरावर 28 कोनांच्या तारकाकृती पायावर उभे आहे. संपूर्ण मंदिराची बांधणी काळ्या पाषाणातील आहे. सरदार रघुजी आंग्रे यांचे हे कुलदैवत. रघुजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास दलाल यांनी कनकेश्वर मंदिराबाहेरील पुष्करणी आणि पायर्यांचे काम स्वखर्चाने इसवी सन 1774 जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते. या डोंगरमाथ्यावर कनकेश्वराचा देवाधिदेव महादेवांचा अधिवास असल्याची खूण म्हणजे येथील एका पायरीवर महादेवांच्या उजव्या पावलाचा ठसा उमटला आहे, याला ‘देवाची पायरी’ असे म्हणतात. श्री रामसिद्धिविनायक मंदिर ज्या स्थानी उभारले आहे, तेथे पूर्वी शिकारीसाठी सरदार आंग्रे येत, त्यांच्या विश्रांतीची ही जागा होती. या मोकळ्या जागेचा आध्यात्मिक साधनेसाठी उपयोग केला जाण्याचा स्वामीजींनी संकल्प घेतला हे कळताच ते कृत्य कृत्य झाले आणि आपल्या स्वमालकीची जमीन त्यांनी आनंदाने बहाल केली.
निर्जन स्थळी मंदिर उभारणे हे महाकठीण कार्य होते. ईश्वरेच्छा आणि श्री लंबोदर स्वामीजींच्या आशीर्वादाने मंदिर उभारणीस स्वेच्छेने अनेकांनी तन, मन, धन यथाशक्ती अर्पण करून श्रीगजानन मंदिर निर्माणाचे शिवधनुष्य उत्तम रितीने पेलले. श्री रामसिद्धिविनायक मंदिरातील गणेशमूर्ती सिद्धिबुद्धिलक्षलाभ यांच्यासहित असलेली मनोहारी अशी संगमरवराची आहे. ही गणेशमूर्ती बडोद्याचे नवकोट नारायण गोपाळराव मैराळ यांनी स्वामीजींच्या श्रद्धेपोटी कनेकश्वरी पोहचविण्याचे कार्य भक्तिभावाने केले. ज्येष्ठ वद्य 4 शालिवाहन शके 1798 (जून 1876) या गणेशमूर्तीची स्थापना झाली.
श्री रामसिद्धिविनायक मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक देवतांच्या मूर्ती आणि श्री लंबोदरानंद स्वामींचे समाधिस्थळदेखील आहे. भक्तमंडळींसाठी निवासाची व्यवस्था, स्वयंपाकासाठी प्रशस्त दोन खोल्या, मधुर पाणी देणारी देवस्थानाची विहीर, असा हा नयनरम्य परिसर आहे. मंदिर संस्थानासाठी सातघर, लोणघर, खारपेढांबे, रेवस, म्हाप्रोळी अशा पंचक्रोशीतूनही बक्षिसपात्राने देवस्थानास जमीन मिळाली. तसेच काही जमीनी स्वामीजींनी खरेदी केल्या. सुरूवातीला यातून येणार्या उत्पन्नावर देवस्थानाचा कारभार चालत.
श्री रामसिद्धिविनायक देवस्थानाचा व्यवहार चोखपणे चालावा या दृष्टीने श्री लंबोदरानंद स्वामीजींनी संस्थेकरिता ‘नियमपुस्तिका’ तयार केली. श्री लंबोदरानंद स्वामी संन्यस्त वृत्तीचे असले तरी त्यांना जगाच्या व्यवहाराचे सम्यक ज्ञान होते. मंदिर संस्थानाचे व्यवहार पारदर्शक आणि चोख असावेत, हा उद्देश ठेवूनच या नियमपुस्तिकेचा त्यांनी घाट घातला होता. यासाठी देवस्थानाविषयी नितांत श्रद्धा असणार्या व्यक्तींचे विश्वस्त मंडळ स्वामीजींनी स्वतः नेमले. देवस्थानाचा सहा वर्षे स्वतः कारभार करून विश्वस्त मंडळाला वस्तुपाठ घालून दिला. नियमपुस्तिकेवरून ओझरती नजर फिरवली तरी लक्षात येते, ती स्वामीजींची व्यवहारकुशलता आणि पारदर्शकता. ही पुस्तिका म्हणजे मार्गदर्शक पाथेयच म्हणावे लागेल.
देवस्थानाच्या विश्वस्त मंडळात रामचंद्र विष्णू बापट; सातघर, भास्कर पांडुरंग दातार; किहीम, सदाशिव गणेश जोशी; सातघर, मोरो रामचंद्र देवल; झालखंड, गोविंद महादेव सहस्रबुद्धे; कनकेश्वर, बाबाभटजी वैशंपायन; कनकेश्वर, महादेव भिकाजी पिंपुटकर; उंबरगाव या विभूती होत्या. श्री लंबोदरानंद स्वामीजींच्या मार्गदर्शनाने आणि या विभूतींच्या परिश्रमाने श्री राम सिद्धिविनायक मंदिर निर्जन स्थळी स्थापित करणे शक्य झाले. या विश्वस्त मंडळीपैकी रामचंद्र बापट हे सा. विवेकचे हितचिंतक आणि सद्यस्थितीत मंदिराचे कार्याध्यक्ष असलेल्या श्रीराम बापट यांचे खापरपणजोबा. स्वामीजींच्या गणेश उपासनेने आणि आध्यात्मिक प्रभावामुळे पंचक्रोशीतील लोकदेखील कनकेश्वर स्थापित श्री राम सिद्धिविनायक मंदिराकडे भक्तिभावाने येऊ लागले. या मंदिरासाठी श्रीराम बापट यथाशक्ती भरीव योगदान देत असतात.
देवस्थानाचे यंदाचे वर्ष हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पूजनीय लंबोदरानंद स्वामीजी 1903 साली समाधिस्थ झाले. देवालया शेजीरीच स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. धुंडिराज केशव फडके यांच्या कार्यकाळात उत्सवाची घडी मूळ नियमबुकप्रमाणे होईल असे जातीने पाहिले. या काळात कूळकायदा लागू झाल्याने मंदिराच्या उत्पन्नातही घट झाली. अशा प्रसंगी व्यावसायिक प्रवचनकार व कीर्तनकार बोलावणे आर्थिकदृष्ट्या कठीण झालेे. तेव्हा मुकुंदशास्त्री बापट, नाशिक (मूळ सातघर) यांनी प्रवचनकार व कीर्तनकार म्हणून दायित्व समर्थपणे स्वीकारले ते त्यांच्या मृत्यूपर्यंत.
मूळ देवालय चौसोपी घरासारखे होते. 1989 मध्ये देवालयाचा जीर्णोद्धार केला गेला. हे सर्व काम कै. नाना भावे यांच्या कारभारी पंच कार्यकाळात झाले. या कामात कै. ब.चिं.जोशी, वैभव जोशी, भालचंद्र फडके यांनी खूप मेहनत घेतली. विशेष म्हणजे भालचंद्र फडके यांनी डीझेलवर चालणारा क्रशर कनकेश्वर येथे नेऊन बांधकामासाठी लागणारी खडी तिथेच तयार केली. नवीन मंदिराचे नकाशे बाळ भावे (आर्किटेक्ट) यांनी बनवले होते. मंदिर संस्थानाचा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे, हा भविष्यवेध घेऊन वरद जोशी यांनी कायमनिधी ही अभिनव योजना राबविली.
कनकेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून कोणतेही दळवळणाचे साधन नसताना पायपीट करीत तब्बल 650च्या वर पायर्या चढून भक्त कनेकश्वराचा डोंगर चढून अजूनही जातात. अद्ययावत यंत्रणेच्या काळात डोंगर चढून गणरायाचे दर्शन घेणे ही एक साधना आहे, हाच भाव तेथील आलेल्या प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहर्यावर असतो. संस्थानाचा चोख कारभार पाहता आणि समाजाभिमुख धोरण पाहता गणेशभक्त सढळ हस्ते अर्थसहाय्य करतात. विश्वस्त मंडळापैकी काही मंडळींचे वारसदार पुष्टिपति जन्मोत्सव तसेच वर्षभरातील उत्सवादरम्यान आवर्जून येतात. प्रत्येकास भोजनाचा प्रसाद असतो. वार्षिकोत्सव असो की अन्य वर्षभरात होणारे कार्यक्रम, त्यासाठीचे नियोजन काही महिने आधीपासूनच केलेले असल्याने ते यशस्वीरित्या पार पडतात.
यंदा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने श्री ब्रह्मणस्पति सूक्त मंडल जप पार पडले, या वर्षाची सांगतादेखील श्री ब्रह्मणस्पति सूक्त मंडल जप करून होणार आहे. आध्यात्मिक साधनेसोबत समाजाभिमुख कार्य करण्याचा वसा संस्थानाने घेतला असून डॉ. हेडगेवार रूग्णालय आणि श्रीगुरूजी रूग्णालय येथे यथाशक्ती देणगी देण्याचा निर्णय संस्थानाने घेतला आहे. चौदा विद्या, चौसष्ट कलेचा अधिपती असलेल्या गणरायाच्या कृपादृष्टीने आणि श्री लंबोदरानंद स्वामीजींच्या आशीर्वादाने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवापर्यंतची आणि त्या पुढील वाटचाल निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास श्री रामसिद्धिविनायक संस्थानाच्या विश्वस्तांना आहे.