यश मिळविण्याच्या बाबतीतील गुणसंपदा अमेरिकेने संपादन केली, यश पचविण्यात अमेरिका अयशस्वी झाली. वेगवेगळ्या अध्यक्षांच्या रूपाने या घमेंडखोर अमेरिकेचा चेहरा जगासमोर यायला लागला. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका या युद्धात वीस दिवसांची शस्रसंधी झालेली आहे. या शस्त्रसंधीने डोनाल्ड ट्रम्प यांचे नाक कापले गेले आहे, हे मात्र स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धातील जागतिक खलनायक झालेले आहेत.
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबले आहे. वीस दिवसांची शस्त्रसंधी झालेली आहे. ही शस्त्रसंधी अनेक वर्षांसाठी असेल की, पुन्हा युद्ध सुरू होईल? हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. परंतु निश्चितपणे एक गोष्ट सांगता येते, ती म्हणजे, या शस्त्रसंधीने डोनाल्ड ट्रम्प यांचे नाक कापले गेले आहे. ’नाक कापणे’ हा वाक्यप्रयोग आपल्याकडे अब्रू घालविण्यासाठी वापरला जातो. डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धातील जागतिक खलनायक झालेले आहेत.
अमेरिकेचा इतिहास 250 वर्षांचा आहे. 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित झाला. हा दिवस अमेरिकन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला आता 250 वर्षे झाली आहेत. 1789 सालापासून अमेरिकेत अध्यक्षीय राजवट सुरू झाली. या राजवटीचे डोनाल्ड ट्रम्प हे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द अधिक उणे अशी राहिलेली आहे. इंग्रजीत He Also Ran असा एक वाक्यप्रयोग आहे. त्याचा अर्थ असा होतो, ज्याची लायकी नाही तोसुद्धा शर्यतीत धावला. अध्यक्षपदाची क्षमता नसलेलेदेखील अध्यक्ष झालेले आहेत, तो लोकशाहीचा चमत्कार असतो. अकार्यक्षम आणि अपात्र लोकांना निवडून देणे हा लोकमताचा गुणधर्म आहे, ज्याचा अनुभव आपण महाराष्ट्रात घेतलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन
https://www.vivekprakashan.in/product/dr-babasaheb-ambedkars-constitutional-thoughts/
डोनाल्ड ट्रम्प हे He Also Ran या श्रेणीतील राष्ट्राध्यक्ष आहेत. चाळीस दिवस चाललेल्या युद्धात ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इराणवर पडत होती, अमेरिकेच्या तळावरही पडत होती. त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांची मौखिक क्षेपणास्त्रेे रोजच्या रोज बाहेर पडत होती. पहिले क्षेपणास्त्र - मुकाट्याने शरण या. दुसरे क्षेपणास्त्रे -आठ दिवसांत युद्ध संपेल. तिसरे क्षेपणास्त्र-इराणचे नाविक दल आम्ही नष्ट केले आहे. चौथे क्षेपणास्त्र इराणची मारक क्षमता नष्ट झाली आहे. इराण संपला आहे, पाचवे क्षेपणास्त्र-इराणमध्ये सत्तापरिवर्तन होणार. डोनाल्ड ट्रम्प यांची ही सर्व मौखिक क्षेपणास्त्र दिवाळीत उडविणार्या रॉकेटसारखी झाली. ही रॉकेट आवाज करतात. उंच जातात. फुटतात. वेगवेगळ्या रंगाचे कारंजे निर्माण होते आणि राख जमिनीवर येऊन पडते.
डोनाल्ड ट्रम्प हे महासत्ता अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षाची भाषा अध्यक्षीय पदाला शोभेल अशी असावी लागते. डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा हिंदी सिनेमातील गुंड खलनायकदेखील जी भाषा वापरत नाहीत (वापरली तर ती, सेन्सॉर बोर्डाला सेन्सॉर करावी लागते. मी सेन्सॉर बोर्डावर असल्यामुळे हे लिहिले.) हा लेख लिहिण्यापूर्वी चार दिवस अगोदर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले ते इंग्रजीतच देतो. कारण त्याचा अनुवाद मराठी भाषेची प्रतिष्ठा कमी करणारा ठरेल. Tuesday will be Power Plant Day, and Bridge Day, all wrapped up in one, in Iran. There will be nothing like ti. Open the Fuckin Strait, you crazy bastards, or you'll be living in Hell - Just Watch. Praise to be Allah.
डोनाल्ड ट्रम्प आणखी एक वाक्य बोलले, ‘एका रात्रीत आम्ही इराणला संपवून टाकू शकतो. एक संपूर्ण संस्कृती एका रात्रीत मरण पावेल आणि या संस्कृतीचे पुनरागमन अशक्य असेल.’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीचा अर्थ असा की, इराणवर आम्ही अणुबाँब टाकून इराण बेचिराख करून टाकू. पोप लिओ 14 यांनीदेखील डोनाल्ड ट्रम्पच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अब्राहम लिंकन हेदेखील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष होते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी त्यांची झालेली भाषणे आजही वाचली असता, मन अंतर्मुख होते आणि काही वेळा शरीरावर रोमांच उभे राहातात. अडीच ते तीन मिनिटांचे त्यांचे गेटीस बर्ग भाषण जगातील सर्व भाषणातील कोहिनूर हिरा आहे. जे भाषण झाल्यानंतर श्रोते टाळ्या वाजवायला विसरले. का, श्रोत्यांनी टाळ्या वाजविल्या नाहीत? एकाने उत्तर दिले, ‘देवाच्या प्रवचनानंतर टाळ्या वाजविणे हा देवाचा घोर अपमान आहे.’ अशी उंची ज्या महापुुरुषाने रिपब्लिकन पक्षाला दिली त्याची प्रतिमा डोनाल्ड ट्रम्प रसातळाला घेऊन चाललेले आहेत.
थोडा अधिक खोलवरचा विचार करायचा तर, डोनाल्ड ट्रम्प ही एक व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. ते अमेरिकन प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात. ही प्रवृत्ती वर्चस्ववादी, अधिकारवादी, स्वत:ला अतिमहान समजणारी, स्वाभाविकपणे दुसर्याला अत्यंत हीन समजणारी, आम्हीच जगातील एकमेव लष्करी महासत्ता आहोत, आर्थिक महासत्ता आहोत, ज्ञानाची महासत्ता आहोत, याची घमेंड बाळगणारी ही मनोवृत्ती आहे. डोनाल्ड ट्रम्प या मनोवृत्तीचे नाव झालेले आहे.
सर्व काळ अमेरिकेची ही मनोवृत्ती होती, असे नाही. पहिल्या महायुद्धात अमेरिका उतरली. त्यामुळे जर्मनीचा पराभव झाला, आणि जगाच्या पुनर्रचनेचा विषय सुरू झाला. तेव्हाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे नाव होते, वुड्रो विल्सन. त्यांनी चौदा कलमी कार्यक्रम जीत राष्ट्रांपुढे ठेवला. पुन्हा जागतिक युद्ध नको म्हणून लीग ऑफ नेशन्सची संकल्पना ठेवली. दुसर्या देशांच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करता कामा नये. जीत प्रदेशातील लोकांना स्वायत्तता दिली पाहिजे. त्यांना ज्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत जगायचे आहे, याचा निर्णय त्यांना करू दिला पाहिजे. त्यांच्यावर लादवणूक करता कामा नये.
खर्या अर्थाने जागतिक शांततेसाठी आपले आयुष्य खर्च करणारे वुड्रो विल्सन होते. त्यांच्या कल्पनेतील लीग ऑफ नेशन्स (आजच्या युनोचे पूर्वरूप) अस्तित्वात आले. परंतु अमेरिकन जनमत जागतिक भानगडीत आपण पडू नये, असे असल्यामुळे अमेरिकेच्या काँग्रेसने, ‘अमेरिकेने लीग ऑफ नेशन्स‘मध्ये सहभागी होऊ नये असा निर्णय दिला. अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे तो अधिकार काँग्रेसला आहे. त्यामुळे अमेरिका सोडून लीग ऑफ नेशन्स अस्तित्वात आले. त्यामुळे ती दुर्बळ राहिली आणि तिला दुसरे महायुद्ध थांबविता आले नाही.
दुसर्या महायुद्धात पुन्हा अमेरिकेला उतरावे लागले आणि पुन्हा एकदा जर्मनी, जपानचा पूर्ण पराभव झाला. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध प्रचंड विध्वंस करणारे ठरले. युरोपच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिकेने पुढाकार घेतला. ‘मार्शल प्लॅन’ योजना तयार करून युरोपची पुनर्बांधणी करण्यासाठी अमेरिकेने अब्जावधी डॉलर्स खर्च केले. त्यामुळे अल्पावधीतच फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादी देश औद्योगिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहिले. त्यांचे सामाजिक जीवन स्थिर झाले. जागतिक नेतृत्वाला शोभेल असे काम अमेरिकेने केले.
याच काळात रशियाच्या विस्तारवादी कम्युनिझमच्या संकटाचे ढग युरोपच्या आकाशात गोळा होऊ लागले. रशियादेखील अण्वस्रसज्ज झाला होता. पूर्व युरोपातील लहानसहान देश त्याने गिळंकृत केले. कम्युनिझमचे साम्राज्य उभे केले. या साम्राज्याचा पश्चिम युरोपमध्ये विस्तार होऊ नये म्हणून अमेरिकेने ‘नाटो‘ नावाची संघटना उभी केली. पश्चित युरोपातील सगळे देश तिथे सभासद झाले. अमेरिकेने या सर्व देशांना अणुबाँबची छत्री दिली. युरोपमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ उभे राहिले. नाटोसारखे आणखी पाच करार आहेत, ज्याच्यात आशिया खंडातील देशदेखील सामील झालेले आहेत. लष्करीदृष्ट्या रशियाला घेरून टाकण्याचे काम या कराराने केले. रशिया पोलादी पडद्याच्या आड अडकला. आणि नंतर 1990 साली रशियन कम्युनिझमचे साम्राज्य कोसळले. 1945 ते 90 सालाच्या कालखंडाला शीतयुद्धाचा कालखंड म्हणतात. हे शीतयुद्ध अमेरिकेने फारसे रक्त न सांडता जिंकले.
अमेरिकेच्या दृष्टीने हा इतिहास अत्यंत गौरवशाली इतिहास आहे. रशिया कोसळल्याने जग हे एकधु्रवीय (युनिपोलर) जग झाले. अमेरिका जगातील एकमेव महासत्ता ठरली. लष्करी, आर्थिक आणि ज्ञानाची महासत्ता असे अमेरिकेचे रूप झाले. यश मिळविण्यासाठी सहनशक्ती लागते, कष्ट लागतात आणि योग्य प्रकारचे नेतृत्व लागते. यश पचविण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. नम्रता लागते आणि उदंड सहानुभूती लागते. यश मिळविण्याच्या बाबतीतील गुणसंपदा अमेरिकेने संपादन केली. यश पचविण्यात अमेरिका अयशस्वी झाली. वेगवेगळ्या अध्यक्षांच्या रूपाने या घमेंडखोर अमेरिकेचा चेहरा जगासमोर यायला लागले. पहिला चेहरा निक्सनचा आहे, नंतरचा चेहरा दोन बुश यांचा आहे, क्लिटंन हादेखील एक चेहरा आहे आणि आताचा चेहरा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे.
जागतिक शांततेचा भव्य ध्येयवाद उराशी बाळगणारे वुड्रो विल्सन किंवा आयसेनहॉवर हे एका बाजूला आणि जगाला बुडविण्याचा ध्येयवाद बाळगणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे विभाजन आहे. इराण युद्ध सुरू करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाचे हेतू मांडले. ते असे -
* इराणचे युरेनियम ताब्यात घेणे म्हणजे, इराणचा अणू कार्यक्रम संपवून टाकणे.
* इराणमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणणे. कट्टर इस्लामी राजवट संपवून उदारमतवादी लोकशाही राजवट आणणे.
* इराणची क्षेपणास्त्र क्षमता संपवून टाकणे.
* जहाजांची वाहतूक करणारी होर्मुझ खाडी मुक्त करणे.
* इराणने निर्माण केलेल्या दहशतवादी संघटना संपवून टाकणे.
आता युद्धविराम झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलेल्या उिंद्दष्टांचे काय झाले? यातील एकही उिंद्दष्ट सफल झालेले नाही. युद्धविरामच्या अटी इराणने घातलेल्या आहेत. इराणने युद्ध नुकसान भरपाई मागितली आहे. इराणी जनतेने राजवट बदलास अनुकूलता दाखविली नाही. युद्धविराम हा इराणचा जय आहे, असे इराणी जनतेला वाटते. आणि हा विजय साजरा करण्यासाठी इराणचे स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले. दूरदर्शनच्या पडद्यावर ही सर्व चित्रे झळकलेली आहेत. याला म्हणतात, डोनाल्ड ट्रम्प यांचे नाक कापणे.
संपूर्ण अमेरिकन जनमत डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात आहे, असे आपण म्हणू शकत नाही, परंतु अमेरिकेच्या 70-80 खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध महाभियोग चालवावा, अशी मागणी केलेली आहे. अमेरिकन जनतेने ‘नो किंग’चे बॅनर हातात घेऊन अमेरिकेच्या सर्व राज्यांत लाखोंच्या संख्येने निदर्शने केलेली आहेत. एका बाजूला इराण आहे. जिथे राजकीय मत एकच आहे. ते इराणच्या शासनाच्या मागे ठामपणे उभे आहे. इराणचे जनमत खामेनी सरकारविरुद्ध गेलेले नाही. त्याच्याउलट परिस्थिती अमेरिकेची आहे. राजकीय मत दुभंगलेले आहे, तसेच जनमतदेखील विभाजित झालेले आहे.
अब्राहम लिंकनचे वाक्य आहे, ‘ज्या घरात फूट आहे, ते घर टिकू शकत नाही.’ अमेरिकेची ही राजकीय फूट आणि जनमतातील फूट अमेरिकेपुढे असंख्य संकटे निर्माण करणारी ठरणार आहे. प्रत्येक युद्ध दोन गोष्टी करते. पहिली गोष्ट-प्रत्येक युद्ध जगाची पुनर्बार्ंधणी करते आणि दुसरी गोष्ट-पुढच्या युद्धाला जन्मास घालणारी पार्श्वभूमी तयार करते. या दृष्टीने या युद्धाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, ते पुढील अंकात बघूया.