वायूपुराण

विवेक मराठी    17-Apr-2026
Total Views |
LPG, PNG
 
@डॉ. बाळ फोंडके 
ऊर्जा ही आजच्या काळात अन्न-वस्त्र-निवार्‍याइतकीच महत्त्वाची गरज बनली आहे. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे गॅसचे पर्याय बदलत असून त्यामागं तांत्रिक आणि आर्थिक कारणं आहेत. एलपीजी आणि पीएनजी हे दोन्ही गॅस वेगवेगळ्या स्त्रोतांवर आधारित असल्यानं त्यांच्या उपलब्धतेत फरक दिसतो. जागतिक घडामोडींचा परिणाम एलपीजीसारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या इंधनांवर अधिक होतो. पीएनजी गॅस हा नैसर्गिक वायूवर आधारित असल्यामुळे तो तुलनेनं सुरक्षित आणि सातत्यानं उपलब्ध राहू शकतो. देशांतर्गत साठे आणि पायाभूत सुविधा यामुळे पीएनजीकडे झुकाव वाढत आहे. ऊर्जेच्या दृष्टीनं स्वयंपूर्णता साधण्यासाठी पर्यायी आणि स्थानिक इंधन स्रोतांना प्राधान्य देणं आवश्यक ठरतं.
LPG
 
अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, असं आपण समजत आलो आहोत. त्या तशा आहेतच. पण आज घडीच्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून त्यात ऊर्जा हिचाही समावेश करायला हवा. आपण म्हणजे मनुष्यप्राणी हा अन्न शिजवून खाणारा एकमेव प्राणी आहे. हे अन्न शिजवण्यासाठी चूल तर पेटायला हवी. अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत यासाठी कोळसा, केरोसीन वापरलं जात होतं. ग्रामीण भागात लाकूडफाटा किंवा शेणाच्या गोवर्‍या हेच सरपण असायचं. आजमितीला मात्र देशाच्या बहुसंख्य भागात यासाठी गॅसचाच वापर केला जातो. विशेषतः या चुली धूरविरहित असल्यामुळं अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक आहेत. शिवाय गॅसचा पुरवठाही पर्याप्त प्रमाणात होतो आहे.
 
 
अर्थात ज्याचा जास्त वापर होतो तो सिलिंडरमधून उपलब्ध होणारा एलपीजी वायूच आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी आता पाईपद्वारे पीएनजी गॅस उपलब्ध करून दिला गेला आहे. तिथं एलपीजी सिलिंडरचा वापर होत नाही. किंबहुना पीएनजीची जोडणी झाल्याबरोबर तोपर्यंत वापरले जाणारे सिलिंडर परत करण्याचं बंधनच घातलं गेलं होतं. परंतु मध्यपूर्वेत चालू असलेल्या युद्धापायी एलपीजीचा तुटवडा असल्याचं जनसामान्यांचं मत झालं आहे. ते चुकीचं आहे, तुटवडा नाही, ती केवळ अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, असंच सरकार वारंवार सांगत आहे. तरीही त्याच्या पुरवठ्यासाठी युद्धपूर्व काळापेक्षा जास्त वेळ लागत असल्यानं नागरिक या सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावत असल्याची दृश्यं सर्वत्र पाहावयास मिळत आहेत.
 
 
वास्तविक आखाती प्रदेशातलं हे युद्ध आपण सुरू केलेलं नाही. खरं तर आपला त्यात दूरान्वयानंही सहभाग नाही. तरीही त्याची झळ सर्व जगाबरोबर आपल्यालाही बसत आहे. आणि आता ती आपल्या स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचली आहे. यावर तोडगा म्हणून सरकारनं एलपीजीऐवजी पीएनजी गॅसला पसंती द्यावी, असा आग्रह धरला आहे. त्याची जोडणी जिथं आहे तिथं एलपीजी सिलिंडर मिळणार नाही. आहेत ते सिलिंडर परत करावेत अन्यथा त्यांचा पुरवठा बंद केला जाईल, असं फर्मानही काढलं आहे. एवढंच नाही तर जिथं या गॅसची जोडणी नाही तिथं ती तातडीनं देण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत.
 
 
तरीही एलपीजीचा तुटवडा आहे तर या गॅसचा का नाही, असा सवाल फडा काढून तुमच्या आमच्या मनात उभा राहिला असल्यास नवल नाही. त्याचं साधं आणि सरळ उत्तर आहे की हे दोन गॅस एकच नाहीत. ते वेगवेगळे आहेत. त्यांचं रासायनिक स्वरूप, तयार करण्याची पद्धत, गुणधर्म, उपयोग आणि मर्यादा निरनिराळे आहेत. त्यामुळं त्यांना एकाच मापानं तोलता येणार नाही.
 
 
लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस याचं लघुरूप एलपीजी हे आहे. त्या नावावरूनच स्पष्ट होतं की हा वायू पेट्रोलियमशी संबंधित आहे. आणि त्याचं वायरूपातून द्रवरूपात अवस्थांतर घडवून तो वितरित केला जात आहे . जेव्हा कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करून त्यापासून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांची निर्मिती केली जाते तेव्हा त्या प्रक्रियेचं एक जोड उत्पादन म्हणून हा वायू तयार होतो. तो खरं तर एकच वायू नाही. तर प्रॉपेन आणि ब्युटेन या दोन वायूंचं मिश्रण आहे. तो उच्च दाबाखाली ठेवला की त्याचं द्रवरूपात अवस्थांतर होतं. कोणताही वायू घ्या, त्याची घनता त्याच्याच द्रवरूपापेक्षा कमी असते. साहजिकच तो कितीतरी जास्ती जागा व्यापतो. आपल्या ओळखीचं पाणीच घ्या ना. पेलाभर पाणी, पण त्याला उष्णता देऊन त्याचं वाफेत रूपांतर केलं की ती खोलीभर पसरते. एलपीजीची बाबही वेगळी नाही. त्यामुळं त्याला जर सिलिंडरच्या मर्यादित जागेत साठवायचं तर त्याला द्रवरूप द्यायला हवं. त्यासाठी त्याच्यावर दाब टाकला जातो. त्याच उच्च दाबाखाली तो सिलिंडरमध्ये भरता येतो. आपण सिलिंडरची तोटी उघडली की तो दाब नाहीसा होतो आणि परत तो वायुरूप धारण करतो, आपल्या चुलीत शिरतो.
 
LPG 
 
 
एलपीजीचा उष्मांक जास्त आहे. म्हणजेच जास्ती उष्णता मिळण्यासाठी तो कमी वापरला तरी चालतं. घरगुती इंधनबचतीसाठी हे योग्य असल्यामुळंच स्वयंपाकासाठी तो अत्यंत कार्यक्षम ठरतो. त्याचे आणखीही फायदे आहेत. एकतर त्याची सहज वाहतूक करता येते, तो सिलिंडरमध्ये साठवता येतो आणि त्याचं ज्वलन तुलनेनं स्वच्छ असतं. तरीही मुळात तो एक जीवाश्म इंधन असल्यामुळं कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन करतोच. शिवाय त्याची घनता हवेच्या घनतेच्या दीडपट ते दुप्पट असल्यामुळं गळती झाल्यास तो जमिनीवरच साचून राहतो. तिथंच त्याचं ज्वलन होऊन आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची संभाव्यता वाढते. म्हणूनच वापरताना काळजी घेणं गरजेचं ठरतं. त्याची जोडणीही काळजीपूर्वक करावी लागते. आणि स्वयंपाकघरात योग्य वायुवीजन असणंही आवश्यक ठरतं. झालंच तर याच्या निर्मितीसाठी कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणावर अवलंबून राहावं लागतं. साहजिकच जर काही कारणांमुळं कच्च्या तेलाचा तुटवडा झाला, त्याची बाजारातली किंमत अव्वाच्या सव्वा वाढली किंवा शुद्धीकरणाच्या सुविधा कमी पडल्या की याचीही टंचाई भासू लागते.
 
 
पीएनजीची परिस्थिती याच्या उलट आहे. पीएनजी म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. हा नैसर्गिक वायू, म्हणजे मुख्यतः मिथेन आहे. त्याचं द्रवरूपात अवस्थांतर न करता वायूरूपातच तो पाईपलाइनद्वारे थेट घरांपर्यंत पोहोचवता येतो. अर्थात सिलिंडरची गरज राहत नाही. तोही कमी वापरात जास्ती उष्णता देतो. परिणामी स्वयंपाकासाठी हा अत्यंत सोयीस्कर ठरतो, गॅस संपण्याची चिंता नाही, बुकिंगची गरज नाही. पीएनजीचे फायदे म्हणजे सातत्यपूर्ण पुरवठा, एलपीजीसारखा त्याच्यावर अतिरिक्त दाब नसल्यामुळं तो सुरक्षित आहे. त्या व्यतिरिक्त त्याचं स्वच्छ ज्वलन होतं. कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन कमी होतं. परिणामी प्रदूषणाची समस्या उद्भवत नाही. हा वायू हवेपेक्षा हलका असल्यामुळं गळती झाल्यास तो हवेत पसरतो. हा वायू असा बहुगुणी असला तरी त्याच्या उपलब्धतेसाठी मोठं पायाभूत जाळं उभारावं लागतं, जे सध्या भारतात हळूहळू वाढत आहे. सद्य परिस्थितीत या सुविधेच्या स्थापनेवर सरकार विशेष भर देऊन त्याचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. शहरांमध्ये त्याचा प्रसार होत असला तरी ग्रामीण भागात तो अजून मर्यादित आहे.
 
 
आपल्या धरतीचं वय आजमितीला साडेचार अब्ज वर्षं आहे. यातला सुरुवातीचा तप्त वायूचा गोळा असण्याचा कालखंड सोडला तरी त्यानंतरच्या कोट्यवधी वर्षांमध्ये अनेक सागरी वनस्पती तसेच प्राणी यांचे अवशेष गाडले गेले आहेत. त्यांच्यावर नद्यांमधून येणारा गाळ, वाळू काही खडक येऊन पडले आहेत. त्यांचा असह्य दाब आणि भूमीगत कमालीची उष्णता यांच्या प्रभावाखाली यातील सेंद्रिय पदार्थांचं विघटन होऊन त्यातून मिथेन वायू तयार झाला आहे. तो या पृथ्वीच्या पोटातल्या खडकांच्या खाली अडकून पडला आहे. हे खडक जमिनीखाली आहेत तसेच सागरतळाच्या खालीही आहेत यातले काही कातळ सच्छिद्र आहेत. तसंच काहींच्यामध्ये फटीही आहेत. त्या रुंदावून या अडकलेल्या वायूला मोकळं करता येतं. आणि तो बाहेर काढता येतो. त्याचं द्रवरूपात अवस्थांतरही करता येतं. तसं केल्यास तयार होणारा एलएनजी हा तेलवाहू जहाजांमधून दूरवर नेता येतो. एरवी वायूरूपातच पाईपमधून त्याचं वितरण करता येतं. आपल्या घरात तो याच प्रकारे पुरवला जातो.
 
 
सच्छिद्र नसलेलेही काही खडक आहेत. त्यांच्या खालीही हा वायू, त्याला शेल गॅस म्हणतात, जखडला गेलेला आहे. त्या ख़डकांचं ड्रिलिंग केल्यास त्याला मोकळी वाट करून देता येते. तो जवळजवळ अमर्यादित असल्यामुळं त्याचा शोध लागला तेव्हा फार मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या. पण त्याच्या उत्पादनासाठीचं तंत्रज्ञान गुंतागुंतीचं असून अजूनही ते विकसित होत आहे. पण भविष्यात तो आपली ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करू शकेल अशी अपेक्षा आहे.
 
 
ग्रामीण भागात काही ठिकाणी बायोगॅसचा वापरही आता सुरू झाला आहे. हा थोडा वेगळा प्रकार आहे. तो शेण, खरकटं, अन्नाचा उरलेला भाग किंवा पिकाची कापणी झाल्यानंतर उरणारे शेतातील अवशेष यासारख्या सेंद्रिय कचर्‍यावर काही जीवाणूंच्या अभिक्रियेतून तयार होतो. त्यात 60 टक्के मिथेन व उरलेला 40 टक्के कार्बन डायऑक्साईड असतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो नवीकरणीय आहे आणि कचर्‍याचं व्यवस्थापनही करतो. ग्रामीण भागात तो स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. मात्र त्याचं उत्पादन स्थानिक पातळीवरच करावं लागतं. त्याची साठवण आणि वितरण मर्यादित आहे. त्याच्या मोठ्या प्रमाणावर वापरासाठी अजून तंत्रज्ञान विकसित होत आहे.
 
 
पीएनजीच्या वापरावर सरकार भर देण्याची दोन मुख्य कारणं आहेत. देशांतर्गत त्याचे मोठे साठे मिळालेले आहेत. ते भूमीगत तसंच सागरतळाशीही आहेत. कृष्णा-गोदावरी खोरं, मुंबई हाय आणि आसाम व राजस्थान इथं हे साठे सापडले आहेत. त्यातून 40 ट्रिलियन घनफूट इतका नैसर्गिक वायू मिळेल. देशाची निम्म्याहून अधिक गरज या देशांतर्गत उत्पादनातून भागवता येईल. त्या शिवाय आपण एलएनजी रूपात त्याची आयातही करत आहोत. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं पीएनजी रूपात अवस्थांतर करून वितरण केलं जातं. थोडक्यात या वायूच्याबाबतीत आपण बरेचसे आत्मनिर्भर आहोत. उलट एलपीजीसाठी आपण जवळजवळ पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत, मग ती थेट एलपीजीची असो की ज्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून त्याची निर्मिती होते त्या कच्च्या तेलाची असो. तेव्हा त्याच्याऐवजी आपण स्वयंपूर्ण असलेल्या पीएनजीवर भर देणं आपल्या एकंदरीत ऊर्जासुरक्षेच्या दृष्टीनं सूज्ञपणाचं ठरावं..