@ मंजुषा रेडगांवकर
लग्न झालं तेव्हा वय अगदी लहान होतं, संघ वगैरे समजून घेण्यासारखं ते वय नव्हतं. पण हेदेखील खरं की घरच्या कुणीही माझ्यावर कधीच संघाच्या कार्याची, विचारसरणीशी सहमत हो अशा प्रकारची सक्ती केली नाही. घरी येणार्या संघ स्वयंसेवकांच्या आचरणांतून त्यांना समजून घेत गेले. हळूहळू माझ्या विचारातदेखील खूपच बदल झाला आणि झपाटल्यासारखी संघाकडे ओढली गेले. ...आणि संघाच्या घ़राशी कधी समरस झाले ते कळलंदेखील नाही.
माझ्या माहेरी संघ या विषयाची गंधवार्तादेखील नव्हती. संघाचे लोकं म्हणजे अर्धी चड्डी घालून, हातात दंडुका घेऊन भल्या पहाटे शाखेत जाणारे, इतकीच काय ती माहिती होती. मनात हा भाव की, हे लोकं कुणास ठाऊक कशाला असले उपद्व्याप करतात. पण यापलीकडे मात्र काहीच नाही.
पण ज्याप्रमाणे सगळ्या मुलींचं लग्नानंतर आयुष्य पालटतं तसं माझंही हळूहळू पालटत गेलं. सासरी वेगळं वातावरण. यजमान फक्त संघ विचारसरणीचे होते. नियमित नाही; तरीही शाखेत जाणारे होते. सोबत ‘संघ शिक्षावर्ग’ प्रशिक्षितदेखील.
आता आली का पंचाईत, हे कसं जमायचं आपल्याला हा प्रश्न आ वासून उभा राहिला. मनात उगाचच संघाच्या लोकांविषयी आकस होता. (खरं तर अज्ञानातून निपजलेला)
लग्न झालं तेव्हा वय अगदी लहान होतं, हे सगळं समजून येण्यासारखं नव्हतं. पण हेदेखील खरंय की घरच्या कुणीही माझ्यावर कधीच संघाच्या कार्याची, विचारसरणीशी सहमत हो अशा प्रकारची सक्ती केली नाही.
घरी प्रचारकांचं येणं जाणं असायचं, सुरुवातीला घरात सासूबाई असल्यानं त्याच सगळं बघायच्या. मी मात्र त्यातून अलिप्तच राहिले. त्यावेळी का कुणास ठाऊक जर घरी कुणी प्रचारक आले, तर कपाळावर आठ्या यायच्या.
पण हळूहळू आकस कमी होऊन संघ वातावरणाशी स्नेहबंध निर्माण व्हायला लागला. ह्या गोष्टीचं श्रेय मात्र त्या सर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचं ंआहे, हे नक्की. घरी कुणीही प्रचारक, संघ अधिकारी येवो; प्रत्येक जण आल्यावर घरातील प्रत्येकाची अगत्यानं चौकशी करत. माझ्या लहान मुलीला सहज उचलून घेत. तिच्याशी तिच्याच भाषेत बोलत. हे सगळं मनाला स्पर्शून जायला लागलं.
खाण्याविषयी कधीच कुठली आवड नावड ह्यांच्यापैकी कुणी सांगितली आहे, असं आठवत नाही. घरात जो स्वयंपाक झाला असेल तो आनंदानं खाणारे, आवर्जून प्रत्येक पदार्थाची चव किती छान होती याचा उल्लेख करणारे, गृहस्वामिनीच्या कष्टाची जाणीव ठेवणारे प्रचारक सहजच सगळ्या घराशी(माझ्यासकट) आपुलकीनं वागणारे मनात हलकेच प्रवेश करते झाले. अशा प्रकारे हे स्वयंसेवक आणि प्रचारक म्हणजे काय रसायन आहे हे हळूहळू उमगायला लागलं.
मग मीही संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं हळूहळू सुरू केलं. विचारसरणी आणि कार्यपद्धती जशी जशी समजायला लागली, तसं मन संघात रमायला लागलं. कळत-नकळत कधी त्यात ओढले जाऊन समरसून गेले, ते माझं मलाच कळलं नाही.
एक प्रसंग आठवतो, आमच्या घरी निवासाकरता पहिल्यांदा विद्या भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष दीनानाथ बत्राजी व महेश शर्माजी जे त्यावेळेस विद्याशाखेचे प्रांत संघटन मंत्री होते, ते आले होते. (नंतर त्यांनी आदिवासी भागातील कार्याला वाहून घेतलं होतं) मला तर त्यांच्याविषयी अजिबात माहिती नव्हती. आज जाणवतंय की, ती किती मोठी माणसं आहेत. मात्र त्यावेळेस त्यांनी कधी एका शब्दानं वा कृतीनंदेखील आपलं मोठेपण जाणवू दिलं नव्हतं. (त्यातील माननीय महेशजी शर्मा यांना तर अलीकडेच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.)
सहज हसत खेळत गप्पा मारणं, घरात राहणं, वागणं, बोलणं इतकं नेटकं की कुठे बोट ठेवायला जागा मिळू नये. आहार-विहार आणि वेश अगदी सगळंच साधं.
त्यावेळी मी बँकेत नोकरी करायचे. मुलगी लहान होती. तिची शाळा, अभ्यास ह्या सगळ्या व्यापात पाहुण्यांना फार वेळ देता यायचा नाही. पण ही मोठी माणसं स्वतःच सगळी कामं करायला सुरुवात करत. मला अगदी कानकोंड व्हायला लागायचं. पण मदतीचा कुठलाही आव न आणता सहजपणं भाजी निवडून देण्यापासून ते पाट-पाणी( तेव्हा घरात डायनिंग टेबलाचा प्रवेश झाला नव्हता) घेणं, इतकंच काय खरकटी भांडीदेखील पटकन आवरून टाकायचे.
या सगळ्याचा मनावर खोलवर ठसा उमटला. त्या पाहुण्यांचा धाक कधी वाटलाच नाही. त्यांच्याविषयीचा आदर मात्र वाढीस लागला.
सरस्वती शिशु मंदिर कमिटीच्या बैठकी घरी व्ह्यायच्या, तेव्हा ही अशीच परिस्थिती. पटापट सगळे कामाला लागायचे.
इंदूरला आले असताना माननीय माजी खासदार(केंद्रीय मंत्री) स्वर्गीय अनिलजी दवे हेदेखील आवर्जून येत असत. तेव्हा ते प्रचारक होते आणि वनवासी भागातील समाज बांधवांचं धर्मांतरण होऊ नये याकरीता सतत प्रयत्न करत असायचे. इंदूर प्रांताचे विभाग प्रचारक रणवीर सिंग, महानगर प्रचारक अभय जैन यांचं येणं जाणं सुरू असायचं. अकस्मात भोजनाला येणं, जो काही स्वयंपाक घरात होत असेल ते आवडीनं खाणं हे सगळं सुरूच असायचं.
पण कधीच नोकरी करून आपण ही सगळी तारेवरची कसरत करतोय, असं जाणवलं नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे संघाच्या मुशीतून घडलेल्या या सर्व व्यक्तिमत्त्वांची सहजता.
मग मात्र माझ्या विचारातदेखील खूपच बदल झाला आणि झपाटल्यासारखी संघाकडे ओढली गेले. संघाचं समरसता संमेलन असो, संघ शिबिर असो, की कुठली बैठक असो, आता माझाही वावर सगळीकडे सहज व्ह्यायला लागला होता.
सर्व कॉलनीमधून पोळ्या गोळा करून पाठवणं, सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करणं हे हळूहळू अंगवळणी पडायला सुरुवात झाली आणि मग आठवड्यात कुणी घरी आलं नाही तर चुकल्या चुकल्यासारखं व्हायला लागलं.
नवर्याचं सतत घराबाहेर राहणं आता कटकटीचा किंवा वादाचा विषय राहिला नव्हता. उलट तो संपूर्ण घराच्या अभिमानाचा विषय झाला होता.
हळूहळू मीदेखील घडत होते, थोडी का होईना समंजस होत होते. संघाच्या कामाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवायला लागलं आणि मग घरासोबत मीदेखील संघाची होऊन गेले.
त्यातच प्रसंग उभा राहिला अयोध्येला कारसेवेला जाण्याचा. घरात सासूबाई होत्या, त्यांनी त्यांच्यापरीनं विरोध करण्याचा दुबळा प्रयत्न केला. थोडी भीती दाखवली पण संघाचे लोक अशा कुठल्याही धाकाला भीक घालतील तर मग ते स्वयंसेवक कसले? मी मात्र त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. (कदाचित ह्या प्रसंगात आपल्या नवर्याचादेखील सहभाग असावा, असं मनोमन वाटत होतं.)
एव्हाना मला ह्या सगळ्याची सवय झाली होती बहुधा. पण अयोध्येत कारसेवेला गेलेल्या सगळ्यांवर काय कठीण प्रसंग गुदरलाय हे बातम्यांच्या माध्यमातून कळत होतं. पण त्यावेळी कोण कुठल्या परिस्थितीत आहे हे कळायचा काहीच मार्ग नव्हता. अद्ययावत संपर्क माध्यमं नव्हती. घरी साधा फोनदेखील नव्हता, तर कळणार कुठून?
सगळीकडे ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सासूबाई काळजीत होत्या आणि मला बोल लावत होत्या, ‘तू त्याला थांबवलं नाहीस. आता आज चार दिवस झाले, तरी आपल्याला त्याची काहीच बातमी कळली नाही.’
माझाही धीर सुटायला लागला होता. कुठे जाऊ, कुणाकडे चौकशी करू काही कळत नव्हतं. पण मनात मात्र ठाम विश्वास होता की, प्रभू रामचंद्र ह्यांच्या कार्याला गेले आहेत-तेव्हा रामराया त्यांना सुखरूप घरी आणून सोडतील.
...आणि झालंही तसंच. शहरात सगळीकडे संचारबंदी घालण्यात आली होती. अचानक एक पोलीस वाहन दाराशी येऊन थांबलं. जवळपासचे सर्व लोक आपापल्या घरातून, गॅलरीत उभे राहून बघायला लागले होते. मीही सहजच बाहेर डोकावलं, तर समोरच गाडीतून उतरताना ह्यांना बघितलं. मग काय आनंदाश्रू आवरेनात. सासूबाईंच्या गळ्यात पडून पोटभर रडून घेतलं. तितक्यातच बाहेर गलका ऐकू आला. शेजारीपाजारी सगळे ह्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावायला अधीर झाले आहेत, असं दृश्य दिसलं आणि मी भरून पावले.
सासूबाई तर आपला राग विसरून लेकाची पंचारती ओवाळायला पुढे सरसावल्या. मागोमाग मीदेखील....! माझी लेक आपल्या वडिलांचा हा कौतुक सोहळा नवलानं बघत होती आणि बघता बघता घर संघाचं झालं....!!!