@ विनीता तेलंग
9890928411
संगीताच्या विशाल नभांगणात आशाताईंनी निर्माण केलेलं स्वतःचं स्थान म्हणजे त्यांनी अपार कष्टाने मिळवलेला स्वतःचा चंद्र आहे. चिमूटभर चांदण्यात समाधान मानणारी अल्पसंतुष्टता नाकारत जिद्दीने मिळवलेला पूर्णचंद्र! आशाताईंनी स्वरांचा असा आनंदलोक आपल्यासाठी निर्माण केला आहे की, जिथला चंद्र कधीच मावळत नाही!
‘प्रत्येकालाच कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात, ते न जमल्यास वेचायचे असते चिमूटभर चांदणे..’ अशी शांताबाईंची एक सुंदर कविता आहे. कलावंताच्या मनातली स्वतःचं स्थान निर्माण करण्याची आकांक्षा, त्यासाठीची त्याची धडपड, त्यात येणारं यश, आणि यश मिळालं नाही तरी धडपडीतला आनंद सांगणारी ही कविता. संगीताच्या विशाल नभांगणात आशाताईंनी निर्माण केलेलं स्वतःचं स्थान म्हणजे त्यांनी अपार कष्टाने मिळवलेला स्वतःचा चंद्र आहे. चिमूटभर चांदण्यात समाधान मानणारी अल्पसंतुष्टता नाकारत जिद्दीने मिळवलेला पूर्णचंद्र!
दीनानाथ मंगेशकर नावाच्या समृद्ध स्वरांगणात जन्मलेली पाच कलासक्त भावंडे. आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचं आहे याचा विचार मनात येण्याच्या आधीच हरपलेले पितृछत्र..दीदीने उचललेली जबाबदारी आणि पाहता पहाता तिच्या गायनाच्या कला अशा विकसत गेलेल्या की कधी न अस्त पावणारा पूर्णचंद्र तिने अंगणी आणून टांगलेला..तिच्या पाठीमागून चालू लागलेल्या हिने जाणले की आपल्यालाही असा चंद्र हवाय, आपला स्वतःचा. पण त्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं वेगळं आकाशही निर्माण करायला लागेल आणि तिने ते केले.
दीदी पहिल्यांदा शाळेत गेली तेव्हा हिला तिच्या कडेवर बसवून घेऊन गेली होती. ‘हिला शाळेत बसवता येणार नाही’ म्हटल्यावर दीदीनेही शाळेकडे पाठ फिरवली, असा तिचा हिच्यावर जीव! तीन नंबरची आशा लहानपणापासून धीट, बंडखोर खरेतर ‘वांड’ म्हणावे अशी! दादागिरी, मारामार्या करणारी, एकूण काय ‘मिळमिळीत अवघे त्यागावे, उत्कट भव्य तेची घ्यावे’ असं म्हणत जे हवं ते झगडून मिळवणारी. वयात आली आणि एका बेसावध क्षणी ‘मी माझ्या नशिबाची ’म्हणत त्या वर्णसठीच्या कहाणीतल्या मुलीसारखी आपले नशीब घडवायला, आपले आकाश शोधायला घरट्यातून उडाली. एक तप आपल्या नशिबाचे चटके सोसत राहिली. मात्र एका शुभक्षणी हाताशी दोन आणि पोटात एक अशा तीन मुलांना घेऊन ती ‘आपल्या’ घरी आली तेव्हा दीदीने अवाक्षर चौकशी न करता फक्त हात पसरले आणि त्या घरट्याने तिला पुन्हा आपल्या उबेत घेतले.
असंख्य अपमान, अवहेलना, वेदना या अनुभवांच्या गाठी पदराला मारलेल्या. तीन जिवांना सांभाळण्यासाठी ती पदर खोचून कामाला लागली. आईपणाला मागे ठेवून कामाला भिडणं सोपं नसणारच. पण आयुष्यानं तिला अनेक कडू घोट गिळायला शिकवलं आणि ती गाऊ लागली, गात राहिली. तिच्या घरात आणि तिच्या अवतीभवतीच्या गानविश्वात व्यापून राहिलेला आवाज होता साक्षात गानसरस्वतीचा. तिचा आणि आपलाही आब राखून स्वत:ला सिद्ध करणं सहजसाध्य नक्कीच नव्हतं. तुलना अटळ होतीच. ती सात्विक, ही राजस! तिचे स्वर दैवी, अप्राप्य हिचे मानवी, प्रयत्नसाध्य. पण तुलना मागे पडली आणि अखेरीस तिचे स्वतःचे आकाश तिने निर्माण केले ज्याला कोणतीच क्षितिजरेषा बंधन घालू शकली नाही. ना भाषेचे, ना गीत प्रकाराचे, ना तुलनेचे, ना वयाचे! ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल अशा अनवट वाटांवरून ती चालली.
समोर येईल ते आव्हान स्वीकारणारा विलक्षण मनस्वी स्वभाव, जगण्याचे सारे ऋतू, सारे सोहळे मनःपूतपणे उपभोगणारी देहस्वी वृत्ती, आणि कंठात वडिलांसारखाच लखलखीत, धारदार अन् तेजस्वी स्वर! सदासतेज, चिरतरुण, तिच्या मागून येणार्या नव्या पिढ्यांच्या बदलत्या अभिरुचीत सुद्धा टिकून राहणारा, आणि दु:खही सुंदर करणारा तिचा गळा तब्बल आठ दशके गात राहिला.जगात कुणीही केली नाहीत इतकी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम तिने केला. वीसेक भाषांमध्ये, सर्व काळातल्या सर्व महत्त्वाच्या संगीतकारांकडे, बारा हजारहून अधिक गाणी!
‘रे तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी’ म्हणत तिने जगण्याच्या सर्व उर्मींना निःसंकोचपणे बाहूत घेतलं आणि मराठी, मध्यमवर्गीय, बाळबोध मनांमधल्या अव्यक्त भावनांना आपल्या स्वरांमधून वाट करून दिली. मुंबईच्या चाळीतल्या दीडखणी खोलीत सुद्धा ‘हात चांदण्यांचा घेई उशाला..’ असं म्हणून शृंगार फुलवता येतो हे तिनंच दाखवलं! ‘कधी रे येशील तू’ म्हणताना वेगवेगळ्या रागांमधून वेगवेगळ्या भावनांचे विभ्रम तिने जिवंत केले,‘येणार नाथ आता’ म्हणताना तिच्या स्वरातून आनंदाचं कारंजं थुईथुई नाचलं. बाबूजींचे संगीत, गदिमा आणि खेबुडकरांचे शब्द आणि आशाचा स्वर या सर्वांनी मिळून मराठी सिनेसंगीताला जी गानसुधा पाजली, त्याची धुंदी अजूनही उतरली नाही! ‘धुंदी कळ्यांना’, ‘पान जागे फूल जागे’, ‘या मीलनी रात्र ही रंगली’, ‘स्वप्नात रंगले मी’‘रात्र चांदणी गंध चंदनी’, ‘डोळ्यांत वाच माझ्या’..एकापेक्षा एक अवीट गोडीची गाणी! मराठी असूनही हिंदीत आपले निर्विवाद स्थान निर्माण करणं हे एक वेगळं कर्तृत्व, पण मराठी चित्रसृष्टी, भावगीते, भावकविता यासाठी तिनं दिलेलं योगदान केवळ अमूल्य असं आहे. विशेष बाब अशी की स्वराचा तोच ताजेपणा, गाण्यातलं तेच परफेक्शन,‘ष-फडक्यांचा ष’ असं हसून म्हणत शुद्ध उच्चारांचा असलेला आग्रह, पुढच्या पिढीच्या संगीतकारांना अनुभवता आला. श्रीधर फडकेंसोबत अनेक नितांतसुंदर गाणी आशाताईने केली. ‘ऋतु हिरवा’, ‘फुलले रे क्षण माझे’ मधला तरुण ताजा प्रसन्न स्वर, ‘सांज ये गोकुळी’ मधली दिवस संपतानाची पूर्णता आणि व्याकुळता, ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले’ गातानाचा गंभीर स्वर आणि ‘साकार गंधार हा’ ऐकताना कानाला तृप्त करणारा दैवी गंधार!
आपण मराठी आहोत या भाग्याचा हेवा वाटावा अशी गाणी तिने लाडक्या ‘बाळ’सोबत केली. दोघांनी एकत्र केलेलं पहिलं गाणं ‘चांदणे शिंपीत जाशी’ ऐकताना दोघांकडे आलेला दीनानाथांचा वारसा लख्खपणे प्रतिबिंबित होतो. ‘गेले द्यायचे राहून’ सारखी कस पाहणारी गाणी गायली. बाळकडे ‘मलाच अशी अवघड अनवट गाणी का देतोस बरं’ अशी लटकी तक्रार करत तिने ‘जिवलगा’ गायलं, आणि त्या गीताला, स्वतःला आणि हृदयनाथांना अप्राप्य अशा उंचीवर नेऊन ठेवलं. ‘समईच्या शुभ्र कळ्या’ गातानाचा तिचा तो ज्योतीसारखा स्थिर शांत स्वर..‘मला हासूही सोसेना’ म्हणताना संयत पण खोलवर विद्ध झालेला स्वर! ‘दिन तैसे रजनी झाले गे माय’ म्हणताना पराकोटीचा आर्त आणि व्याकुळ होणारा स्वर..
सुरेश भटांनी तिच्यासाठी लिहिलेल्या ‘तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो’ या ओळी तिने शब्दशः सत्यात उतरवल्या. ‘केव्हातरी पहाटे’,‘तरुण आहे रात्र अजुनी’ अशा गीतांमधून दरवळणारा निखळ असा शृंगार कितीतरी कोमेजल्या मनांना टवटवी देणारा ठरला असेल. सिनेमा व अन्य माध्यमांतून पहावा लागणारा उघडावागडा, बटबटीत प्रणय दिसू लागण्यापूर्वी या गीतांमधून या तिघांनी शृंगाराला अक्षरशः दैवी पातळीवर नेऊन ठेवलं.
‘चांदण्यात फिरताना’ ऐकताना वाटतं, भटांनी तिच्यासाठीच, तिच्यावरूनच लिहिल्या आहेत या ओळी. सारं अवकाश कवेत घेईल अशा विशाल, दमदार मालकंसासारखा जिचा दमसास आहे आणि पारिजातकाच्या स्वर्गीय फुलासारखा जिचा स्वरस्पर्श अतीव नाजूक आहे, अशा आशाच्याच ओठी ‘श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात’ या ओळी शोभतात! तसं तर तिला शोभत नाही, जमत नाही असं काही नव्हतंच. तिनं ‘येगं येगं विठाबाई’ म्हटलं की वाटे हे लाडिक आर्जव ऐकून पंढरीनाथ विटेवरून उतरून, मातृवेश धरून भेटीला येतील! तिनं ठुमकत ‘बुगडी माझी सांडली गं’ गावं किंवा तडफेने ‘झाले युवतीमना’ गावं, गानरसिक तिचा शब्द न शब्द ऐकायला आतुर असत.

हिंदीत तर तिच्या गाण्यांनी शब्दशः धुमाकूळ घातला. ‘पिया तू’ पासून ‘हो जा रंगीला’ पर्यंत. तिच्या उत्कट अशा जीवनेच्छेमुळे जगण्याचा कोणताही रंग तिने वर्ज्य मानला नाही. उलट, एका अनिवार उत्कटतेने, अपार उत्सुकतेने तिने आपल्या स्वरदेहाने सारे अनुभव घेतले. क्लब साँग असूदे किंवा कॅबेरे, जो गीत प्रकार खुणावेल त्याला ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ म्हणत डोळे भिडवले आणि ‘दिलो जां लुटाने को जी चाहता है’ या वृत्तीने तिनं स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं.
‘एक सिर्फ हमीं है जो आंखोंसे पिलाते है’ म्हणत तिनं स्वरातून मदिरा लुटावी.. ‘अंबर की एक पाक सुराही’ मधून ‘घूंट चांदनी पी है हमने’ हे तिनेच म्हणावं! ‘कौनो ठगवा नगरिया लूटन हो’ म्हणताना आलेलं सैरभैरपण आणि ‘राधा कैसे ना जले’ म्हणत सवतीमत्सराचा ठसका दोन्ही तिनंच दाखवावं. रात्री उशिरापर्यंत तिनं ‘पिया तू अब तो आजा’ म्हणत जागवावं, आणि ‘भीनी भीनी भोर आयी..’ म्हणत तिनेच आम्हाला साखर झोपेतून जागं करावं. त्या पहिल्या ‘आह्’ साठी ‘छोड दो आंचल’ आम्ही पुन्हा पुन्हा, पिढ्यान पिढ्या ऐकावं, तिच्या लाडिक ‘अच्छा जी मैं हारी’ मध्ये विरघळून जावं! ‘ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा न घबराइये’ असं म्हटलं म्हणून धिटाईने त्या स्वरांच्या मागे मागे चालत रहावं आणि तिच्या ‘अभी ना जाओ छोडकर’ या हट्टाआधी जी समजूत ती घालते, त्या तिच्या स्वरातल्या आर्जवावर आम्ही जीव ओवाळावा.
पृथ्वीवरच स्वर्ग आहे असं वाटायला लावणार्या स्वराच्या ऋणातून कसं उतराई व्हायचं? ‘ती श्रेष्ठ का ही’ अशी चिकित्सा करण्यापेक्षा ती होती आणि ही सुद्धा होती म्हणून आपलं स्वरविश्व पूर्णतेला गेलं हे भाग्य लाखमोलाचं आहे. मर्यादापुरुषोत्तम आणि पूर्ण पुरुष दोन्ही अवतार वेगळे, त्यांचं प्रयोजन वेगळं, महत्त्व वेगळं. आशाच्या रूपात एक परिपूर्ण स्त्रीत्व पाहायला मिळालं. स्वयंसिद्ध आणि जगप्रसिद्ध गायिका, प्रेमळ आई, जीव लावणारी प्रेयसी, अन्यायाविरुद्ध लढणारी मानिनी, जगभर आपला ब्रॅन्ड उभा करणारी उद्योजक, रसरसरशीत जीवन जगणारी, उमदी, उत्फुल्ल, आनंदी, खोडकर पण जीवनाशी अत्यंत प्रामाणिक असलेली, आपल्या मनातली उमेद जागी ठेवणारी, अम्लान सुरांची सम्राज्ञी!
आत्ता आत्ता, कदाचित तिच्या अखेरच्या एका सोशल मीडिया मेसेजमध्ये तिनं म्हटलं,‘गाणं म्हणजे माझ्या जीवन नौकेचा नावाडी.त्यानेच मला पैलतीराला आणलं. गात गात पैलतीराला जाणं हाच माझा मोक्ष आहे. मग मी विश्वलयीशी एकरूप होईन. तिथल्या चिरंतन अशा स्वरलहरींमध्ये मिसळून जाईन..’
‘ओ निगाहे मसताना’साठी तिला फक्त हमिंगसाठी एस.डीं.नी बोलावलं तेव्हा तिनं विचारलं, ‘फक्त इतकंच गायचं?’ तेव्हा ते म्हणाले होते, ‘तुझ्या नुसत्या स्वरांनी या गीताला पूर्णता येणार आहे.’ तशी तिची स्वरकंपने आपल्याला कायमच जाणवत राहतील.आपल्या भावविश्वाला पूर्ण करत राहतील.
आपल्या स्वतःच्या हक्काचं आकाश मिळवून त्यात स्वत:च्या यशाचा पूर्णचंद्र तिने कायमचा अडकवून टाकला आहे.कुसुमाग्रजांच्या ‘आनंदलोक’ कवितेसारखा तिच्या स्वरांचा असा आनंदलोक ती आपल्यासाठी निर्माण करून गेली आहे, जिथला चंद्र कधीच मावळत नाही!