“सत्याचा शोध घेणे हे पत्रकारितेचे ध्येय आहे.”- प्रमोद बापट रा. स्व. संघ पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख

विवेक मराठी    18-Apr-2026
Total Views |
 
book
 
सा. विवेकचे माजी संपादक कै.राजाभाऊ नेने यांच्या स्मरणार्थ विवेक व्यासपीठ आणि कै. राजाभाऊ नेने स्मृती समितीच्या वतीने, पत्रकारितेत विशेष योगदान देणार्‍या पत्रकारांना कै. राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि विश्व संवाद केंद्र, पुणेच्या संपादक अंजली तागडे यांना देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या पुरस्कार सोहळ्याबरोबरच पद्मश्री रमेश पतंगे यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रमही झाला. पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट उपस्थित होते. तर पुस्तक प्रकाशनासाठी मुंबई विद्यापीठाचे आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग संचालक प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड आणि मुंबई महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सी.ए. प्रतीक कर्पे उपस्थित होते.
 
 
विवेक पुस्तक प्रकाशनने प्रकाशित केलेले ‘संविधान’ या विषयाशी संबंधित रमेश पतंगे यांचे हे दहावे पुस्तक. या पुस्तकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना संविधान साक्षर करण्याची ही मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. ही पुस्तके जशी सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत तशी ती चळवळीतल्या कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. त्याचबरोबर आपल्या मनोगतात त्यांनी बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर केलेल्या भाषणांच्या स्मृती जागवल्या. तसेच भारतीय राज्यघटनेतील 21 वे कलम किती महत्त्वाचे आहे हे उलगडून सांगितले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन
https://www.vivekprakashan.in/product/dr-babasaheb-ambedkars-constitutional-thoughts/ 
 
‘जेव्हा हिंदूंना वेद आणि वेदांताची गरज निर्माण झाली, तेव्हा त्यांनी हे काम महर्षी व्यासांना दिले. व्यास हे सवर्ण हिंदू नव्हते. जेव्हा हिंदूंना महाकाव्य हवे होते, तेव्हा हे काम महर्षी वाल्मिकींवर सोपविण्यात आले. तेदेखील सवर्ण हिंदू नव्हते. आणि जेव्हा संविधानाची गरज निर्माण झाली, तेव्हा हे काम मला देण्यात आले.’ हे उद्गार बाबासाहेबांनी ज्या प्रसंगी काढले, त्या प्रसंगाची आठवण सांगत पतंगे यांनी बाबासाहेबांच्या मनातल्या हिंदू धर्माविषयीच्या भावना अधोरेखित केल्या. ते पुढे म्हणाले की, ‘यातील मला समजलेला अर्थ असा की, आम्ही भारतीय आहोत. व्यास-वाल्मिकी आणि आंबेडकर मिळून आमचं भारतीयत्व निर्माण होतं.’
घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांबाबत आजकाल तावातावाने विशेषत: राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. या संदर्भात बोलताना पतंगे यांनी नमूद केले की,‘घटनेचा कोणताही मूलभूत अधिकार हा निरंकुश नाही. त्यांना योग्य मर्यादांची चौकट आहे. ही चौकट सांभाळत अधिकार उपभोगायचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे हे विसरता कामा नये. बोलण्याचे मूलभूत स्वातंत्र्य म्हणजे निरर्थक बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवावे.’
 
 
 
या प्रसंगी, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ या पुस्तकाचे सखोल विश्लेषण डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले. तर आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात अशा संदर्भ पुस्तकांचे मोल किती आहे हे सी.ए. प्रतीक कर्पे यांनी नेमके उलगडून दाखवले. आजच्या फेक नॅरेटिव्हच्या युगात अपप्रचार खोडून काढण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल असेही ते पुढे म्हणालेे.
 
 
book publish
 
‘सत्याचा शोध घेणे हे पत्रकारितेचे ध्येय आहे. राजाभाऊ नेने यांच्यासारख्या व्रतस्थ संपादकाचे स्मरण करणे म्हणजे सत्यबोधाचे स्मरण आहे. प्रत्येकाच्या मनात सत्याचा घोष निनादत ठेवण्याचे काम सा. विवेकने केले आहे. या पुरस्काराच्या रूपाने आज पुन्हा सत्याची घंटा निनादत ठेवली आहे’,अशा शब्दांत पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रमोद बापट यांनी पत्रकारितेचे महत्त्व व गरज सर्वांसमोर मांडली. तसेच महर्षी नारदांचे वचन उद्धृत करत त्यांनी पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव केला. ते म्हणाले,‘सत्य हे सत्य असते, ते कधीही बाधित होत नाही, कलंकित होत नाही. असे सत्य सांगणारी मंडळी आज सन्मानित झाली आहेत.’
पुरस्कार प्रदान केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर यांनी आपल्या मनोगतात साप्ताहिक विवेकला धन्यवाद दिले. तसेच, मूळच्या सामाजिक कार्यकर्त्याला पत्रकारितेच्या वाटेवर प्रोत्साहन देणार्‍या, मार्गदर्शन करणार्‍या व घडविणार्‍या पूर्वसुरींचे आभार मानले. पुणे येथील विश्व संवाद केंद्राच्या संपादक अंजली तागडे यांनी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त करत,‘हा पुरस्कार मला अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरणार आहे’,असे उद्गार काढले.
 
book publish 
 
वडाळा येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहात झालेल्या या संस्मरणीय सोहळ्याची सुरुवात सुधीर पाचपोर यांनी गायलेल्या संघगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक पुस्तक विभागाचे संपादक रवींद्र गोळे यांनी केले तर आभारप्रदर्शन साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केले. दोन्ही कार्यक्रमांचे नेटके, प्रभावी सूत्रसंचालन विवेक डिजिटल विभागाच्या बागेश्री पारनेरकर यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.