@डॉ. हेमंत बेडेकर
9767200905
बांबू उद्योगाच्या यशामागे भक्कम पुरवठा साखळी हीच खरी किल्ली ठरते. शेतकरी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि शासन यांच्या समन्वयातून कच्चा माल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांची अचूक सांगड घातली तर उद्योगाला गती मिळते. चीनने याच सूत्राचा अवलंब करत बांबू क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली, यातून शाश्वत विकास आणि ग्रामीण समृद्धीचा आदर्श उभा राहिला.
या आधी आपण चीनच्या बांबू उद्योगाची प्रगती कशी झाली हे पाहिले. कोणताही उद्योग उभा करताना उद्योजक काही मूलभूत विचार करतो. त्यामध्ये उद्योग प्रक्रियेचे तंत्रज्ञान, कच्च्या मालाची भक्कम पुरवठा साखळी, कुशल व अकुशल कामगार, आवश्यक मशिनरींची उपलब्धता, आपल्या उत्पादनासाठी उपलब्ध बाजारपेठ, विक्री व्यवस्था आणि आर्थिक पाठबळ या गोष्टी येतात.
बांबू लागवड करण्यापूर्वीच आपला हक्काचा ग्राहक कोण आहे, कोणत्या उद्योगाला किती कच्चा माल लागणार आहे आणि कमीत कमी वाहतूक खर्चात तो त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल, याचे नेटके नियोजन असेल तर उत्पादनापासून ते खात्रीशीर विक्रीपर्यंतच्या आर्थिक यशाची शाश्वत हमी देता येते. यासाठी सरकार, उद्योग आणि शेतकरी या तिन्ही स्तरांवर सक्षम समन्वय असणे ही काळाची गरज आहे. संशोधनावर आधारित उद्योगांची सखोल माहिती जेव्हा शेतकरी आणि उद्योजक दोघांनाही मिळते, तेव्हा कच्च्या मालाची उपलब्धता आणि उद्योगाची भरभराट या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात. विशेषतः नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना अशा दूरदृष्टीने केलेल्या नियोजनामुळे प्रगतीचे नवे आणि शाश्वत मार्ग खुले होतात. चिनी शेतकरी आणि उद्योजकांसाठी बांबू उद्योग तसा नवीनच होता. अशा परिस्थितीत, ऐंशीच्या दशकात बांबूची वाढती जागतिक मागणी ओळखून, त्यातील नफ्याच्या संधी आणि तांत्रिक माहिती उद्योजकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्यात आले
दीर्घकालीन शाश्वत उत्पादनांसाठी भक्कम पुरवठा साखळी प्रस्थापित असणे अवाश्यक आहे, हे समजून घेऊन त्याप्रमाणे पावले उचलावी लागतात. पुरवठा साखळी उभारताना आपण शेती उद्योगाशी निगडीत अशा बांबू उद्योगाचा विचार करतो आहोत, हे लक्षात घेऊन बांबूचा नियमित आवश्यक पुरवठा व्हावा व त्याचबरोबर पुढील काही वर्षांत वाढणार्या उद्योगांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने विचार करून लागवडीचे नियोजन करणे आवश्यक होते. याशिवाय कोणते उत्पादन देशासाठी आवश्यक आहे व आपल्याकडे काय होऊ शकते याची सांगड घालणे अत्यावश्यक आहे, याचे नियोजन काटेकोरपणे करून ते प्रत्यक्षात उतरवणे महत्त्वाचे असते. हे सर्व नियोजनकार, उद्योजक, शास्त्रज्ञ आणि मुख्य म्हणजे निर्मिती करणारा या सर्व घटकांनी एकत्र येऊन करावे लागते. जर एकदा हे नियोजन केले व त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले तर हे करताना बांबू लावल्यापासून 3 ते 4 वर्षानंतर आपल्याला त्याचे उत्पादन मिळेल हे लक्षात घ्यावे लागते. यासाठी कोणता बांबू, कोणत्या भागात व किती लागेल याचा अंदाज घेऊन किती लागवड व्हावी हे निश्चित करून संपूर्ण लागवड कार्यक्रम ठरवला जातो. हे सर्व चीन पहिल्यापासूनच यशस्वीपणे जमवत आहे. बांबू उद्योगात भरारी मारताना या गोष्टीला फार महत्त्व आहे.
तंत्रज्ञानाचे सुसंबद्ध अभिसरण
नवीन तंत्रज्ञान थेट शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे एक नियोजनबद्ध यंत्रणा राबवली जाते. यामुळेच, ’तयार झालेल्या बांबूचे मी काय करू किंवा तो कुठे आणि कसा विकू?’ असे प्रश्न चिनी शेतकर्यांना कधीच भेडसावत नाहीत. हे शक्य होते ते एका चोख नियोजनामुळे. बांबू लागवडीतील मूळ तंत्रज्ञान आणि त्यात काळानुसार होणारे नवनवीन बदल यांची इत्थंभूत माहिती शेतकर्यांना देण्यासाठी तिथे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणीही केली जाते. यामध्ये संपूर्ण देशाने, प्रांताने आणि स्थानीय अशा प्रत्येक स्तरावर कोणी कोणत्या पद्धतीने नवीन तंत्राचा वापर शेतकर्यांपर्यंत कसा पोहोचवायचा हे विविध स्तरावरची संशोधन केंद्रे चोख बजावतात. यामुळेच नवीन किंवा बदललेले तंत्र शेतकर्यांपर्यंत पोहोचवून तशी लागवड केली जाते. या सर्व योजनेत आलेले अनुभव खूप काही सांगून जातात. हे कसे केले जाते ते आता पाहू.
1) विविध स्तरांवरचा सहभाग - स्थनिक सरकारी संस्था, शास्त्रज्ञ, विविध उद्योग आणि शेतकरी हे एकमेकांच्या साहाय्याने या सर्व गोष्टी एकत्र येऊन प्रत्यक्षात अमलात आणतात.
2) तंत्रज्ञान शेवटच्या घटकांपर्यंत रुजवण्यासाठी, शास्त्रज्ञांकडून शेतकरी ते उद्योग असे तंत्र सुपूर्द करण्याचे विशेष करार केले जातात. यामध्ये कोणी कोणते काम कसे करावयाचे याचा नेमकेपणा ठरवला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही हेक्टरी उत्पन्न कमी येऊ नये याची काळजी घेतली जाते. कमी उत्पन्नाचा शेतकर्यांच्या उत्पन्नावर आणि उद्योगाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे; हे लक्षात घेऊन त्यासाठी काळजी घेतली जाते. यासाठी शास्त्रज्ञांनी घेतलेल्या परिश्रमांचा पुरेपूर मोबदला आधीच निश्चित केला जातो.
3) शेतकर्यांना नवीन तंत्र सहज सुलभतेने अवगत होण्यासाठी विविध कार्यशाळा घेतल्या जातात.
4) हे तंत्र शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रगत शेतकरी निवडून त्यांना आधी प्रशिक्षित केले जाते. हे शेतकरी त्यांच्या मित्रांना प्रोत्साहित करतात.
5) नवीन तंत्रज्ञान शेतात वापरल्यानंतर त्याचा खरेच परिणाम दिसतो का नाही यासाठी तंत्रज्ञ प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करतात. यशस्वी तंत्रासाठी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांना विविध रूपाने वेगवेगळे पुरस्कार दिले जातात.
या सर्वांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करणे हेही महत्त्वाचे असते.
चीनमध्ये सर्व जमिनी शेतकर्यांना करारावर दिल्या जातात. बांबू शेतामध्ये लागवडीनंतर 30 ते 40 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त रहाणारे आहे हे लक्षात घेऊन 30 ते 50 वर्षांचे करार केले जातात. त्यामुळे शेतकरी ही जमीन दीर्घकाळ आपल्याकडे राहणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नेटाने कामाला लागतो.
पडीक किंवा वरकस जमिनीत बांबू चांगला येतो, हे लक्षात घेऊन अशा पडीक जमिनींचे करार केले गेले आणि त्यावर बांबू लागवडीस प्रोत्साहन दिले गेले. याचवेळी जुनी नैसर्गिक लागवड त्याला जोडून दिली. त्यामुळे जुनी लागवडही फायदेशीर ठरली. बँकांनी अशा लागवडीसाठी व त्यावरच्या बांबू आधारित उद्योगासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले. हे कर्ज देताना कमी उत्पन्न देणार्या नैसर्गिक बांबू क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांचाही विकास केला गेला.
यशस्वी शेतकरी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ अशा सर्वांना विविध स्वरूपात बक्षिसे दिली जातात. भविष्यातील मध्यम व दूरवरच्या उद्योगांचा विचार करून त्या अनुषंगाने धोरणे आखली जातात. आर्थिक तरतूद केली जाते. 2002 सालापर्यंत निर्यात केलेल्या बांबू उत्पादनांवर निर्यात उत्पन्नाच्या 8 ते 10 टक्के कर भरावा लागायचा. त्यांनतर हा कर माफ करण्यात आला. आता सर्वच नवीन बांबू उद्योगांना पहिली तीन वर्षे कर माफ करण्यात येतात.
या सर्व योजना आणि धोरणे यांचा एकत्रित परिणाम म्हणून बांबू उद्योग भरभराटीला आला.
अशी एक वाटचाल
बांबूची औद्योगिक वाटचाल पाहता, 1980 सालापर्यंत बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी प्रामुख्याने हाताने चालणारी छोटी हत्यारे वापरली जात असत. सुतारकामासाठी उपयुक्त असलेली ही हत्यारे त्या काळातील मर्यादित उत्पादनासाठी निश्चितच चांगली होती. मात्र, जेव्हा बांबूचा वापर मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादनासाठी सुरू झाला, तेव्हा या हत्यारांची मर्यादा स्पष्ट झाली. त्यांची निर्मिती क्षमता खूपच कमी असल्याने वाढत्या मागणीपुढे ती अपुरी ठरू लागली.
औद्योगिक उत्पादनाच्या सुरुवातीच्या काळात एक मोठी तांत्रिक त्रूटी होती. शेतातून कापलेला अखंड बांबू शहरांमधील कारखान्यांमध्ये नेला जाई आणि तिथेच त्यावर प्रक्रिया होत असे. बांबूचा वाकडा भाग कापणे, साल काढणे, तुकडे करणे आणि पट्ट्या काढणे ही सर्व कामे तिथे अकुशल कामगारांकडून करून घेतली जात. या प्रक्रियेत एक मोठी समस्या अशी होती की, आणलेल्या एकूण बांबूपैकी केवळ 20 टक्के भाग वस्तू बनवण्यासाठी वापरला जाई. उर्वरीत 80 टक्के भाग (भुसा, साल, पेरे) हा वाया जात असे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो पुन्हा शेतात नेण्यावर वाहतुकीचा मोठा खर्च होत असे. यामुळे उत्पादित वस्तूंची किंमत अनावश्यकरीत्या वाढत होती.
या समस्यांवर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला एक प्रभावी तोडगा निघाला. वाया जाणारा 80 टक्के बांबू हा प्रत्यक्षात दुसर्या उद्योगांसाठी उपयुक्त कच्चा माल ठरू शकतो, हे लक्षात आले. व्यावसायिकांनी एक नवी रणनीती आखली-जिथे बांबू पिकतो, तिथेच जर प्राथमिक प्रक्रिया केली, तर वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचवता येईल. या विचारातूनच ’शेतकरी ते उद्योजक’ हे क्रांतिकारी मॉडेल आकारास आले. या रचनेत शेतकरी आणि उद्योजक यांनी एकत्र येऊन परस्परांच्या फायद्यासाठी काम करण्याचे ठरवले.
या नव्या व्यवस्थेनुसार, उद्योजकांनी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि आर्थिक मदत पुरवायची आणि शेतकर्यांनी दर्जेदार बांबू पिकवून त्यावर प्राथमिक प्रक्रिया करायची, असे निश्चित झाले. ग्रामीण भागात, प्राथमिक प्रक्रिया केंद्राच्या 30 ते 40 किलोमीटर परिसरातील बांबूवर तिथेच प्रक्रिया होऊ लागली. उपयुक्त 20 ते 30 टक्के कच्चा मालच फक्त मुख्य कारखान्याकडे पाठवला जाऊ लागला आणि वाया जाणारा 70 ते 80 टक्के भाग तिथेच स्थानिक स्तरावर राखून ठेवला गेला.
या निर्णयाचा परिणाम अत्यंत सकारात्मक झाला. उद्योगांना त्यांचा कच्चा माल निश्चित वेळेत आणि आवश्यक प्रमाणात मिळू लागला, ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी घट झाली. त्याचबरोबर, जो भाग पूर्वी वाया जात असे, त्यातून पार्टिकल बोर्ड, किचनवेअर (चमचे, ताटल्या) यांसारख्या नवीन वस्तू बनवण्याचे तंत्र विकसित झाले. यामुळे उद्योगांना मनुष्यबळ आणि वाहतुकीत बचत करता आली, तर शेतकर्यांना उत्पन्नाची खात्री मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
1980 ते 1990 या दशकात घडलेल्या या बदलांमुळे हे मॉडेल अत्यंत यशस्वी ठरले. जे शेतकरी सुरुवातीला या व्यवस्थेत नव्हते, त्यांनीही स्वतःची प्रक्रिया केंद्रे सुरू केली, ज्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा अधिक वाढला. उद्योजकांना आता पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी जास्त कच्चा माल उपलब्ध होऊ लागल्याने उद्योगांची भरभराट झाली. याच प्रक्रियेचे रूपांतर पुढे ’शेतकरी प्राथमिक प्रक्रिया केंद्र कंपनी’ या मॉडेलमध्ये झाले, याविषयी आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊया.
कच्च्या मालाची पुरवठा साखळी उत्तम प्रकारे तयार होण्यामध्ये आणखी एका घटकाचा फार मोठा हातभार लागला. प्राथमिक प्रक्रिया केंद्राच्या निर्मिती वेळी अनेक स्वयंसेवी खाजगी संस्थांनी मोठे योगदान दिले. त्यामध्ये चीनच्या वनविभागाच्या संशोधन संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबर चीनची बांबू सोसायटी, घराभोवतीची 10 बेटे असणार्या संस्थेनी प्रचंड मदत केली. अजूनही ही प्रथा चालू आहे. दर दोन वर्षांनी चीनमध्ये बांबू सांस्कृतिक उत्सव आयोजित केला जातो. यावर्षी गेल्या दोन वर्षांतील तयार झालेले नवीन तंत्रज्ञान आणि देशातील आणि विदेशातील नवनवीन संधींची माहिती दिली गेली. ‘घराभोवतीची 10 बेटे’ या संस्थेच्या माध्यमातून शेतीतील यशोगाथा व शेतकर्यांचे प्रबोधन यांवर खूप चर्चा होतात. अशासकीय संस्थांमधून शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाते तसेच उद्योग आणि शासन यांनाही आपल्या निर्णयामध्ये बदल करून सुधारणा करण्याची संधी मिळते. या संस्था जगभरातल्या नवीन तंत्रज्ञानाची आणि उपलब्ध होऊ घातलेल्या नवीन बाजारपेठाबद्दल माहिती देतात. अशासकीय संस्थांबरोबर शेतकरी, उद्योजक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि शासकीय अधिकारी काम करतात.
बांबू उत्पादन करणार्या प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था, प्रांतिक मंडळ, खाजगी संस्था आणि देशव्यापी योजनाकार यांना आपल्या योजना बनवताना आपले जुने अनुभव, मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय साधताना उद्योजक आणि शेतकरी यांच्या समस्यांचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा योजना ठरवून बांबू उद्योगाचा विकास केलेला आहे. शासनाने घेतलेला पुढाकार आणि त्याला उद्योजक, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी दिलेले सहकार्य खूप मोलाचे ठरले आहे.
सारांशाने सांगायचे झाले तर चीनमधल्या बांबू उद्योगाची अतिशय वेगाने झालेली शाश्वत प्रगती होताना पुढील महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश होतो. पहिला म्हणजे उद्योगाची वाढ होण्यासाठी अशी धोरणे आखायला हवीत की ज्यामुळे उद्योग, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचा सक्रिय सहभाग असेल. दुसरा म्हणजे शासनाने तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचा आदर राखून बांबू उद्योग आणि बांबू शेती यांच्या वाढीसाठी योग्य ते भरीव प्रयत्न केले जावेत. यामुळे शासनावरील विश्वास वाढून नवनवीन उत्पादनांची निर्मिती होते व तंत्रज्ञान विकसित होते. साहजिकच पुरेसे बांबू उत्पादन, त्याचा पुरवठा साखळीतील सहभाग व उद्योजकांनी दाखवलेली उभारी यामुळे निर्मिती सहज सुलभ होते.
तिसरा म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उद्योगांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असतो. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानाचे भरीव योगदान आणि विश्वासाने शेतकर्यांनी केलेले बांबूचे उत्पादन हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहे. याची जाणीव ठेवून शासकीय निर्णय झाले. म्हणूनच जगभरामधल्या बांबू उत्पादनामध्ये चीनचे योगदान साध्य होऊ शकले. बांबू उत्पादन आणि उद्योगामधून शेतकर्यांना उत्पन्नाची खात्री व उद्योगाला हवा असलेला कच्चा माल या पुरवठा साखळीमधील दोन्ही टोकांचा उत्तम समन्वय साधला गेला. याचा परिणाम म्हणून चीनच्या शाश्वत बांबू उद्योगामध्ये ग्रामीण भागांमध्ये शाश्वत अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला. शतकाच्या पहिल्या दशकात. अंदाजे चार ते पाच दशलक्ष शेतकरी यामध्ये सहभागी झाले. त्यातील सुमारे 80 टक्के बांबू लागवडीमध्ये सहभागी झाले. 10 टक्के शेतकरी प्राथमिक प्रक्रियामध्ये आणि पाच टक्के शेतकरी वाहतूक व बांबू व्यापार यामध्ये सहभागी झाले. तसेच या योजनाबद्ध पद्धतीने आखलेल्या कार्यक्रमाच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे दर हेक्टरी तयार बांबूचे आणि प्रक्रियासाठीचे कोंब यांची विक्रमी निर्मिती होऊ शकली.
बांबू हा पर्यावरण दृष्टीनेसुद्धा खूप उपयुक्त घटक आहे. त्याचे आणि माती संवर्धनासाठी प्रचंड योगदान आहे. या लागवडीचा वापर करून कृषी पर्यटनामध्ये मोठी वाढ चीनमध्ये होऊ शकली. या सर्वांची गोळाबेरीज म्हणून बांबू उत्पादक प्रदेशातील शेतकर्यांच्या दरडोई उत्पन्नामध्ये 10 वर्षांत 40 टक्के फरक पडला. स्वतःच्या खेड्यामध्ये उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध झाला. या देशातील शेती उत्पादनामधून प्रचंड प्रमाणात रोजगारनिर्मिती, उद्योगासाठी खात्रीशीर कच्चा माल पुरवठा आणि अंतिमत: देशाच्या सकल उत्पन्नात पडलेली प्रचंड भर हे चीनच्या बांबू उद्योगाचे फलित आहे.
- संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.
venu.vedh25@gmail.com