पंचायतन पूजेचे प्रर्वतक आद्य शंकराचार्य

विवेक मराठी    21-Apr-2026   
Total Views |
 
adi shankaracharyaadi shankaracharya
 
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले, अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आणि संन्यास धर्माचे महत्त्व वाढणारे आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी अलौकीक कार्य केले आहे. या भारतमातेच्या सुपुत्राला अभिवादन करणारा लेख..
 
 
भारताच्या आध्यात्मिक इतिहासात असंख्य ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांनी हिंदू धर्मासाठी, रक्षणासाठी अलौकीक कार्य केले आहे. त्यामुळेच त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यामध्ये एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे आद्य शंकराचार्य! या महापुरूषाने आपल्या 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले आहे. त्यामागे त्यांची केवळ वैयक्तिक प्रतिभा नव्हती, तर त्याला एक वैचारिक आधार होता.
 
 
इ.स. आठवे शतक हे भारताच्या धार्मिक उलथापथीचा कालखंड मानले जाते. बौद्ध धर्म आणि जैन पंथांनी भारतात आपली खोलवर मुळे रोवली होती. वेदांवर आधारित धर्मव्यवस्था अनेक ठिकाणी केवळ कर्मकांडात अडकली होती, तर काही ठिकाणी तिच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होत होता. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजात एक प्रकारची धार्मिक गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याचा फायदा काही इतर पंथातील पांडितांनी घेऊन हिंदूधर्मावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. याला तत्कालीन समाज बळी पडत चालला होता. अशा वेळी आवश्यक होती ती संतुलित दृष्टीकोन ठेवून वेदांचे प्रामाण्य टिकवून ठेवेल व हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करू शकेल अशा एका नेतृत्वाची, यासाठी कुमारिल भट्ट यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कुमारिल भट्ट हे या काळातील पहिले महान योद्धे म्हणावे लागतील की त्यांनी या विरोधात पहिले पाऊल उचलले. इतर पंथांच्या तत्त्वज्ञानाला त्यांनी केवळ धार्मिकच नव्हे, तर तर्कशास्त्रीय पातळीवर आव्हान दिले. वेदांविषयी असलेला संशय दूर करणे आणि वैदिक कर्मकांडाची सामाजिक व धार्मिक उपयुक्तता सिद्ध केली. त्याचबरोबर कुमारिल भट्टांनी वैदिक धर्माचा पाया पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अनेक सभा, विचारमंथन, धर्मसभांमधून पांडित्य केले. पांडित्यांत त्यांचा विजय झाला. पण ते विचार मान्य केले गेले नाहीत. इतका पगडा बौद्धधर्मांतील पांडित्यांचा होता की, तत्कालीन राजांनाही कुमारिल भट्टांच्या तत्त्वाज्ञानाला, विचारांना स्थान देता आले नाही.
 
आद्य शंकराचार्य यांचा उदय
 
इतर पंथांच्या विचारांची पकड निर्माण झाला होती. भारतीय वैदिक हिंदू संस्कृतीकडे दुर्लक्ष होत होते. अशा धार्मिक अंधारमय कालखंडात आद्य शंकराचार्य यांचा उदय झाला. त्यांनी कुमारिल भट्टांनी उभारलेल्या वैदिक पायावर शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताची भव्य रचना उभी केली. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता, अद्वैत वेदांत! ‘ब्रह्म सत्य, जग मिथ्या‘ या सूत्रातून त्यांनी जीवन आणि विश्वाचे अद्वैत पटवून दिले. आत्मा आणि ब्रह्म यांची एकता सांगून त्यांनी आध्यात्मिक अनुभवाला सर्वोच्च स्थान दिले. ही केवळ तत्त्वज्ञानाची मांडणी नव्हती, ही वैचारिक क्रांती होती. त्यांचे हे तत्त्वज्ञान सर्वसामन्यांना तितकेच रुचले. इतर पंथातील विचारांना एक प्रभावी पर्याय उभा केला होता.
 
 
आद्य शंकराचार्यांनी कुमारिल भट्ट यांची भेट घेतली. त्यावेळी कुमारिल भट्ट स्वतःच्या आयुष्यात प्रायश्चित्तात घेत होते. आपल्या तत्त्वज्ञानाला कोणी जुमानत नाही. म्हणून ते भाताच्या तुसात आत्मदहन करत होते. असंख्य लोक त्यांचे हे आत्मदहन पाहण्यासाठी येत असत, त्यांना समजावत पण भट्ट मात्र आत्मदहनापासून पराववृत्त होत नव्हते. याचवेळी आदि शंकाराचार्य तेथे पोहोचले, त्यांनी हे सर्व पाहिले, त्यांच्याशी संवाद साधला, यातून एका भविष्यातील मोठ्या वैचारिक लढ्याचा जन्म झाला. यातून हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचा पाया रचला गेला. याचवेळी भट्ट यांनी शंकराचार्यांना आपले शिष्य मण्डन मिश्र यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. शंकाराचार्य त्यांच्याकडे गेले. सखोल चर्चा झाली, वाद विवाद झाले, त्यातून कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय घडून मण्डन मिश्रांनी शंकराचार्यांचे शिष्यत्व स्वीकारून सुरेश्वराचार्य म्हणून नवीन अध्याय सुरू केला. ही एक अद्भूतच घटना घडली होती.
 
 
पुनरुज्जीवनाची व्यापक चळवळ
 
आदि शंकराचार्यांचे कार्य केवळ ग्रंथरचना किंवा वादविवादापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आसेतु हिमाचल भारतभ्रमण केले. हे भ्रमण हिंदू धर्माच्या पुनज्जीवनाचा एक महत्त्वाचा कालखंड मानला जातो. या दरम्यान त्यांना अनेक गोष्टी ज्ञात झाल्या त्यावर त्यांनी आसूड ओढले. त्यात त्यांना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे शैव आणि वैष्णव यामध्ये झालेली हिंदू धर्माची विभागणी. शैव उपासक लोक आणि वैष्णव उपासक यांच्यामध्ये वाद विकोपाला गेले होते. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी पंचायतन पूजन दिले. म्हणजेच शिव (भगवान शंकर), विष्णू (भगवान नारायण), देवी (अंबा, दुर्गा माता), सूर्यदेव आणि गणपती यांचे पूजन करण्याचे आवाहन केले. याला लोकांचाही चांगला प्रतिसाद दिला. वाद संपुष्टात येण्यास मदत झाली. अशा प्रकारे हे हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाचे एक महत्त्वाचे पाऊल ठरले. त्याच बरोबर त्यांनी चार दिशांना मठ स्थापन केले. शृंगेरी मठ, द्वारका मठ, पुरी मठ आणि ज्योतिर्मठ हे मठ केवळ धार्मिक केंद्र नव्हते, तर ज्ञान, साधना आणि परंपरेचे संवर्धन करणारी संस्थान होत.
 
 
आईसाठी संन्यास धर्माचा त्याग
 
आद्य शंकराचार्य यांनी आपल्या आईसाठी (आर्यांबा) संन्यास धर्माचा पूर्णपणे त्याग केला नव्हता, परंतु संन्यासाचे नियम पाळून त्यांनी आईला दिलेले वचन पूर्ण केले. आद्य शंकराचार्यांनी यांनी आईला संन्यास घेण्यापूर्वी वचन दिले होते की, मी तुझे अंत्यसंस्कार करण्यासाठी येईन. त्यानुसार ते आले होते. त्यावेळी तत्कालीन समाजाने त्यांना विरोध केला. शंकाराचार्यांनी तो विरोध पत्कारून आईचे अंत्यसंस्कार केले. यातून त्यांनी एकच संदेश दिला की, संन्यास हा कपड्यात नसतो, संन्यास याचा अर्थ प्रेमशून्यता नाही हेच त्यांनी यातून दाखवून दिले.
 
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले., अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आदि शंकराचार्य यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
संदर्भ -
1) संस्कृती पूजन
2) मराठी विकीपीडीया