सीए वैभव देवधर - 8975321606
राष्ट्र किंवा राज्याच्या आत्मनिर्भरतेची घोषणा उत्पादन आणि निर्यातीतून होत असली, तरी तिचे खरे अधिष्ठान 'वित्तीय सक्षमीकरणात’ असते. महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक शक्तीपीठ असले, तरी या प्रगतीचा खरा सारथी इथली गतिमान 'बँकिंग प्रणाली’ आहे. सार्वजनिक, सहकारी आणि खाजगी बँकांच्या त्रिवेणी संगमातूनच राज्याची आर्थिक घोडदौड सुरू आहे. बँका केवळ भांडवल पुरवणार्या संस्था नसून त्या अर्थव्यवस्थेला शिस्त आणि दिशा देणार्या ’सह-निर्मात्या’ आहेत. उद्योग आणि बँकिंगमधील हे अतूट नाते ‘आत्मनिर्भर महाराष्ट्रा’चे स्वप्न कसे साकारत आहे, याचा वेध घेणारा हा विशेष लेख.
आत्मनिर्भरतेची चर्चा आपण बहुतेक वेळा उत्पादन, निर्यात किंवा स्थानिक उद्योगांच्या संदर्भात करतो; परंतु तिची खरी सुरुवात वित्तपुरवठ्यापासून होते. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ या संकल्पना केवळ औद्योगिक विस्ताराच्या घोषणांपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या आर्थिक स्वायत्ततेच्या आणि स्थैर्याच्या दृष्टीनेदेखील अत्यंत मूलभूत आहेत. मात्र, या संकल्पनांच्या केंद्रस्थानी असलेला एक प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो; आत्मनिर्भरतेला आवश्यक असलेला वित्तीय पाया कोण घडवणार?
उद्योग उभारणे, विस्तार करणे किंवा अडचणीतून पुन्हा उभे राहणे या प्रत्येक टप्प्यावर भांडवलाची उपलब्धता, त्याची किंमत आणि त्याचे वेळेवर वितरण हे घटक निर्णायक ठरतात. याचा अर्थ असा की आत्मनिर्भरतेचा पाया उत्पादन क्षमतेबरोबरच वित्तीय सक्षमतेतदेखील आहे. आत्मनिर्भरतेचा प्रश्न केवळ उद्योग उभारण्याचा नसतो; तो त्या उद्योगांना दिशा देणार्या भांडवलाच्या प्रवाहाचाही असतो.
महाराष्ट्राच्या औद्योगिक वास्तवाकडे पाहिले, तर ही बाब अधिक स्पष्ट होते. मुंबईचे वित्तीय केंद्र, पुण्याचे नव उद्योग, नाशिक-छत्रपती संभाजीनगरचे उत्पादन पट्टे, पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी उद्योग या सर्वांचा विचार केला तर उद्योगविकासाची ही विविधता बँकिंग व्यवस्थेच्या मजबूत पायावर उभी आहे.
मात्र, ‘उद्योजक-बँकिंग प्रणाली’ यांच्यामधील नात्याचे विश्लेषण केवळ कर्जपुरवठा या एकाच निकषावर करता येणार नाही. बँका ह्या बीजभांडवलाच्या टप्प्यापासून ते विस्तार आणि पुनर्रचनेपर्यंत उद्योगांच्या आर्थिक जीवनचक्रातील सहप्रवासी आहेत. म्हणूनच बँकिंग इंडस्ट्रीला आधारस्तंभ म्हणणे हे केवळ अलंकारिक विधान नसून एक तात्त्विक सत्य आहे.
सरकारी बँका - स्थैर्य आणि व्यापक विस्तार
महाराष्ट्रातील उद्योगवाढीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे योगदान ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहे. विशेषतः एमएसएमई (MSME) क्षेत्रासाठी सरकारी बँका आजही प्राथमिक वित्तपुरवठादार आहेत.
सरकारी बँकांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भौगोलिक विस्तार आणि धोरणात्मक भूमिका. ग्रामीण आणि अर्धशहरी भागांमध्ये उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेले कर्ज हे बहुतेक वेळा या बँकांकडूनच उपलब्ध होते. तसेच, मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया, पीएमईजीपी, सीएमईजीपी यांसारख्या सरकारी योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्याचे कामही या बँकांकडेच असते. त्यामुळे आर्थिक समावेशन आणि औद्योगिक समावेशन यांचा संगम येथे दिसतो.
तथापि, या बँकांच्या कार्यपद्धतीत जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक संरचित सावधगिरी दिसून येते. निर्णयप्रक्रियेत आवश्यक असलेली कागदोपत्री शिस्त, बहुस्तरीय पडताळणी आणि उत्तरदायित्वाची स्पष्ट रचना यांमुळे निर्णयप्रक्रिया विचारपूर्वक आणि नियंत्रित पद्धतीने पुढे जाते. यासोबतच नियामक अपेक्षा, देखरेख आणि थकबाकी तरतुदींच्यार् (provisioning) निकषांमुळे बँकिंग निर्णयांवर अतिरिक्त संरचनात्मक बंधने येतात. उद्योगांच्या दृष्टीने, जिथे वेग आणि लवचीकता अपेक्षित असते, तिथे ही प्रक्रिया काही वेळा तुलनेने संथ वाटू शकते.
सहकारी बँका - स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा
महाराष्ट्राच्या आर्थिक रचनेत सहकार ही केवळ एक संस्थात्मक चौकट नसून सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. साखर कारखाने, दूधसंघ, पतसंस्था आणि ग्रामीण वित्तीय संस्था या सर्वांचा पाया सहकार चळवळीने घातला. सहकारी बँका ह्या त्या परंपरेचे प्रमुख वित्तीय रूप असून, त्या स्थानिक अर्थव्यवस्थेच्या सर्वात जवळच्या स्तरावर कार्य करतात.
सहकारी बँकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेली स्थानिक पातळीवरील सखोल समज. एखाद्या उद्योजकाची पत फक्त बॅलन्स शीटवरून नाही तर स्थानिक प्रतिष्ठा, आर्थिक व्यवहारांचा इतिहास आणि सामाजिक नेटवर्कवरूनही ओळखली जाते. ही अनौपचारिक माहिती अनेकदा औपचारिक क्रेडिट मॉडेल्सपेक्षा अधिक प्रभावी ठरते. ज्या उद्योगांना मोठ्या बँकिंग व्यवस्थेत प्रवेश मिळणे कठीण जाते, त्यांच्यासाठी सहकारी बँका एक सुलभ आणि लवचीक पर्याय ठरतात.

मात्र, या मॉडेलमध्ये अंतर्भूत असलेली एक संरचनात्मक मर्यादादेखील लक्षात घ्यावी लागते. स्थानिक जवळीक आणि विश्वास यांवर आधारित निर्णय प्रक्रियेला जर व्यावसायिक गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेची जोड नसेल, तर त्यामध्ये जोखीम वाढण्याची शक्यता निर्माण होते. काही प्रकरणांमध्ये आर्थिक निकषांपेक्षा इतर घटकांना प्राधान्य देणे, नियंत्रण यंत्रणांचा कमकुवतपणा किंवा राजकीय हस्तक्षेप यांमुळे संस्थात्मक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. तथापि, या चित्रात काही सकारात्मक अपवादही दिसून येतात. विशेषतः बहुराज्यीय सहकारी बँकांमध्ये तुलनेने अधिक व्यावसायिक व्यवस्थापन, स्वायत्त निर्णयप्रक्रिया आणि सक्षम गव्हर्नन्सची रचना दिसून येते.
सहकारी बँकिंगच्या पुढील टप्प्यासाठी सहकार आणि व्यावसायिकता यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञानाधारित देखरेख, स्वतंत्र व सक्षम व्यवस्थापन, आणि पारदर्शक निर्णय प्रक्रिया यांचा अवलंब केल्यास सहकारी बँका महाराष्ट्रातील लघुउद्योगांसाठी सर्वात प्रभावी आणि सर्वाधिक विश्वासार्ह वित्तीय भागीदार बनू शकतात.
खाजगी बँका
कार्यक्षमता, वेग, तंत्रज्ञान आणि ग्राहक केंद्रितता
खाजगी बँकांनी भारतीय बँकिंग व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण गुणात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत वेग, विश्लेषण आणि ग्राहककेंद्रितता यांचा संगम दिसून येतो. डेटा-आधारित क्रेडिट मूल्यांकन, डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म्स आणि तंत्रज्ञान-आधारित निर्णयप्रक्रिया यांच्या सहाय्याने त्यांनी कर्ज वितरण अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम केले आहे.
विशेषतः महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या शहरी आणि अर्ध-शहरी औद्योगिक पट्ट्यांमध्ये स्टार्टअप्स, सेवा उद्योग आणि मध्यम उद्योगांसाठी खाजगी बँका महत्त्वाचा वित्तीय पर्याय बनल्या आहेत. कॅश फ्लो आधारित मूल्यांकन, सप्लाय चेन फायनान्सिंग, डिजिटल पेमेंट सोल्युशन्स आणि ग्राहककेंद्री बँकिंग उत्पादने यांमुळे उद्योगांना त्यांच्या व्यवसायाच्या मॉडेलशी सुसंगत वित्तीय साधने उपलब्ध होतात.
तथापि, या कार्यक्षमतेच्या पाठीमागे एक स्पष्ट जोखीम-निवड (risk selection) धोरण कार्यरत असते. खाजगी बँका जोखीम घेतात, परंतु ती निवडक स्वरूपाची असते. उच्च क्रेडिट प्रोफाईल, स्थिर कॅश फ्लो आणि स्पष्ट व्यवसाय मॉडेल असलेल्या उद्योगांना प्राधान्य दिले जाते. परिणामी, नवउद्योजक, अनौपचारिक क्षेत्रातील उद्योग किंवा उच्च जोखीम असलेले प्रकल्प यांना या व्यवस्थेत प्रवेश मिळणे मर्यादित राहू शकते.
बँकिंग प्रणालीचे परस्परपूरक स्वरूप
तीनही प्रकारच्या बँकांचे विश्लेषण केले तर स्पष्ट होते की त्या स्पर्धक नसून परस्परपूरक घटक आहेत. सार्वजनिक बँकांचा सर्वसमावेशक विस्तार, सहकारी बँकांची स्थानिक सक्षमता आणि खाजगी बँकांमधील कार्यक्षम नवकल्पना या तिन्हींच्या संतुलित सह-अस्तित्वामुळेच महाराष्ट्रात उद्योगांची विविधता टिकून आहे. ही विविधता म्हणजेच आर्थिक स्थैर्याचे खरे लक्षण आहे.
बँका अधिक उद्योगस्नेही कशा बनू शकतात?
बँका उद्योगस्नेही व्हाव्यात याचा अर्थ केवळ कर्ज देणे सोपे व्हावे असा मर्यादित नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की बँकिंग व्यवस्था उद्योगांच्या वास्तविक आर्थिक गतीशी, जोखीम स्वरूपाशी आणि वाढीच्या चक्राशी सुसंगत व्हावी. यासाठी केवळ प्रक्रियात्मक सुधारणा पुरेशा नाहीत; तर विचारसरणी, रचना आणि तंत्रज्ञान या तीनही स्तरांवर बदल अपेक्षित आहेत.
बँकिंग व्यवस्था अधिक उद्योगस्नेही व्हावी, यासाठी केवळ प्रक्रिया सुलभ करणे पुरेसे नसून निर्णय प्रक्रियेचा स्वभाव समजून घेणे आवश्यक आहे. निर्णयातील संकोच हा अकार्यक्षमतेचा परिणाम नसून जोखीम व्यवस्थापन, नियामक अपेक्षा आणि उत्तरदायित्वाच्या संरचनेतून निर्माण होणारा नैसर्गिक घटक आहे. ठेवीदारांचे संरक्षण, ऑडिट आणि बहुस्तरीय पडताळणी यांमुळे कर्ज निर्णय विचारपूर्वक घेतले जातात; मात्र यांमुळे निर्णय घेण्याची गती कमी होऊ शकते.
उद्योगस्नेही बँकिंग म्हणजे प्रक्रिया कमी करणे नव्हे, तर जोखीम अधिक अचूकपणे आणि वेगाने समजून घेणे होय. विशेषतः एमएसएमई क्षेत्रात, अपूर्ण माहिती, अनौपचारिक व्यवहार आणि अस्थिर कॅश फ्लो यांमुळे जोखीम मोजणे अधिक गुंतागुंतीचे ठरते.जोखीम केवळ कर्ज देणे किंवा न देणे इतकीच मर्यादित नसून, ती कर्जाच्या किंमत निर्धारणातही (व्याजदरात) प्रतिबिंबित होत असते.
बँका उद्योगस्नेही होणे म्हणजे सवलती देणे नाही; तर उद्योगांच्या वास्तवाशी सुसंगत वित्तीय रचना निर्माण करणे असा त्याचा अर्थ करणे आवश्यक आहे. यासाठी तारणाधारित मॉडेलपासून कॅश फ्लो विश्लेषणाकडे वळणे, निर्णय प्रक्रियेत उत्तरदायित्व स्पष्ट करणे, उद्योगविशिष्ट दृष्टीकोन विकसित करणे आणि डेटा-आधारित सल्लागार भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. सहकारी बँकांसाठी गव्हर्नन्स सुधारणा आणि MSMEक्षेत्रासाठी सोप्या, विश्वासाधारित कर्ज चौकटी यादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
उद्योगांची जबाबदारी - संतुलनाचा दुसरा पाया
बँकिंग व्यवस्था उद्योगस्नेही असावी ही अपेक्षा योग्य असली, तरी या नात्याचा पाया द्विपक्षीय आहे. उद्योगांनीही वित्तपुरवठ्याला केवळ उपलब्ध संसाधन म्हणून न पाहता, त्यासोबत येणार्या आर्थिक शिस्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. निधींचा उद्देशानुसार वापर, पारदर्शकता आणि विश्वासार्हता यांमुळेच बँकिंग प्रणालीतील जोखीम योग्य पातळीवर राहते आणि वित्तपुरवठ्यात सातत्य टिकून राहते.
बँकिंगची खरी भूमिका
जोखीम, शिस्त आणि भांडवलाचे योग्य वाटप
बँकिंग व्यवस्था उद्योगांना भांडवल पुरवते, हा तिचा सर्वात दृश्यमान भाग आहे; परंतु अर्थव्यवस्थेत जोखीम कशी वितरित होते आणि भांडवल कुठे वाहते हे ठरवणेही तिची खरी आणि अधिक महत्त्वाची भूमिका आहे. कोणत्या उद्योगाला कर्ज मिळेल, कोणत्या उद्योगाला मिळणार नाही, कोणत्या प्रकल्पाला विस्तारासाठी निधी दिला जाईल आणि कोणत्या प्रकल्पाला थांबवले जाईल या सर्व निर्णयांच्या एकत्रित परिणामातून अर्थव्यवस्थेचा केवळ आकार नव्हे, तर तिची गुणवत्ता ठरते. काही वेळा कर्ज देणे या निर्णयाइतकाच; कर्ज न देणे हादेखील तितकाच महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो.
याच ठिकाणी बँकिंगची भूमिका केवळ growth enabler म्हणून न पाहता capital allocator म्हणून समजणे आवश्यक ठरते. योग्य उद्योगांना वेळेवर आणि पुरेसा वित्तपुरवठा झाला, तर उत्पादनक्षमता वाढते. रोजगारनिर्मिती होते आणि आर्थिक स्थैर्य मजबूत होते. परंतु चुकीच्या उद्योगांना किंवा अव्यवहार्य प्रकल्पांना कर्ज दिले गेले, तर परिणाम केवळ त्या उद्योगापुरते मर्यादित राहत नाहीत तर ते संपूर्ण बँकिंग प्रणालीवर आणि व्यापक अर्थव्यवस्थेवर दिसून येतात.
भारतीय बँकिंग व्यवस्थेने याचा अनुभव मागील दशकात घेतला आहे. पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांसाठी अति उत्साहाने दिलेले कर्ज नंतर मोठ्या प्रमाणावर थकबाकीत (NPA) परिवर्तित झाले. या प्रक्रियेत एक महत्त्वाचा धडा समोर आला; कर्ज देणे हे विकासाचे साधन आहे, परंतु चुकीचे कर्ज देणे हे आर्थिक अस्थैर्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे बँकिंगची खरी परीक्षा किती कर्जवाटप केले यात नसून कर्जाच्या गुणवत्तेत आहे.
महाराष्ट्राच्या संदर्भातही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा होत असताना, त्या भांडवलाचा वापर उत्पादनक्षम आणि टिकाऊ उद्योगांसाठी होतो आहे का, की तो केवळ अल्पकालीन विस्तारासाठी वापरला जातो आहे, हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. विशेषतः सहकारी बँकांच्या संदर्भात; जिथे स्थानिक स्तरावरील निर्णय अनेकदा आर्थिक निकषांपेक्षा इतर घटकांवर आधारित असतात आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर ठरू शकतात.
याच ठिकाणी उद्योगस्नेही बँकिंग या संकल्पनेचा पुनर्विचार करणे आवश्यक ठरते. उद्योगस्नेही होणे म्हणजे केवळ कर्ज देण्याची तयारी दाखवणे नव्हे; तर योग्य उद्योगांना, योग्य प्रमाणात आणि योग्य अटींवर कर्ज देणे होय. बँकांनी उद्योगांना समर्थन देणे जितके आवश्यक आहे, तितकीच आर्थिक शिस्त राखणेही आवश्यक आहे.
बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाची नियंत्रण प्रणालीदेखील आहे. कर्जाच्या अटी, आर्थिक अहवालांची सखोल तपासणी, कर्ज-करारातील बंधने (covenants) आणि वेळोवेळी होणारी देखरेख या सर्व गोष्टी उद्योगांना आर्थिक शिस्तीत ठेवतात. जर ही भूमिका कमकुवत झाली, तर उद्योगांमध्ये अति विस्तार, निधींचे चुकीचे वाटप आणि शेवटी आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे बँकिंगचे उद्दिष्ट केवळ credit growth नसून quality credit growth असणे आवश्यक आहे. आत्मनिर्भरतेच्या संदर्भात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. कारण आत्मनिर्भर अर्थव्यवस्था ही स्वतः उत्पादन करण्यासोबतच स्वतःच्या संसाधनांचे योग्य आणि जबाबदार व्यवस्थापन करणारीदेखील असते.
म्हणूनच बँकिंग व्यवस्थेची खरी भूमिका ही द्विस्तरीय आहे; एकीकडे ती उद्योगांना वाढीसाठी भांडवल पुरवते, आणि दुसरीकडे त्या वाढीला शिस्त आणि दिशादेखील देते. या दोन गोष्टींमध्ये संतुलन राखणे हीच बँकिंगची खरी कसोटी आहे.
अखेरीस, उद्योगांना कर्ज देणे हे सोपे असते; पण योग्य उद्योगांची निवड करणे आणि चुकीच्या कर्जाला थांबवणे हीच बँकिंगची खरी जबाबदारी आहे. कारण बँका केवळ उद्योगांना वाढवत नाहीत; त्या ठरवतात की कोणते उद्योग वाढतील; आणि याच निर्णयातून अर्थव्यवस्थेचे भविष्य घडते.
आधारस्तंभापासून सहनिर्मितीकडे- नात्याचा पुनर्विचार
उद्योग आणि बँकिंग यांचे नाते आपण पारंपरिकरीत्या कर्जदाता आणि कर्जग्राहक या चौकटीत पाहत आलो आहोत. या नात्यात एकजण भांडवल पुरवतो आणि दुसरा त्याचा वापर करतो इतपतच त्याचे स्वरूप मर्यादित मानले गेले. परंतु बदलत्या आर्थिक वास्तवात ही चौकट अपुरी ठरत आहे.
आज उद्योगांच्या वाढीचा वेग, बाजारातील अनिश्चितता आणि स्पर्धेचे स्वरूप इतके बदलले आहे की बँकिंगला केवळ वित्तपुरवठादार म्हणून मर्यादित राहणे शक्य नाही. उद्योगांना भांडवलाबरोबरच मार्गदर्शन, आर्थिक शिस्त आणि कधीकधी कठोर निर्णयांचीही गरज असते.
याच ठिकाणी या नात्याचा पुनर्विचार आवश्यक ठरतो. बँका आणि उद्योग हे दोन स्वतंत्र घटक नसून एकाच आर्थिक प्रक्रियेचे परस्परावलंबी भाग आहेत. या नात्यातील असमतोल एका घटकापुरता मर्यादित राहत नाही; तो अखेरीस संपूर्ण अर्थव्यवस्थेत प्रतिबिंबित होतो. त्यामुळे बँकिंग इंडस्ट्रीकडे आधारस्तंभ म्हणून पाहण्यापेक्षा सहनिर्माता म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते.
अखेरीस, आत्मनिर्भरतेचा प्रश्न केवळ उद्योग उभारण्याचा नाही; तर त्या उद्योगांना संधी देणारी व्यवस्था किती न्याय्य, जबाबदार आणि दूरदृष्टीपूर्ण आहे याचाही आहे; आणि या कसोटीवर बँकिंग व्यवस्थेची भूमिका केवळ आर्थिक राहत नाही; तर ती अर्थव्यवस्थेच्या संरचनेला आकार देणारी धोरणात्मक व्यवस्था ठरते.