व्यंकटेश कल्याणकर
7798703952
व्यंकटेश कल्याणकर
7798703952
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, तसे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आज उद्योगविश्वाचा चेहरामोहरा बदलत आहे; पण एआय म्हणजे नोकर्यांवर गदा की प्रगतीची नवी गुरुकिल्ली? ऑटोमोबाईलपासून ते बारामतीच्या ऊस शेतीपर्यंत एआयने नेमकी कशी क्रांती घडवली आणि या तंत्रयुगात आपली नोकरी व व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतील, याचा वेध घेणारा हा लेख.
आजचा काळ हा कोणत्याही क्षेत्रासाठी केवळ नवनिर्मितीचा नाही; तर उत्पादन निर्माण करताना किंवा सेवा पुरविताना वापरकर्त्याच्या सुलभता आणि समाधान यांचा सर्वोच्च प्राधान्याने विचार करण्याचा काळ आहे. त्यामुळेच उत्पादनाची निर्मिती किंवा सेवा प्रदानाची प्रक्रिया अधिकाधिक अचूक, वेगवान असणे अपेक्षित आहे. त्यामुळेच आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात कोणताही व्यवसाय टिकवण्यासाठी केवळ मेहनत, भांडवल किंवा पारंपरिक कौशल्य पुरेसे राहिलेले नाही. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अनिवार्य बनले आहे. अशा काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हे तंत्रज्ञान उद्योग-व्यवसायासाठी ‘नवा परीस’ ठरत आहे. यामुळे निर्मितीची प्रक्रिया सुलभ होत आहे. कमीत कमी मनुष्यबळाचा वापर होत असला तरीही रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. त्याविषयी या लेखात चर्चा केली आहे.
एआय म्हणजे काय?
एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच मशीन किंवा संगणक प्रणालींना मानवी बुद्धिमत्तेसारखे विचार करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवण्याची क्षमता देणारे तंत्रज्ञान. यामध्ये Machine Learning, Deep Learning, Natural Language Processing (NLP) यांसारख्या शाखांचा समावेश होतो. साध्या भाषेत सांगायचे तर, AI म्हणजे माहितीच्या (डेटा) आधारे स्वतः शिकणारी आणि निर्णय घेणारी आणि नैसर्गिक मानवी भाषेत प्रतिसाद देऊ शकणारी यंत्रणा.
महाराष्ट्र आघाडीवर
माहिती तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्था असलेल्या राज्यांशी स्पर्धा करता महाराष्ट्र नेहमीच तंत्रज्ञानाधारित बदल स्वीकारण्यात आघाडीवर आणि स्पर्धात्मक स्थानी आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातील बदलही स्वीकारण्यात आणि त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात महाराष्ट्र सक्रिय असल्याचे दिसते. महाराष्ट्र सरकारने कृषी, प्रशासन आणि सेवा क्षेत्रात एआयचे प्रयोग करणारे प्रकल्प सुरू केले आहेत. एआय स्किलिंग कार्यक्रमात महाराष्ट्राचा मोठा सहभाग आहे. धोरणात्मक पावले, प्रत्यक्ष प्रकल्प, कौशल्य आणि शिक्षण तसेच एआय आधारित कौशल्य आणि नव उपक्रमात महाराष्ट्र नक्कीच अग्रस्थानी आहे.
एआयचा नियोजनबद्ध वापर आवश्यक
कोणतेही तंत्रज्ञान मुख्यत्वे माहितीचे संकलन, माहितीचे संपादन आणि माहितीचे वितरण या तीन स्तरांवर चालत असते. एआयमुळे संकलित माहितीचे आकलन करून घेऊन मानवी बुद्धीप्रमाणे त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर विचारपूर्वक व नियोजनबद्ध वापर केला तर एखादा उद्योग केवळ आधुनिक बनत नाही, तर त्याला वेग, अचूकता आणि स्पर्धात्मकता या तिन्ही बाबतीत नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो, यात शंका नाही. हा बदल केवळ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घडणारा बदल नसून एआयच्या प्रभावी वापरामुळे काम करणार्या पद्धतीत नवी क्रांती घडविणारा आहे.
उत्पादन प्रक्रियेत क्रांती ः एआयच्या प्रभावी वापरामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम होते. एका मोठ्या वाहन उत्पादन कंपनीत उत्पादन प्रक्रियेदरम्यान जी गोष्ट ठरावीक पद्धतीने पुन्हा पुन्हा करावी लागते; अशा ठिकाणी रोबोटिक्स वापरले जात आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन काम जलद व अचूक होते. परिणामी उद्योग अधिक नफा-केंद्रित आणि कार्यक्षम बनतो. तसेच एखादे मशीन कोणत्याही तांत्रिक कारणाने बंद पडले तर तंत्रज्ञ येऊन दुरुस्ती करून परिस्थिती पूर्ववत करेपर्यंत मोठा कालावधी आणि वेळेचा अपव्यय होत असत. पण आता मशीन लर्निंगच्या मदतीने यंत्रसामग्रीतील बिघाडाआधीच (Predictive Maintenance) ओळखता येतो. शिवाय झालेला बिघाड रोबोटिक्सद्वारे मानवी हस्तक्षेपाशिवाय करता येतो. यामुळे उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाचा मानलेला डाऊनटाईम आणि मानवी चुका कमी होतात. परिणामी वेळ, खर्च आणि संसाधनांची बचत होते; शिवाय उत्पादनाची क्षमता व वेग वाढतो.
प्रगत एआयच्या वापराचे परिणाम
* एखादे मशीन कधी बिघडेल आणि मशीनमध्ये बिघाड होऊ नये हे टाळण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन मिळते.
* डिजीटल ट्विन म्हणजे कारखाना, मशीन किंवा संपूर्ण उत्पादन लाईनचे व्हर्च्युअल (डिजिटल) प्रतिरूप तयार केले जाते. यातून उत्पादनापूर्वी स्टिम्युलेशन, बदलांचा परिणाम आधीच तपासणे, उत्पादन रिस्क फ्री होते.
* एआय आधारित उत्पादन तपासणी (क्वालिटी कंट्रोल) यामध्ये कॅमेरे आणि अन्य साधने वापरून उत्पादनातील दोष ओळखला जातो.
* संपूर्ण पुरवठा साखळी ऑप्टीमाईज केली जाते. यामध्ये उत्पादनाची आवश्यकता, मालाची(साठ्याचे) व्यवस्थापन, वितरणामध्ये सुलभता आणली जाते.
* Autonomous Production Systems : एआय आधारित रोबोट स्वत: उत्पादन लाईन सुरू अथवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतात. उत्पादनात अडथळा आला तर पर्यायी मार्ग शोधून तो कार्यान्वित केला जातो. याशिवाय AI-based Energy Optimization मुळे ऊर्जेचीही बचत होते.
डेटा-आधारित निर्णयक्षमता : उद्योग क्षेत्रातील एआयच्या वापरापूर्वी निर्णय केवळ माणसांच्या अनुभवावर घेतले जात असत. त्यामुळे असे निर्णय अधिकाधिक अचूक आणि परिणामकारक ठरण्याची शक्यता तुलनेने कमी होती. मात्र डेटा-आधारित निर्णयक्षमतेमुळे ग्राहकांची आवड, बाजारातील ट्रेंड्स यांचे अचूक विश्लेषण, योग्य वेळी योग्य उत्पादन बाजारात आणणे या गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. माहितीच्या प्रचंड संचांच्या क्षणार्धात विश्लेषण निर्णय घेण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहेत. उदा. एखाद्या खाद्यपदार्थ बनविणार्या कंपनीमध्ये विशिष्ट कालावधीत विशिष्ट पदार्थाची बाजारातील मागणी किती असू शकते, याचे वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचणारे आणि पूर्वीच्या माहितीच्या आधारे विश्लेषण एआयमार्फत काही क्षणांत मिळू शकते. त्यावरून निर्णय घेण्यास मदत होते. डेटा आधारित निर्णयक्षमतेमुळे उद्योग अधिक स्पर्धात्मक आणि यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होते.
प्रभावी ग्राहक संवाद ः कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायामध्ये ग्राहक संवाद आणि त्यांच्या शंकांचे निराकरण अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. सोशल मीडियामुळे संवादाची प्रभावी माध्यमे उपलब्ध झाली आहेत. मात्र, ग्राहकांशी वैयक्तिक आणि प्रभावी संवादासाठी एआय आधारित चॅटबॉट्स आणि 24 तास सक्रिय असणारे व्हर्च्युअल असिस्टंट अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत. या चॅटबॉट्समुळे ग्राहकांना त्यांची गरज, आर्थिक क्षमता यांसह इतर गोष्टींचा विचार करून उत्पादने सुचविली जात आहेत. उदा. पुणे शहरात अंतर्गत प्रवासासाठी एखाद्या ग्राहकाला दुचाकी वाहन खरेदी करायचे असल्यास त्याची आर्थिक क्षमता, गरज आणि इतर गोष्टी विचारात घेऊन त्याला वाहन सुचविले जाते. त्या वाहनासंदर्भातील सर्व तांत्रिक, कायदेशीर आणि आर्थिक बाबीही चॅटबॉट्स पुरवितात. त्यातून ग्राहकांना संबंधित वाहन उत्पादन कंपनीबद्दलचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होते.
एआय तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादनात वाढ
तंत्रज्ञान कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ‘मॅप माय क्रॉप’ यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील बारामती येथे एआय-आधारित ऊस शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामध्ये सॅटेलाईट इमॅजरीद्वारे शेतीचे निरीक्षण करण्यात आले. एआय-बेस्ड क्रॉप मॉनिटरिंग करण्यात आले. खते आणि पाण्याचे अचूक नियोजन करताना एआय वापरण्यात आले आणि शेतकर्यांना रिअल टाईम मार्गदर्शन केले. यामुळे शेतकर्यांना पाणी कधी द्यावे, खत किती वापरावे, रोग व तणाची शक्यता अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन एआयमुळे मिळत होते. या प्रयोगामुळे पीकलागवडीच्या काळातील (इनपुट) खर्च 41 टक्क्यांनी कमी झाला. 70 टन प्रति एकरापासून 120 टन प्रति एकरपर्यंत उत्पादन वाढले. पाणी आणि खताचा कार्यक्षम वापर करण्यात आला. अशा प्रकारे एआय + डेटा + शेतकरी यांचा संगम करून स्मार्ट शेतीचा यशस्वी प्रयोग झाला. अशाच प्रकारे कापूस, सोयाबीन, मक्यासह इतर पिकांनाही एआय आधारित पीक व्यवस्थापन करता येणे शक्य आहे.
एआयच्या वापरामुळे रोजगाराच्या नव्या संधी
कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोजित विकास अंमलात आला की, मनुष्यबळाच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली जाणे, नैसर्गिक आहे. भारताने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतरही अशी चिंता व्यक्त केली गेली. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचे युग आले. हे सगळे बदल आपल्या व्यवस्थेने उदार मनाने स्वीकारले. कारण यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. तसे मनुष्यबळ निर्माण झाले. कौशल्य आणि कौशल्य प्रशिक्षण विकसित केले गेले. आता एआयमुळेही रोजगाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामध्ये -
नवीन तंत्रज्ञानाधारित नोकर्यांची निर्मिती : एआयच्या प्रभावी वापराकरिता उद्योग-व्यवसायांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे एआय इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर, एआय प्रशिक्षक इत्यादी प्रकारच्या नोकर्यांची मागणी वाढत आहे. माहिती तंत्रज्ञानाप्रमाणे या नोकर्यासुद्धा उच्च वेतनश्रेणी असलेल्या आहेत.
पारंपरिक नोकर्यांचे रूपांतर : एआयमुळे काम सोपे झाले तरी काम संपलेले नाही. केवळ कामाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने नोकरी करणार्या व्यक्तीने एआय कौशल्य आत्मसात केले की, तो एआय युगात सहजपणे टिकून राहील. उदा. पूर्वी मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेला व्यक्ती कौशल्य विकसित करून स्मार्ट मशीन सुपरवायझर होऊ शकतो. तसेच पूर्वी अकाऊंटंट म्हणून काम करणारी महिला कौशल्य आत्मसात करून डेटा अॅनालिस्ट होऊ शकते. डेटा एंट्री ऑपरेटर हा डेटा मॉनिटरिंग आणि अॅनालिस्ट होऊ शकतो.
उद्योग-व्यवसायाच्या जाहिरातीमध्ये एआयचा वापर
कोणत्याही प्रकारच्या उद्योगामध्ये सर्वाधिक प्रमाणात एआयचा वापर हा जाहिरात, विपणन आणि ग्राहक व्यवस्थापनात केला जात आहे. जाहिरात निर्मितीमध्ये आशय निर्मितीमध्ये (कंटेंट, व्हिज्युअल्स आणि व्हिडीओ कंटेंट क्रिएशन) एआयचा प्रभावी वापर केला जात आहे. तसेच डिजिटल मार्केटिंगची स्ट्रॅटेजी तयार करणे आणि अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत उत्पादन किंवा सेवेची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी एआय अत्यंत कल्पक आणि मौलिक मदत करत आहे.
सहाय्यभूत नोकर्यांमध्ये वाढ : उद्योग-व्यवसायात एआय आल्यानंतर सहाय्यभूत नोकर्यांमध्ये वाढ झालेली आहे. उदा. सिस्टीम मेंटेनन्स इंजिनिअर, एआय मॉनिटरिंग, डेटा लेबलिंग, सायबर सिक्युरिटी इत्यादी विविध प्रकारच्या नोकर्या वाढल्या आहेत.
स्टार्टअप्स आणि नव उद्योगांची वाढ : एआयमुळे अनेक प्रकारे नवे स्टार्टअप्स आणि नवउद्योगांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये एआय सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (SaaS) कंपन्यांची निर्मिती, ऑटोमेशन सर्व्हिसेस, एआय कन्सल्टिंग इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे.
कौशल्य विकास : एआय हे नवतंत्रज्ञान असल्याने त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक बनते. त्यामध्ये डेटा अॅनालिसीस, एआय टूल्स वापरणे इत्यादींची गरज भासत आहे. त्यामुळे शिक्षण, प्रशिक्षणाच्या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
नवीन क्षेत्रांची निर्मिती : एआयमुळे नवीन उद्योग अस्तित्वात येत आहेत. त्यामध्ये स्वयंचलित वाहन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थ टेक-एआय इत्यादींसह कला-साहित्य क्षेत्रांतही एआयचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन नवनव्या क्षेत्रांची आणि रोजगारांची निर्मिती होत आहे.
मुक्त कार्य (फ्रीलान्स) तथा प्रकल्पाधारित कामे : एआयच्या माध्यमातून फ्रीलान्स आणि गीग इकॉनॉमी म्हणजे प्रकल्पाधारित कामांची संख्या वाढली आहे. केवळ विशिष्ट काम किंवा प्रकल्पासाठी मनुष्यबळाची आवश्यकता पडते. एकच व्यक्ती किंवा छोटा समूह एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करू शकतो. या क्षेत्राचीही मागणी वाढली आहे.
समारोप
काळाच्या वेगाने पुढे जात प्रगती साधणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत एआय हे केवळ तांत्रिक साधन नसून उद्योगविश्वासाठी एक परिवर्तनकारी शक्ती ठरत आहे. उत्पादनापासून ग्राहकसेवेपर्यंत, निर्णय प्रक्रियेपासून नव उपक्रमापर्यंत एआय दिवसेंदिवस अधिकाधिक अनिवार्य होत चालला आहे. एआयमुळे विविध प्रकारचे उद्योग अधिक सक्षम, अचूक आणि वेगवान बनत आहे. त्यामुळेच एआयला आजच्या काळातील व्यवसायाचा नवा परीस म्हणणे अधिक संयुक्तिक ठरते. या तंत्रपरिवर्तनाचा लाभ घ्यायचा असेल तर उद्योगांनी एआयचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करणे आवश्यक आहे. केवळ तंत्रज्ञान स्वीकारणे पुरेसे नाही, तर त्यासाठी योग्य कौशल्यविकास, डेटा व्यवस्थापन, नैतिकता आणि सुरक्षा यांचा समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एआयमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्या तरी त्यासाठी कामगारांना नव्या कौशल्यांची जोड देणेही आवश्यक ठरणार आहे. बाजारपेठेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि विकासाचा मार्गाने सातत्याने मार्गक्रमण करण्यासाठी एआयचा स्वीकार हा पर्याय नसून अपरिहार्यता बनत चालली आहे. जे उद्योग या बदलाला वेळेत स्वीकारतील, तेच स्पर्धेत पुढे राहतील. नव्हे तर स्पर्धेत टिकतील. म्हणूनच, एआयचा योग्य वापर करून उद्योगक्षेत्राने नव्या संधींचा लाभ घेत, अधिक समृद्ध, सक्षम आणि शाश्वत भविष्याची दिशा निश्चित करणे ही काळाची गरज आहे.
- प्रकल्प संशोधक
माध्यम व प्रकाशन केंद्र, यशदा, पुणे