‘2047 साली भारताची विकसित देशांमध्ये गणना होईल’, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. भारत देश ‘विकसित देश’ होण्याच्या दिशेने भारतातील सर्व क्षेत्रांचे योगदानही अपेक्षित आहे. सबका साथ, सबका विकास, या मोदींच्या धोरणास कटिबद्ध असलेले, पायाभूत सुविधांमध्ये विशेष योगदान देणारे, जालन्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव शुद्ध स्टील हब म्हणजे मेटारोल इस्पात होय. एखाद्याचे स्वप्नातील घर असो की, राष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील रस्ते, पूल वा कालवे यांचे जाळे मजबूत करणे असो, यात स्टीलचे योगदान मोठे असते. गेल्या तीस वर्षांपासून जालन्यातील मेटारोल इस्पातने आपल्या दर्जेदार कामाने स्टील उद्योगात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून या क्षेत्रात आपले स्थान अढळ केले आहे.
स्टील हब म्हणून स्वतंत्र ओळख मिळविणार्या मेटारोल इस्पातचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यासाठी अपार मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष, शिकण्याची उमेद ही पंचसूत्री त्यांनी आत्मसात केली. तसे पाहिले तर, या क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आज यशाचे शिखर गाठण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद असाच आहे. मेटारोल इस्पातचे संचालक आशिष भाला यांना व्यवसायाचा वारसा नसला तरी व्यावसायिक विचारधारा जोपासणार्या मित्रपरिवाराची संगत त्यांना लाभली. एक-दोन नाही तर एकूण नऊजणांचा त्यांचा जिवलग मित्रांचा ग्रुप होता. भविष्यात वेगळी वाट चोखाळायची असे सार्यांनाच वाटत होते. चर्चाविनिमय, चिंतन या वैचारिक घुसळणीतून सर्वांनुमते जालन्यात पहिली स्टील कंपनी त्यांनी उभारली.
सर्वांच्या साथीने अनेक चढउतारांचा अनुभव घेत प्रतिदिन 25 टन उत्पादन क्षमता असलेली छोटी रोलिंग मिल सुरू झाली. या काळात संघर्षाचा सामना करावा लागला, परंतु आम्ही ती आमची ‘लर्निंग कॉस्ट’ समजतो, तसेच उद्योग क्षेत्रात नऊ भागीदारांनी एकत्र 25 वर्षे एखादा व्यवसाय सुरू ठेवणे, हे दुर्मीळच. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे भाला कृतज्ञभावाने सांगत होते. स्टील उद्योगालाही स्थित्यंतराचा सामना करावा लागला. हळूहळू व्यवसाय विस्तार होत गेला, नऊजणांपैकी काहीजणांनी संगनमताने स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मी (संचालक आशिष भाला) आणि व्यवस्थापकीय संचालक द्वारकाप्रसाद सोनी यांनी मेटारोल इस्पातचा कारभार सांंभाळला.
त्यासोबतच आमची पुढची पिढी म्हणजे आमच्या दोघांचीही उच्चशिक्षित मुले स्वेच्छेने व्यवसायात उतरली. माझा मुलगा नमन भाला सेल्स अॅण्ड मार्केटिंगची धुरा सांभाळतो, तर द्वारकाप्रसाद सोनी यांचा मुलगा शुभम सोनी प्रोडक्शन अॅण्ड टेक्निकल डिपार्टमेंट सांभाळतो.
रूढार्थाने 2005 साली मेटारोल इस्पात अनुभवसिद्ध आणि तंत्रज्ञानाधिष्ठित स्टील कंपनीचे काम सुरू झाले. मेटारोलने गुणवत्तेत कधीच तडजोड केली नाही. स्टील निर्मितीमध्ये प्रयोगशाळेचाही सिंहाचा वाटा असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात लागणार्या स्टीलची निर्मिती ही अत्यंत खडतर अशा मानांकनातून केली जाते. यासाठी कंपनीची स्वतंत्र एनएव्हीएल ही मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहे. गुजरात कच्छ येथे झालेल्या भूकंपानंतर स्टीलच्या गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आले. मेटारोलची गुणवत्ता दर्जेदार होतीच, परंतु या घटनेनंतर विकसित तंत्रज्ञान वापरून अधिक उत्तम दर्जाच्या स्टीलच्या निर्मितीकडे त्यांचा कल राहिला. उत्तम दर्जाच्या आधारेच आर्किटेक्ट अभियात्यांपासून ते गवंडी काम करणारे मिस्त्री यांची पहिली पसंती मेटारोलच्या स्टीलला राहिली. निर्यात मोजकी असली तरी देशांतर्गत खूप मागणी आहे, विशेष करून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान या पाच राज्यांत प्रचंड मागणी आहे. जवळपास साडेतीन ते चार लाख टनापर्यंत वर्षाकाठी उत्पादनाचा उच्चांक गाठला जातो.
थर्मेक्स हे जर्मनीतील तंत्रज्ञान भारतात प्रथम आणण्याचा बहुमान मेटारोल इस्पातने मिळविला आहे. यामुळे स्टील उत्पादनात एक नवे पर्व सुरू झाले. मेटारोल इस्पातच्या कार्यप्रणालीच्या आधारेच स्टील उद्योगातील अन्य कंपन्या कामाची दिशा ठरवू लागल्या. विशेष करून नव्याने ‘हॉट रोल्ड बिलेट रोलिंग’ तंत्रज्ञान वापरून स्टील उत्पादनासाठी लागणारा कोळसा व ऑईल त्यासोबत वेळेचीही बचत करण्यात आली. मेटारोल स्टील उत्पादन प्रकल्पात एलआरएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांत शुद्ध आणि दर्जेदार स्टीलनिर्मिती करत आहे. स्टील मार्केटमध्ये मेटारोलचे नाव होत होते, ही संधी मेटारोलने ओळखून आपल्या उत्पादनावर कंपनीचे ब्रँडनेम मुद्रित करण्याचा निर्णय घेतला. याविषयी भाला सांगत होते की, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना स्टीलच्या सळ्या आम्ही उपलब्ध करून देत आहोत. विशेष करून नॉर्थ ईस्टच्या डोंगर-दर्यांमधील अतिशय कठीण ठिकाणी मेटारोलच्या स्टीलला प्राधान्य दिले जाते. गुजरातमधील नर्मदा सरोवरचे कालवे व त्यातील पुलांसाठीदेखील मेटारोलचेच मजबूत स्टील वापरले जाते. भूकंप आणि भूस्खलन होणार्या भागातही मेटारोलने उत्पादित केलेले स्टील टिकाव धरते.
आत्मनिर्भर भारताच्या योगदानात नवीन आव्हाने स्वीकारून स्वदेशी बनावटीची स्टीलनिर्मिती हे मेटारोलचे वैशिष्ट्य. याचे उदाहरण म्हणजे मेटारोलचे थे्रडेड बार (अँकर बोल्ट). रस्ते, घाट, डोंगरपदपथावरील रस्ते, तसेच पर्वतीय क्षेत्रात होणारे भूस्खलन रोखण्यासाठी या थ्रेडेड बारचा उपयोग केला जातो. (उदा. मुंबई-पुणे महामार्गावरील डोंगरावर लावलेल्या जाळ्या), मायनिंगमध्ये अपघात टाळण्यास हे थ्रेडेड बार उपयुक्त ठरतात. हे थ्रेडेड बार बनवणारी भारतातील एकमेव कंपनी ही मेटारोल इस्पात आहे. परदेशातील नामांकित ‘डायविडॅग’ इंजिनिअरिंग कंपनीसोबत विक्री करार करण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून एशियन, साऊथ एशियन तसेच युरोपियन देशात थ्रेडेड बारची निर्यात केली जाते.
मेटारोल इस्पातच्या ब्रँड अॅम्बेसेडरविषयी विचारले असता, आशिष भाला हे आत्मविश्वासाने म्हणाले की, आमचे डीलर्सच आमचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादन देणे, डीलर्सला चांगले मार्गदर्शन देणे, वेळप्रसंगी त्यांना प्रशिक्षण देणे, हे धोरण आम्ही अवलंबिले आहे. मेटारोलचे जाळे देशभरात पसरविण्यात सिंहाचा वाटा हा आमच्या डीलर्सचा आहे.
जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहता आणि स्टील उद्योगाला अतिरिक्त पाण्याचा वापर यातून कंपनीच्याच आवारात आम्ही दोन मोठी शेततळी बांधली आहेत. लागूनच असलेल्या टेकडी परिसरावर आणि सभोवताली वृक्ष लागवड केली आहे. स्वतंत्र बगिचाही निर्माण केला आहे. पॉवर फॅक्टरीची युनिटी ठेवा, हा सरकारचा नियम आहे, तोही आम्ही तंतोतंत पाळतो. या संदर्भात विचाराधीन असा सोलर प्लांट बसवण्याचे निश्चित आहे. तसेच भविष्यात आम्ही एक इंटिग्रेटेड प्लांट टाकण्याच्या विचाराधीन आहोत.
विदर्भातील उमरेडमध्ये जमीन खरेदी केली असून पुढील परवानगी प्रक्रिया सुरू आहे. मेगा प्रोजेक्ट सरकारने मान्य केला आहे.
पर्यावरण रक्षण आणि ऊर्जाबचतीसोबत सामाजिक भान जपणे हे मेटारोल इस्पात आपले कर्तव्य मानते. वर्षातून दोनदा कामगारांच्या मुलांचे एकत्रिकरण केले जाते. आपले पालक नेमके काय काम करतात, याची जाणीव करून देण्याचा संस्कार या माध्यमातून केला जातो. तसेच चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, इ. माध्यमातून त्यांच्यातील क्षमतांची चाचणी घेतली जाते. या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ऋषी विद्यालय सुरू केले आहे. भविष्यात ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा विचारही आहे. यानिमित्त आशिषजी यांचे वाक्य मनाला स्पर्श करून जाते, ‘मनापासून कुणाला मदत करायची असेल तर त्याला रोजगार द्या.’ आपण केलेली मोजकी मदत ही तात्पुरती असते तर आपल्यात रोजगार देण्याची क्षमता असेल तर त्याच्या क्षमतेनुसार त्याला रोजगार देऊन त्याच्या भविष्याची वाट सुकर करावी, असा स्तुत्य विचार त्यांनी मांडला.
कोरोना काळात जीवनावश्यक ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित झाले होते. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारले. वेळप्रसंगी जनसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी कंपनीचे काम थांबवून तेथील ऑक्सिजनचाही पुरवठा रुग्णांना उपलब्ध करून दिला. याच कोरोना काळात ‘हम होंगे कामयाब’ अभियानात राजमिस्त्रींचा सन्मान करण्यात आला. राष्ट्र उभारणीसाठी अभियंतावर्गाचे महत्त्व जाणून त्यांच्यातील एकतेचे दर्शन घडवून आणण्यासाठी ‘इंजिनिअर्स डे रन’ मेटारोलने आयोजित केले. महाराष्ट्राच्या संतपंरपरेची खूण असलेल्या विठूरायाच्या वारीत मेटारोल इस्पातची आरोग्यसेवा पुरविणारी अॅम्ब्युलन्स असते. नारीशक्तीचा सन्मान म्हणून महिलादिनी ढोलताशांच्या गजरात मेटारोलच्या वतीने ‘सावित्रीच्या वेगळ्या वाटा’ माध्यमातून बाईक रॅली काढण्यात आली.
मेटारोल इस्पात कंपनीला आपली गुणवत्ता टिकवून स्टील निर्मितीत दिलेल्या योगदानाबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात ऑल इंडिया इंडक्शन फर्नेसेल असोसिएशनचा लिडरशीप अॅवार्ड, बिझनेस फॉट, एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) यांच्याकडूनही मेटारोलला गौरविण्यात आले आहे. स्वच्छ हरित शहर अभियानात मेटारोलचे योगदान प्रशंसनीय आहे.
उमेदीच्या वयात आपण व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला, आपल्या अनुभवांवरून आपण आजच्या युवा पिढीला काय संदेश द्याल?, यावर मेटारोलचे संचालक आशिष भाला म्हणाले की, success has no shortcuts यशस्वी व्हायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही, त्यासाठी कुठलाही शॉटकर्ट तर नाहीच शिवाय पळवाटही नाही. खरं तर आजच्या युवा पिढीला तंत्रज्ञानाचे उत्तम ज्ञान आहे. या ज्ञानाला परिश्रमाची जोड दिली तर उद्याचे भवितव्य असणार्या आजच्या युवा पिढीमुळे भारत नक्कीच विश्वगुरूपदी रूढ होण्याची वाट सुकर करेल हा विश्वास आहे.
संकलन - सुशांत डोके
शब्दांकन - पूनम पवार