महाराष्ट्राचे आजचे गढूळ वातावरण पाहता आपण महाराष्ट्राचा वारसा विसरत चाललो आहोत, असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु अशाही वातावरणात चैतन्य, पावित्र्य, मांगल्याचे दीपस्तंभ ठरावेत अशी शेकडो कामे महाराष्ट्रात नि:स्वार्थी वृत्तीने चालत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या अत्यंत विषारी धार्मिक, सांस्कृतिक वातावरणात राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे धर्मराजाप्रमाणे स्थिर आहेत.
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्याच्यापूर्वी महाराष्ट्र नव्हता असे नाही. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाचा विषय कैक हजार वर्षांचा आहे. महाराष्ट्रात साम्राज्य निर्माण झाली. महाराष्ट्रात जगप्रसिद्ध लेणी खोदली गेली. आधुनिक काळाला सामोरी जाणारी सर्व प्रकारची वैचारिक ऊर्जा, मग ती आध्यात्मिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल ती महाराष्ट्राने देशाला दिली आहे. अशा महाराष्ट्रात आपला जन्म झाला याचा अभिमान बाळगावा असा आपला वारसा आहे.
आजच्या महाराष्ट्राचे धार्मिक, सामाजिक, राजकीय चित्र जर असेच दीर्घकाळ राहिले तर येणारी पिढी असे छातीठोकपणे म्हणेल का? या महाराष्ट्रात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे. हे युग माहितीजालाचे युग आहे. 24 तास बातम्यांचा पाऊस पडत असतो. कोणत्या बातम्यांचा पाऊस पडतो? फक्त मगाील दोन महिन्यांचा विचार करू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बातमीची शाई वाळते ना वाळते तोच भोंदूबाबा अशोक खरात याच्या बातम्या सुरू झाल्या. याच काळात राज्यसभेच्या निवडणुका आल्या. त्यावरून उबाठातील राजकारण, शरदराव पवार, हे विषय चर्चेला आले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुका याच काळात झाल्या.
अजितदादा पवार यांचा मृत्यू हा दुर्दैवी मृत्यू आहे आणि कोणत्याही विमान अपघाताची कसून चौकशी होते. तशी या अपघाताचीदेखील सुरू आहे. अहमदाबादच्या विमान अपघाताचीदेखील चौकशी चालू आहे. या अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूचे राजकारण झाले नाही. अजितदादा पवार यांच्या मृत्यूचेे राजकारण सुरू आहे. या राजकारणातील शिलेदार पवारांचे नातू आहेत. अजितदादा तर त्यांचा पक्ष सोडून गेले होते म्हणजे ते गद्दार झाले होते. मग नातवाला एवढा प्रेमाचा पान्हा का फुटला? एका शब्दांत त्याचे उत्तर आहे राजकारण. राजकारणात सतत प्रकाशझोतात राहावे लागते. मीच आता पक्षाचा तारणहार आहे, अशी भूमिका वठवावी लागते. त्यासाठी विषय लागतात. अजितदादांचा विमान अपघातातील मृत्यू हा विषय आहे. हे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे राजकारण आहे, घृणास्पद आणि गलिच्छ. या नातवाचे राजकीय कर्तृत्व काही नाही. पवार नावाचे कुंकू आहे, हे भांडवल राजकारणात पुरेसे नसते.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या जाळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष फसल्या. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भोंदूबाबाला अटक झाली. डखढ चौकशी चालू आहे. प्रकरण कोर्टात जाईल आणि न्यायनिवाडा होईल आणि त्यात जर महिला अध्यक्षा सापडल्या तर कायद्यानुसार त्यांनाही शासन होईल. परंतु महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर डोळा असणार्या ज्ञातअज्ञात अशा महिला राजकारणी जे तोंडसुख घेत आहेत त्याला काही सीमा नाही. महिला अध्यक्षांना सहआरोपी करा, अटक करा. पक्षाच्या पदावरून हाकलून लावा. बुवाला बाया पुरवण्याचे काम त्याच करत होत्या, इथपर्यंत आरोपाचे गटार वाहत आहे. याचे दुसरे नाव गलिच्छ राजकारण असे आहे.
अशोक खरात यांच्या भोंदूगिरीवरून सोशल मिडीयावरून हिंदू धर्म, बुवाबाजी वगैरे संबंधी जे अकलेचे तारे तोडण्याचे काम चालू आहे त्यालाही गलिच्छतेचा अविष्कार असेच म्हटले पाहिजे, हे सर्व विकृत बुद्धीचे खेळ आहेत. या विकृत बुद्धिवाल्यांना महाराष्ट्रातील महान संत परंपरा आठवत नाही. नि:स्पृहता आणि अनामिकता याचा चालताबोलता आदर्श असलेले गाडगेबाबा आठवत नाहीत. त्यांना भानगडबाज बुवाच आठवतात.
आणि प्रसारमाध्यमांविषयी काय म्हणावे? ज्यांची विश्वासार्हता वायू वेगाने रसातळाला जात चालली आहे अशी ही आपली प्रसारमाध्यमे आहेत. त्यांना विकृतीच्या बातम्या घोळून घोळून चालवण्यात आनंद वाटत असतो. संस्कारक्षम तरुणपिढी त्यांच्या आहारी गेली तर ती नक्कीच म्हणले की, अशा महाराष्ट्रात माझा जन्म झाला याची मला लाज वाटते. महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. दरवर्षी हजारो मुली बेपत्ता होतात आणि अल्पवयीन मुलींवरदेखील बलात्कार केले जातात. हे सर्व चित्र आशावाद जागवणारे ठरत नाही.
परंतु अशाही वातावरणात चैतन्य, पावित्र्य, मांगल्याचे दीपस्तंभ ठरावेत अशी शेकडो कामे चालत असतात. माध्यमात यात कुणी ‘नात’ू दिसत नाही, ‘बुवा’ दिसत नाही, ‘अंधार’ दिसत नाही, त्यामुळे अशी पवित्र कामे करणार्यांचा चुकूनही उल्लेख होत नाही. 26-27 मार्च रोजी मी लातूर येथे होतो. पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे आणि डॉ. जोत्स्ना कुकडे यांची भेट घेणे एवढाच उद्देश होता. परंतु कार्यकर्ते स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांनी कार्यक्रम लावले.
हरंगुळ येथे जनकल्याण समितीच्या वतीने 1993 साली झालेल्या भूकंपग्रस्त मुलांसाठी निवासी शाळा सुरू झाली. पहिली दोन-तीन वर्षे ती पत्र्याच्या शेडमध्ये चालली. आता शाळेचे भव्य संकुल उभे राहिले आहे. निसर्गरम्य परिसर आहे. पर्यवेक्षक आणि शिक्षक यांच्यापुढे संविधानाची मूलतत्त्वे या विषयावर माझे व्याख्यान होते. आज या प्रकल्पाला 33 वर्षे झाली. शैक्षणिक दर्जा अतित्कृष्ट म्हणजे दहावीचा निकाल शंभर टक्के असतो. संस्थेचा एक कडक नियम आहे, शाळेत केवळ ग्रामीण भागातील मुलामुलींना प्रवेश द्यायचा, शहरी भागातील मुलामुलींना नाही. सेवा देणारे शिक्षक, कर्मचारी हे केवळ वेतनधारी सेवक नाहीत, तर सेवाव्रतधारी सेवक आहेत. जवळजवळ तीन तप हे काम चालू आहे. बारा वर्षांची तपश्चर्या असे आपण म्हणतो. या तपश्चर्येची फळे आतापर्यंत शिक्षण घेऊन बाहेर पडणार्या मुलांच्या जीवनात उमटली आहेत. सुसंस्कारीत, जिज्ञासू आणि समाजकर्तव्य बांधिलकीची जाण असणारे विद्यार्थी इथे घडले. विविध वाहिन्यांवरील बडबडींपेक्षा या कार्याचे मोल किती? याचा वाचकांनी हिशोब मांडावा.
लातूरनिवासी डॉ. अशोकराव कुकडे हे असे नाव आहे ज्याचे वर्णन दाढी, मिशा, लांब केस नसलेले, तुमच्या आमच्यासारखे पोशाख घालणारे, आधुनिक काळातील महर्षी आहेत.
महाराष्ट्रात विविध व्यक्तीच्या नावांची निरंतर चर्चा चालते. नऊची बांग देणारे कोण? किंबहुना किंबहुना करणारे कोण? मराठीसाठी गळा काढणारे कोण? ब्राह्मणांना शिव्या घालणारे कोण? सर्व आपल्याला माहीत आहेत. लातूरनिवासी डॉ. अशोकराव कुकडे हे असे नाव आहे ज्याचे वर्णन दाढी, मिशा, लांब केस नसलेले, तुमच्या आमच्यासारखे पोशाख घालणारे, आधुनिक काळातील महर्षी आहेत. ते लातूरचे भूषण आहेत, हा खूप मर्यादित शब्दप्रयोग झाला. ते महाराष्ट्राचे भूषण आहेत. लातूरमधील त्यांचे स्थान कोणते? विवेकानंद रुग्णालयाचे शिल्पकार की, निष्णात सर्जन, की उत्तम वक्ता हे त्यांचे स्थान नाही. लातूरमध्ये त्यांचे स्थान सर्व विचारधारांच्या आणि सर्व प्रकारची कामे करणार्यांचे अत्यंत विश्वासाचे त्यांचे स्थान आहे. नुकतेच दिवंगत झालेले शिवराज पाटील शेवटच्या काही दिवसात अन्नपाणीदेखील घेत नसत. शेवटच्या तीन दिवस अन्नाचे ग्रहण डॉ. अशोकरावांच्या हस्ते त्यांनी केले. पवारी राजकीय विचार केला तर शिवराज पाटील वेगळ्या विचारधारेचे आणि अशोकराव संघविचारांचे. पवारीशैलीत मी त्यांची जात काढत नाही. संघ स्वयंसेवकाच्या दृष्टीने ते पाप आहे.
असे एकच अशोकराव कुकडे महाराष्ट्रात आहेत असे नाही. त्यांच्या प्रतिकृती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सापडतील. कुणाची उणीदुणी न काढता, कुणाची जात न काढता, कुणाच्या धार्मिक भावना न दुखावता, काम करणारी अशी शेकडो मंडळी आहेत. सांस्कृतिक र्हास करणार्या बोलघेवड्या, तोंडाळ आणि स्वार्थाशिवाय ज्यांना दुसरे काहीही सुचत नाही अशा बजबजपुरीतील या दीपमाळा आहेत.
‘इथे भावी पिढी घडविली जाते’ असे एका वाक्यात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्चे वर्णन करावे लागेल.
‘इथे भावी पिढी घडविली जाते’ असे एका वाक्यात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्चे वर्णन करावे लागेल. ज्यांच्या वस्तीपालावर हजारो वर्षे संस्कृत पोहोचले नाही त्या पालावरची मुले आणि मुली आज ईशावास्योपनिषद तोंडपाठ म्हणतात. या उपनिषदाविषयी महात्मा गांधी म्हणाले की, हिंदूंचे सर्व धर्मग्रंथ नष्ट झाले आणि केवळ एकच ईशावास्योपनिषद् उरले तर तेवढ्यावर हिंदू धर्म आणि हिंदू समाज जगेल. मुंबईत इंटरनॅशनल शाळेत जाणार्या मुलांना आपला वारसा माहीत नसतो आणि पालकांनाही त्याचे काही वाटत नाही म्हणून म्हटले की, भारत घडविणारी पिढी तिथे तयार होते.
महाराष्ट्राच्या अत्यंत विषारी धार्मिक, सांस्कृतिक वातावरणात राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे धर्मराजाप्रमाणे स्थिर आहेत.
महाराष्ट्राच्या अत्यंत विषारी धार्मिक, सांस्कृतिक वातावरणात राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे धर्मराजाप्रमाणे स्थिर आहेत. याचे एक उदाहरण आपण पाहू. धर्मराजाने दुर्योधनाचा उल्लेख सुयोधन असाच केला. दुर्योधनाविषयी त्याच्या मनात विखार कधी राहिलाच नाही. आज शरदराव पवार, देवेंद्र यांच्या उदारवृत्तीमुळे राज्यसभेत गेले आहेत. हे शरद पवार कसे आहेत तर ‘पगडी नको पागोटे हवे’ असे म्हणणारे आहेत. ‘ओठात राम पोटात नथुराम’ हे त्यांचेच वाक्य आहे. ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे ते जनक आहेत. ‘पूर्वी छत्रपती पेशव्यांना वस्त्र देत, आता पेशवे छत्रपतींना खासदारकी देतात’ हेही शरद पवारांचेच वाक्य आहे. हा इतिहास माहीत असूनही धर्मराजवृत्तीने आणि सुयोधन भावनेने फडणवीस यांनी शरदराव पवार यांच्या राज्यसभा खासदारकीत अडथळे निर्माण केले नाहीत. देवाभाऊंना प्रणाम. सर्व आघात ते सहन करत आहेत. त्यांची जात काढली गेली. त्यांच्या पत्नीची टिंगलटवाळी केली गेली, नको ते आरोप केले गेले. इसापची एक कथा आहे. एकदा घोडा आणि गाढवाची पैज लागली. आपल्या दोघांत मोठे कोण? घोड्याच्या शक्तीपुढे गाढवाचा टिकाव लागला नाही. पळण्यातही तो हरला. शेवटी गाढव एका उकिरड्यावर गेले. पाय वर करून लोळू लागले. गाढव घोड्याला म्हणते, मी हे करू शकतो तू करू शकतोस का? तेव्हा घोडा म्हणाला, माफ कर, तू जिंकलास, मी हरलो.
देवेंद्र फडणवीस ‘नऊच्या बांगे’ला उत्तर देत नाहीत. ‘किंबहुना किंबहुना’च्या तोंडी लागत नाहीत. नातवाला किंमत देत नाहीत, थंड डोक्याने ते आपले काम करीत राहतात. ते आणि मी एका विचारधारेचे आहोत म्हणून ही स्तुती करतो असे नाही. महाराष्ट्राचे आजचे गढूळ वातावरण पाहता ते चांगले राहिल यासाठी आपल्या चारित्र्यबलाने उभा राहिलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणून असे निश्चयाने म्हणता येईल की, हे काळे ढग विरतील स्वच्छ सूर्यप्रकाश पडेल आणि उगवती पिढी अभिमानाने म्हणेल,‘महाराष्ट्रात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे’.