छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्रीराम नवमीच्या दिवशी विधिवत शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला. संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय शिक्षण संकुलामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजियोथेरेपी कॉलेज सुरू झाले आहे.
या महाविद्यालयासाठी 25 एकर जागा किराडपुरा राम मंदिराने दिली असून या शिवाय अन्य दहा एकर जागा संस्थेने खरेदी केली आहे. हेडगेवार रुग्णालयाला जागा देताना सदर जागेवर प्रभू रामाचे मंदिर बनवण्याची अट किराडपुरा राम मंदिराने घातली होती. त्याप्रमाणे अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराप्रमाणे छोटेसे मंदिर उभारण्याच्या दृष्टीकोनातून रामनवमीच्या दिवशी 26 मार्च 2026ला शिलान्यास समारंभ महाविद्यालयाच्या परिसरात संपन्न झाला.
एकूण जागेपैकी सात एकर जागेवर श्री प्रभू रामचंद्राचा मंदिर परिसर असेल या परिसरात अयोध्येमध्ये मिलाफवन, विश्वामित्रवन, चित्रकूट वन, मधुवन, रामवन, बानगंगावन, वैकुंठवन होते. त्याचप्रमाणे याही परिसरात वरीलप्रमाणे वनांचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी आत्तापर्यंत 1000 झाडे लावून झाली आहेत. या सर्वांचे डिझाईन न्यूयॉर्कच्या कंपनीने केले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे आर्किटेक्ट आशिष सोमपुरा यांच्यावरच याही मंदिराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार राम मंदिर 4180 चौरस फुटाचे असेल आणि मंदिराची उंची 46 फूट असेल. या राम मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे अयोध्येत शरयू नदीवर ज्या पद्धतीने घाट बांधण्यात आला आहे त्याच धर्तीवर येथे कृत्रिम शरयू घाट तयार करण्यात येणार आहे. जणू काही आपण अयोध्येत आल्याचा भाव भाविकांमध्ये जागृत होईल, हेच या मंदिराचे वैशिष्ट्य असणार आहे.
अयोध्येतील मंदिराची छोटी प्रतिकृतीच हे मंदिर असेल. या मंदिराच्या निर्माणासाठी अयोध्येच्या मंदिराकरिता वापरलेला बन्सी पहाडपूर हा दगड, राजस्थानमधील मकराना मार्बल वापरण्यात येणार असल्याचे शिलान्यास समारंभात सांगण्यात आले. अयोध्येतील रामललाची आकर्षक मूर्ती घडवणारे मूर्तिकार श्री योगीराज हे तशीच हुबेहूब मूर्ती बनवून देणार आहेत.
अयोध्येतील श्रीराम मंदिर बनवणारे कारागिर छत्रपती संभाजीनगर येथे मंदिराच्या निर्माणासाठी येणार आहेत.
प्रस्तावित भव्य श्रीराम मंदिराचा रामनवमीच्या दिवशी दिनांक 26 मार्चला संपन्न झालेल्या शीलापूजन कार्यक्रमात अयोध्येमधून आणलेल्या नऊ शिळांची पूजा मुंबईचे उद्योजक नरेश व सुनयना सराफ, डॉ. पिनाकिन व डॉ. प्रियंका पुजारी, डॉ. वैभव व अनिता राजहंस, सुनील व सुषमा सिरसवाल तसेच मेडिकल कॉलेजमधील स्वच्छता विभाग पर्यवेक्षक शांताराम व मंगल दापके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.ना. अतुलजी सावे यांनीही शिलापूजन केले.
अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासंदर्भात संस्थेचे विश्वस्त सुनील केजरीवाल, डॉ. अनंत पंढरे, डॉ. सीमा पंढरे, नरेश सराफ यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतराय आणि नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेऊन रितसर परवानगी घेतली.
मंदिर उभारण्याची जबाबदारी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक नरेश सराफ यांनी स्वीकारली असून उपस्थित भाविकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी प्राप्त झाला. उपस्थित भक्तांनी अंगावरील सोन्याचे दागिने, वस्तू यावेळी शिलान्यासात अर्पण केल्या.
या भव्य शिलान्यास सोहळ्यात चिन्मय मिशनचे स्वामी आत्मेशानंद महाराज, पूजनीय आनंद शास्त्री गिरीजी महाराज, विजय पल्लोड महाराज, प्रभाकर महाराज, मुनिश्री सुदर्शन महाराज कपाटे, अभिनव महाराज कपाटे, इस्कॉनचे रुक्मिणी रमणदास महाराज या पूजनीय संतांसोबतच अशोक गोयल, मुकुल अग्रवाल, सुनील केजरीवाल, विमल भिमराजका, रमेश केजरीवाल, नंदलाल चावला, सुप्रतिक चक्रवर्ती, प्रांत संघचालक अनिल भालेराव, विश्व हिंदू परिषद प्रांत अध्यक्ष संजय गायकवाड, डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. अश्विनकुमार तुपकरी, मुकुंद भोगले, डॉ. अनंत पंढरे, अधिष्ठाता डॉ.स्वाती शिरडकर, घाटी रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, डॉ. नीता पाडळकर, उद्योगपती विमल केडिया, महानगरपालिकेचे सभापती अनिल मकरीये, संभाजीनगर शहरातील मंदिरांचे विश्वस्त यांच्यासह परिसरातील तीन हजार भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
- राजीव जहागीरदार
विश्व हिंदू परिषद
मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम प्रमुख देवगिरी प्रांत