तिसर्‍या महायुद्धातील अंतस्:थ प्रवाह - प्रवृत्तींचा संघर्ष

विवेक मराठी    03-Apr-2026   
Total Views |
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे स्वरूप जरा खोलात जाऊन पाहिले तर हा तीन देशांतील प्रवृत्तींचा लढा आहे. इराणपुरता नेस्तनाबूत झाला नाही तर पुढच्या वेळी तो इस्रायलचे अस्तित्व जगातून पुसून टाकेल. जसा चवताळलेला प्राणी जीवाच्या निकराने तुटून पडतो तसे ते युद्ध होईल. त्यासाठी इराण जेवढा खच्ची होईल तेवढे इस्रायलला पाहिजे आहे. त्याची इतकी अधोगती झाली पाहिजे की पुढची 50-100 वर्षे इराणला डोके वर काढता येऊ नये. ही स्वसंरक्षणाची अत्यंत टोकाची प्रवृत्ती आहे.
 
iran israel and america
 
 
हा लेख लिहित असताना, इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाला आज 32 दिवस झाले आहेत. या बत्तीस दिवसात तीनही देशांनी कुठलीही तमा न बाळगता विरोधी देशांवर बेमुर्वतपणे, दिवस-रात्र न पाहता मन मानेल तिथे हल्ले सुरू ठेवले आहेत. एक मात्र घडले की, अमेरिका-इस्रायल यांचे इराणला गुढघे टेकायला लावण्याचे मनोरे धुळीस मिळाले. तीन वेळा इराणच्या शीर्षस्थ नेतृत्वाला नेस्तनाबूत करूनही, नव्या नेतृत्वाने ना गुढघेे टेकले ना तहाची बोलणी करण्याची उघडपणे तयारी दाखवली. इराणचे हवाई आणि नौदल पुरते नष्ट झाले अशी बढाई ट्रम्प वारंवार मारतात. त्यात बरेच तथ्य असावे. ती केवळ आत्मप्रौढीच आहे असे म्हणता येणार नाही. इराणच्या पायदळाचा आणि समांतर इराणी क्रांतिकारी सुरक्षादलाचा जमिनीवरील युद्धात कस लागायचा आहे. जमिनीवरील युद्ध होणार की नाही याचा निर्णय साधारणपणे 6 एप्रिल नंतर ठरेल. त्याच वेळी स्वतःला अमेरिकेचे सर्वेसर्वा मानणारे आणि राजकीय आखाड्यात सांसदीय संकेतांना ठोकरून लावणारे ट्रम्पबाबा मात्र अनेक बाजूंनी दबावाखाली येऊन जेरीस आले. त्यांना इराणशी बोलणी करून युद्धाच्या त्रांगड्यातून सुटका करून घ्यायची आहे. त्यांच्या सवयीनुसार त्यांनी विधान केले की, इराण जेरीस आल्याने त्याच्याशी तह करण्याच्या संबंधात उच्चस्तरीय बोलणी मध्यस्थांकरवी सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी कोणाला पकडावे? तर बेभरवशाच्या पाकिस्तानला. तेवढ्यात पाकिस्तानही भाव खाऊन गेला. आता जरी इराण वाटाघाटी करण्यास अजिबात उत्सुक नाही असे दाखवत असला तरी पडद्याआड, इजिप्त-तुर्की-सौदी अरेबिया आणि पाकिस्तान हे पोस्टमनचे काम करत असावेत. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने आगाऊपणा करत सर्व देशाच्या वाटाघाटी पाकिस्तानमध्ये घडवून आणण्याची तयारी दाखवली.
 
 
मार्को रुबिओची मुलाखत
 
अमेरिकाच्या प्रशासनातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असलेल्या मार्को रुबिओंची दि. 31 मार्चला अल जजिरा वाहिनीवर मुलाखत दाखवली गेली. ही मुलाखत युद्ध कोणत्या वळणावर जाते आहे हे स्पष्ट करणारी होती. मुलाखतीदरम्यान जाणवल्याप्रमाणे मार्को रुबिओ अत्यंत कसलेला, धोरणी आणि स्पष्ट विचार मांडणारा दिसला. त्या मुलाखतीतून अमेरिकेचे युद्धाबाबत बदललेले आकलन, पुढे घडू शकणार्‍या घटनांचा अंदाज आला. सर्वात पहिली आणि महत्त्वाची अपेक्षा म्हणजे इराणने अण्वस्त्र आणि दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करण्याचा विचार सोडून द्यावा. जोपर्यंत ते करण्याची इराण तयारी दाखवत नाही तोवर युद्ध चालूच राहील. म्हणजे राजवट उलथून टाकण्याचा विचार अमेरिकेने सोडून दिला आहे. इस्रायल यासाठी नक्कीच तयार नसणार. दुसरे होर्मुुझ सामुद्रधुनीवरील ताबा इराणने सोडला पाहिजे. ती मुक्त करण्याचा अमेरिकेचा निर्धार असून अमेरिका तो प्रश्न येत्या काही आठवड्यात, (महिन्यात नाही) निकालात काढेल. दिलेल्या मुदतीच्या आत, दि. 6 एप्रिलपूर्वी जर इराण मानला नाही तर इराणचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून पुसले जाईल. कारण आण्विक अस्त्रे आणि दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे इराणच्या हातात असणे आजूबाजूच्या छोट्या मोठ्या देशांसाठी धोक्याची घंटा असेल. इराणला मध्येच सोडून दिले तर तो पुन्हा आण्विक शस्त्रसज्जता मिळवेल; तेव्हा तर तो अधिक धोकादायक ठरेल. इराणने अणू ऊर्जेसाठी स्वनिर्मित युरेनियम न वापरता योग्य क्षमतेचे युरेनियम आणि इतर साधनसामग्री दुसर्‍या देशांकडून विकत घ्यावी. मार्कोने युरोपातील देशांनी पळ काढल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.
 
 
प्रवृत्तींचा लढा
 
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे स्वरूप जरा खोलात जाऊन पाहिले तर हा तीन देशांतील प्रवृत्तींचा लढा आहे. इराण पुरता नेस्तनाबूत झाला नाही तर पुढच्या वेळी तो इस्रायलचे अस्तित्व जगातून पुसून टाकेल. जसा चवताळलेला प्राणी जीवाच्या निकराने तुटून पडतो तसे ते युद्ध होईल. त्यासाठी इराण जेवढा खच्ची होईल तेवढे इस्रायलला पाहिजे आहे. त्याची इतकी अधोगती झाली पाहिजे की पुढची 50-100 वर्षे इराणला डोके वर काढता येऊ नये. ही स्वसंरक्षणाची अत्यंत टोकाची प्रवृत्ती आहे.
 
 
अमेरिकेला जगावर भौतिक प्रभुत्व प्रस्थापित करण्याची भूक आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जुन्या महासत्ता जाऊन नव्या जगात अमेरिका सर्वशक्तिमान देश बनला. 1950च्या दशकात, इराणच्या खनिज तेलावर आपली प्रभुसत्ता असावी यासाठी मोहम्मद मोसादेक यांचे रितसर निवडून आलेले लोकशाही शासन उलथवण्याची कारवाई अमेरिकेने इराणमध्ये केली. अंतर्गत बंडाळी यशस्वीपणे राबवून तिथले निवडून आलेले सरकार पाडले. त्यानंतर अमेरिकेने अनेक देशांत बंडाळ्या माजवून बाहुले ठरलेली सरकारे आणली. जिथे मार खाल्ला तिथून अमेरिकेने शेपूट दाबून पळ काढला. याचे व्हिएतनाम आणि अगदी अलिकडचे उदाहरण अफगाणिस्तान आहे. असे जरी असले तरी अमेरिकेच्या जनमानसाची प्रवृत्ती भ्रामक गौरवोन्मादाची (Megalomania) आहे. अमेरिकेला मानवजात, मानवता, सर्वांचे कल्याण इ. बाबतीत काही देणे घेणे नाही. ट्रम्प हे त्याचे सर्वात ठळक उदाहरण आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन - मागा’ - या बरोबरच ट्रम्पबाबाची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा या सर्व प्रवृत्तींचा मिलाफ अमेरिकाच्या इराणविषयक धोरणात दिसतो.
 
 
tramp
 
एकंदरच इस्लाममध्ये सर्वात प्रबळ प्रवृत्ती काफिरद्वेषाची आहे. इस्लाममधे जो पुरुष जन्मतो (महिला नाही) तो जन्मजात अल्लाचा लाडका आणि स्वर्गालाच जाणारा असतो. त्याने केलेल्या वाईट भौतिक कृत्यांची पुरेशी शिक्षा भोगून तो अनंत काळापर्यंत स्वर्गवासी होणारच असतो. त्याचे या जीवनातील ध्येय अनंत काळापर्यंत नरकात जाणार्‍या गैरमुस्लिमांना इस्लाममधे आणणे हेच असते. त्याला सर्व मानवजातीचे भले केवळ इस्लाममध्ये असणे यातच भासते. त्यामध्ये किती लोक मेले, किती निरपराधांचा बळी गेला, किती लोक अत्याचारांना बळी पडले हे खिसगणतीत नसते. येनकेन प्रकारेण गाझीपदासाठी योग्यता मिळवणे ही सर्वसाधारण मुस्लिम समाजातील प्रवृत्ती आहे. शिया मुस्लिमांमधे संस्थापक असलेल्या चौथ्या खलिफांच्या, हजरत अलिंच्या हौतात्म्याचा त्याला आधार आहे. धर्मयुद्धात हौतात्म्य मिळणे हा जीवनातील श्रेष्ठ मान आहे. स्वतःला हौतात्म्य मिळण्याबरोबरच इतरांनाही ते मिळावे हे ते धरून चालतात. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ याला धरून काही वेळा एक पाऊल मागे जाणे हे या प्रवृत्तीत बसत नाही. त्यांच्यासाठी ‘बहुजन हित’ हौतात्म्यात आणि ‘बहुजन सुख’ 72 पर्‍यांच्या स्वर्गीय सहवासात असते. आततायीपणातून किती नरसंहार झाला याला महत्त्व असत नाही. आजच्या घटकेला इराणी क्रांतिकारी सुरक्षादल इतर सर्व घटकांवर वर्चस्व राखून आहे. ते देशांतील राजकारणी, मुत्सद्दी आणि सर्वसामान्य जनतेच्या आशाआकांक्षाना मानणारे नाहीत. त्याचा प्रत्यय इराणच्या तर्फे धोरणात्मक निवेदन देणार्‍या प्रवक्त्याची देहबोली आणि आवाजातून जाणवतो. त्याला आपल्याबरोबर इतरांनाही हौतात्म्याचे आणि मरताक्षणीच स्वर्गाचे वाटेकरी करायचे आहे. या प्रवृत्तीमुळे किती लोक मरतील, भविष्यात उजाड झालेल्या देशापुढे आणि येणार्‍या पिढ्यांपुढे कोणते विक्राळ प्रश्न उभे राहतील याचे देणे घेणे नाही. त्यामुळे अपरिमित हानी होऊनही इराणी क्रांतिकारी सुरक्षादल एकही पाऊल मागे घेण्यास तयार नाही. इराणी क्रांतिकारी सुरक्षा दल याच कट्टर प्रवृत्तीला धरून उभारले गेले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जमिनीवरील संघर्षाशिवाय पर्याय नाही. हजारोंच्या संख्येने विशेष प्रशिक्षित ‘मरीन’ सैनिकदले तैनात करून ट्रम्पबाबाची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
 
 
 
tramp
 
अंत:स्थ प्रवाह
 
वडिलांवर झालेल्या प्राणघातकी हल्ल्यादरम्यान मोज्तबा जबर जखमी झाल्याच्या बातम्या होत्या. मोज्तबाची आयातोल्ला पदावर नेमणूक होण्यासाठी पहिले तर वेळ झाला; त्यानंतर तो कुठेही जनतेसमोर आलेला नाही. त्याच्या वतीने फक्त इराणी क्रांतिकारी सुरक्षादलाचा प्रवक्ताच धोरणात्मक घोषणा करतो. इराणबाबत तज्ञांचा कयास आहे की आता मोज्तबा सुरक्षादलाच्या देखरेखीखाली असून केवळ त्यांच्या हातातील बाहुले बनला आहे. कट्टरपंथी त्याला पुढे करून मनमानी करतात. त्यांच्यापुढे इतर कोणाचे चालत नाही. कोणी विरोधात हूं का चूं केले तर त्याचा लगेच काटा काढला जाईल.
 
 
दुसरीकडे ट्रम्पवर युद्धबंदी आणि तह घडविण्यासाठी अंतर्गत आणि इतर देशांचा, विशेष करून नाटो सदस्य देशांचा दबाव वाढत असून ट्रम्प आता कदाचित ‘जितं मया’ अशी एकतर्फी घोषणा करून युद्धातून पळ काढण्याच्या विचारात असला तरी, त्याच्यावर आखाती देशांचा युद्ध चालू ठेवून इराणचा पुरता बीमोड करण्यासाठी दबाव येत आहे. कारण यापुढे आखाती देशांत स्थायी सैनिकी तळ ठेवून त्या देशांना सुरक्षेचे मृगजळ दाखविणे आणि वारेमाप मोबदला घेणे यापुढे कोणत्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला जमणार नाही. आखाती देशांत अमेरिकेची पत पुन्हा न सुधारणा होण्याइतपत बिघडली आहे. त्या देशांचे अमेरिकी सुरक्षेचे मृगजळ विरले आहे. सध्या ट्रम्प युरोपातील देशांना गुंतवून होर्मुुझ खाडी मोकळी करण्याच्या प्रयत्नात असला तरी ते लोक किती बधतील हा प्रश्नच आहे. त्याच वेळी ट्रम्पमधील व्यापारी जागा होऊन आता आखाती देशांकडून युद्धाचा खर्च कसा वसूल करता येईल या फिकिरीत आहे. सैनिकी संघर्षाचा काही तरी आर्थिक अंदाज अमेरिकेने घेतला असणारच. त्याचा किती टक्के खर्च आखाती देश उचलतील याचा अंदाज अमेरिका घेतच असणार. ते पुढे येतील असे वाटत नाही. जर अमेरिकेला योग्य मोबदला मिळाला नाही तर, आतबट्टयात जाणारा व्यवहार सोडून अगदी 24 तासांत गाशा गुंडाळून ट्रम्प बाहेर पडेल. काही नाटो सदस्यांना ट्रम्पची कटकट गेल्याचा आनंदच होईल. ते आणि आखाती देश मिळून इराणशी तहाच्या वाटाघाटी करून होर्मुझ खाडी पूर्ववत वाहतुकीसाठी मोकळी करण्यात पुढाकार घेतील. त्यावेळी इराणची बाजू वरचढ असेल. युद्धात झालेली धुळधाण भरून काढण्यासाठी इराण वाहतूक कर लावेल. ती रक्कम किती असावी याबाबत तहाच्या टेबलावर बसलेल्या देशांना मुठी ढिल्या सोडाव्या लागणार आहेत. ट्रम्पने इस्रायलला तहाच्या बोलण्यात सामील करून घेतले नाही तर नाटो देशही त्याला वगळतील. यापुढे जगाच्या व्यवहारात अमेरिका-इस्रायल वाळीत टाकले जातील. युद्धातून पाय काढण्यापूर्वी अमेरिका-इस्रायल इराणचे विशेष करून अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र प्रकल्पांचे होईल तेवढे नुकसान करून जितके वर्ष त्याच्या प्रगतीला खीळ घालता येईल तेवढा प्रयत्न करतील.
 
 
या दरम्यान अमेरिकेने निकराचा प्रयत्न करून अण्वस्त्र कारखाने, भुयारातील क्षेपणास्त्रांचे साठे नष्ट करताना अमाप मानवी मोल देतानाच त्या संघर्षात जर सुरक्षादलाचे सामर्थ्य पुरेसे नष्ट केले आणि त्यांचे आता जे भय जनमानसात आहे ते अगदी कमी झाले, तर इराणी लोक रस्त्यांवर उतरून सुरक्षादलांच्या एकेका सदस्याला बाहेर काढून अक्षरशः ठेचतील. तो या शतकातील अत्यंत आघोरी आणि फार मोठा नरसंहार ठरेल. त्यानंतरच इराणमधे खर्‍या अर्थाने सत्तापलट घडेल.

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.