मातृभाषेतून विज्ञान प्रसाराचा - हीरक महोत्सवी प्रवास

विवेक मराठी    30-Apr-2026
Total Views |
@ अनघा अमोल वक्टे

vivek 01
 
ज्या काळात समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवणे हे एक मोठे आव्हान होते, अशा वेळी म.ना. गोगटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एका ध्येयवादातून ’मराठी विज्ञान परिषदे’चे छोटेसे रोपटे लावले. विज्ञानाला केवळ प्रयोगशाळेत बंदिस्त न ठेवता मातृभाषेतून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि थेट मनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्था करत आहे. संस्थेने विज्ञानाला मनोरंजनाचा आणि जगण्याचा भाग बनवले. संस्थेच्या गौरवशाली प्रवासाचा घेतलेला मागोवा
 
दिनांक 24 एप्रिल 1966 रोजी म.ना. गोगटे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने ’मराठी विज्ञान परिषद’ या संस्थेची स्थापना केली. 60 वर्षांपूर्वी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवायचे हे सोपे काम नव्हते; पण ध्येयाने पछाडलेली माणसे एकत्र येऊन काम करतात, तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. महाराष्ट्राच्या मातीतील ही संस्था मातृभाषेतून विज्ञान प्रसाराचे कार्य करू लागली. या संस्थेच्या मूळ उद्देशांमधला एक उद्देश म्हणजे विज्ञानाचा मातृभाषेतून विज्ञान प्रसार करणे, याचबरोबर मराठी भाषा समृद्ध करणे, समाजात विज्ञान प्रसार करताना, समाजाला आपल्या जीवनात असणारे विज्ञानाचे महत्त्व समजून देणे, हेही उद्देश आहेत.
हे उद्देश पूर्ण करण्यासाठी परिषद विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. स्थापना झालेल्या वर्षापासून अगदी सहा महिन्यांत परिषदेने संमेलन (आता अधिवेशन) घ्यायला सुरुवात केली. पहिले संमेलन डिसेंबर 1966मध्ये मुंबईतील गिरगांव भागात असणार्‍या ‘बिर्ला क्रीडा केंद्र’ येथे झाले. त्यानंतर आजतागायत म्हणजे गेल्या 60 वर्षांत 60 अधिवेशने झाली. यात वेगवेगळ्या विषयांवर परिसंवांद, चर्चासत्र अशी वैज्ञानिक मेजवानी, त्याशिवाय विविध विषयांतील तज्ज्ञ, संशोधक यांची उपस्थिती ही प्रत्येक अधिवेशनाची खासियत. याचप्रमाणे वर्धापन दिन(एप्रिल) आणि विज्ञान दर्पण (ऑगस्ट) हे कार्यक्रम वर्षातून एकदा विज्ञान भवनात होतात. यानिमित्ताने विज्ञानप्रेमी एकत्र भेटतात.
1995 पासून दर तीन वर्षांतून एकदा असे विद्यार्थ्यांसाठी बालविज्ञान संमेलन परिषदेने सुरू केले. या संमेलनात कृतीप्रधान प्रकल्पांवर भर देण्यात आला. विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे, यासाठी संशोधन आवश्यक आहे. परिषदेचा चौथा उद्देश वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे हा आहे. ’विद्यार्थी दशेत जर हा विचार रुजवला तर भविष्यात अनेक संशोधक निर्माण होतील’ या उद्देशाने पी.एच.डी.च्या विद्यार्थ्यांमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘संशोधनाकडे वळा’ हा उपक्रम घेतला जातो. मूलभूत विज्ञानात संशोधन व्हावे, मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधीची, विविध शैक्षणिक संस्थांची माहिती मिळावी म्हणून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. यात विद्यार्थी तज्ज्ञांशी संवादही साधतात.
विज्ञान प्रसारासाठी ’मराठी विज्ञान परिषदे’ने प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी कार्यक्रम आयोजित केले. अगदी लहान मुलांसाठी गोष्टीतून, खेळण्यांतून विज्ञान, शालेय विद्यार्थ्यांसाठी सोपे प्रयोग, प्रारूपे, समस्यापूर्ती, संकल्पना विकसन अभ्यासक्रम असे अनेक उपक्रम असतात. ’विज्ञान प्रयोग’ आणि ’खेळणी’ हे उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही आयोजित केले जातात.
 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वयंसेवक होऊन विद्यार्थ्यांना प्रयोग, खेळणी शिकवताना स्वत: विज्ञान संकल्पनांना उजळणी देण्याची संधी मिळते.
 
’राष्ट्रीय विज्ञान दिन’, ’राष्ट्रीय गणित दिन’, ’रसायन दिन’ अशा विविध दिवसांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून विज्ञान कार्यक्रम परिषदेत आयोजित केले जातात.
 
फक्त विद्यार्थी दशेतच नाही तर प्रौढांसाठीही अनेक कार्यक्रम आहेत. शिक्षकांसाठी प्रशिक्षणे, ग्रहणांविषयी आणि इतर विज्ञानविषयक अनेक व्याख्याने परिषदेने आयोजित केली. ’शहरी शेती’ या उपक्रमात घराच्या बाल्कनीत, कुंड्यांमध्ये झाडे कशी लावायची याचे मार्गदर्शन केले जाते. घरातल्या भाज्या, फळांच्या कचर्‍याचे व्यवस्थापनही यात होते.
 
’विज्ञान रंजन कथा स्पर्धा’, ’निबंध स्पर्धा’, ’उत्तम विज्ञान पुस्तक’, ’अभियांत्रिकी पुरस्कार’, ’प्राध्यापक संशोधकांसाठी प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कार’, ’जीवनगौरव पुरस्कार’, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनात रुची निर्माण होण्यासाठी ’विज्ञान संशोधन पुरस्कार’ अशा स्पर्धा आणि पुरस्कारांचे आयोजनही परिषद करते. ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थानांही पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जाते.
 
विज्ञान प्रसारासाठी मनोरंजनाचे माध्यम वापरावे म्हणजे अधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल अशा विचाराने, विज्ञान कथा लेखनाला प्रोत्साहन दिले. यासाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करुन नवीन विज्ञान कथा लेखक तयार केले. मराठी माणूस आणि नाटक याचे एक वेगळेच नाते आहे. याचाच उपयोग करून घेत ’विज्ञान एकांकिका’ या विज्ञान प्रसाराच्या नव्या स्वरुपाची सुरुवात 2015 पासून झाली. आकाशवाणी तसेच दूरदर्शनवर विज्ञान मालिकांच्या माध्यमातूनही परिषद विज्ञान कार्यक्रम करत असते.
 
’पत्रिका’ या विज्ञान मासिकासह इतर विज्ञान पुस्तके, ई पुस्तके, बोलकी पुस्तके तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकेही परिषदेने प्रकाशित केली आहेत. वर्तमानपत्रात विज्ञान विषयक अनेक सदरांतून परिषद लेख प्रसिद्ध करत असते. ’दै. लोकसत्ता’तील ’कुतूहल’ या सदराचे हे 21 वे वर्ष आहे. परिषदेत अनेक विज्ञान पुस्तके, विज्ञान सी.डी. असलेले संदर्भालयही आहे.
 
बदलत्या काळाबरोबर परिषदेने नवीन गोष्टी स्वीकारल्या. कोविडच्या काळात आणि त्यानंतरही विज्ञान प्रसारासाठी परिषदेने ऑनलाईन माध्यमही वापरले आहे. तरुणांचा विज्ञान प्रसारात सहभाग कसा वाढेल, यासाठी परिषद प्रयत्न करत असते.
विज्ञान प्रसाराच्या या कार्यासाठी डॉ. रा.वि. साठे, म.ना. गोगटे, प्रा. भा.मा. उदगावकार, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, प्रभाकर देवधर, आणि 2014 पासून प्रा. ज्येष्ठराज जोशी या अध्यक्षांचे मार्गदर्शन लाभले आहेत.
 
 
1966 साली लावलेल्या या लहानशा रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. परिषदेच्या मुंबई(मध्यवर्ती) बरोबर 68 विभाग कार्यरत आहेत. त्यात चार विभाग महाराष्ट्राबाहेर आहेत, जिथे तिथल्या स्थानिक भाषेतूनही विज्ञान प्रसार होत आहे.
 
 
रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी विज्ञान भवन, शीव-चुनाभट्टी, मुंबई येथे वर्धापन दिन साजरा झाला. मराठी विज्ञान परिषदेला भेट द्या, विज्ञान प्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा.
- लेखिका मराठी विज्ञान परिषद येथे
विज्ञान अधिकारी आहेत.