Baramati

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. स्व. अजितदादा यांचे व संपूर्ण पवार कुटुंबियांचे बारामतीतील राजकीय वर्चस्व पाहता ही निवडणूक बिनविरोधच होणे अपेक्षित होते. तरीही तेथे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय तर्क-विर्तकांना उधाण आले आहे. काँग्रेसचा मुखवटा ठेऊन शरद पावरच हा खेळ खेळत नाही ना? अशा ही चर्चा रंगू लागल्या आहेत. याचेच विश्लेषण करणारा लेख..
Baramati By Election sunetra pawar
देशात एखाद्या राजकीय नेत्याच्या किंवा आमदाराच्या आकस्मिक निधनानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागते. पण ती पोटनिवडणूक म्हणजे बर्याच वेळा एक औपचारिकता असते. बर्याच वेळा ही निवडणूक बिनविरोधच झाल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली जाते, पण त्या निवडणुकीत राजकीय रंगत नसते. ज्या आमदाराचे किंवा नेत्याचे निधन झालेले असते, त्यांच्या वारसदारांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे त्यांची सहानुभूती उमेदवाराच्या पाठीशी असते. याच जोरावर त्या वारसदाराचा अगदी सहज विजय होतो. गेल्या काही वर्षांत याला काही निवडणुका अपवादात्मक राहिलेल्या आहेत. 2021मध्ये पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या भारत भालकेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा भगीरथ भालके याचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजीत कदम हे बिनविरोध निवडून आले होते. पण हे क्वचित घडत असते. त्या नेत्याची त्या मतदारसंघातील लोकप्रियता, त्यांनी केलेली विकासाची कामे यामुळे बिनविरोध केल्याशिवाय इतरही राजकीय पक्षांना पर्याय नसतो. मात्र हेच अजितदादांच्या बाबती घडणे अपेक्षित होते.
अजितदादा म्हणजे राज्यातील दमदार नेते. अनेक वर्षे उपमुख्यमंत्री व राज्यात विविध खाती सांभाळलेले शक्तिशाली नेते. त्यांचा विजय हा लाखांच्या फरकाने झालेला आहे. विरोधकांची अनामत रक्कमसुद्धा जप्त झालेली आहे. यावरून त्यांची मतदारसंघावरील मजबूत पकड, लोकप्रियता लक्षात येते. मएकच वादा, अजितदादाफ या घोषणेने बारामती मतदारसंघ दणाणून जायचा. आज मात्र त्याच मतदारसंघात त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांना आव्हान देणारे निर्माण झाले आहेत. काँग्रेसने तर पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे, काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ही स्थिती का निर्माण झाली आहे? हा राष्ट्रवादीसाठी चिंतनाचा विषय झाला आहे. सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारा आहे.
बारामती म्हणजे पवार अणि पवार म्हणजे बारामती हेच राजकीय समीकरण गेली कित्येक वर्षे बारामतीत आहे. जेव्हापासून शरद पवार राजकारणात आले, तेव्हापासून या मतदारसंघावर पवार परिवाराची मजूबत पकड राहिली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे.. येथे पवारांव्यतिरिक्त कोणीच येथे निवडून आलेला नाही. त्यांना राजकीय शह देण्याचाही कोणी प्रयत्न केला नाही. मग अजितदादांच्या निधनानंतर व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झालेले असल्यामुळे हा राजकीय शह तर मिळत नाही ना? सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. पण ‘ओठावर एक आणि पोटात एक‘ अशी पवारांसारखी नीती येथेसुद्धा नाही ना? कारण किती म्हटले, तरी आता पवार परिवारात राजकीय मतभेद आहेत. अजितदादांनी वेगळी भूमिका घेऊन जेव्हा भाजपासोबत सरकारमध्ये समील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. त्याच 2024मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यात भलेही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला असला, तरी सुप्रिया सुळे यांना भविष्यात आपल्याच कुटुंबीयांकडून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा त्यांना साक्षात्कार झाला आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले होते. एकंदरीत काय, तर पवार परिवारातील राजकीय मतभेदांची दरी आता खोल होत चालली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या आडून शह देण्याचा पवारांचा गेम तर नाही ना? अशीच शंका उपस्थित होत आहे. काल दिल्लीत वार्तालाप करतांना काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे असे वक्तव्य करून काँग्रेसच्या निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे इतर वेळी हायकंमाडशी अशा प्रसंगी बोलणी करून मार्ग काढणारे पवार मात्र यावेळी शांत आहेत. तरीही पवार शांत राहतील असे दिसत नाही. यात पवाराची सावध भूमिका असल्याचे बोलले जात आहे. जर सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी जास्तच जनमत दिसले, तर काँग्रेस हायकमांडला सांगून पवार काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावतील आणि मग मीडियासमोर आपलीच पाठ थोपटून घेतील. हा पवारांचा जुनाच खेळ आहे. ते असे अनेक खेळ खेळलेले आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडताना नाट्यप्रयोग केला होता. राजीनामा देण्याचे नाट्य रचले, अजितदादांना तो राजीनामा खराही वाटला होता. त्यानंतर झालेले महानाट्य सर्वांना माहीतच आहे. राजीनामा परत घ्यावा यासाठी जयंत पाटील रडले, जितेंद्र आव्हाड यांनी आपले समर्थक आणून पवारसाहेबांनी राजीनामा परत घ्यावा अशा घोषणा दिल्या, हे सर्वच पवारांनी घडवून आणले होते, हे नंतर उघड झाले होेते. असे अनेक राजकीय डावपेच खेळण्यात ते कसलेले मल्ल आहेत. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांना बारामती मतदारसंघातून असा संशयही येत आहे, तर काहींच्या मते पवार अप्रत्यक्षपणे आपली रसद काँग्रेसच्या पाठीमागे लावून ते मतदारसंघाचा अंदाज घेतील किंवा सुनेत्रा पवार यांच्यावर यामाध्यमातून एक वचक निर्माण करतील, असे बोलले जाते.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. यापूर्वीदेखील 2014 साली आकाश मोरे यांनी काँग्रेसकडून बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचाही मोठा जनसंपर्क आहे. त्यातच ते धनगर समाजाचे असल्याने या भागात मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाजाचाही ते पाठिंबा मिळवू शकतात..
आजच्या घडीला सर्वच जर आणि तरच्या गोष्टी असल्या, तरी पवारांची राजकीय गणिते नेहमीच वेगळी असतात. शांतपणे कोणतीही राजकीय खेळी ते करू शकतात आणि तेरावा बॉम्बस्फोट करू शकतात. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कुठेही शरद पवारांचे नाव नसतानाही, आपल्या पक्षाचे तेवढे संख्याबळ नसतानाही त्यांनी खासदारकी आपल्या खिशात घातली. बारामती या आपल्या होम पीचवर शांत राहतील, तर ते शरद पवार कसले..
आजतरी अजितदादांचे काम, त्यांच्याविषयी मतदारसंघात असलेली सहानुभूती यामुळे सुनेत्रा पवार यांचा सहज विजय होईलच, असे चित्र दिसते. यामुळे काँग्रेसची तर बेअब्रू होईलच पण पवार विरुद्ध पवार सामना यापुढे दिसून येईल, हे मात्र निश्चित आहे.
आता पवार शांत का?
शरद पवार नेहमीच काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडीत हस्तक्षेप करतात..याचा प्रत्यय अनेकवेळा महाराष्ट्राला आला आहे. 2019साली उद्धव ठाकरे यांना मुखमंत्री करण्यासाठी राहुल गांधी अनुकूल नव्हते, तेव्हा पवारांनी त्यांना राजी केले होते..
2019च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधील धानोरकर हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते. त्यांना लोकसभेचे टिकीट मिळेल असे आश्वासन ही मिळाले होते. पण तिकीट वाटपाच्यावेळी मात्र विजय वडेट्टीवार यांच्यामुळे तिकीट मिळत नव्हते. अखेर शरद पवारांनी मध्यस्थी करून टिकीट मिळवून दिले.
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एफआयआर दखल करण्यासाठी देशभरात रोहित पवार यांनी रान उठवणारे आहे. मग यानिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हाच मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरले आहेत. हा योगायोग कसा? जर एफआयआर दखल झाले तर मी माघार घेईन असे वक्तव्य ते का करतात.. असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.