नव्या जागतिक संघटनेची आवश्यकता

विवेक मराठी    09-Apr-2026   
Total Views |
UN
 
जगाने तिसर्‍या महायुद्धाचा अनुभव घेऊ नये, म्हणून अमेरिका, रशिया, ब्रिटन इत्यादी देशांच्या पुढाकाराने राष्ट्र संघाची (युनो) स्थापना झाली. परंतु दुर्दैवाने हा उदात्त ध्येयवाद केवळ लिखित चार्टरमध्येच राहिलेला आहे. ज्या कारणासाठी युनो निर्माण झाली, ते कारणच ती विसरून गेली आहे किंवा त्या कारणाची अंमलबजावणी करण्याची शक्ती तिच्यात नाही. राष्ट्र संघाचा जीवनहेतू राष्ट्र संघाला साध्य करता येत नाही, म्हणून नवीन रचनेची गरज आहे.
जागतिक लोकमताचा अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाविषयी जर कुणी सर्व्हे केला तर सर्व्हेचा निष्कर्ष एकच येईल की, हे युद्ध तात्काळ थांबवले पाहिजे. सर्वसमान्य माणूस मग तो कोणत्याही देशाचा का असेना, कोणत्याही धर्माचा असेना, त्याला युद्ध नको असतं. परंतु विडंबना अशी आहे की, सामान्य माणसांची जनसंख्या सर्वाधिक असूनही सामान्य माणसाकडे युद्ध थांबविण्याची शक्ती नसते. त्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसे युद्धाचे परिणाम भोगत राहतात.
 
 
जगात युद्ध नको शांतता हवी म्हणून 1945साली युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. 1939 ते 1945 हा दुसर्‍या महायुद्धाचा कालखंड आहे. या महायुद्धात युरोपातील अनेक देश होरपळून निघाले. कैक दशलक्ष लोकांना आपला प्राण गमवावा लागला. संपत्तीचे किती नुकसान झाले याची मोजदाद करणेदेखील कठीण आहे. 1945साली अमेरिकेने जपानावर दोन अणुबाँब टाकले आणि त्यानंतर युद्ध समाप्त झाले.
 
 
जगाने तिसर्‍या महायुद्धाचा अनुभव घेऊ नये, म्हणून अमेरिका, रशिया, ब्रिटन इत्यादी देशांच्या पुढाकाराने राष्ट्र संघाची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. या राष्ट्रसंघाचे 192 देश सभासद आहेत. राष्ट्र संघाची घटना आहे, तिला ‘चार्टर’ असे म्हणतात. या चार्टर म्हणजे घटनेत 111 कलमे आहेत आणि चार्टरची उद्देशिकादेखील आहे.
 
 
ही उद्देशिका म्हणते,“आम्ही राष्ट्र संघाचे लोक निश्चय करतो की,...” पुढे असे म्हटले आहे की,
 
* भावी पिढ्यांना युद्धाच्या भीषणतेपासून वाचविणे.
 
* यापूर्वी दोनदा (पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध) भयानक युद्धाचा अनुभव आपण घेतला आहे. या महायुद्धांनी अपरिमित दुःख निर्माण केले.
 
 
* मानवी अधिकारांविषयी आत्यंतिक श्रद्धा आम्ही बाळगतो. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मूल्य तसेच स्त्री आणि पुरूषांना समान अधिकार व सर्व राष्ट्रांना समान अधिकार आम्ही स्वीकारतो.
 
 
* आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वेगवेगळ्या देशात जे करार होतात, त्यातून न्याय आणि उत्तरदायित्व यांची आम्ही जोपासना करू.
 
 
* हे गाठण्यासाठी सहिष्णुता आणि शांततामय सहजीवन यांचा अंगीकार करू.
 
 
* आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी आमच्या शक्तीचा वापर करू.
 
 
* आपापसातील संघर्ष सोडविण्यासाठी लष्कराचा वापर केला जाणार नाही.
 
 
* तसेच सर्व लोकांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी आंंतरराष्ट्रीय कार्यव्यवस्था निर्माण केली जाईल. (हा उद्देशिकेचा भावानुवाद आहे.)
 
 
या उद्देशिकेतील ध्येयवादावर जर धावती नजर टाकली तर कुणाचेही असे मत होईल की, केवढा उदात्त ध्येयवाद ठेवून राष्ट्र संघाची निर्मिती झाली आहे. परंतु दुर्दैवाने हा उदात्त ध्येयवाद केवळ लिखित चार्टरमध्येच राहिलेला आहे. मानवजातीचा इतिहास हे सांगतो की, उदात्त मूल्ये सर्वांना माहीत असतात आणि विसंगती अशी असते की, त्याप्रमाणे कुणी आचरण करीत नाही.
 
 
युनोची आजची अवस्था कशी आहे? खूप वर्षापूर्वी एका आश्रमातील वळूची गोष्ट ऐकली होती. आश्रमातील संचालकांनी गायींची चांगली पैदास व्हावी म्हणून चांगले पैसे मोजून एक वळू आणला होता. वर्ष-दोन वर्षात त्यांच्या हे लक्षात आले की, वळू चांगला धडधाकट आहे, शक्तिमान आहे, सर्वकाही आहे, परंतु याच्यात वासरांना जन्म घालण्याची शक्ती नाही. पंचतंत्रातील एका कथेतील श्लोकही असाच आहे. सिंहाच्या छाव्याच्या संगतीत वाढलेल्या कोल्ह्याच्या मुलाला सिंहिण म्हणते, तू दिसायला चांगला आहेत, विद्यावान आहेस, परंतु तू ज्या कुळात जन्मला आहेस, त्यात हत्तीची शिकार कुणी करत नाही. आजची युनो अशी आहे, दात आणि नखे नसलेल्या वाघासारखी. रूप आदर निर्माण करणारे, परंतु शक्ती शून्य.
 
 
युनोने अमेरिका, इस्रायल, इराण यांचे युद्ध थांबविले पाहिजे. कारण युद्ध थांबविण्यासाठी तिचा जन्म झालेला आहे. चार्टरच्या प्रस्तावनेतदेखील हेच म्हटलेले आहे. इराण, अमेरिका, इस्रायलचे युद्ध सोडून द्या, पण युनोला 1967चे अरब-इस्रायल युद्ध थांबवता आले नाही. अमेरिका-इराक युद्ध थांबविता आले नाही. अमेरिका-व्हिएतनाम युद्ध थांबविता आले नाही. रशिया-युक्रेन युद्ध थांबविता आले नाही. भारत-पाकिस्तान युद्धदेखील थांबविता आले नाही. ज्या कारणासाठी युनो निर्माण झाली, ते कारणच ती विसरून गेली आहे किंवा त्या कारणाची अंमलबजावणी करण्याची शक्ती तिच्यात नाही, हे खरे.
 
UN 
 
युनोची अतिशय महत्त्वाची सहा अंगे आहेत, त्यातील दोन सभागृहे आहेत. 1) जनरल असेेंब्ली(आम सभा) आणि 2) सिक्युरिटी काऊन्सिल (सुरक्षा परिषद) या सुरक्षा परिषदेत पाच सभासद कायमस्वरूपी सभासद आहेत. त्यांची नावे अशी- ब्रिटन, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन. आम सभा सर्व सदस्य राष्ट्रांची आहे. या सभेत जागतिक परिस्थितीवर चर्चा होते, ठराव पारीत केले जातात. जागतिक नेते त्यांच्या प्रवासात येथे येऊन भाषणे करतात. आपल्या देशातील पं. नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी आदी पंतप्रधानांची भाषणे आम सभेपुढे झाली आहेत.
 
 
आम सभेने पारीत केलेले ठराव कपाटात पडून राहतात. त्यांची अंमलबजावणी करण्याची शक्ती आम सभेकडे नाही. म्हणजे हे असे ठराव झाले की, जे एखादी शैक्षणिक संस्था किंवा वकिलांची संस्था आपल्या सभेत पारीत करू शकते, त्यामुळे प्रसिद्धी मिळेल, पण अंमलबजावणी शून्य. आम सभेपुढे वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रमुख जी भाषणे देतात, ती विषय आणि आशयाच्या दृष्टीने प्रगल्भ असतात. पंरतु त्यांचे मूल्य प्रवचनापलीकडे अधिक नसते. त्यातील काहीही व्यवहारात येत नाही.
 
 
सुरक्षा परिषदेचे आणखी काही सभासद आहेत, परंतु कायमस्वरूपी पाच सदस्यांना नकाराधिकार प्राप्त झालेला आहे. या नकाराधिकाराचा उपयोग करून या पाच महासत्ता आम सभेचे ठराव अर्थहीन करतात. उदाः- रशियाने युक्रेनचा प्रांत क्रिमिया आक्रमण करून बळकावला. युनोने ठराव केला, रशियाने नकाराधिकार वापरून तो फेटाळून लावला. पॅलिस्टिनी प्रश्नांवर ठराव झाला, अमेरिकेने नकाराधिकार वापरून तो फेटाळून लावला. गेल्या ऐंशी वर्षातील ही दोनच उदाहरणे आहेत असे नाही, त्यांची संख्या शंभरवर जाईल. याचा अर्थ काय झाला?
 
 
याचा अर्थ सुरक्षा परिषद ही महासत्तांच्या राजकीय डावपेचांचा अड्डा झालेली आहे. प्रत्येक महासत्ता आपले भूराजनीतिक हितसंबंंध डोळ्यांत तेल घालून जपत असते. एखादा ठराव एखाद्या महासत्तेच्या हितसंबंधांना बाधा पोहचविणारा ठरणारा असेल तर नकाराधिकार म्हणजे व्हेटोचा वापर केला जातो. सुरक्षा परिषदेने गेल्या ऐंशी वर्षात जेवढी युद्धे झाली, ती थांबविण्यासाठी काही पावले उचलली आहेत असे नाही. प्रत्येक युद्धात कोणती ना कोणती महासत्ता गुंतलेली असते. आणि त्या इतक्या निष्ठुर असतात की, त्यात युनोच्या जनरल सेक्रेटरीलाही आपला प्राण गमवावा लागतो.
 
 
Dag Hammarskjöld हे संयुक्त राष्ट्राचे दुसरे महासचिव होते. 1953 ते 1961 हा त्यांचा कालखंड आहे. मरणोेत्तर नोबेल पारितोषिक मिळालेले, ते एकमेव पारितोषिक विजेते आहेत. त्यांच्या काळात कांगोचे युद्ध चालू होते. कांगोमध्ये विपुल प्रमाणात तांबे आणि युरेनियम आहे. त्यावर सर्व महासत्तांचा डोळा होता. या गृहयुद्धाची समाप्ती करण्यासाठी तेव्हा कांगोत युनोने शांतीसेना पाठविली. त्यात भारतीय सैन्यदेखील होते. शेवटच्या टप्प्यात प्रश्न मिटविण्यासाठी डॅग हॅमरस्कजोल्ड विमानाने चालले होते. त्यांच्या विमानाला अपघात झाला. (म्हणजे ते विमान पाडले गेले, त्यात त्यांच्यासहित अन्य 15 लोक ठार झाले.) हे विमान कोणी पाडले? केजीबीने की सीआयएने? त्यावर नेटवर डोके सुन्न करणारी माहिती आहे.
 
 
Dag Hammarskjöldयांचा खात्मा का करण्यात आला? कारण ते महासत्तांना नकोसे झाले. हीच गोष्ट कोफी अन्नान यांची आहे. ते देखील कर्तृवान महासचिव होते. त्यांनादेखील शांतेतेचे नोबेल पारितोेषिक मिळाले. ऐंशी वर्षाच्या काळात अन्य जे महासचिव झाले आहेत, ते फार काही करू शकलेे नाहीत. गेले आठ-दहा वर्षे विद्यमान महासचिव कोण आहेत, हे रोजची वर्तमानपत्रे वाचणार्‍यालाही माहीत नसावे, एवढे त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे नाव आहे, अ‍ॅन्टोनियो गुटेरस (António Guterres). यांच्यापाशी अमेरिका, इराण, इस्रायल यांचे युद्ध थांबविण्याची शक्ती आहे का?
 
 
युनो ही शक्तिहिन संघटना आहे. आर्थिकदृष्ट्या ती स्वायत्त नाही. एकूण खर्चापैकी 22% भाग अमेरिका उचलते, अन्य सदस्य देश आपले योगदान देत असतात. चाळीसहून अधिक देश असे आहेत की ज्यांची थकबाकी प्रचंड आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ही म्हण आहे. अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली तर स्टाफची रोजीरोटी धोक्यात येईल. 1782साली ब्रिटिशांनी अमेरिका सोडली. स्वातंत्र्ययुद्धानंतर तेरा राज्ये एकत्र आली. त्यांनी एक संघ निर्माण केला. त्याला ‘कॉन्फेडेरेसी’ म्हणतात. हा संघ शक्तिहीन संघ होता. त्याच्याकडे सैन्य नव्हते, कर लावण्याची शक्ती नव्हती, कायद्याची अंमलबजावणी करण्याची शक्ती नव्हती. अमेरिकेची चिंता करणार्‍यांना हे धोकादायक वाटले आणि त्यांनी 1789साली आपली घटना तयार केली आणि शक्तिशाली अमेरिका उभी केली.
 
 
राष्ट्र संघाचा जीवनहेतू राष्ट्र संघाला साध्य करता येत नाही, म्हणून नवीन रचनेची गरज आहे. जागतिक शांतता, जागतिक पर्यावरणाचे प्रश्न, जागतिक गरीबी, जागतिक पेयजलाचे प्रश्न, जागतिक आरोग्याचे प्रश्न असे मानवजातीचे असंख्य प्रश्न आहेत. कोणताही एक देश हे प्रश्न सोडवू शकत नाही. सर्वांनी एकत्र येऊन सर्व जनहिताय काही धोरणे ठरविणे आवश्यक आहेत. एक शक्तिशाली व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. असे व्यासपीठ ज्याच्याकडे ठरावाची अंमलबजावणी करण्याची शक्ती असेल आणि जे आर्थिकदृष्ट्या स्वायत्त असेल, ही काळाची गरज आहे.
 
 
भारताच्या जागतिक लक्ष्याचा विचार करता भारताने जगातील समविचारी राष्ट्रनेते, धार्मिक नेते, सामाजिक नेते, जागतिक विचार करणारे विचारवंत, अर्थतज्ज्ञ, मानवतावादी, वैज्ञानिक अशा सर्वांचा एक संघ निर्माण केला पाहिजे. मनुष्यजातीचा प्रवास भटक्या जीवनापासून सुरू झाला आणि तो वळणे घेत घेत राष्ट्र संघापर्यंत येऊन पोहचला, त्याच्याही पुढे जाण्याची वेळ आता आली आहे. कारण जे उपकरण मानवजातीने निर्माण केले, त्यातच जर अपूर्णता असेल तर अधिक चांगले उपकरण तयार करणे यातच शहाणपण आहे. हे आताच्या आणि येणार्‍या पिढीने प्रकट केले पाहिजे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.