तिसर्‍या महायुद्धातील निर्णायक वळण

विवेक मराठी    09-Apr-2026   
Total Views |

iran israel and america
युद्धात पुढे काय घडेल? युद्ध संपेल? लढाई, प्रत्यक्ष हल्ले, काही काळापर्यंत स्थगित राहतील? कारण तीनही लढणारे देश जेरीस आले आहेत. सध्या तरी प्रत्येक राजकर्त्याला मीच जिंकलो असे सांगता येण्याची परिस्थिती आहे आणि तेवढेच त्या तिघांसाठी पुरेसे आहे. या सर्व लढाईच्या परिस्थितीत जर कुणाचे फावले असेल तर ते पाकिस्तानचे. निरोप्याचे काम करून तो आज शांतीदूत झाला आहे. आता हे महायुद्ध एका निर्णायक वळणावर आले. वाटाघाटी कशा होतात, यावरच सर्व अवलंबून आहे.
सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति मनुजः।
अर्धेन कुरुते कार्य सर्वनाशो हि दुःसहः॥
अर्थः सर्वनाशाच्या परिस्थितीत सामान्य माणूस अर्ध्यावर पाणी सोडतो (समाधान मानतो). कारण जे काही अर्धेमुर्धे उरले असेल त्यातही भागवता येते आणि सर्वनाश असह्य असतो.
वरील सुभाषित अनेक वाचकांना माहिती किंवा पाठसुद्धा असेल त्यांना मनुजः शब्द खटकला असेल, कारण तो मुळात पंडितः आहे. आजच्या घटनांच्या संदर्भात, जे तीन पक्ष तिसर्‍या महायद्धात गुंतलेले आहेत त्यांच्यामधून एकालाही पंडित - शहाणा म्हणता येणार नाही. मात्र ती चुकणारी माणसे आहेत हे नक्की. पाच, दहा, आणि शेवटी दोन दिवसांचा निर्वाणीचा इशारा देऊन ट्रम्पबाबाने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला. तो इराणलाही हवा होता. त्यानेही त्याला संमती देताना होर्मुझ खाडी मोकळी करताना त्यावर नियंत्रण आपलेच राहील हा हेका सोडलेला नाही. तो कर आकारणार नाही हे नक्की ठरलेले नाही. खाडीतून जाताना, फक्त वाटेल त्याला शत्रूपक्ष म्हणून अटकाव करून हल्ले करणार नाही एवढेच घडू शकेल.
 
 
या सर्व घडामोडीत बिबी नेतान्याहू कुठेच समोर आला नाही. त्याला ट्रम्पबाबाने फक्त युद्धबंदीसंबंधात सांगितले, पण तो कितपत बधेल हाही प्रश्नच आहे. सध्यातरी असे दिसते की, अमेरिकेच्या पाठोपाठ इस्रायल इराणवर हल्ले करणे थांबवेल पण त्याचे सख्खे शेजारी असलेल्या हमास आणि हिजबुल्ला वैर्‍यांबाबत त्याची भूमिका कितपत सौम्य होईल हा प्रश्नच आहे. इराणने एक प्रकारे तात्काळ निर्णायक भूमिका घेऊन प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद हमास, हिजबुल्ला आणि हुती बंडखोर देण्याचा शहाणपणा दाखवतील या विषयी लेखकाला शंकाच आहे. क्षणात मिळणार्‍या हौतात्म्यातून स्वर्ग आणि तात्काळ 72 हुर्‍यांचा स्वर्गीय सहवास याच्या पलीकडे काही दिसत नसणार्‍या या बंडखोर गटांना भौतिक जगात अक्षरशः काहीही गमवण्यासारखे राहिलेले नाही. गाझापट्टी, बैरूत आणि लेबनॉनमधील हिजबुल्लांच्या वस्त्या आणि हुतींचे अड्डे आतापर्यंत राखरांगोळी झाले आहेत. आता त्यांच्या हाती येणारा दारुगोळा इस्रायलवर मारा करून त्याचे होता होईल तेवढे नुकसान करणे एवढेच काम उरले आहे. प्रश्न फक्त इराणचा आहे. या युद्धबंदीच्या काळात इराण शस्त्रे डागणार नाही. तो नक्कीच थेट कुरापत काढणार नाही, युद्धबंदी मोडण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु अजूनही त्याची इस्रायलविरोधी खुमखुमी जिरली नसल्याने तो जर हिजबुल्ला, हुतींना शस्त्र पुरवठे करत राहिला तर इस्रायलला तेच पाहिजे आहे. ते हल्ले चालू ठेवतील आणि इस्त्रायल या माथेफिरू अतिरेक्यांवर अगदी शहाजोगपणे हल्ले करत राहील. जितकी या अतिरेक्यांची संख्या कमी होत राहील तेवढी इस्रायलची भविष्यातील डोकेदुखी कमी होईल. अर्धं त्यजति मनुजः ही अक्कल त्या तिन्ही बंडखोरांमध्ये नाही.
 
ट्रम्पबाबाने दिलेली शेवटची दोन दिवसांची मुदत संपण्याच्या काही तास आधी तिन्ही देशांनी, ज्याला बोलीभाषेत हात मारणे म्हणतात तसे, जोरदार हल्ले महत्त्वाच्या ठिकाणांवर केले. ट्रम्पबाबा काही तरी विलक्षण करणार याची कल्पना असल्याने शत्रूपक्षाची होता होईल तेवढी हानी करण्यावर एकमेकांचा भर होता. इस्रायलने इराणच्या शहरांवर हल्ले केले. ट्रम्पबाबाने रेल्वे स्थानकांवर आणि होर्मुझ खाडीच्या लगत असलेल्या बुशहर आण्विक ऊर्जा प्रकल्पावर हल्ले केले. बाहेर आलेल्या माहितीप्रमाणे तेथे जवळपास 75 मीटर खोलपर्यंत घुसून स्फोट करणारी क्षेपणास्त्रे टाकल्याने तो प्रकल्प निकामी झाल्यासारखा आहे. इस्रायलला इराणी क्रांतिकारी सुरक्षा दलाचा पुरता खात्मा करायचा होता तो होऊ शकला नाही. ते अजूनही मोठ्या संख्येत असून तेथील सैनिकी व्यवस्थापनावर भक्कम पकड आहे. त्यांच्या विरोधात उभे राहण्याची लोकांमध्ये हिंमत नाही.
इराणनेही आखाती देशांमध्ये तसेच पराकोटीचे हल्ले करून त्यांची होईल तेवढी हानी केली. तात्पुरता युद्धविराम जाहीर झाल्यावरही 2-4 ठिकाणी हल्ले झाले. ते तसे सर्वत्र होत असतातच, कारण अनेक ठिकाणी विखुरलेल्या सैन्याला योग्य तो संदेश पोहचण्यास वेळ लागतो.
ट्रम्पबाबा इराणची मजबुरी
 
एकीकडे खार्ग बेटावर कब्जा करण्याचे मनसुबे मिरवत असताना ट्रम्पबाबाची दुसरीकडे नातांझ आण्विक प्रकल्प आवारामध्ये भुयारात दडविलेले युरेनियम उचलण्याची योजना होती. अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर इराणने पाडले. ते इराणच्या इतके आत घुसण्याचे कारण त्यातून नतांझची पाहणी करून सैन्य तुकड्या कुठे, कशा उतरवायच्या आणि इराणच्या ताब्यातील युरेनियमचा मलिदा कसा उचलून आणायचा याची आखणी करायची होती. पण नेमके तेच विमान इराणने पाडल्याने परत पायलटला सोडवायच्या उद्देशाने जी मोहीम आखण्यात आली त्यात नतांझवरील हल्ला करण्याची योजना होती असे दिसते, तीही फसली. जिथे 10 विमानांनी काम होण्यासारखे होते तिथे 225 विमानांचा ताफा पाठविण्याची आवश्यकता काय? सर्वांचे लक्ष पायलट मुक्ततेकडे असल्याचा फायदा घेऊन त्याच वेळी नतांझवर शेवटचा आघात करण्याचे ट्रम्पबाबाचे मनसुबे होते. ते सफळ झाले नाहीत. एक चांगली गोष्ट ट्रम्पबाबासाठी घडली. जखमी झालेला पायलट सुखरूप परत आल्याचे त्याला छाती बडवून सांगता आले, खरेखोटे त्याला आणि ज्या सैनिकांनी उचलून आणले त्यांनाच माहीत. त्याला एका तरी कामगिरीत यश मिळाल्याचा दावा करता आला. तेवढ्यावरच समाधान मानून एकतर्फी युद्धविरामाची घोषणा त्याने केली. पायलटची मुक्तता करण्याच्या योजनेत नेतन्याहूने जाहीर केल्याप्रमाणे इस्रायलची एक विशेष प्रशिक्षित तुकडी सामील होती. त्या सहभागाचे श्रेय मात्र त्याला मिळाले नाही. ट्रम्पबाबाने ते पळवले असे दिसते. शेवटी शेवटी लढाई होर्मुझ खाडीच्या मुक्ततेभोवती घोटाळत होती. ती मात्र मुक्त झाली नाही. सध्यातरी दिसते त्याप्रमाणे खाडीचा कब्जा शेजारी असलेल्या ओमानसह करण्याची तयारी इराणने दाखवली आहे. पण ओमानच्या मते तो आंतरराष्ट्रीय समुद्री महामार्ग आहे म्हणून ओमानने इराणबरोबर जकात वसुलीच्या कामात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
 
इराणने वेळ न काढता प्रतिसाद देण्यामागे त्याची म्हणण्यापेक्षा, इराणी क्रांतिकारी सुरक्षा दलाची मजबुरी होती. कितीही मुजोरी बाहेरून दाखवली तरी अमेरिका-इस्रायल ठिकठिकाणी जी राखरांगोळी करत होते, त्याचा परिणाम म्हणून सामान्य जनतेच्या हालअपेष्टा मर्यादेबाहेर गेल्या होत्या. कोणत्याही क्षणी जनता रस्त्यावर उतरून हल्ले करेल याची शक्यता दिसत होती. तसे जर झाले तर जनताच त्यांच्या सदस्यांना घराघरांतून बाहेर काढून नि:पात करेल, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारी राखरांगोळी 50 वर्षे मागे घेऊन गेली असती. तो सर्वनाश टाळण्याची मजबुरी इराणपुढे होती. होर्मुझसारखा एक्का हातात ठेवून इराणने तात्पुरती बाजी मारली आहे. ही स्थिती केवळ पंधरा दिवसांच्या मुदतीत आटोपली जाणार नाही. गोष्टींचे गुर्‍हाळ चालू ठेवण्यातच इराणचे हितसंबंध बांधलेले आहेत. जोवर होर्मुझवर इराणचा कब्जा असेल तोवर हातात सोन्याची अंडी देणारी कोंबडी असेल. ती सहजासहजी इराण सोडणार नाही.
 
हे नक्की आहे की इराणला पुढे राखेतून उठावे लागेल. या युद्धात इराणची न भरून येणारी हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी इराणला काही दशके लागतील. त्याची सर्व जबाबदारी इराणने अमेरिकेवर टाकली आहे. जर अमेरिका त्याची जबाबदारी घ्यायला तयार झाली तर अमेरिका होर्मुझची विनाशुल्क वाहतुकीसाठी मोकळी करण्याची अट इराणला घालू शकेल. त्यात ट्रम्पसारख्या व्यापारी डोक्याच्या नेत्याला अजिबात रस नसेल. ते होण्याची शक्यता नाही. या पुढे जाऊन होर्मुझचे आखात जर इराण आपल्या ताब्यात ठेवणार असेल तर त्याच्या पाठोपाठ चीनही तैवानच्या खाडीवर कब्जा सांगू शकेल. चीनची राजकीय प्रवृत्ती आणि आकांक्षा पाहता तो दिवस दूर नाही. हुतीसुद्धा तोच कित्ता लाल सामुद्रधुनीत गिरवतील. या सगळ्या संघर्षाने जगाला काय दिले?
 

iran israel and america 
पाकिस्तान भाव खाऊन गेला
 
या सर्व लढाईच्या परिस्थितीत जर कुणाचे फावले असेल तर ते पाकिस्तानचे. सौदी अरेबियावर इराणने हल्ले केल्यावर पाकिस्तानने सौदीच्या मदतीसाठी धावून जाणे हे, धर्मकर्तव्य, मित्रकर्तव्य आणि तहांतर्गत अपेक्षित होते. पण पाकिस्तानसमोर इकडे आड तिकडे विहिर अशी समस्या होती. पाकिस्तानची उत्तरी सीमा इराणला लागून आहे. ज्या वेळी इराण अमेरिकेच्या खाडीतील मित्र देशांना अमेरिकेचे सैनिकी तळ राखू देण्यासाठी बाँबहल्ले करून जर्जर करत होता, त्यावेळी जर पाकिस्तानने इराणची कुरापत काढली असती तर इराणने अमेरिकेचा मित्र देश म्हणून त्यावरही क्षेपणास्त्रे टाकण्यास मागेपुढे पाहिले नसते. इतरांना अमेरिकेने हवाई संरक्षण दिले होते. ते सैनिकी तळांच्या रक्षणासाठी आवश्यक होते. पाकिस्तानला तसे काही नव्हते. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताने पाकिस्तानचे हवाई कवच पुरते मोडून काढले होते. इराणची क्षेपणास्त्रे पाकिस्तानची अगदी सहज धूळधाण करू शकली असती. तेव्हा धर्म, मैत्री इ. बाजूला ठेवून पाकिस्तानने तह घडवून आणण्यासाठी वावदूकपणा करून पुढेपुढे करण्याचे सुरक्षित धोरण अंगिकारले. प्रथम तर हा वावदूकपणा इराणने फेटाळून लावला. तरी पाकिस्तान लुडबूड करत राहिला. काही काळाने चार देशांच्या समूहात तोही सामील होऊन इराण अमेरिकेमध्ये निरोप्याचे काम करण्यास सरसावला. त्याला धरून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्याला दलाल असेही म्हटले. पण शेवटी वाटाघाटी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी इतर कोणत्याही ठिकाणाला न जाता पाकिस्तान हेच ठिकाण ठरविले. एक प्रकारे पाकिस्तानने बाजी मारली. 10 एप्रिल रोजी वाटाघाटींचे गुर्‍हाळ पाकिस्तानात सुरू होणार आहे. युद्धविरामाला काही तास होत नाही तोच सौदीने पाकिस्तानला पाच अब्ज कोटी डॉलरचे कर्जही देऊ केले आहे. त्यातून पाकिस्तानला संयुक्त अमिरातीच्या कर्जाचे ओझे दूर करता येईल आणि वर दीड अब्ज खात्यात जमा ठेवून अधिक कर्ज घेता येईल. हे अमेरिकेच्या वरदहस्तामुळे घडले. उद्या जर इराणवर हल्ला करण्याची परिस्थिती उद्भवली तर अमेरिका त्यासाठी पाकिस्तानला वेठीस धरू शकेल. हे पाकिस्तानचे सामरिक महत्त्व नेहमीच असेल.
 
 
या पुढे काय घडेल? युद्ध संपेल? लढाई, प्रत्यक्ष हल्ले, काही काळापर्यंत स्थगित राहतील. कारण तीनही लढणारे देश जेरीस आले आहेत. सध्या तरी प्रत्येक राजकर्त्याला मीच जिंकलो असे सांगता येण्याची परिस्थिती आहे आणि तेवढेच त्या तिघांसाठी पुरेसे आहे.

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.