@मिलिंद प्रभाकर सबनीस

स्वातंत्र्यानंतर ‘वंदे मातरम्’ हेच राष्ट्रगीत व्हावे यासाठी कृष्णराव फुलंब्रीकर, पं. वि. दे. अंभईकर यांनी सांगितिक संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर पुढे 40 वर्षांनी संसदीय कामकाजाची सुरुवातही ‘वंदे मातरम्’ने व्हावी यासाठी खासदार राम नाईक यांनी 1991 - 92 मध्ये संसदीय पातळीवर एकाकी झुंज दिली. या सगळ्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. भारतीय समाजमनावर गेले 150 वर्षे अधिराज्य करणार्या ‘वंदे मातरम्’ या तेजस्वी राष्ट्रमंत्राला आता पुन्हा एकदा राजकीय पातळीवर उच्च स्थान प्राप्त होते आहे. या विषयी माहिती देणारा लेख.
26 मार्चच्या पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी आकाशवाणीच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात झाली आणि सुखद आश्चर्याचा मोठा धक्का बसला. एकदाचा अपवाद वगळता आतापर्यंत ’वंदे मातरम्’चे एकच कडवे आकाशवाणीवरून प्रसारित होत असे पण 26 मार्च रोजी धु्रवपदासह सहा कडव्यांच्या 25 ओळींचे ’संपूर्ण वंदे मातरम्’ सादर झाले. ’संपूर्ण वंदे मातरम्’च्या या रोज सुरू झालेल्या सरकारी प्रसारणामुळे ’वंदे मातरम्’च्या इतिहासात एक नवे क्रांतिकारक पाऊल पडले आहे .
15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्याच्या पहिल्या पहाटे पं. ओंकारनाथ ठाकूर यांनी 7 मिनिटे एवढ्या कालावधीत उभे राहून म्हटलेले ’संपूर्ण वंदे मातरम्’ प्रसारित झाले होते. त्यानंतर जवळजवळ 78वर्षांनंतर आकाशवाणीवरून अधिकृतपणे ’संपूर्ण वंदे मातरम्’ सादर झाले.
1953पासून आकाशवाणीवरील कामकाजाची सुरुवात ’वंदे मातरम्’ ने होते. दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर तेथेही कार्यक्रमाची सुरुवात ’वंदेे मातरम्’नेच होऊ लागली .
’वंदे मातरम्’नेच सुरुवात का करावी? असा वाद 1961 मध्ये निर्माण झाला. त्यावेळी सरकारने डॉ. संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करून मत मागवले, तेव्हा या समितीने आजच्या तरुण पिढीला ’वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत माहीत असले पाहिजे व त्यासाठी ते दररोज आकाशवाणीसारख्या माध्यमातून प्रसारित होण्यामागे कोणाचाही आक्षेप असू नये असे मत नोंदवले.
1953मध्ये तत्कालीन नभोवाणीमंत्री बाळकृष्ण केसकर यांनी सरकारी पातळीवर रुजवण्यासाठी ’वंदे मातरम्’ची नवीन संगीत रचना करावी असे ठरवले व त्या वेळी दिल्ली आकाशवाणीवर पं. वि. रा . आठवले या आकाशवाणीवरील तरुण संगीत दिग्दर्शकाकडून देस रागातली रचना तयार केली गेली. ही रचना पं. दिनकर कैंकीणी व डॉ. सुमती मुटाटकर या ज्येष्ठ गायकांकडून गाऊन घेऊन ध्वनिमुद्रित केली गेली व तीच रचना आकाशवाणीच्या सकाळच्या प्रसारणात वाजवली जाऊ लागली. त्याच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या. परंतु पं. वि.रा. आठवले आकाशवाणीच्या सेवेत असल्यामुळे त्यावेळच्या नियमांनुसार त्यांचे नाव संगीत दिग्दर्शक म्हणून ध्वनिमुद्रिकेवर वा अन्यत्रही दिले गेले नाही.
आज या मूळ पं. वि. रा. आठवले यांनी केलेल्या एक कडव्याच्या ’वंदे मातरम्’च्या संगीत रचनेला पूरक होणारी तशीच रचना पुढच्या चार कडव्यांना केली गेली आहे.
मुंबईतील आकाशवाणी विविध भारतीच्या राष्ट्रीय वाहिनीतर्फे ’वंदे मातरम् एक जयघोष’ या सध्या चालू असलेल्या 52 भागाच्या विशेष मालिकेसाठी ही विशेष रचना करण्यात आली आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून निवृत्त झालेले व शास्त्रीय संगीतातले ज्येष्ठ गायक पं. चंद्रशेखर वझे यांनी गायलेले हे ’संपूर्ण वंदे मातरम्’चे नवे ध्वनिमुद्रण रोज सकाळी प्रसारित होऊ लागले आहे. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तुर यांचे पं. चंद्रशेखर वझे हे शिष्य आहेत.
7 नोव्हेंबर 1875 या दिवशी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून ’वंदे मातरम्’ या गीताची निर्मिती झाली. यंदाचे वर्ष या राष्ट्रमंत्राचे 151वे स्फुरण स्मरण वर्ष. एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या वर्धापन दिनाप्रमाणे एखाद्या साहित्यकृतीच्या निर्मितीचा असा महोत्सवी वर्धापनदिन होणे, यामध्येच ’वंदे मातरम्’ या गीताचे श्रेष्ठत्व आहे.
’वंदे मातरम्’च्या निर्मितीनंतर 40 ते 50 वर्षांतच त्यावर बहिष्काराची भाषा सुरू झाली. आमच्या धर्माला हे गीत मान्य नाही, आम्ही मूर्तीपूजा मानत नाही अशा सबबी पुढे आल्या. तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी त्याला कायम उपेक्षेचीच वागणूक दिली. स्वातंत्र्यानंतरही ही उपेक्षा संपली नाही. भारतीय राज्यघटनेने ’वंदे मातरम्’ला समान राष्ट्रगीताचा दर्जा देताना राष्ट्रगीताऐवजी (नॅशनल अँथेम) ऐवजी राष्ट्रीय गीत (नॅशनल साँग) असे दुय्यम स्थान दिले. तत्कालीन सरकारी पातळीवर जरी असे घडले असले तरी बहुतांश भारतीय जनतेच्या मनात ’वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचे स्थान होते. अलीकडच्या दहा वर्षांत मात्र ही परिस्थिती काही प्रमाणात तरी बदलू लागली आहे. काही गोष्टींमध्ये मोठे बदल घडवायचे असतील तर त्याला अनुकूल काळ यावा लागतो. आणि तसा अनुकूल काळ ’वंदे मातरम्’चे महत्त्व जाणणारी मंडळी सत्तास्थानी आल्यामुळे आता आला आहे. ऑक्टोबर महिन्यात माननीय पंतप्रधानांनी ’मन की बात’मध्ये ’वंदे मातरम्’चा गौरव केला. आणि लगेचच केंद्रीय मंत्रालयाच्या सांस्कृतिक व गृहविभागातर्फे 7 नोव्हेंबरला ’वंदे मातरम्’चा 151 वा जयंतीदिन साजरा करण्याचे निर्देश दिले गेले. संपूर्ण देशभर अत्यंत उत्साहाने कार्यक्रम घेतले गेले. खुद्द राजधानी दिल्लीतही स्वतः पंतप्रधानांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम झाला. त्याचेच प्रतिबिंब पुढे 26 जानेवारीच्या दिल्लीतील पथसंचलनात दिसले. ’वंदे मातरम्’ या विषयावर तीन चित्ररथ सादर केले होते.
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने वंदे मातरम् विषयी एक महत्त्वाचा आदेश जाहीर केला. या आदेशानुसार शासकीय केंद्र व राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल यांचे आगमन झाल्यानंतर तसेच कार्यक्रम संपतांना सहा कडव्यांचे ’संपूर्ण वंदे मातरम्’ समूह स्वरात वाजवले वा गायले जावे. तसेच सर्व शाळांमध्ये कामकाजाची सुरुवात ’संपूर्ण वंदे मातरम्’ने व्हावी. ’जन गण मन’ या राष्ट्रगीतापाठोपाठ ’वंदे मातरम्’चे सादरीकरण व्हावे व सरकारी संगीत रचनेतील 3 मिनिटे 10 सेकंद एवढ्या वेळेतच ते पूर्ण व्हावे.
अपेक्षेप्रमाणे मुस्लीम नेत्यांनी याला विरोध केलाच, पण त्याला फारशी किंमत न देता देशभर हळूहळू ’संपूर्ण वंदे मातरम् ’ पुन्हा एकदा सादर केले जाऊ लागले.
दि. 24 मार्च 2026 रोजी डेप्युटी डायरेक्टर जनरल आकाशवाणी प्रसार भारती यांनी प्रसारित केलेल्या आदेशानुसार भारतातील सर्व आकाशवाणी केंद्र तसेच दूरदर्शनच्या सरकारी वाहिन्यांवर प्रसारणाची सुरुवात ’संपूर्ण वंदे मातरम्’ने करावी असा आदेश आहे.
’वंदे मातरम्’विषयी घडलेल्या या महत्त्वाच्या घटनेनंतर गेल्या काही वर्षांत विशेषतः गेल्या 10 वर्षांत घडलेल्या अनेक घटना पाहता कोणत्याही ’वंदे मातरम्’प्रेमी माणसाला अत्यानंद होणे स्वाभाविकच होते. स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारक तसेच निःशस्त्र आंदोलकांनी ’वंदेे मातरम्’चा गजर करत प्राणार्पण केले. स्वातंत्र्यानंतर हेच राष्ट्रगीत व्हावे यासाठी कृष्णराव फुलंब्रीकर, पं. वि. दे. अंभईकर यांनी सांगितिक संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर पुढे 40 वर्षांनी संसदीय कामकाजाची सुरुवातही ’वंदे मातरम्’ने व्हावी यासाठी खासदार राम नाईक यांनी 1991 - 92 मध्ये संसदीय पातळीवर एकाकी झुंज दिली. या सगळ्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. भारतीय समाजमनावर गेले 150 वर्षे अधिराज्य करणार्या ’वंदे मातरम्’ या तेजस्वी राष्ट्रमंत्राला आता पुन्हा एकदा राजकीय पातळीवर उच्च स्थान प्राप्त होते आहे. 8 एप्रिल रोजी ऋषी बंकिमचंद्राचा 132वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने ह्या वर्षात ’वंदे मातरम्’ला मिळत असलेला गौरव म्हणजे आपण सर्व भारतीयांना त्यांना अर्पण केलेली सर्वोत्तम अशी आदरांजली आहे.
- लेखक वंदे मातरम्चे अभ्यासक व संशोधक आहेत.