अभिजात मराठी साहित्यातील ही अक्षरलेणी म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरेतील एक अमृत ठेवा आहे.
संतकवी मुकुंदराज यांच्या ‘विवेकसिंधु’ या ओवीबद्ध ग्रंथाला आपल्या माय मराठीतील अभिजात वाङ्मयातील आद्य पद्यग्रंथाचा मान आहे. शके 1110मध्ये (इ.स.1188) लिहिलेला हा ग्रंथ मराठी भाषेच्या आरंभकाळातील साहित्य व सौंदर्यगुणाने संपन्न असून आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर आधारित आहे. ‘लिळाचरित्र’ व ‘ज्ञानेश्वरी’च्या आधीच्या या ग्रंथाचा सकल संतकवींनी गौरव केलेला आहे. या ग्रंथाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. त्यात 18 प्रकरणे व 1700 ओव्या आहेत. ‘झळाळा दिसे विवेकाचा।’ अशा या आद्य मराठी काव्यग्रंथाचा परिचय.
कुंदराज महासमर्थ । केला विवेकसिंधु ग्रंथ ॥
आपल्या ‘मराठी’ भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘अभिजात’ भाषेचा राज-सन्मान इ.स.2024मध्ये देऊन मराठी भाषेचा गौरव केला, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे; तरी पण मराठी भाषा तिच्या आरंभकाळातील संतकवी मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’, सर्वज्ञ चक्रधरस्वामींचे ‘लिळाचरित्र’ आणि तत्त्वज्ञ-कवी ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांमुळे प्रारंभापासूनच ‘अभिजात’ भाषाच आहे. जगामध्ये सध्या मराठी बोलणार्यांची संख्या सुमारे नऊ कोटी आहे. सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये मराठीचा जगामध्ये दहावा क्रमांक आहे, तर भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे. आपली आजची ‘मराठी’ भाषा ‘संस्कृत’, ‘प्राकृत’, ‘अपभ्रंश’, ‘महाराष्ट्री’, ‘महाराष्ट्री अपभ्रंश’ अशी काल व समाजसापेक्ष रूपे घेत घेत इसवी सनाच्या सुमारे नवव्या शतकात ‘मराठी’ या नावाने उदय व विकसित झाली. संपूर्ण मराठीत लिहिला गेलेला, सकल साहित्यगुणांनी संपन्न असा पहिला मराठी ग्रंथ इ.स.1188 (शके1110) मध्ये मराठी साहित्य विश्वात जन्माला आला; तो म्हणजे ‘संतकवी मुकुंदराज’ यांचा ‘विवेकसिंधु’!
आदिकवी मुकुंदराज
संतकवी मुकुंदराज (जन्मवर्ष उपलब्ध नाही) यांनी आद्य शंकराचार्यांच्या अद्वैतवेदांतावर आधारित ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आणि त्याला ‘विवेकसिंधु’ असे नाव दिले. श्रीमद्शंकराचार्यांच्या ‘विवेकचुडामणी’ या संस्कृत भाष्यग्रंथाच्या आधारे तो लिहिल्यामुळे ‘विवेकसिंधु’ हे नाव अगदी सार्थ व समर्पक आहे.
शके अकरा दहोत्तरू। साधारण संवत्सरू।
राजा शारंगधरू। राज्य करी॥
ऐसा समय सर्वोत्तम। तेथे मुंकुंद द्विजोत्तम।
विवेकसिंधु मनोरम। निर्मित झाला॥
‘विवेकसिंधु’ ग्रंथातील या ओव्यांमधून कवीने आपले नाव, ग्रंथाचे नाव, लेखन काळ-शक, आणि तेव्हा कोणता राजा राज्य करीत होता यांची नेमकेपणाने माहिती दिलेली आहे. मुकुंदराजाने एवढी माहिती दिली असली तरी मुकुंदराज कवीची नेमकी जन्मतारीख, जन्मस्थळ आणि कर्मभूमी याविषयी कोठेच साधार माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्याविषयी संशोधक विद्वानांमध्ये अनेक प्रकारची मतमतांतरे-वाद आहेत. आद्य कवी मुकुंदराज हा मराठवाड्यातील बीड आंबेजोगाईचा की विदर्भातील? हा वाद गेली अनेक वर्षे संशोधकांमध्ये सुरू आहे.
* वैनगंगेचिये तिरी। मनोहर अंबानगरी।
तेथ प्रकटले श्रीहरी। जगदिश्वरू॥ (अ.18)
* नृसिंहाचा बल्लाळु। तयाचा कुमरू जैत्रपालु॥
तेणे करविला हा रोळु। ग्रंथरचनेचा॥ (अ.7)
* आदिगुरू श्री आदिनाथु। तेथोनि श्रीहरीनाथु।
तेथिचा शिष्यु रघुनाथु। जो गुणसिंधु॥ (अ.18)
या स्थळ, गुरू परंपरा आदीचा निर्देश करणार्या काही ओव्या ‘विवेकसिंधु’मध्ये असून या ओव्यांच्या अर्थाबद्दल व स्थळाबद्दलही संशोधक विद्वानांमध्ये अनेक वाद आहेत. भगवद्गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती आहे. ‘ज्ञानेश्वरी’ संत ज्ञानदेवांची वाङ्मयमूर्ती आहे तद्वतच ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ मुकुंदराज यांची वाङ्मयमूर्ती आहे.
ओळख ‘विवेकसिंधु’ची
संतकवी मुकुंदराज यांनी शालिवाहन शके 1110 म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ लेखनाच्या आधी 100 वर्षे ‘विवेकसिंधु’ या ग्रंथाचे लेखन केले. या ग्रंथाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे -
1) हा ओवी छंदातील पद्य ग्रंथ आहे.
2) हा ग्रंथ गुरू-शिष्य संवाद रूप आहे.
3) हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैतवेदांत विचाराच्या अधिष्ठानावर आधारित आहे.
4) भगवद्गीतेप्रमाणेच हा ग्रंथ हा 18 अध्यायाचा (प्रकरणांचा) आहे.
5) या ग्रंथाची ओवी संख्या 1700 असून पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागात आहे.
‘विवेकसिंधु’ या ग्रंथाला ‘महाभाष्य’, ‘तत्त्वबोध’, ‘तत्त्वप्रबोध’, ‘परमार्थबोध’ आणि ‘विवेकार्णव’ अशा अनेक नावाने ओळखले व गौरवले जाते. मराठी भाषेत ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करण्याच्या उद्देशाने मुकुंदराजाने हा ग्रंथ लिहिला असून ग्रंथाचा मुख्य भर ‘ब्रह्मविचार’, ‘आत्मविचार’ असल्याने साहित्यातील नवरसांपैकी शांत रसाने हा ग्रंथ परिपोषित आहे. भक्तीपंथामध्ये ब्रह्मरस हा सर्व रसांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. त्या दृष्टीने पाहता ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ ब्रह्मरसाचे पारणे आहे, ब्रह्मरसाचा अमृतठेवा आहे. मुकुंदराजाच्या कवित्वाला परतत्त्वाचा दिव्य स्पर्श झालेला आहे.
‘वाचे बरवे कवित्व। कवित्वी बरवे रसिकत्व।
रसिकत्वी परतत्त्व। स्पर्शु जैसा।’ ज्ञानेश्वरीतील या ओवीचे विवेकसिंधु वाचताना वारंवार स्मरण होते.
म्हणोनि विवेकसिंधू येणे नावे। ग्रंथकिजैल स्वानुभवे।
तर्ही श्रोता अवधान देयावे। म्हणे मुकुंदराज॥ (अ.1.23)
अशी आपल्या ग्रंथारंभीच कवीवर्य मुकुंदराज यांनी श्रोत्यांना विनवणी केली असून हा ग्रंथ म्हणजे ‘स्वानुभवाधिष्ठित लेखन आहे’ असे स्पष्ट सांगतो. एवढेच नव्हे तर या ग्रंथवाचनाने श्रोते व वाचकांना ‘येची देही येचि डोळा। भोगिते मुक्तीचा सोहळा॥’ लाभेल अशी ठाम आत्मविश्वासाने मुकुंदराज प्रतिज्ञा करतात.
गुरू परंपरा ः मतमतांतरे
भारतीय ज्ञान परंपरा ही गुरुशिष्य परंपरा आहे. त्यामुळे आपल्या परंपरांमध्ये ‘आचार्य देवो भव।’ असे गुरूचे स्थान देवस्वरूप आहे. मुकुंदराजांची गुरुपरंपरा हा महत्त्वाचा विषय आहे. मुकुंदराज यांनी विवेकसिंधूंच्या 18व्या अध्यायामध्ये आपली गुरुपरंपरा दिलेली आहे. ती ओवी अशी -
आदिगुरू आदिनाथु। तेथौनि श्रीहरीनाथु।
तेयाचा शिष्य श्रीरघुनाथु। जो गुणसिंधु॥ (18.34)
यावरून मुकुंदराज हे नाथपंथीय अनुग्रहीत होते, असे दिसते. आदिगुरू आदिनाथ त्यांचे शिष्य हरिनाथ, हरिनाथाचे शिष्य रघुनाथ उर्फ रामचंद्र आणि या रघुनाथ-रामचंद्राचा शिष्य मुकुंदराज, अशी ही गुरुपरंपरा ‘विवेकसिंधु’तून मिळते. पण हे गुरू हरिनाथ कोण? ते महानुभव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधरस्वामीच असावेत, आणि रघुनाथ म्हणजे विदर्भात चक्रधरांना भेटलेला शिष्य रामदेव दादोस असावा. असे काही संशोधक म्हणतात. डॉ. भीमाशंकर देशपांडे मुकुंदराजांची वेगळीच गुरुपरंपरा सांगून तो आनंद संप्रदायी असल्याचे म्हणतात. आनंद संप्रदायात ‘विवेकसिंधु’ला अनन्यसाधारण महत्त्व असून सर्व मठात व शिष्यपरिवारात हा ग्रंथ श्रद्धेने संग्रही ठेवून वाचला जातो.
मराठीतून ब्रह्मतत्त्व निरूपण
मुकुंदराजाच्या ‘विवेकसिंधु’ची एका ओळीत ओळख करून द्यायची झाली तर,‘विवेकसिंधु’ हा ‘शंकरोक्तीवर आधारित ओवीबद्ध ब्रह्मतत्त्व निरूपण आहे.’ मुकुंदराज हे वेदविद्या पारंगत, ब्रह्मज्ञानी, साक्षात्कारी सत्पुरुष होते. ते संस्कृतमधूनही हा ग्रंथ लिहू शकत होते पण ब्रह्मविद्या, वेदांत प्रतिपादन करण्यास ‘मराठी’ भाषाही समर्थ आहे, हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले.
वेदशास्त्राचा मथीतार्तु। मियां बोलीला हा परमार्थु।
या व अशा ओव्यातून ‘विवेकसिंधु’चे नेमके स्वरूप काय आहे ते सहजपणे समजून येते. पूर्वीच्या काळी अध्यात्म, परमार्थ, ब्रह्मनिरूपण हे सारे संस्कृतमध्येच होत होते व त्या ज्ञानास वेदवंचित सर्वसामान्य मराठी समाज पारखा होता. सर्वसामान्य लोकांना ब्रह्मविद्या कळावी या उदात्त सामाजिक हेतूने मुकुंदराजाने मराठीत ब्रह्मविद्येचे निरूपण करण्याचे धाडस केले.
जेया नाही शास्त्र प्रतीती। नेणति तर्कमुद्रेची स्थिती।
तेया लागी मर्हाटीया युक्ती। केली ग्रंथरचना॥
वेदवंचित अशा सर्वसाधारण मराठी जनांविषयी राजयोगी मुकुंदराजाच्या ठायी केवळ करुणाच नव्हे तर वात्सल्यभाव आहे. मुुकुंदराजाचा ‘सूये जननी कृपाळु। अपत्य विषई॥’ वात्सल्याचा भाव, हेच त्याच्या ठायीचे संतत्व होय! वेदार्थ मराठीतून निरुपित करण्यास विरोध करणार्या तत्कालीन धर्ममार्तंड धुरिणांना मुकुंदराजांचे मोठ्या धाडसाने, मराठीत वेदांत का सांगायचा नाही? त्यात अपराध काय? असा खडा प्रश्नही केलेला आहे. तत्कालीन समाजस्थिती व धर्ममार्तंडाचे वर्चस्व पाहता असा प्रश्न करणेही मोठ्या धारिष्ट्याचे होते.
झळाळा दिसे विवेकाचा
परमार्थ विषयक ब्रह्मनिरूपण-वेदांत हा ‘विवेकसिंधु’चा प्रतिपाद्य विषय कठीण व क्लिष्ट असला तरी तो मुकुंदराजाच्या सुलभ, सरळ, अर्थगर्भ मराठी ओवीमध्ये सर्वजन सुसेव्य, वाचकप्रिय ठरलेला आहे. स्वाभाविकपणेच लोक, रसिक ‘विवेकसिंधु’ची तुलना पुढील काळात झालेल्या ज्ञानेश्वरीच्या काव्यसौंदर्याशी, दृष्टांत, रूपक कौशल्याशी करतात. ज्ञानेश्वर हे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेतच पण मुकुंदराजही ब्रह्मवीणावादिनी शारदेचा वरदहस्त लाभलेला सिद्धहस्त प्रतिभावंत कवी आहे. त्याची ओवी ज्ञानदेवाइतकीच गोड, सुलभ व आशयघन आहे.
जो मुकुंदराज आदिकवी। जयापासव उदभवे ओवी।
तयानि ग्रंथ अनुभवी। सिंधुविवेक हा केला।
अशा शब्दात मुकुंदराजाच्या ओवीचा ‘साधुविलास’ ग्रंथकर्त्या रामसुतांनी केलेला आहे आणि तो सार्थ आहे. स्वतः मुकुंदराज यांनाही आपल्या ओवीचा स्वाभिमान आहे. आपल्या ओवीची रसात्मकता व आशयसामर्थ्य यांची त्यांना नेमकी जाण आहे. परंतु ओवी केवळ सुंदर असून उपयोग नाही तर तिला परमार्थाचा स्पर्श नसेल तर ती व्यर्थ आहे असे मुकुंदराजाचे मत आहे.
ऊस फिरू दिसे काळा। परि घेपे रसाचा गळाला।
तैसे आरूषु बोल परि झळाळा। दिसे विवेकाचा॥
थोडक्यात मुकुंदराज काव्यसौंदर्यापेक्षा परमार्थबोधाला- विवेकाला अधिक प्राधान्य देतो.
‘विवेकसिंधु’चा गौरव व सामाजिक प्रभाव
मुकुंदराजाचे काव्य हे अर्थ व आशयसंपन्न आहेत तद्वत त्याचे ‘दृष्टांत’ आणि ‘रूपक’सुद्धा चपखल व चमकदार आहेत. काही संशोधक-समीक्षकांच्या मते ‘विवेकसिंधु’ची भाषा त्याच्या आद्यत्वाच्या तुलनेने प्राचीन वाटत नाही’. यावर अनेक आवृत्त्यांचे संशोधन करून, ‘विवेकसिंधु’ची पाठशुद्ध आवृृत्ती सिद्ध करणार्या श्री.कृ.पां.कुलकर्णींच्या मते लोकप्रियता, मौखिक पाठांतर, वाचन, प्रसार आणि अनेक प्रतिलिपीकरांच्या प्रतिलेखन व हस्तांतरामुळे ‘विवेकसिंधु’ची भाषा काहीशी अर्वाचीन वाटत असली तरी शब्द, त्यांचा वापर, शैली आदी अन्य अनेक घटक ‘विवेकसिंधु’च्या प्राचीनत्वाची व आद्यत्वाची ग्वाही देतात. विवेकसिंधु आद्य मराठी काव्यग्रंथ असल्याचे सिद्ध करतात.
मुकुंदराजाच्या ‘विवेकसिंधु’चा पुढील काळातील संतांच्या साहित्यात उल्लेख व परोक्ष-अपरोक्ष प्रभाव दिसतो. संत तुकाराम, संत रामदास, महिपती, मोरोपंत, कृष्णदयार्णव अशा अनेकांनी ‘विवेकसिंधु’चा गुणगौरव केलेला आहे. समर्थभक्त उद्धवसूताची ही ओवी पहा -
‘मुकुंदराज महासमर्थ। केला विवेकसिंधु ग्रंथ॥’.
तर केशवस्वामी म्हणतात -
मुकुंदराज पूर्ण ज्ञानी। अवतारपुरुष चिद्रत्नखाणी।‘’
तर पंडितकवी मोरोपंत,
‘वंदन नंदनसा मी करितो भावे मुकुंदराजाला।’ असे वंदन करतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात- ‘मराठी भाषेच्या वेषातला शांकरमठातला सुबोध वेदांतपाठ म्हणजे ‘विवेकसिंधु’ होय!’
‘विवेकसिंधु’ने समाजात स्वधर्मनिष्ठा जागवली आणि सामाजिक भेदाभेदावर मात करीत भक्तीच्या योगे पारमार्थिक समरसता व ऐक्य निर्माणाचे प्रयत्न केले. त्यामुळे महाराष्ट्र भूमीवर झालेल्या धर्मांध विदेशी आक्रमणांना व धर्मांध राजवटीतील धार्मिक जाचाला मराठी माणूस समर्थपणे तोंड देत स्वत्वाचे रक्षण करू शकला. अशा व्यापक अर्थाने ’विवेकसिंधु’चे पारमार्थिक, साहित्यिक आणि सामाजिक महत्त्व कालातीत आहे.
तो मार्ग कळिमाजी सुगम सर्वास जाला।
विवेकसिंधु बोधे दयार्णय निवाला । कृष्णदयार्णव
- लेखक संतसाहित्याचे उपासक, अभ्यासक आहेत.