माणसं जोडणारा संघ

---आणि घर संघाचे झाले

विवेक मराठी    15-May-2026
Total Views |
@अ‍ॅड. अंजली विवेक मुतालिक
rss 
संघाशी संबंध नसलेली एक मुलगी ते विद्याभारतीची कार्यकर्ती... हा प्रवास केवळ जबाबदार्‍यांचा नव्हता, तर तो माणसं समजून घेण्याचा आणि संस्कारांच्या शिदोरीचा होता. शुभ्र कपड्यांमागची ती निस्वार्थी ‘सफेदी’ आणि घरच्यासारखा जिव्हाळा जपणारी संघातील विविध व्यक्तिमत्त्वे आयुष्यात कशी विरघळली, याचे हे एक प्रांजळ आत्मकथन. कौटुंबिक स्नेह आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा मेळ घालणारे हे काहीसे खास असे अनुभवकथन
‘अंजू, तू मुलाचा फोटो न बघताही डोळे झाकून मुलगा पसंत करावा असा आहे. कारण यांच्या हॉलमध्ये भारतमाता, श्रीगुरुजी आणि डॉक्टर यांचे फोटो आहेत हो!’ अशी विधानं जेव्हा माझं लग्न ठरवत होते तेव्हा मला ऐकायला मिळाली होती. त्याआधी मी कराडला काकांसोबत त्यांची प्रभात शाखा, ध्वज बघितलेला होता. संघाची माझी ओळख इतकीच होती.
 
 
भारतमाता ठीकाय...पण ते डॉक्टर आणि श्रीगुरुजी कोण हे मला खोलात माहिती नव्हते. आमच्या गावीही जोशीभाऊ नियमित शाखा घेत असत. मी सिमेंट पाईपमध्ये बसून चोरून चोरून त्यांचे सर्व खेळ आत्मसात केलेले होते. कारण त्यात माझा आशिष दादा असे. मी मुलग्यांच्यात येऊन खेळू लागले की ते चिडवायचे ... पोरात पोरी लांडोरी....हे ऐकून मी आईकडे तक्रार घेऊन जात असे. ‘तुम्ही वेगळं खेळा...त्यांच्यात जाऊ नका...’ आईने इतकंच सांगितलं.
 
 
ते सारे कसे खेळतात तसे खेळ आम्ही सुरू केले. जसे खेळ आणि झेंडा लावतात तसे केवळ एक काठी समोर लावून मुलींना वासुदेव मंदिरात गोळा करून आम्ही सगळे खेळ खेळत असू. अर्थात त्याला शाखा म्हणतात हे मला त्यावेळी माहिती नव्हतं. यामधे तळ्यात..मळ्यात, असं करा.. तसं करा, शिवाजी म्हणतो..., झुल झुल झेंडा...झुल झुल, संघटन मे शक्ती है असं खूप मोठ्याने आरड मारून म्हणत होतो. तिथली गाणी म्हणत होतो. पण संघटन कशाशी खातात हे तेव्हा माहीत नव्हतं.
 
 
लग्नानंतर नवरामुलगा संघकाम करतो, त्याच्याकडे संघाची कायतरी जबाबदारी आहे असं समजलं. मी झोपून उठण्यापूर्वी हा नवरामुलगा पिंगुळीत वडाखाली मंदिराजवळ प्रभात शाखा लावून येत असे. याची नियमितता आणि सातत्य पाहून खूपजण तिथं जमायला लागले.
 
 
पण मला बघायला जायला जमत नसे. यांच्या बैठकीत..हो मीटिंग म्हणायचं नाही, मला प्रवेश वर्ज्य होता. पण त्यांची प्रत्येक मीटिंग संपल्यानंतर डायरीची मी पारायणं करायची. मला वाटायचं कायतरी अत्यंत महत्त्वाचा ठराव वगैरे घेतला असणार. पण यांची मीटिंग म्हणजे सत्र पहिले..विजेरी, दंतमंजन, समर्पण, समरसता असे मराठीतील जोड नव्हे जड शब्द हे वापरत असत. माझ्या मेंदूत कसला कसलाच समन्वय लागत नव्हता. पाठपुरावा म्हणजे फॉलोअप हे हळूहळू समजू लागले.
 
 
लग्नानंतर पहिल्या वर्षात जेव्हा आईबाबा माझ्या घरी आले तेव्हा मला सर्वांना झोपण्यासाठी जागा करायची होती. त्यात एक बेड इकडून तिकडे हलवायचा होता. तेव्हा हॉलमधे बसलेले दादा गोखले मला आपलेच दादा वाटले. त्यांच्या मदतीने मी बेड हलवून सगळे व्यवस्थित करून घेतले. बाबा म्हणाले, “तुला मी जवळचा की हे संघवाले?” मला दादा गोखले पाहुणे वाटले नाहीत ते खूपदा आमच्याकडे यायचे, राहायचे तर मी हक्काने त्यांच्याकडून मदत घेतली. नव्या आलेल्या नवरीला आपल्याच घरातला हा माणूस वाटणं आणि भावासारखी त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणं हे माझं मलाच खूप छान वाटलं.
 
 
दादा गोखले गाणी खूप छान म्हणतात. त्यांनी शिटी वाजवत गाणं म्हणावं आणि पटकन आपण ते ओळखून सांगावं...वागण्यात इतकी सहजता केवळ आपल्या माणसात असते. सहज त्या त्या घराशी एकरूप होणं...चाटूनपुसून पान स्वच्छ करणं, आपले कपडे अत्यंत खसखसून घासणं...कायम ते इतके शुभ्र राहतात कसे हा मला प्रश्न असायचा. साबण कोणताही असला तरी आणि संघवाला कोणताही असला तरी कपडे हे शुभ्र आणि स्वच्छच असणार. यांची सफेदी कायम उजवी. अस्सल नीळ दिलेली असते.
 
 
शशी कपूर दीवार सिनेमात म्हणतो ना,“तेरे पास क्या हैं?मेरे पास माँ है....” तसं या संघवाल्या लोकांकडे कधीही कशाची कमी नसते. यांच्या पाठीवरच्या काळ्या बॅगेत दुनिया सामावलेली असते. अगदी नेलकटर, ईअर बड, बाम, कात्री, चिकटपट्टी, साबण, कंगवा काहीही यांच्याकडे असतंच! ते कुठेही जाऊन तुमचं तेल कुठं असतं? जरासं पाहिजे होतं असा पाव्हनेर त्रास अजिबात देत नाहीत. आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे ती शशी कपूरवाली खरीखुरी भारतमाँ यांच्याच हृदयात वास्तव्यास असते. जगायला अजून काय हवे? जिथे जाईल ते ते घर आपलेसे करण्यात आणि तिथं राष्ट्रभक्ती मुरवण्यात हे अग्रेसर असतात.
 
 
माझ्याकडे जेव्हा विद्याभारती आणि जनकल्याणची जबाबदारी देण्यात आली तेव्हा आमच्या बाबा चांदेकर यांनी सांगितलं...“तुम्ही एकाशीच लग्न करा..एकाशी काडीमोड करून टाका. तरच योग्य न्याय देता येईल नाहीतर दोन्हीकडे तुमची पळापळ होऊन अपेक्षित काम होणार नाही.” ती गुरूआज्ञा मानून आजपर्यत मी विद्याभारतीशी एकनिष्ठ राहून सुखाचा संसार करत आहे.
 
 
लवू महाडेश्वर दादा उत्तम फोटोग्राफी करतात. त्यांच्या स्टुडिओत बसून त्यांची कला मला आवडायला लागली. चारचौघांना आवडतील असे फोटो मी त्यांच्यामुळे काढायला शिकले. त्यांची ओम्नी चालवून शिबिराच्या मैदानावर फिरवून कनाती तंबूकाम बघता आले.
 
मिलिंद देसाई काका यांच्यामुळे मला ‘राजद्वारे स्मशाने च य: तिष्ठती सबांधव:।‘ हे सुभाषित जगता आले आहे. मला यांच्यामुळे स्मशानात जायची सवय लागली आहे. तिथली माझी आणि माझ्या मुलाची भीती देसाई काकांच्या सोबतीने पळवून लावलेली आहे.
विद्याभारतीच्या कामासाठी भाई उपाले काका आले. त्यांनी मला केळफूल भाजी कशी करायची याची रेसिपी सांगितली. अजूनही मी ती भाजी तशा पद्धतीने करत असते. शिक्षणासोबत पाककलेत रस असणारे भाई काका. त्यांचा हा पैलू मनाला भावणारा!
 
 
गोव्याचे दिलीपराव बेतकेकर सर, धामापूर येथील देसाई यांची बिनभिंतीची शाळा पहायला आले होते. त्यांच्या नजरेतून मी ती शाळा पाहून घेतली. त्यांच्यातील सहज संवाद साधण्याची कला आवडून गेली. एकावेळी शंभर गोष्टी, पुस्तके, कथा डोक्यात ठेवणारे आणि पाय जमिनीवर असणारे ते एक अजब रसायन आहेत. त्यांनीही मला वेळोवेळी लिहिते राहण्याची प्रेरणा दिली आहे.
 
 
अतुलजी लिमये आणि जयंतराव सहस्त्रबुद्धे ही दोन्ही माणसं कितीही वेळा भेटली तरी दरवेळी नवनवीन ज्ञान पदरात टाकणारी होती. एखादं अमृतवचन, सुभाषित ओठावर घेऊन ते फिरत असतात.
 
लहान असताना बालवाडीत शिकणारा माझा मुलगा माझा हात झटकून धावतधावत संचलनात शिरला होता. आज तो डॉ. ओंकार घोडके आणि अमित नाईक दादा यांच्या संगतीत राहून सुरेल बासरी वाजवतो. कोणतेही गाणे तो बासरीवर पेटीवर वाजवतो तेव्हा एक आई म्हणून खूपच भारी वाटतं. हे सुरांचे देणे संघवाले कधी देऊन गेले समजलेच नाही.
 
 
तात्या रायकर काका यांच्या खूपदा भेटी होत असत. ते अत्यंत हुशार आणि एखादी गोष्ट सुरेख रितीने समजून देत असत. समरसता काय असते हे मला त्यांच्या वागण्यातून समजले. समरसता कार्यक्रमासाठी गेलेले तात्या रायकर कार्यक्रम संपल्यानंतर त्या वाडीत सर्वांबरोबर जेवून आले. तेव्हापासून आंबेडकर वस्तीतले बरेच जण आजतागायत संघाशी जोडले गेलेले आहेत. रायकर काका शेवटपर्यंत त्यांचं हे माणसं जोडण्याचं काम करत राहिले. त्यांची लाल रंगाची प्लेझर कितीतरी वर्षे जतन करून त्यांच्या पवित्र स्मृती आम्ही जपत आहोत.
 
 
असे कितीतरी संघवाले मला जवळून पाहता आले. त्यांच्या सद्गुणांची मला माझ्या आयुष्यात टप्याटप्यावर आठवण होत असते.